मोहेंजोदडो ते मोरगाव…

हिंदू कादंबरी
हिंदू कादंबरी

माझा मित्र एक गोष्ट सांगायचा. (त्याला हजारदा ‘हे लिही’ हे सांगूनही त्यानं न लिहिल्यामुळे अजितची ही गोष्ट त्याचा कॉपीराईट मान्य करून मीच सांगणार आहे.) ‘टीआयएफआर’ मध्ये ऐंशीच्या दशकात बुद्धिमान मंडळींचा फिल्म क्लब होता. आजच्यासारखे एचबीओ/सोनी पिक्स चॅनेल्स नव्हते. त्यामुळे मुंबईत इंटुक फिल्म बघायच्या तर फिल्म सोसायटी किंवा छोटा फिल्म क्लब याशिवाय गत्यंतर नव्हतं. कोणती तरी एक समांतर फिल्म बघून एका संध्याकाळी सारे ‘टीआयएफआर’च्या कॅम्पसमधून बाहेर पडत होतो. कुणी काहीच बोलत नव्हतं. नॉर्मल प्रॅक्टिस म्हणजे बाहेर पडून त्या सिनेमाचं विश्लेषण करायचं, पण फिल्म एकूणच बंपर होती. कोणी काहीच बोलेना तेव्हा अजितनं त्याच्या एका मित्राला विचारलं, “ काय रे, कशी वाटली फिल्म?” त्याच्या मित्रानं दोन मिनिटं गहन विचार केला आणि मिलियन डॉलर उत्तर दिलं, “ I have not yet decided to like it.” फिल्म आवडून घ्यायचं मी अजून ठरवलेलं नाही! मी अजितला आमच्या प्रत्येक भेटीत एकदा तरी या किश्शाची आठवण करून देते. ‘फिल्म आवडून घ्यायची हे अजून ठरवलेलं नाही’ हे बेष्ट उत्तर आहे. अजित तो सारा प्रसंग सांगतोही रंगवून!

हिंदू कादंबरी  ‘हिंदू’ कादंबरी गाजावाजा होऊन प्रकाशित झाली, पण कोणाची वाचून झाली म्हणून प्रतिक्रिया विचारावी तर बहुतेकदा चेहरा अजितच्या मित्रासारखा होतो. ‘हिंदू’ आवडून घ्यायची हे अजून ठरवलेलं नाही!’ असं उत्तर चेह-यावर तरळतं. सुलभ गोष्टी चटकन आवडतात किवा त्यांच्याबद्दल चटकन प्रतिक्रिया मिळतात. पण ‘हिंदू’सारखं प्रचंड डायडॅक्टिक ऊर्फ बुद्धी-बुद्धी पुस्तक डिसमिस केलं तरी पंचाईत, नाही आवडलं तरी पंचाईत आणि आवडलं तर त्याहून! त्यामुळे एकूणच परिस्थिती कठीण.

 प्रत्येक जण ‘हिंदू’बद्दल दुसरा काय म्हणतोय ते ऐकून घ्यायला उत्सुक. पूर्वी ‘ललित’ किंवा ‘मटा’तलं परीक्षण वाचून अनेक मध्यमवर्गीय मतं बनायची. पण आता ‘ललित’ मध्येही इतकी भंपक पुस्तकओळख सापडते, की ‘मानाचं पान’ ज्या लेखकांना मिळतं त्यांना दोन दिवस त्याच पानांत चेहरा लपवावासा वाटेल! त्यामुळे “हिंदू’ कशी वाटली”चं सध्याचं चलनातलं पॉलिटिकली करेक्ट उत्तर म्हणजे ‘वाचून संपली नाही’. सुनील तांबे वगळता अजून तरी कोणाचा ‘हिंदू’वरचा ‘टेक’ वाचण्यात आलेला नाही. (तांबे यांचं लेखन वाचण्‍याकरता इथे क्लिक करा ).

