‘दगडांच्याही देशा…’ असे कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राला केलेले संबोधन समर्पक आहे. महाराष्ट्राची जमिन विविध खनिजसंपत्तीने समृद्ध आहे. त्यातील दगडांचा खजिना शोधण्याचा छंद पुण्यातील मोहम्मद फसिउद्दिन मक्की यांना लागला. मक्की हे व्यवसायाने दगडांच्या खाणीचे मालक आहेत. त्यांना त्यांच्या खाण व्यवसायातूनच त्यांच्या छंदाचा शोध लागला. त्यांच्याकडे वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या, रूपाच्या वैशिष्ट्यपूर्ण दगडांचा साठा आहे. पुण्यातील पाषाण रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटीतील त्यांच्या बंगल्यात दगडच दगड पाहायला मिळतात. पण मक्की हे अभ्यासू छांदिष्ट आहेत. मक्की हे मूळ कर्नाटकचे. त्यांचे वडील फसिउद्दिन मक्की कर्नाटकात शिक्षणाधिकारी होते. त्यांनी आवड म्हणून १९५१ साली दगडांच्या खाणीचा व्यवसाय सुरू केला. मक्की यांनी एम.ए.ची ( इंग्रजी) पदवी घेतल्यानंतर वडिलांच्या व्यवसायात उतरून त्यांना मदत सुरू केली. त्यांना महाराष्ट्रात, विशेषत: पुणे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, अहमदनगर, ठाणे या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर दगडांची खनिज संपत्ती असल्याचे ध्यानी आले. त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वत:च्या खाणीतून परदेशात प्रयोगशाळांना, महाविद्यालयांना अभ्यासासाठी दगड पाठवले. मक्की यांनी स्टोन कटिंगनंतर त्याचे पॉलिशिंग करता करता दगडांचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे त्यांना कोणताही दगड पाहताक्षणी तो कोणत्या प्रकारचा आहे हे चटकन ओळखता येऊ लागले. त्यांना दगडांसोबत काम करताना दगडांचे आकार, रंग, सौंदर्य भावले. त्यांनी ‘सुंदर’ दगड स्वतःच्या संग्रही ठेवण्यास सुरुवात केली. मक्की यांना तो छंदच जडला.
मक्की त्यांच्या संग्रहात क्रिस्टल, उल्का, पायराइट्स, अमेथिस्ट, आगेट, ग्रीन अपोफोलिट, कॅव्हेन्झाईट, झिओलाईझ, जल गोल्डाईट अशा विविध प्रकारच्या दगडांचे दीड हजारांहून अधिक नमुने आहेत.
झिओलाईझ, जल गोल्डाईट यांसारखी दुर्मीळ खनिजे सजावटीसाठी व शैक्षणिक संशोधनासाठी वापरली जातात. ती जळगाव, नाशिक, अहमदनगर येथील शाकूर येथे आढळून येतात. जल गोल्डाईट हे दगडखनिज काळ्या रंगाचे असते. त्याला छोटे छोटे केस असतात. तसे विविध दगड मक्कीं यांच्या संग्रही आहेत. मक्की वैशिष्ट्यपूर्ण दगडखनिज मिळाले, की स्वत: खाणीत उतरतात. त्यांच्या हाती अनमोल खजिना लागतो.
मक्की यांना, १९८८ साली नगर जिल्ह्यात कॅल्शियम, अॅल्युमिनियम व हॅड्रोसिलिकेट यांच्या संयोगाने बनलेले ‘स्कोले साईट’ हे खनिज मिळाले. त्याबाबतच्या त्यांच्या लेखनाला परदेशातील भूशास्त्रीय ‘जर्नल’मध्ये प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर मक्की यांना मुंबईजवळ मिळालेल्या ‘कॅल्साईट’ या खनिजाबाबतच्या माहितीला जर्मनीतील ‘लेपीस’ या बहुचर्चित मासिकाने प्रसिद्धी दिली. ‘जल-गोल्डाईट’ या खनिजाला आणि त्यावरील त्यांच्या संशोधनाला अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठाने प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे भूशास्त्रीय संपत्तीचे अभ्यासक आणि संग्राहक म्हणून मक्की यांची ख्याती सर्वदूर पसरली. त्यानंतर मक्की यांनी जगात विविध ठिकाणी भरलेल्या खनिज प्रदर्शनात भाग घेतला. त्यांना खनिज संशोधक म्हणून अनेक नवी दालने खुली झाली. मक्की यांचा छंद व व्यवसाय परस्परांना पूरक ठरले.
