राम सुतार हे स्वातंत्र्योत्तर भारतीय स्मारकशिल्पांच्या इतिहासातील एक मानकरी. त्यांना गुरुस्थानी मानणारे मोठे शिल्पकार होऊन गेले. त्यामध्ये मुंबईचे विनय वाघ, विजयवाड्याचे बीएसव्ही प्रसाद यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. शिल्पकलेला 1960 नंतर नवनवे फाटे फुटत गेले. त्यातील एक शाखा म्हणजे स्मारक-शिल्पे. ती शाखा मुख्यत: भावनेशी निगडित असल्याने त्या प्रकारच्या कलेस राजाश्रय व लोकाश्रय अधिक मिळाला. प्रचंड आकाराची शिल्पे हे राम सुतार यांचे वैशिष्ट्य. राम सुतार यांना केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडून ‘रवीन्द्रनाथ टागोर संस्कृती पुरस्कार’ (2016) मिळाला, त्यावेळी त्यांचे वय ब्याण्णव होते! राम सुतार यांनी, स्टुडिओ 1960 साली थाटला. म्हणजे कामगिरी औपचारिकपणे सुरू केल्यावर छपन्न वर्षांनी. त्यांनी घडवलेले पुतळे – संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (18 फूट), इंदिरा गांधी (17 फूट), राजीव गांधी (12 फूट), गोविंदवल्लभ पंत (10 फूट) आणि जगजीवनराम (9 फूट). त्यांनी गांधी आणि आंबेडकर यांचेही अनेक पुतळे घडवलेले आहेत, त्यांनीच रवीन्द्रनाथ टागोर यांचा टोकिओतील पुतळा निर्मिलेला आहे. भारत सरकारने त्यांच्या स्टुडिओत घडलेले गांधीजींचे अनेक अर्धपुतळे परदेशांना भेट म्हणून दिलेले आहेत.
नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडवणारी भित्तिशिल्पे हेही सुतार यांचे वैशिष्ट्य. दिल्लीत राजीव गांधी यांची कामगिरी वर्णन करणारे भित्तिशिल्प; तसेच, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पिढ्यांची कारकीर्द एकत्रित मांडणारे मोठे भित्तिशिल्प राम सुतार यांच्या कल्पनेतून साकारले आहे. त्यांनी ते तिशीच्या आतबाहेर असताना (1952 ते 58) आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनवण्याचे काम सरकारी नोकरीचा भाग म्हणून केले, स्मारकशिल्पांबाबतची त्यांची दृष्टी तेथे विकसित होत गेली.
राम सुतार सात-आठ वर्षांचे असताना महात्मा गांधी गोंडूरला आले होते. त्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यलढ्याचा भाग म्हणून विदेशी वस्तू जाळण्याचा कार्यक्रम होता. गर्दीत उभ्या असलेल्या राम सुतार यांच्यापाशी मखमलीची गोल टोपी होती. त्यांना कोणी तरी ती पण विदेशी असून होळीत टाकली पाहिजे असे सांगितले आणि तेथून त्यांचा महात्मा गांधी यांच्याशी नकळत जोडला गेलेला ऋणानुबंध त्यांच्या शिल्पकलेला चालना देणारा ठरला. सुतार विनोबा भावे यांच्या नित्य संपर्कात होते.
सुतार यांना त्यांचे मूर्तिकौशल्य हेरून चित्रकलेच्या शिक्षकांनी 1948 साली गांधी यांचा पुतळा बनवण्यास सांगितला. त्यांना त्या पुतळ्यादाखल शंभर रुपयांचे बक्षीस मिळाले. सुतार यांनी नंतर शेजारच्या गावात तशीच गांधी मूर्ती बनवून दिली. तेथे त्यांना तीनशे रुपये मिळाले. सुतार यांना त्यांच्या कारकिर्दीला महात्मा गांधी यांचा आशीर्वाद लाभला असेच वाटले. तेव्हापासून महात्मा गांधी यांचा पुतळा हा त्यांची खासियत बनून गेला.
