‘मिरॅकल कुरियर्स’चे काम चर्चगेटच्या इंडस्ट्री हाऊसमधल्या जागेत सकाळी नऊच्या दरम्यान सुरू होते. काम रोजच्या डिस्पॅचची विभागणी करणे, पत्रे वाटून घेणे, एरिया ठरवणे आणि नोंदी करणे इत्यादी. ऑफिसमध्ये कुणी बोलत नाही; कमालीची शांतता असते. आवाज असतो तो फक्त कागद, गठ्ठे आणि पाकिटे इथुन तिथे सरकावल्याचा. मुली आलेली पत्रे निवडायची कामे करतात तर मुलगे ती पोचवण्याचे काम करतात. सारे खाणाखुणांच्या भाषेत (साईन लॅंग्वेज) शिस्तीत चाललेले असते. पन्नास कर्णबधिर मुले गोदरेज, महिंद्र अॅण्ड महिंद्र, आदित्य बिर्ला ग्रूप अशा मोठाल्या कंपन्यांसाठी सर्व्हिस देत आहेत. त्यांच्या कामात नेमकेपणा, अचूकपणा आणि वक्तशीरपणा असतो.
“तो असणारच, का नसावा? कर्णबधिरांना व्यावसायिक कौशल्ये येणार नाहीत असे मानणे चुकीचे नाही का?” ध्रुव आपल्यालाच प्रश्न विचारतो. ध्रुव लाक्रा हा ‘मिरॅकल कुरियर’ कंपनीचा संस्थापक आणि सीईओ. बत्तीस वर्षांच्या ध्रुवने ऑक्सफर्डमधून एमबीए केले आणि समाजातल्या बहिर्या मुलांसाठी काही करावे या हेतूने ही कंपनी स्थापली. तो म्हणतो, की भारतात शारीरिक व्यंग असलेल्या लोकांसाठी रोजगाराच्या, उत्पन्नाच्या संधी कमी आहेत. इथे अपंगांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते. त्यांनाही त्यांच्याबाबत सातत्याने केल्या जाणार्या भेदभावामुळे आपण काहीही करू शकणार नाही असे वाटत असते. पण कोणाही व्यक्तीला योग्य प्रशिक्षण आणि आत्मविश्वास दिला तर ती कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करू शकते. आवश्यकता असते ती लोकांवर विश्वास टाकण्याची, त्यांना संधी देण्याची. मी तेच केले. कंपनीतल्या सार्यांना प्रशिक्षण दिले आहे.
ध्रुव ऑक्सफर्डला असताना त्याच्या वडिलांना अपघात झाला. त्यानंतर ते चालू शकत नाहीत. त्यावेळेस त्याला पहिल्यांदा जवळून जाणवले, की अपंगत्व म्हणजे नेमके काय? शारीरिक व्यंग असलेल्यांना घेऊन काही उद्योग करावा हा विचार तिथे पक्का होत गेला. बहिर्या मुलांसाठी कंपनी काढावी असे ध्रुवला का वाटले? ध्रुव एकदा बसने कुठेतरी निघाला होता. त्याच्या शेजारी बहिरा मुलगा बसलेला होता. स्टॉपमागून स्टॉप येत होते आणि तसतसा तो मुलगा अस्वस्थ होऊन खिडकीबाहेर पाहत होता. कंडक्टर ज्या स्टॉपची नावे घेत होता ती त्याला ऐकू येत नव्हती. इतक्या आवाजात, गोंगाटात तो एकटा पडलेला मुलगा ध्रुवला अस्वस्थ करून गेला. अंध, अपंग मुले असतील तर पटकन लक्षात येतात, बहिर्या व्यक्ती लगेच लक्षात येत नाहीत, आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का? आणि नेमके काय करायचे? याविषयी तो विचार करू लागला. त्यानंतर काही दिवसांनी ध्रुवच्या घरी कसलेसे कुरियर आले आणि ध्रुवच्या लक्षात आले, की ‘कुरियर बॉय’ला वा त्याच्याशी बोलण्याचा फारसा प्रश्न येत नाही! तो येतो. पार्सल देतो. सही घेऊन निघून जातो. मग कर्णबधिरांना घेऊन ‘कुरियर सर्व्हिस’च का सुरू करू नये? असा विचार करून ध्रुव तयारीला लागला.
आम्ही साईन लॅंग्वेज येणार्या विद्या अय्यर यांची मदत घेतली. त्यांच्या साहाय्याने काही पीपीटी तयार करून कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले. नव्या येणार्या मुलांना ऑन जॉब ट्रेनिंग देतो. एक गोष्ट आम्ही कटाक्षाने पाळतो आणि ती म्हणजे काम मिळवताना कुठेही दया म्हणून आम्हाला काम नको, हे समोरच्याला स्पष्ट करतो.”
