मेहनत म्हणजे कष्ट, श्रम; त्याचबरोबर मजुरी, कामधंदा असेही अर्थ त्या शब्दाचे आहेत. मेहनत हा शब्द खूप प्रयत्न, अभ्यास, रियाझ या अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ, ‘मेडिकलला प्रवेश मिळवायचा असेल तर फार मेहनत घ्यावी लागते’ किंवा ‘शास्त्रीय संगीतात नाव कमावण्यासाठी गाण्याची मेहनत लागते’ अशी वाक्ये.
त्या शब्दाचा उगम ‘मिहनत’ या अरबी शब्दातून झाला आहे असे शब्दकोशात म्हटले आहे. परंतु काही तज्ज्ञांनी, त्या शब्दाचा वेगळा अर्थ उलगडून दाखवला आहे. त्यांच्या मते, तो शब्द मेह आणि नत या दोन संस्कृत शब्दांपासून तयार झाला आहे. मेह म्हणजे लघवी करणे, मूत्रनिदान असे अर्थ गीर्वाण लघुकोशात आहेत. नत म्हणजे वाकलेला. जिच्यापुढे मेह रोग नत होतो; म्हणजेच ज्याच्यामुळे मेह रोगावर विजय मिळवता येतो ती गोष्ट म्हणजे मेहनत. घाम व्यायामामुळे, कष्टामुळे भरपूर येतो आणि मूत्राचे प्रमाण घटते. म्हणून व्यायाम, कष्ट यांसाठी मेहनत शब्द वापरला जातो. ज्या व्याधीत मेहाचे म्हणजेच लघवीचे प्रमाण भरपूर वाढते, त्याला प्रमेह म्हणतात. मधुमेह म्हणजे डायबिटिस. आयुर्वेदातील प्रमेह म्हणजेच मधुमेह. त्या व्याधीत मूत्राचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले असते. मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते आणि मूत्रातही शर्करा असते. जे लोक फारसे कष्ट करत नाहीत, श्रम टाळतात अथवा ज्यांचा व्यवसाय बैठा आहे अशा लोकांना मधुमेह होण्याची शक्यता दाट असते. प्रमेहावर विजय मिळण्यासाठी शारीरिक कष्ट करणे आवश्यक असते. म्हणूनच पूर्वीच्या काळी अशा रुग्णांना व्यवसाय बदलण्याचा सल्ला दिला जाई. त्या दृष्टीने गुरे वळणे, शेतीत राबणे अशी कामे योग्य. चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही.
– उमेश करंबेळकर 9822390810
umeshkarambelkar@yahoo.co.in