मिलिंद पराडकर यांच्या पुस्तकाचे जुलैमधील गिरिमित्र संमेलनात (2011) प्रकाशन झाले, तो क्षण त्यांच्यासाठी स्वप्नपूर्तीचा होता! ते स्वप्न त्यांच्या आईने पाहिले होते. मिलिंदने गडदुर्गांचा जो अभ्यास केला तो पुस्तकरू पाने यावा असे तिला वाटे. तो क्षण आला पण तोवर ती मात्र राहिली नव्हती! आईला तसे वाटणे हे स्वाभाविक होते, कारण मिलिंदच्या वेडाचे, छंदाचे रूपांतर तिच्याच समोर अभ्यासात होत गेलेले तिने पाहिले होते. मिलिंदला त्याच्या या अभ्यासामधून पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. मात्र त्यासाठी त्याने काही वर्षे अपार मेहनत घेतली.
मिलिंद सांगत होते, ‘या अभ्यासादरम्यान काही अभूतपूर्व माहिती माझ्या हाती आली. रायगडावरील इमारती लांबीरुंदीचे जे प्रमाण योजून रचल्या गेल्या ते सूत्र मला गवसले. ते मी साधार अन सचित्र असे प्रबंधात मांडले आहे’.
‘प्राचीन भारतीय दुर्गशास्त्र आणि हिंदवी स्वराज्याच्या दोन राजधान्या- राजगड व रायगड : एक तुलनात्मक अभ्यास’ हा त्यांचा प्रबंधविषय. मिलिंद यांचा प्रबंध फेब्रुवारी 2008 ते मार्च 2010 ह्या काळात लिहून पूर्ण झाला. त्याचे पुस्तकरूपातील प्रकाशन संमेलनात झाले. सर्वच गिर्यारोहकांच्या दृष्टीने तो अभिमानाचा क्षण होता. गेल्या दोन-तीन दशकामध्ये गिरिभ्रमणाचे वेड खूप वाढत गेले आहे. परंतु ते छंदाच्या, हौशीच्या, किंवा फारतर सामाजिक कार्याच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटत आले आहे. या विषयाचा अभ्यास फार थोड्या लोकांनी केला.
मिलिंदना 1978 सालापासून पदभ्रमण आणि गिर्यारोहण हे वेड लागले. त्यांना ज्येष्ठ साहित्यिक आणि दुर्गप्रेमी गो.नी.दांडेकर ह्यांच्या सहवासात, गड-किल्ल्यांत फिरणे म्हणजे केवळ मजा नव्हे तर तो अभ्यासाचा विषय आहे ह्याचे भान आले. त्यामुळे त्यांना गडांचा ऐतिहासिक ऐवज, गडांवर घडलेल्या घटना यांची जाण आली आणि तीच ओढ त्यांना एका वेगळ्या विश्वात घेऊन गेली.
एका मित्राने त्यांना 1988 साली ‘दुर्गांच्या वाटा भटकणे’ ह्या विषयाचा गंभीरपणे विचार करून, त्यांवर पीएच.डी. करावी असे सुचवले. त्यातून त्यांचे भटकणे जास्त डोळस झाले. शिवछत्रपती हे त्यांचे दैवत. राजगड आणि रायगड या शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या दोन राजधान्या. एक अभिषिक्त तर दुसरी अनभिषिक्त. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्व घटना त्या दोन दुर्गांनी पाहिल्या आहेत. मिलिंदंना ते दुर्ग भटकताना राजांच्या कर्तृत्वाचा अस्सल प्रत्यय येत गेला. त्यांचे मन प्रत्येक नवीन आकलनाबरोबर भारावून जाई. अभ्यासाच्या दरम्यान त्यांचे इतर दुर्गतर भटकून झालेच; पण त्यांच्या राजगड आणि रायगड या दोन्ही दुर्गांच्या प्रत्येकी जवळपास तीनेकशे वार्या घडल्या.
मिलिंद सांगत होते, प्रत्येक वारीत नवीन विचार मिळत होता; नवीन माहितीचा खजिना नवीन रंगात समोर येत होता. त्याचा सतत विचार करणे, ते विचार तर्कसंगत मनात मांडणे आणि नंतर कागदावर उतरवणे, ते तपासण्यासाठी मार्गदर्शक सर अरविंद जामखेडकर ह्यांच्याकडे देणे, त्यांनी ते वाचून-तपासून पाठवणे ह्या प्रक्रियेत दीड वर्ष स्वप्नवत गेले आणि प्रबंध आकाराला आला.
काही महत्त्वाचे निष्कर्ष त्यांच्या हाती लागले आहेत. दुर्गांचा रचनाकाल शास्त्रीय पुराव्यानिशी सातवाहनांपर्यत, म्हणजे जवळजवळ पाचशे वर्षे मागे ढकलण्यात त्यांना यश लाभले आहे. आपल्या ह्या यशात त्यांचे कुटुंबीय, गुरुवर्य गोनीदां आणि डॉ. अरविंद जामखेडकर व समग्र मित्रमंडळ यांचा मोठा वाटा आहे असे ते म्हणतात. त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे आणि ते सगळ्यांचे लाडके आहेत. गड-किल्ल्यांवरचे त्यांचे भाष्य ऐकताना सगळे भारावून जातात.