‘मिरॅकल कुरियर्स’ ही स्वयंसेवी संस्था नाही. संस्था सुरू न करता कंपनी काढण्यामागे, व्यवसाय करण्यामागेही ध्रुवचा विशिष्ट उद्देश होता. तो म्हणतो, आपल्याकडे असे मानतात, की अपंगांना मदत म्हणजे त्यांच्यासाठी काम करणार्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेला किंवा त्या माणसाला काहीतरी देणगी देणे. पण आमची मुले कर्णबधिर आहेत, तरी ती मेहनत करू शकतात. त्यांची काम करण्याची इच्छा आहे. त्यांना काम द्या. सवलती, करूणा नको.
‘मिरॅकल’ ची दोन ऑफिसे आहेत. एक अंधेरीत व दुसरे चर्चगेटमध्ये. त्यांच्या डिस्पॅच हॅण्डलिंगची जबाबदारी समीर भोसले आणि निमेश पवार पाहतात. डिस्पॅचविषयी निमेश सांगतो, व्यावसायिक कंपन्यांच्या स्पर्धेत उभे राहताना अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. दोन आघाड्यांवर लढायचे असते – व्यावसायिक स्पर्धकांशी आणि कर्मचार्यांच्या अडचणींशी. कधी मुलांना रस्ता अडतो, घरच्या काही अडचणी असतात, आम्ही मुलांना विशिष्ट एरिया वाटून दिला आहे. दुसर्या दिवशीचे टपाल मुलींकडून टपालाच्या डेटा एण्ट्रीज केल्या जातात. एका पद्धतीत काम सुरू असते. वस्तू वेळेवर आणि नीट स्थितीत पोचणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही ऑपरेशन्सवर अधिक लक्ष दिले. व्यंग असलेल्या व्यक्तींबरोबर काम करताना तसे करणे गरजेचे होते. मोबाईल फोनवरून मेसेज ही त्यांच्याबरोबर काम करताना उपयोगात येत असलेली सोय आहे. तरीही विचित्र पद्धतीने वागवणारा सोसायटीचा वॉचमन किंवा कंपनीची रिसेप्शनिस्ट ही गोष्ट अडचणीची ठरते.
निमेश पुढे सांगतो, इतरही अडचणी असतात. एका मुलाची आई यायची. तिला त्याने ‘कुरियर बॉय’ची नोकरी केलेली आवडायची नाही. तिच्या मते, तो घरात बसला तरी चालेल. पण त्याला कुठे काही झाले तर काय करायचे? मुलाला मात्र नोकरी करायची होती. आमच्याकडची मुले परिस्थितीने गरीब आहेत. स्वभावाने सरळ आहेत. मेहनती आहेत. त्यांना बाहेरच्या जगाचे छक्केपंजे कळत नाहीत. त्यांच्या मिळणार्या पगाराबद्दल, त्यांच्या पैशांबद्दल त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे म्हणून आम्ही स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये त्यांचे सॅलरी अकाउण्टस् उघडले आहेत.
निमेश सांगतो, कधी या मुलांकडून काहीतरी चुकते, हरवते, मग ते खूप घाबरतात. त्यांना पुन्हा समजावावे लागते. आत्मविश्वास द्यावा लागतो. मागच्याच महिन्यात एका मुलाकडे आम्ही पाचशे रुपये दिले होते. त्या दिवशी ते काम झाले नाही म्हणून त्याने ते घरी नेले. त्याच्या घरी कुणीतरी ते पैसे चोरले. तो इतका घाबरला, की दुसर्या दिवशी ऑफिसला यायलाच तयार नव्हता. त्याला खूप समजावावे लागले. कितीतरी मुलांना त्यांच्या अगोदरच्या नोकर्यांमध्ये वाईट अनुभव आले आहेत. त्यांना पटकन सूचना कळत नाहीत. त्यावरून त्यांना ओरडणे किंवा कॉम्प्लेक्स देणे, प्रमोशनला लायक असूनही निव्वळ व्यंग आहे म्हणून डावलले जाणे किंवा त्यांना दिले जाणारे काम हे त्यांच्यावर दया म्हणूनच दिले गेले असे त्यांना सातत्याने जाणवून देणे, पगार वेळेवर न देणे किंवा कामावर घेताना सांगितल्यापेक्षा कमी पगार देणे, नोकरी देताना कामाचे स्वरूप वेगळे सांगायचे आणि नंतर दुसरेच निम्न दर्जाचे काम त्यांच्याकडून करून घ्यायचे असे अनुभव यांतल्या काही मुलांना आलेले आहेत. या अनुभवांमुळे मुले कोणावरही पूर्ण विश्वास टाकायला बिचकतात. त्यांच्यात आत्मविश्वास नसतो. ती पटकन गोंधळतात-घाबरतात. एकदा त्यांना कामाचे स्वरूप नीट समजले, की मग मात्र ती कामात तरबेज होतात. कितीतरी वेळा त्यांना नीट लिहिता-वाचता येत नसते. त्यासाठी आम्ही त्यांची वाचन-लेखनाची वर्कशॉप्सही घेतली आहेत. अशा अनेक अडचणींमधूनही जेव्हा मुले स्वत:च्या पायांवर उभी राहतात, स्वावलंबी होतात, एखादे आव्हान आले तर आत्मविश्वासाने ‘मी करेन सर, तुम्ही काळजी करू नका’ असे म्हणतात तेव्हा बरे वाटते.