 माझ्या छोट्या सॅम्पलमधलं निरीक्षण पुढीलप्रमाणे: ज्यांना ‘हिंदू’ पहिल्या झटक्यात प्रचंड आवडली, त्यांनाच कर्मधर्मसंयोगानं राजन गवसही प्रचंड आवडतात. ज्यांना रंगनाथ पठारे प्रचंड आवडतात त्यांनीही ‘हिंदू’ला पॉझिटिव्ह मार्क्स दिलेत. ‘हिंदू’त नेमाड्यांनी त्यांना शोभेशा अभिनिवेशात ‘हिंदुत्त्वा’च्या खपल्या काढल्यात, त्यामुळे ‘हिंदुत्त्ववाद्यां’नी आपली कॉपी विकत घेतली आहे, पण ते अजून मतप्रदर्शन करत नाहीत. ‘नामांतरा’च्या मुद्याचा एकूण घोळ झाल्यानं ‘पुरोगामी’ प्रतिक्रिया जरा उशीरानंच येतायत. ‘अ‍ॅडवर्ल्ड’मधला दादामाणूस नुकताच मला भेटला. ‘कोसला’वर एकेकाळी प्रेम केलेल्या पिढीतला… ‘फार मिनिमाईज करतात ते नेमाडे वाचकाला’ म्हणत त्यानं पंधरा पानांत कादंबरी बाजूला ठेवल्याचं सांगितलं. पण मराठीत पुस्तक पूर्ण न वाचताच ते ‘आवडलं’ असं ठरवलेले वाचकही असतात. त्यांपैकी एकानं मला ‘हिंदू’ पुराण सांगून ती किती आवडली ते सांगितलं होतं. अर्थात त्याच्या वेगवान आयुष्यात ‘हिंदू’ हातात घेतली=बघितली=वाचली हे गणित मला ठाऊक होतं. पण अजून, उदाहरणार्थ, ‘हिंदू’ आवडलेला आणि इतर वेळी ‘मौज’चा वाचक असलेला माझ्या पाहण्यात नाही आला. एकूण, निर्णयनाच्या पहिल्या धारेत अजून अदमास घेणं चालू आहे…

 आता, या सगळ्यांच्या टोप्या उडवल्यावर मला काय वाटलं ते वाचून सांगायची नैतिक जबाबदारी येतेच. ‘हिंदू’बद्दल दीर्घ लेख स्वतंत्रपणे लिहितच आहे. परंतु तत्पूर्वी, त्या दीर्घ लेखाअलिकडची ही काही निरीक्षणं.

भालचंद्र नेमाडे  पहिल्या वाचनात, मला नव्हती आवडली ‘हिंदू’. त्यावेळी पॉप्युलर प्रकाशनाच्या पी.आर.वाल्यानं वाचायला दिलेली ती कॉपी होती. मला नव्हतीच आवडली ती पहिल्या वाचनात. ‘अरे, माझ्या मराठी वाचक मित्रांनो, ‘बघा कसा इंटुकडा खंडेराव मी डिजाईन केलाय’ असा अभिनिवेश आणि त्यातले ‘स्त्रीमुक्तीवाल्या टाईप’ बायकांचे उगीचच उल्लेख – मंडी-बिंडीचं दूरस्थ अप्रूव्हल आणि परंपरेतून मुक्त स्त्री म्हणजे जणू गावची स्थानिक नगरवधू किंवा बेलाबाला असं वाचून माझं तर डोकंच फिरलं.

 अ‍ॅकॅडमिक माहितीचा ताकाला तूर लागू द्यायचा नाही आणि जडजड थिअ-या बोलीभाषेत पेरून ठेवायच्या. मला ते जिगसॉ रेफरन्स शोधायचा कंटाळा आला. या दोन ओळींतले राजवाडे, त्या परिच्छेदातला कार्ल अर्न्स्ट किंवा ते स.शि. भावे किंवा त्या तुकड्यातला फुको असं नोंदवताना वात आला. पण एखादा प्रचंड अ‍ॅटिट्युडवाला ओळखीचा माणूस दुस-या भेटीत गप्पा मारताना खुलावा, आणि आधीच्या तुसडेपणाचे अवशेष शिल्लक ठेवूनही दुस-या भेटीत त्याच्याशी सुरेख संवाद साधला जावा आणि त्या संवादात त्यानं त्याचे प्रयोग खुलवून सांगावेत तसं झालं माझं ‘हिंदू’ नीटस, गोमटी प्रत बनून हातात पडली तेव्हा.

 त्यानंतर मला दुस-या वाचण्यात ‘हिंदू’ आवडली, आक्षेपांसहित आवडली. मनापासून. प्रत्येक वाचणेच्छुक व्यक्तीला ‘पहिली पंधरा पानं प्लीज वाचा आणि हातातून खाली ठेवू नका’ असं बजावून सांगितलं मी. कारण शीण त्या पहिल्या पंधरा पानांचा येतोच न चुकता. त्यानंतर त्या कादंबरीला आलेली ग्रिप बघून भारावून गेले. पहिले दोन चॅप्टर्स हे मास्टरपीस आहेत. उत्कृष्ट लेखन कसं असावं, कादंबरीनं कसं असावं या क्राफ्टसमनशिपचा अप्रतिम वस्तुपाठ. तिसरं-चौथं प्रकरण मला तुकड्यांत आवडलं. पाचवं आणि सहावं पुन्हा अप्रतिम. ‘प्रचंड अडगळ’ मधल्या प्रकरणात काहीशी मूळ धाग्याला कसर लावणारी. ही कादंबरी म्हणजे दक्षिण आशियातल्या मनाचा बृह्दपट. नशिबानं त्याचं केंद्र ‘मोरगाव’ असल्यानं हा मराठी विश्वाचा भाग बनतो.