लहानपणापासून मुंबईत वास्तव्य असणारे आणि सर्व शिक्षणही मुंबईतच झालेले मिलिंद वयाच्या सोळाव्या वर्षापासून नोकरी करू लागले. त्यांनी पदवी मिळवली (1980). त्यांनी 1981 ते 1995 ह्या काळात ‘लार्सन अॅण्ड टुब्रो ’मध्ये नोकरी केली. त्यांनी नोकरी करत असतानाच प्राचीन भारतीय संस्कृती हा विषय घेऊन एम.ए.ची पदवी मिळवली (1990). त्यांनी ‘एलअॅण्डटी’ची नोकरी 1995 मध्ये सोडली, स्वत:चा चौदा वर्षे ग्राफिक डिझानर म्हणून व्यवसाय केला. तेथे त्यांच्या काँम्प्युटर आणि ग्राफिक सॉफ्टवेअरच्या ज्ञानाचा उपयोग झाला. ते मुलांसाठी आणि इतरेजनांसाठी ऐतिहासिक किल्ल्यांच्या भेटीचे आयोजन 1998पासून करत आहेत. ते कॉर्पोरेट क्षेत्रातल्या लोकांसाठीही प्रोग्रॅम आखतात व कार्यान्वित करतात. ‘होरायझन’ ही त्यांची संस्था.
त्यांनी आता एक नवीन आव्हान स्वीकारले आहे. त्यांना एशियाटिक सोसायटी ऑफ इंडियाची स्कॉलरशिप मिळाली आहे. ते गडकिल्ल्यांचा कालक्रमानुसार अभ्यास करत आहेत. (Chronology). त्यांना साल्हेर ते जिंजा ह्या किल्ल्यांचा अभ्यास करायचा आहे. तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडू ह्या पाच राज्यांचा परिसर आहे. ते टिमवर्क आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम चालले आहे.
मॅजेस्टिक प्रकाशनाने त्यांच्या दोन ऐतिहासिक कांदबर्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांनी दैनिके आणि मासिके यांमधून बरेच लिखाण केले आहे. सह्याद्रीच्या भटकंतीवर रिचर्ड बाख यांच्या ‘जोनाथन लिव्हिंगस्टोन सीगल’ ह्या कांदबरीचे त्यांनी केलेले भाषांतर प्रकाशित होण्याच्या मार्गांवर आहे. त्यांनी तुळसीदासाच्या ‘रामचरितमानस’चे मराठीत गद्य-रूपांतर केले आहे. त्यांनी समर्थ रामदासांच्या ‘रामायणा’चाही गद्यात अनुवाद केला आहे.
रायगड आणि राजगडावरच्या प्रबंध-ग्रंथामध्ये समाविष्ट असलेली, त्या ग्रंथाच्या आकर्षणाचा भाग असलेली सुंदर, आकर्षक छायाचित्रेही त्यांनी स्वत: काढलेली आहेत. त्यातून त्यांच्या छायाचित्रण-कौशल्याच्या पैलूचे उत्तम दर्शन घडते. त्यांच्या किल्ल्यांवर आधारित फोटोंची चार प्रदर्शने मुंबई आणि पुण्यात भरवण्यात आली होती.
त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व किल्ल्यांची वेबसाईट डिझाईन केली आहे, पण ती अपडेट करायला त्यांना गिरिप्रेमींचे सहाय्य हवे आहे. त्यांनी तसे आवाहन केले आहे. ‘कोणत्याही किल्ल्याच्या नवीन निरीक्षणाचे, माहितीचे इथे स्वागत होईल’ असा त्यांचा संदेश आहे.
गडकिल्ले भटकता-भटकता संशोधनाच्या वाटेवर वळलेल्या, ‘ऐतिहासिक दृष्टिकोनातून किल्ले पाहणारे, स्वत: त्यात रमून आणि इतरांना रमवून टाकणार्या मिलिंद यांची इच्छा आहे की त्यांच्या ग्रंथाच्या वाचनाने सर्वसामान्यांच्या मनातही महाराष्ट्रदेशी पसरलेल्या दुर्गांविषयी आपलेपणा वाढावा.
ज्योती शेट्ये – भ्रमणध्वनी : 9820737301, इमेल :jyotishalaka@gmail.com
संपर्क – मिलिंद पराडकर , जी/706, हाय ब्लिस, धायरी-नाहे रस्ता, धायरी, ता. हवेली, पुणे 411041, भ्रमणध्वनी : 9619096347, इमेल : discover.horizon@gmail.com
श्री मिलींद पराडकर यांचा
श्री मिलींद पराडकर यांचा गडकिल्ल्यांविषयीचा संशोधनात्मक अभ्यास मला खूपच आवडला. त्यांचे पुस्तक मी नक्की वाचेन.
सरांची पुस्तकं म्हणजे पर्वणी…
सरांची पुस्तकं म्हणजे पर्वणी असते. सरांच्या ज्ञानाचा फायदा मला वेळोवेळी झाला आहे आणि भविष्यातसुद्धा होत राहील. सरांच्या संस्थेमार्फत म्हणजेच होरायझन्स तर्फे प्राचीन भारत संस्कृतीबंध मध्ये सर्टिफिकेशन कोर्स केला तेव्हा सुद्धा सरांनी आम्हांला भरभरून दिले.
Comments are closed.