अगोदर जुजबी काम करणारी निलम तन्ना ब्रॅंच हेड म्हणून काम पाहते. ती चर्चगेट ऑफिसमधल्या डेटा एण्ट्रिज, सॉर्टिंगपासून नव्या स्टाफचे प्रशिक्षण करण्यापर्यंतच्या सर्व जबाबदार्या सांभाळते. ती आणि तिचा नवरा, दोघेही कर्णबधिर आहेत. काही वर्षांपूर्वी पालकांवर अवलंबून असलेल्या दोघांनी त्यांचे वेगळे घर केले आहे. स्वत:च्या मेहनतीने कमावलेल्या पैशांवर.
ध्रुव सांगतो, “बाजारातल्या कुरियर कंपन्यांचे मनुष्यबळ आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या तुलनेत आमच्यापुढची आव्हाने मोठी आहेत. स्वयंसेवी संस्था नसल्याने आम्ही देणगी घेत नाही आणि कामे मिळवताना, कर्णबधिरांना काम द्यावे का, याविषयी साशंकता बाळगणारे बरेच आहेत. मला कितीतरी वेळा मुलाखतींना बोलावले जाते. कौतुक होते. अनेक राजकीय पुढार्यांनाही कंपनीचे कौतुक वाटते. त्यांनी तसे आम्हाला बोलून दाखवले आहे. पण तोंडाने कौतुक करणे वेगळे आणि कामाला प्रोत्साहन देणे वेगळे. आम्हाला अधिक काम हवे आहे. फक्त स्तुती आणि हार-तुरे नकोत. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला, की मी काळजीत पडतो. पन्नास जणांचे चेहरे मला समोर दिसू लागतात. त्यातल्या प्रत्येकाच्या आयुष्याची एक कथा आहे. कष्टाने कमाई आपण सारेच करतो, पण त्यांचे कष्ट आपल्यापेक्षा बरेच जास्त आहेत. सन्मानाने जगण्याची स्वप्ने पाहत त्यांनी इथे काम करायला सुरुवात केली आहे. ते काम वाढणे गरजेचे आहे. महिन्याला आम्ही सुमारे पासष्ट हजार ऑर्डर्स पुर्या करतो. पण आम्ही अधिक काम करू शकतो.
– शब्दगंधा कुलकर्णी
ए -१०५, समर्थ विहार अॅनेक्स,
पाथर्ली शिवमंदिराजवळ, पाथर्ली,
डोंबिवली (पू)
इमेल – shabdagandha@gmail.com
मिरॅकल कुरिअर्स
९९२००७९३८४
service@miraklecouriers.com
best artical.
best artical.
फारच छान उपक्रम आहे. अपंग
फारच छान उपक्रम आहे. अपंग व्यक्तींना असे प्रोत्साहन देणे छान आहे. मी एक निवृत्त स्त्री आहे. माझी या कामात काही मदत होण्यासारखी असेल तर मी विनामूल्य तुमच्या या कामात अवश्य साथ देऊ इच्छिते.
We learn something from this
We learn something from this article.
सीमा प्रभु, कृपया तुमचा
सीमा प्रभु, कृपया तुमचा मोबाइल क्रमांक शेअर करावा. अथवा आम्हाला 9029557767 या क्रमांकावर फोन करावा. धन्यवाद.
माझे वय 33. खाजगी शाळेत…
माझे वय 33. खाजगी शाळेत नोकरी करते आहे. श्रवणह्रास झालाय. काहीच ऐकू येत नाही अशी वेळ आलीय. मला पुढे काय करता येईल? कृपया सुचवा.
Comments are closed.