रा. वि. भुस्कुटे यांचा आदिवासींसाठी लढा! (R.V.Bhuskute – Activist for the cause of Downtrodden)

1
71

रा.वि. भुस्कुटे

रा.वि.भुस्कुटे ऊर्फ भाऊ भुस्कुटे यांचे जीवितकार्य 16 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आले. त्यावेळी ते पंच्याण्णव वर्षांचे होते. ते त्यांच्या ध्येयासाठी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत जगले आणि झटले. भाऊ हे खडतर जीवनध्येय घेऊन कसे जगले असतील हा विचार मनात येतो, तेव्हा त्यांनी निवृत्तीनंतर लिहिलेल्या हक्क नोंद या पहिल्या पुस्तकाची आठवण होते. त्या पुस्तकाची अर्पणपत्रिका बोलकी आहे. भारताच्या स्वांतत्र्य लढ्यातील एक सेनानी, महाराष्ट्रातील एक चिंतनशील निर्भीड साहित्यिक, मार्क्सवादाचे आणि समाजवादाचे आद्य प्रचारक, ऐतिहासिक मुळशी सत्याग्रहाचे प्रवर्तक, किसान चळवळीचे-शेतमजूर संघटनेचे संस्थापक व संघटक आणि ज्यांनी आम्हांला अन्यायाविरूद्ध अखंड संघर्ष करण्याची प्रेरणा देऊन कृतज्ञ केले त्या आमच्या जन्मदात्याला कॉ. विनायक महादेव भुस्कुटे यांच्या स्मृतीला अर्पण.कॉ. विनायक हे भाऊंचे पिताजी. भाऊंचा जन्म 6 ऑक्टोबर 1925 रोजी झाला. ते एम ए (एकॉनॉमिक्स) झालेले होते. त्यांनी विद्यार्थिदशेत 1942 च्या चले जावच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. त्यावेळी त्यांना येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले होते. भाऊ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या सेवेत रुजू 1949 मध्ये झाले व तहसिलदार या पदावरून निवृत्त 31 ऑक्टोबर 1983 रोजी झाले.

ते निवृत्तीनंतर शेवटचा श्वास घेईपर्यंत सलग पस्तीस वर्षे अथकपणे त्यांच्या ध्येयाशी बांधील कार्यमग्न राहिले. भाऊंना संघर्ष करण्याची, अन्यायाशी झगडण्याची आणि शेतकरी व शेतमजूर यांच्या कल्याणाकरता कार्य करण्याची उमेद वडिलांकडून मिळाली. तिचे दर्शन त्यांच्या त्या अथक कष्टांत होते. भाऊंनी त्या काळात भूषवलेली पदे –  अ. विश्वस्त – महाराष्ट्र आदिवासी सेवा मंडळ ब. अध्यक्ष- आदिवासी पुनर्वसन आंदोलन, क. उपाध्यक्ष – श्रमिक मुक्ती संघटना (मुरबाड), सल्लागार – विकास सहयोग प्रतिष्ठान (गोरेगाव),सर्वहारा जन आंदोलन (माणगाव), जागृत कष्टकरी संघटना (कर्जत), घर हक्क परिषद (विलेपार्ले, पेण).

      

 

    भाऊंनी निवृत्त झाल्यानंतर 1985 ते 2008 च्या दरम्यान एकोणचाळीस पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी महत्त्वाची पुस्तके : 1. हक्कनोंद – त्या पुस्तकाच्या पाच आवृत्ती निघाल्या आहेत. भारतीय जमीन पद्धतीचा इतिहास. भाऊ त्या पुस्तकात लिहितात, भारतातील सर्व राज्यांचे व सम्राटांचे सर्व काळ उत्पनाचे मुख्य साधन जमिनीवर आकारलेला कर (महसूल) हेच राहिले आहे. ते राजे, सम्राट आर्यन असोत, विद्वान द्राविडियन असोत, मोगल असोत, ब्रिटिश असोत की स्वातंत्र्यानंतरचे स्वकीय असोत; जमीन उत्पादनाचा 1/6, 2/5, 1/4 किंवा त्यापेक्षा जास्त महसूल घ्यायचा हा त्यांच्या चर्चेचा मुख्य मुद्दा असे. दक्षिणेतील विजयनगरचे हिंदू राजे न्यायी म्हणून विख्यात होते. त्या राज्याचे प्रधान विद्यारण्यस्वामी यांची विचारधाराजो राजा उत्पनाच्या एक अष्टमांशपेक्षा जास्त महसूल प्रजेकडून घेईल तो जगात दुर्जन ठरेल आणि त्यास मृत्यूनंतर नरकामध्ये आगीत टाकले जाईलअशी होती. जमिनीच्या विविध धारणा पद्धती; जमिन मोजणीचे अनेक प्रकार – शिवशाही काठी, श्रीपाद कौलकाठी, मलिक अंबर पद्धती; महसुली पदे-अधिकार पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे वगैरे. इत्यादींविषयी अभ्यासू व कुतूहल जागवणारी ऐतिहासिक विविध माहिती भाऊंनी त्यांच्या पुस्तकातून दिली आहे व वर्तमान काळातील विसंगतीही दर्शवल्या आहेत.

