मेणवली हे वाईपासून तीन किलोमीटरवर असलेले कृष्णा नदीकाठचे लहानसे गाव. त्याची ओळख नाना फडणवीस यांचे गाव अशी आहे. औंधचे भवानराव त्रंबक पंतप्रतिनिधी आणि साताऱ्याचे रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना फडणवीसांना मेणवली गाव देणगी म्हणून देण्यात आले. नानांनी त्या गावात स्वत:ला राहण्यासाठी एक वाडा बांधलाच, पण कृष्णामाईच्या घाटावर विष्णूचे व दुसरे मेणेश्वराचे म्हणजेच शंकराचे अशी दोन देवळेदेखील बांधली.
कृष्णेच्या घाटावरील त्या मंदिरांच्या परिसरात गेले, की सर्वप्रथम एक छोटेसे देऊळ दृष्टीस पडते. ते विष्णू व शंकर यांच्या देवळांच्या मानाने खूपच लहान असून घंटेचे देऊळ म्हणून ओळखले जाते. त्या देवळाचे विशेष म्हणजे त्यात फक्त एक भलीमोठी घंटा टांगली आहे. पंचधातूंपासून बनवलेल्या त्या घंटेचे वजन सहाशेपन्नास किलोग्रॅम एवढे असून, त्यावर लहानग्या जिझसला कडेवर घेतलेल्या मेरीचे चित्र व 1707 हे साल कोरलेले आहे. ती घंटा बघितल्यावर जिझस आणि मेरी यांचे चित्र कोरलेली घंटा देवळाच्या परिसरात का ठेवली, ती एखाद्या चर्चमधील घंटा आहे का, तिच्यासाठी वेगळे मंदिर का बांधले असे प्रश्न पडतात.
हा ही लेख वाचा –
वसई चर्चमधील घंटा हिंदू मंदिरांत! (Bells From Vasai church in Hindu Temples)
रॉबी डिसिल्वा नावाच्या अवलीयाचा कलाप्रवास
वसई मोहिमेचा दिग्विजय
बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचा 1739 मध्ये पराभव केला अर्नाळा, वसई असे काही किल्ले जिंकून ताब्यात घेतले. त्या किल्यांमध्ये व आसपासच्या परिसरात पोर्तुगीज कालीन चर्चेस असून, त्यामध्ये मोठमोठय़ा आकाराच्या खूप घंटा होत्या. चिमाजी अप्पांच्या सैन्याने वसईच्या किल्ल्यातील चर्चमधील घंटा काढल्या व पोर्तुगीजांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्या हत्तीवरून वाजतगाजत गावात मिरवल्या.
अशा घंटा नाशिकच्या शंकराच्या देवळात, मुरुडच्या दुर्गादेवी मंदिरात, भोरगिरी येथील भीमाशंकराच्या देवळात आढळतात. सुमारे चारशेपेक्षा जास्त वर्षे जुन्या अशा त्या घंटा सुस्थितीत आहेत. मेणवली येथे मात्र त्यातील घंटा देवळात न लावता त्या घंटेसाठी वेगळे मंदिर बांधले गेले आहे. तेच मेणवली गावचे वैशिष्टय़ ठरले आहे. घंटेच्या मंदिरामुळे कृष्णाकाठच्या देवळांच्या रम्य परिसराला एक प्रकारचे वेगळेपण लाभले आहे.
– मृणाल तुळपुळे mrinaltul@hotmail.com
(‘लोकसत्ता’ वास्तुरंग पुरवणीवरून उद्धृत, संपादित -संस्कारित)