चंबळ नदीवरील गांधीसागर धरणानजीकचे ‘चंबळा आणि तिला बिलगलेली दोन बालके’ (बालके हे या धरणाचे लाभ मिळणाऱ्या मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे प्रतीक) असे पंचेचाळीस फुटी शिल्प, हा त्यांच्या कलेतील ‘भारतीयते’चा आदर्श मानला जातो. त्यांनी गंगा आणि यमुना, हरिजन आणि गांधी अशी शिल्पेही त्याच प्रकारे घडवली आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित आंबेडकर स्मारक आणि चिनी बनावटीचा सरदार पटेल यांचा पुतळा… ही उंचीत एकमेकांशी स्पर्धा करणारी तिन्ही स्मारकशिल्पे राम सुतार यांच्या मूळ कल्पनेतून उतरली आहेत. ते दिल्लीत गेले अर्धशतकभर राहत होते.
ते मॅट्रिकच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. मॅट्रिकची परीक्षा सुरू असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. चित्रकला शिक्षक श्रीराम जोशी यांनी सुतार यांना घडवले. राम सुतार यांनी 1947 साली बॉडी बिल्डरचा पहिला पुतळा बनवला.
सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पाचशेबावीस फूट उंचीचा पुतळा साकारण्यात त्यांच्या शिल्पकलेची आणि कल्पकतेची कसोटी लागली. तो गुजरातमध्ये सरदार सरोवर येथे आहे. पुतळ्याचे भाग चीनमधील फौंड्रीत बनवण्यात आले. ते तेथून सरदार सरोवरच्या प्रकल्पस्थळी नेण्यात आले. एल अँड टी कंपनीने प्रकल्पस्थळी काँक्रिटचा भव्य ब्लॉक बांधला. त्यातूनच वर जाणाऱ्या लिफ्टची सोय केली आणि ब्लॉकच्या बाजूने कास्टिंग केलेले भाग लावून वेल्डिंग केले गेले. त्यासाठी मोठमोठ्या क्रेन्सचा वापर केला गेला. सुतार म्हणतात, ‘माझे काम फिनिशिंग करण्याचे होते. त्या संपूर्ण प्रकल्पात कोठेही अडचणी आल्या नाहीत. सर्व कामे पद्धतशीरपणे झाली. पुतळ्याच्या सर्व भागांची पूर्वनियोजित पद्धतीने जुळणी झाली’, सुतार कास्टिंग सुरू असताना प्रत्यक्ष उभे राहून पाहणी करत. त्यावेळी त्यांचे वय चौऱ्याण्णव वर्षांचे होते.
त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावी ‘विश्वकर्मा सुतार’ समाजात 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला. राम सुतार यांचे वडील वनजी लाकडी वस्तू व कृषी अवजारे बनवायचे. राम यांना वडिलांकडूनच कलाकुसरीच्या वस्तू साकारण्याचे कौशल्य मिळाले. त्यांनी प्रतिरूपण व शिल्पकलाविषयक पदविका मिळवली (1953). त्यांनी प्रतिरूपणासाठी (मॉडेलिंग) प्रतिष्ठेचे मेयो सुवर्णपदक जिंकले. त्यांचा विवाह प्रमिला चिमठणकर यांच्याशी 1952 मध्ये झाला. त्यांना ‘साहित्य कला परिषद’, नवी दिल्ली; ‘बाँम्बे आर्ट सोसायटी’ या संस्थांचेही पुरस्कार मिळाले आहेत. ते ‘ऑल इंडिया फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट्स सोसायटी’, नवी दिल्ली आणि ‘ऑल इंडिया स्कल्प्टर्स फोरम’चे सदस्य होते. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
त्यांचा स्टुडिओ नोएडामध्ये आहे. ते वयाची नव्वदी उलटली तरी पायांवर उभे राहून शिल्प साकारत. त्यांच्या शिल्पकलेचा वारसा मुलगा अनिल, नातू समीर व नात सोनाली हे चालवत आहेत. अनिल आर्किटेक्ट असून त्यांनी अमेरिकेत मास्टर्सची पदवी मिळवली आहे.
राम सुतार यांच्या स्टुडीओचा संपर्क 120-3259406, 4310801
स्टुडीओ –
http://ramsutar.in/studio.php
अनिल सुतार 981-008-0319,
anilramsutar@gmail.com
– नितेश शिंदे
info@thinkmaharashtra.com
(संकलित)
Manniy Sir Ram V Sutar…
Manniy Sir Ram V Sutar yanchi khoopch chhan mahiti ahe.
Comments are closed.