2. आदिवासी कायदे – आदिवासींच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी अनेक योजना व कायदे केले आहेत. भाऊंनी पुस्तक आदिवासींचे शोषण थांबवावे, त्यांना जुलूम व अत्याचार यांच्यापासून संरक्षण मिळावे, त्यांचा आर्थिक विकास व्हावा, त्यांना त्यांच्या हक्कांची माहिती व जाणीव व्हावी म्हणून लिहिले आहे.

3. आदिवासी वनहक्क मान्यता – आदिवासींच्या वनहक्कांविषयीचे सर्वसामान्य ज्ञान, वाचकांस आणि वनात व वनाच्या आजुबाजूला वस्ती करून राहणाऱ्या आदिवासी बांधवांना व्हावे आणि त्यांनी त्या हक्कांसाठी लढावे, संघर्ष करावा या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या मुलानेच (जयंत भुस्कुटे) ते पुस्तक प्रकाशित केले आहे.

4. ग्रामपंचायत – जमीनविषयक हक्क आणि कर्तव्ये – ग्रामपंचायती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. त्या सत्तेचे विकेंद्रीकरण करून, स्थानिक पातळीवर लोकशाही पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडवावेत म्हणून निर्माण केल्या गेल्या. त्या संस्थाचे हक्क, अधिकार व कर्तव्ये आणि त्या परिसरातील व्यक्तिगत व सार्वजनिक जमिनीविषयी माहिती व मार्गदर्शन या पुस्तकात आहे.

5. तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायदा 1947 व नियम 1959 – भाऊंनी ते पुस्तक हा कायदा कोणता हेतू साध्य करण्यासाठी केला आहे, कायद्याच्या तरतुदी व अंमलबजावणी याविषयी सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने लिहिले आहे. त्याशिवाय त्यांनी दोन इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. ती मुकंद प्रकाशनयांनी प्रसिद्ध केली आहेत.

भाऊंना मिळालेले पुरस्कार- 1. महाराष्ट्र फांऊडेशनतर्फे वैशिष्टयपूर्ण समाजकार्यासाठी (4 जानेवारी 1997), 2. सामाजिक न्याय प्रतिष्ठान पुरस्कार (29 एप्रिल 2000).

 

भाऊंची आणि माझी ओळख झाल्यानंतर भेटीगाठी अनेक वेळा झाल्या. भाऊ प्रत्येक वेळी आदिवासींवर कनिष्ठ न्यायालयाकडून विरूद्ध गेलेल्या निकालाविरूध्द वरिष्ठ महसूल न्यायालयाकडे किंवा उच्च न्यायालयाकडे अपील अर्ज (याचिका) करण्यासाठी मला सांगत व त्यासाठी हवी ती मदत, सहकार्य करत. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ हा चौपदरी करण्यासाठी सोळा गावांतील बेकायदेशीरपणे वापरलेल्या जमिनीच्या भरपाईची किंमत सुमारे चार कोटी एकतीस लाख एक्याऐंशी हजार चारशेपंधरा रुपये सरकार व महामार्ग प्राधिकरण आदिवासींना अदा करत नव्हते. मी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका भाऊंच्या मदतीने ती रक्कम आदिवासींना मिळण्यासाठी दाखल केली. त्यावर निर्णय होऊन ती रक्कम आदिवासी बांधवाना मिळाली. भाऊंनी त्याकरता केलेल्या संघर्षासाठी नंतर आदिवासी बांधवानी त्यांचा मोठा नागरी सत्कार घडवून आणला. भाऊ देव मानत नव्हते, पण आदिवासी बांधव भाऊंना देव मानत होते!
(जनपरिवार, 5 ऑक्टोबर 2020 वरून उद्धृत, संस्कारीत)

अतुल आल्मेडा 9673881982 atulalmeida@yahoo.co.in

अतुल आल्मेडा हे वसई येथे राहतात. ते मानवता धर्म मानणारे आहेत. त्यांचा अंधारातील वाटाहा लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सुधारककार गोपाळ गणेश आगरकरहा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.


———————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. चांगली माहिती वाचावयास मिळाली.कर्तव्यनिष्ठ व समाजाभिमुख अधीकारी दुर्मिळ होत चालले आहेत हीच खरी शोकांतिका आहे.नवीन पिढीसमोर चांगले आदर्श आपण ठेवत आहात.पण नवीन पिढी असले वाचन किती करते यांविषयी शंकाच आहे.शिक्षकांनीच विचारशील होवून विद्यार्थ्यांमधे समाजसेवेची भावना रूजवणे गरजेचे आहे असे मला वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here