 ‘खंडेराव’ पहिल्या दोन प्रकरणांनंतर अंगावर येत नाही. पहिल्या दोन प्रकरणांत तो आहे तसा टोकदारही राहत नाही. नंतर अस्ताव्यस्त पसरतो. त्याची स्वत:च्या आतल्या गृहितकांवर भक्कन उजेड टाकायची त्याची क्षमताही कमी होते. कधी कधी प्रेडिक्टेबल वागतो तो. पण हिंडून-फिरून परत येतो तो बापापाशी, परत त्या जैविक नाळेपाशी. सा-या इण्टेन्स बायकांच्या आयुष्यांची प्रचंड बारकाव्यांनीशी उभी कलेली चित्रं घेऊन परत येतो तो बापाच्या मरणाशी. घोडा घेऊन रानोमाळ भटकून आलेला खंडेराव शेवटी मोरगावच्या विटेवर जो विठ्ठल उभा आहे; त्या विटेपाशी येतोच, हडबडत.

 एका ब्लॉगवर लिहून संपेल असा हा ‘खंडेराव’ नाही. मात्र ‘हिंदू’ मला दुस-या वाचनात ‘चसका’ लावेल इतकी आवडली. भावात्मक बुद्धी आणि खोल घुसण्याची किमया जशी ‘पांडुरंग सांगवीकर’कडे आहे तशी ती ‘खंडेरावा’कडे नाही, तरीही. खंडेरावाला लेखकाच्या अभिनिवेशाची कसर लागली आहे. जिथे जिथे नेमाड्यांचं राजकारण ‘खंडेरावा’ला डसतं तिथं तिथं तो आपली इण्टेन्सिटी गमावून बसतो, तरीही.

 खंडेरावाचा उत्तर तरूणाईतला नॉन सेक्शुअल कारेपणा आकर्षक वाटत नाही, जसा चांगदेवाचा वाटला होता. कुटुंबाच्या राजकारणाला आणि नात्यांच्या ‘वस्तू’ होत जाण्याला जवळून पाहिल्यामुळे खंडेरावानं सेक्स वगळून दाखवलेलं नातलगबाज कुटुंब मर्यादेपर्यंत ठीक वाटतं. पण त्यातून या भूमीची दांभिक घडी उलगडत जाते. वाचून तंद्री लागेल अशी ही कादंबरी नाही, पण वाचायलाच हवी अशी आहे.

 एक छोटी कळ सांगते. मेघना पेठेच्या ‘नातिचरामि’त जसं बारीकीचं काम आहे, तसं बायकांना मांडताना बारीकीचं काम केलं आहे, ‘हिंदू’मध्ये. त्या बायांनी मला वेड लावलंय; खंडेरावाहून जास्त. हा नेमाडे – ‘नातिचरामि’ दुवा पण तपासण्यायोग्यच आहे.

 दोन्ही पाय उचलून जर खंडेराव कुदला असता तर अल्बेर काम्यूच्या बिनबुडाच्या ‘फॉल’ गर्तेत कोसळला असता. पण तो एक पाय मोरगावच्या मातीत रोवून फिरलाय. जगभर गेला तरी अस्मितेच्या नाळेचा लगाम त्याच्या मानेत गच्चं बसलाय. मोहेंजोदडो ते मोरगाव असा आहे त्या नाळेचा व्यास. पण त्या अस्मिताग्रस्त नाळेमुळेच राजकीय म्हणून काहीशी कमअस्सलही होते हिंदूची धार. त्या नाळेचा अस्मिताग्रस्त पीळ ‘हिंदू’ची अ‍ॅकिलसची टाच आहे. पण त्या दुबळ्या दुव्यामुळेच तर कादंबरीची ओळख ‘हिंदू’ अशी होते. ‘कोसला’पेक्षा पूर्ण नामानिराळी!

 अंतिमत: नेमाड्यांचा वास्तववाद धनाजीबुवाच्या मडक्यात गेलाय-कलदार रुपायाचा खण्णं नाद जोजवत!

ज्ञानदा देशपांडे
९९३०३६०५५०
dnyanada_d@yahoo.com

About Post Author