खाणीतील विहिरीत खोलवर जाऊन तेथील खनिजांचा शोध घेणे हे धाडसाचे काम असते. मक्की यांनी आतापर्यंत असे साहस अनेक वेळा केले आहे. त्यातून त्यांच्या संग्रहात अनेकविध रत्नांची भर पडली आहे. खनिजांचे सुमारे साडेतीन ते चार हजार प्रकार आहेत. त्यावर केमिकल कंपोझिशन केले, की त्यातील विशिष्ट क्रिस्टल वेगवेगळे होतात. पांढरे, पिवळे, लाल, हिरवे, निळे, जांभळे असे विविध रंगांचे ‘क्रिस्टल’ मिळणे म्हणजे पर्वणीच असते! मक्की यांच्याकडे असे क्रिस्टल तसेच ‘क्रिस्टल’च्या असंख्य थाळ्या’ आहेत. त्यांना कर्नाटकातील म्हैसूरजवळ एका दगडात माणिक मिळाले, तर तिरुचिरापल्ली (केरळ) येथे एका खडकात जुरासिक काळातील प्राचीन असे अश्मीभूत अवशेष मिळाले. त्यांना मिळालेला ट्रिलोबाईट जीवाश्म हा चाळीस कोटी वर्षांपूर्वीचा असून त्याचे अवशेष समुद्राच्या तळाशी मिळतात. त्या जीवाश्म्याला डोके, डोळे, शेपूट ही आहेत. तो किड्याच्या आकाराचा असून रंग काळा आहे. याशिवाय मक्की यांच्या संग्रहात हायड्रोसोअर या डायनोसोरचे अश्मीभूत अंडे आणि शार्क माशाचा दातही आहे.
मक्की यांनी त्याच्याकडील दुर्मीळ खनिजांचा फक्त साठा न करता ती खनिजे ‘स्पेसिमन’ म्हणून भारतातातील काही विद्यापीठांतील महाविद्यालयांना पुरवली आहेत. त्यामुळे अभ्यासकांची सोय झाली आहे. पृथ्वीच्या उदरात अशी अनेक रत्ने आहेत. जमिनीच्या खाली मिळणार्या दगडांचे इतके विविध प्रकार असतात, की ते पाहिल्यावर आपण थक्क होऊन जातो! लोकांना भूशास्त्रीय संपत्तीच्या विषयाचे अधिकाधिक ज्ञान व्हावे, ओळख व्हावी यासाठी मक्की यांची धडपड असते. त्यासाठी त्यांचा भूशास्त्रीय खनिजांचा ‘खजिना’ अभ्यासकांना तसेच रसिकांना खुला असतो.
श्रीकांत नारायण कुलकर्णी गेली चाळीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘प्रजावाणी’, ‘तरुण भारत’, ‘लोकसत्ता’ अशा विविध वृत्तपत्रांमध्ये संपादकीय विभागात काम करून ते निवृत्त झाले. ते सध्या मुक्त पत्रकार म्हणून पुण्यात काम करतात. त्यांनी आतापर्यंत विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि इतर नियतकालिकांमधून विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. त्यांना साहित्याची – विशेषता: बालसाहित्याची आवड असून कविता, कथा, विनोदी लेख, चित्रपट परिक्षण अशा विविध पद्धतीचे लेखन त्यांनी केले आहे. आजपर्यंत त्यांची बारा पुस्तके प्रसिद्ध झाली असून छांदिष्ट व्यक्तींवर लिहिलेल्या ‘असे छन्द असे छांदिष्ट ‘ आणि ‘जगावेगळे छांदिष्ट’ या दोन पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. कुलकर्णी स्वत: ‘छांदिष्ट’ असून ते दगडांमधून पशुपक्ष्यांच्या आकारांचा शोध घेतात. ते ‘निर्मळ रानवारा’ या ‘वंचित विकास’ संचलित बालमासिकाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी विविध दिवाळी अंक, विशेषांक, आणि निवडक पुस्तकांचे संपादन केले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9422319143
माझी महाङ ला दगङ खाण आहे…
माझी महाडला दगडांची खाण आहे. माझाकडे खूप छान क्रीस्टलस् आहेत. नक्की बघायला या!
प्रशांत साळुंखे, तुमचा इमेल
प्रशांत साळुंखे, तुमचा इमेल किंवा मोबाइल क्रमांक द्यावा.
खुप सुंदर माहिती आणि अनोखा
खुप सुंदर माहिती आणि अनोखा छंद आहे
शुभेच्छा
Comments are closed.