– दिनकर गांगल
अण्णा हजारे, रामदेवबाबा यांचे गेले काही महिने चालू असलेले नाट्य उबग आणून राहिले होते. त्यावर मनमोहन सिंग यांनी कुरघोडी केली. त्यांनी त्या दोघांना आणखीच महत्त्व द्यायचे ठरवले असावे! मनमोहन सिंग आपदधर्म म्हणून राजकारणात आले आणि पूर्णत: प्रदूषित झालेल्या यंत्रणेच्या हातचे खेळणे बनून गेले…
अण्णा हजारे, रामदेवबाबा यांचे गेले काही महिने चालू असलेले नाट्य उबग आणून राहिले होते. त्यावर मनमोहन सिंग यांनी कुरघोडी केली. त्यांनी त्या दोघांना आणखीच महत्त्व द्यायचे ठरवले असावे! मनमोहन सिंग आपदधर्म म्हणून राजकारणात आले आणि पूर्णत: प्रदूषित झालेल्या यंत्रणेच्या हातचे खेळणे बनून गेले. अर्थात त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नव्हती. त्यांची ब्युरोक्रसीतील करिअर आणि एक विषयतज्ञ… त्यामुळे एका टप्प्यावर त्यांचे व्यक्तिमत्त्व देशाला नेता म्हणून उपकारक झाले. त्यानंतर समर्थ राजकीय नेतृत्व निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवे होते, ते झाले नाहीत. राहुल गांधींचा काही अंदाजच लागत नाही, तोच प्रियंका यांचे नाव काँग्रेस नेतृत्वासाठी पुढे येत आहे!
खरे तर, विद्यमान बजबजपुरीच्या दैनंदिन राजकारणाला मुळीच महत्त्व देऊ नये, त्यात वेळ घालवू नये, मात्र घडामोडी वाचत राहवे असे माझे मत आहे. प्रशासन व देशाचा कारभार निष्पक्ष, प्रभावी आणि नियमाने बध्द कसा होऊ शकेल यावर विद्वानांनी चर्चा घडवावी, मते प्रदर्शित करावीत आणि त्यांतील योग्य पर्याय/उपाय स्वीकारण्यासाठी जनतेला जागे करावे… मला कार्याची ही दिशा मान्य होते, तरी अण्णा हजारे, मनमोहन सिंग, अडवाणी, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे वृध्दातिवृध्द या देशाच्या घडामोडींच्या केंद्रस्थानी कैक दिवस असावेत आणि तरुणांनी त्याबद्दल ब्र काढू नये याचा अचंबा वाटून आज या आठ-दहा ओळी खरडत आहे. महाराष्ट्रापुरते, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार व त्यांची टीम, उध्दव व राज ठाकरे, नितिन गडकरी हे दैनंदिन राजकारणात सक्रिय असलेले त्या वृध्दांपेक्षा कितीतरी तरुण लोक…यांनी का वृध्दांच्या ‘वेड्या’ चौकटीत बांधले जायचे? त्यांनी मुक्त व्हावे, योग्य असा कार्यक्रम जनतेसमोर मांडावा. पैसा हे उद्दिष्ट ठेवू नये. जनता त्यांच्या मागे येईल.
परंतु ही जबाबदारी खरी सुरू होते ती बुध्दिवंतांच्या चर्चेपासून. ते करमणुकीच्या कर्मकांडात किंवा पोपटपंची अभ्यास-संशोधनात मग्न आहेत. त्यांनी हे ध्यानी ठेवावे, की सर्व शास्त्रांतील अभ्यास-संशोधन हे जनतेच्या कामासाठी असते. अभ्यासासाठी अभ्यास असा कधी नसतोच.
आजच्या मुद्याशी पुन्हा यायचे तर देशात जो वेडेपणा चालला आहे त्यास म्हातारचळ म्हणता येईल. तरुणांनी पुढे यावे व कृती करावी, कारण त्यांना उद्याच्या जगात जगायचे आहे. या वृध्दातिवृध्दांना नाही, त्यामुळे त्यांचा ‘स्टेक’ मर्यादितच असणार. रामदेवबाबा या गटात मोडत नसले तरी एकूण विचाराने व कार्यपध्दतीने ते गेल्या जमान्यातलेच वाटतात.
तरुणांनी त्या सर्वांना (व आम्हालाही) रिटायर करावे.
-दिनकर गांगल
जेष्ठ पत्रकार