विलास पंढरी यांनी ‘मनुष्यजीवनाला आकार देणारा संस्कार – मौंजिबंधन’ नावाचा सविस्तर लेख लिहिला आहे. संस्कार म्हणजे भारतीय संस्कृतीतील वागण्या-बोलण्याचे नीतिनियम. असे सोळा संस्कार भारतीय परंपरेत आहेत. त्यांचा आशय समजून घेणे आवश्यक आहे. व्यक्तीला तो समजला तर त्यानुसार आचरण करून ती स्वत:चे व्यक्तिमत्त्व समृद्ध करू शकते. पंढरी यांचा तो लेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘वर ‘सोळा संस्कार विधी’ या नावाने प्रसिद्ध केला आहे.
पंढरी यांच्या लेखामध्ये जुन्या काळापासून आजपर्यंतचा मुंज विधी-संस्कारासंदर्भातील आढावा आहे. त्यात नाविन्याची गोष्ट म्हणजे पुण्याचे पाटणकर यांच्या कंपनीने मुंजीचा ‘इव्हेंट’ साजरा करण्याची योजना आखून तसे समारंभ घडवण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक देशीविदेशी पालक त्या योजनेचा लाभ घेत आहेत. पुण्याच्या सकाळ वृत्तपत्र समूहानेदेखील सर्व जातिधर्मांसाठी मुंजविधी करण्याची चळवळ जाहीर केली आहे. पाटणकर कंपनीने ‘व्रतबंध- एक विद्याव्रत’ या नावाचे प्रदर्शन पुण्यात दोन वर्षांपूर्वी योजले होते. त्याचे उद्घाटन अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्या हस्ते झाले होते. त्यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात ठासून हेच सांगितले, की मुंज हा विधी धार्मिक व काही जातींपुरता मर्यादित नाही. तो सर्व मुलांसाठी संस्कार म्हणून आवश्यक आहे. शिवाजीराजांचा मुंजविधी काय परिस्थितीत केला गेला त्याचेही वर्णन लेखात आहे.
यानिमित्ताने उपनयन विधी संदर्भात वेगवेगळ्या घटना व विचार यांचे संकलन असलेले चार लेख प्रसिद्ध केले आहेत. त्या लेखांचे पुढे वर्णन आहे त्या ठिकाणी लिंकही दिल्या आहेत.
सांगलीजवळील कवलापूर या गावात पन्नास वर्षांपूर्वी स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यातील दरी मिटली. त्याला कारण ठरले डॉ. जय भोरे. त्यांनी लिहिलेल्या ‘द अनटचेबल ब्राह्मिन ख्रिश्चन’ या लेखाचा थोडक्यात अनुवाद सुधीर दांडेकर यांनी एका अस्पृश्याच्या मुंजी
स्मिता भागवत यांच्या संस्कार- उपनयन या लेखात त्यांनी उपनयन विधी, तो कसा केला जातो, शिष्याचे त्यानंतरचे जीवन कसे असते अशा गोष्टींचे विवरण केले आहे.
काही ज्ञाती संस्था मुंजीसारखे धार्मिक समजले जाणारे विधी ज्ञातिबांधवांसाठी सामूहिक रीत्या साजरे करत असते. त्यामुळे समाजाची सोय होतेच; त्याबरोबर पैशांचा अवास्तव खर्चही टाळला जातो. ठाण्याच्या ‘चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सभा’ या संस्थेचे कार्याध्यक्ष दीपक फणसे यांनी तशा उपक्रमाची माहिती आणि तो कसा साजरा केला जातो ते सर्व जातीय सामुदायिक व्रतबंध उपक्रम या लेखात सांगितले आहे. तो लेख नमुनादाखल आहे, कारण अनेक संस्था असे संस्कारविधी सामूहिक रीत्या करत असतात.
‘उपनयन’ संस्काराची सुरुवात कुटुंबातील बालकाचा ‘विधिपूर्वक शिक्षण-प्रवेश’ व्हावा या हेतूने झाली असावी. ती प्रथा कायमस्वरूपी व शिष्टसंमत होण्यासाठी ती ‘धर्मसंस्कार’ म्हणून स्वीकारली गेली. पण तो विधी सध्याच्या काळात गरजेचा आहे का? तेव्हाची आणि आजची जीवनपद्धत-शिक्षणपद्धत यांत बदल झाला आहे. त्यामुळे मुंज कालसापेक्ष राहिलेली नाही असे मत अशोक विद्वांस यांनी त्यांच्या स्वतःच्या उदाहरणांद्वारे त्यांच्या उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का? या लेखात स्पष्ट केले आहे. त्याच लेखात स्त्रीवर्ग अशा धार्मिक समजल्या जाणाऱ्या विधींकडे कसे पाहतो तेही स्पष्ट होत जाते.
– संपादकीय, थिंक महाराष्ट्र
info@thinkmaharashtra.com