सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धामणगाव गढी येथे सर्व लोक आकर्षित होतात ते तेथील रमेश जोशी यांच्या रोपवाटिकेबाबत ऐकून. धामणगाव गढी येथील साधा अल्पशिक्षित मोटर मेकॅनिक ते जोशी रोपवाटिकेचे संचालक रमेश जोशी या भन्नाट व्यक्तिमत्त्वाची ती किमया आहे. त्यांनी लाख-दीड लाख रोपट्यांची वाटिका तयार केली आहे ! त्यांच्या रोपवाटिकेमध्ये क्वचितच एखादे असे रोपटे असेल जे तुम्हाला मिळणार नाही…
जेमतेम हजार-दीड हजार लोकसंख्या असलेल्या धामणगाव गढीच्या गावात रमेश जोशी यांनी लाख-दीड लाख रोपट्यांची वाटिका तयार केली आहे ! त्यांच्या रोपवाटिकेमध्ये क्वचितच एखादे असे रोपटे असेल जे तुम्हाला मिळणार नाही. एखाद्या वृक्षप्रेमीने दुर्मीळ वनस्पतीचे नाव काढावे, जर त्याला पुढील भेटीत ते झाड रमेश जोशी यांच्याकडे उपलब्ध झाले नाही तरच नवल ! ती वाटिका कोलकाता, बंगलोर, पुणे, गोवा अशा अनेकविध भागांतून आणलेल्या दुर्मीळ रोपट्यांनी सुसज्ज व समृद्ध झाली आहे. प्रत्येक रोपट्याची माहिती व त्याचे विविध उपयोग रमेश यांना मुखोद्गत आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले मेळघाट प्रसिद्ध आहे ते वाघांसाठी. पर्यटकांना मेळघाटातील नैसर्गिक सौंदर्य, प्राणी, खवा, स्ट्रॉबेरी, मध व कॉफी या गोष्टी भुरळ घालतात. त्याचप्रमाणे, सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धामणगाव गढी येथे सर्व लोक आकर्षित होतात ते तेथील रमेश जोशी यांच्या रोपवाटिकेबाबत ऐकून. धामणगाव गढी येथील साधा अल्पशिक्षित मोटर मेकॅनिक ते जोशी रोपवाटिकेचे संचालक रमेश जोशी या भन्नाट व्यक्तिमत्त्वाची ती किमया आहे...
रमेश जोशी यांचे मूळ गाव धामणगाव गढी हेच. त्यांच्यापुढे रोजगाराचा प्रश्न दहावी झाल्यावर, 1982 साली बिकट होता. आर्थिक परिस्थिती अशी, की त्यांना पायात चप्पल घालण्याससुद्धा तब्बल पंचवीस वर्षे नव्हती. त्यांनी ऑईल मिलमध्ये काम करून पाहिले. धामणगाव गढी या गावातून चिखलदरा रस्ता जात असल्याने त्यांनी एका कडुनिंबाच्या झाडाखाली एकदोन पाने (स्पॅनर) घेऊन मोटर मेकॅनिकचे कार्य सुरू केले. त्यांनी मेकॅनिकगिरीला त्याच ठिकाणी वाहनाच्या पंक्चर दुरुस्तीचा नवीन व्यवसाय जोडला. त्यांना झाडाखाली काम करताना वेगळाच सुखद अनुभव येई. त्यांना झाडाच्या सावलीमुळे काम करताना कधी थकवा जाणवला नाही. त्यांच्या मनी विचार आला, की एका झाडामुळे मला एवढी शांतता व सुख मिळत आहे तर हे सुख इतरांनासुद्धा द्यायला हवे ! त्यांनी झाडांपासून कलमे बनवण्याचे तंत्र अवगत केले. तयार झालेली रोपटी परिसरात व जंगलात लावण्यास सुरुवात केली. लोक वेगवेगळ्या झाडांची मागणी त्यांच्याकडे करू लागले. त्यामुळे त्यांनी रस्त्यानजीक जागेवर छोटेखानी रोपवाटिका उभारली ! छोट्याशा खेड्यातील खाजगी मालकीची जिल्ह्यातील ती पहिलीच रोपवाटिका ! त्यांची परिसरातील लोक व चिखलदरा पर्यटनाला येणारे लोक यांच्यामुळे ‘रमेशभाऊ जोशी नर्सरीवाले’ अशी नवीन ओळख निर्माण झाली !
त्यांनी रस्त्याच्या कडेला अकरा हजार चौरस फूट जागा 1996 मध्ये खरेदी केली. विहीर खोदून रोपांसाठी पाण्याची व्यवस्था 2002 मध्ये केली. वृक्ष व रोपांची संख्या वाढवली. विविध आकाराच्या सापांचे दर्शन तेथे वरचेवर होई. जोशी यांनी त्या जागी नागदेवतेचे मंदिर उभारले. गुणवंत महाराजांची पालखी दरवर्षी वारीदरम्यान जोशी यांच्या निवासस्थानी येऊ लागली. कवी गणेश देशमुख यांनी गुणवंत महाराजांवर आधारित ‘गुणवंत महापुराण’मध्ये सव्वीसाव्या अध्यायामध्ये रमेश जोशी यांच्या कार्याची दखल घेतली आहे.
एका कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीपासून प्रेरणा घेऊन सुरू झालेला प्रवास लक्ष रोपांची वाटिका म्हणून नावलौकिकास आला आहे. रमेश यांना मराठी व हिंदी वगळता स्थानिक परिसरातील पाच भाषा अवगत आहेत. त्यात आदिवासी, धनगरी, गवळी, मानकरी, गौलान या बोलीभाषांचा समावेश आहे. त्यांच्या नर्सरीमध्ये हापूससह आंब्यांच्या पन्नास प्रजाती व काजूच्या झाडालाही बहर आलेला आहे. रात्री काजवा चमकताना बघतो पण झाडांची पाने चमकताना बघावी असे वाटत असेल तर ती इच्छासुद्धा तेथे पूर्ण होते. अशी झाडांची विविधता ! रुद्राक्षाची पाने रात्री चमकत असल्याचे रमेश जोशी यांनी सांगितले. वड, पिंपळ, आंबे यांच्यासह शिता अशोक, अंजीर, लसुनिया, चायना डाळिंब, स्नेक प्लांट, वैजयंती माला, बदकवेल, पाच पानी, मदनमस्त, कापूर, जंगली बकुळ, महागुणी, कोचीया, पांढरा जामून, सीताफळ, रक्तचंदन, दिन का राजा, शेंदरी, बेल, सफरचंद, शतावरी, अद्रक, पुत्रंजीवा, अश्वगंधा, अडुळसा यांसारखी औषधी व फळ देणाऱ्या वैविध्यपूर्ण रोपट्यांची तेथे रेलचेल आहे.
रमेश जोशी यांना स्वतःच्या रोजगाराची शाश्वती वीस-पंचवीस वर्षापूर्वी नव्हती. त्यांनी खेड्यातच पंधरा लोकांना दैनंदिन रोजगार मिळवून दिला आहे. त्यांच्या रोपवाटिकेचा विस्तार रस्त्याच्या दोन्ही बाजूंला झाला आहे. त्यांनी पूर्वीच्या मोटर मेकॅनिकच्या व्यवसायातील काही वस्तू स्मृती म्हणूनही जपून ठेवल्या आहेत. त्यातील त्यांची टायरमध्ये हवा भरण्याची मशीन वाहनधारकांसाठी खुली आहे. त्यांनी जुन्या गाडीच्या भंगार साहित्यातून रोपटे वाहून नेण्यासाठी सुबक व सुंदर अशी हातगाडी रंगवली आहे.
रोपवाटिकेमध्ये अनेकविध प्रजातीची रोपटी असल्याने परिसरात पक्ष्यांची चहलपहल वाढली आहे. रमेश यांनी पक्ष्यांच्या अन्न-पाण्याच्या सोयीसाठी निसर्गनिर्मित जलपात्र (भोपळा) झाडांना टांगून त्यांच्या धान्य-दाण्याची व्यवस्था केली आहे.
धामणगाव गढीच्या गणेश मंडळाने धार्मिक कार्यासह निसर्ग संवर्धनात हातभार लावावा म्हणून ‘एक गणपती एक झाड’ हा उपक्रम मागील पंधरा वर्षापासून राबवला आहे. जिल्हा परिषदेची जैतादेही शाळा रोपवाटिकेला लागूनच एक मैल अंतरावर आहे. तेथील प्रकल्प व परिसरातील मंदिर, मशीद, शाळा अशा इतर सामाजिक स्थळांवरील डौलदार वृक्ष ही रमेश जोशी यांच्या दातृत्वाची साक्ष आहे ! त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी अनेकदा मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित व पुरस्कारित केले गेले आहे.
रमेश जोशी 9420419454 chiragjoshi8888@gmail.com
– श्रीनाथ वानखडे 9890097000,9422036700 shrinathwankhade@gmail.com
——————————————————————————————————————
रोपवाटीकेचं काम खुपच स्तुत्य व अभिनंदनिय आहे
श्री रमेश जोशी यांना सलाम
छान माहिती दिली आहे . रमेश जोशी यांचे श्रम सत्कारणी लागले आहेत . सध्या एकूण किती एकर जागा आहे ?
रमेश जोशींना सलाम! त्यांचे कार्य खूपच कौतुकास्पद आहे!
Comments are closed.