‘मूकनायक’ हे बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी चालवलेले मराठी भाषेतील पाक्षिक होते. ‘मूकनायक’चा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी प्रकाशित झाला. ते पाक्षिक मुंबईतून निघत असे. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः पहिल्या अंकात ‘मनोगत’ लिहिले आहे. त्यांनी पुढील तेरा अंकांतही लेख लिहिले. शाहू महाराजांनी त्यांना ‘मूकनायक’साठी दोन हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत दिली होती.
‘मूकनायक’ या शब्दातूनच बाबासाहेबांना खूप काही सुचवायचे आहे. ज्यांना आवाज नाही, अशा मूक लोकांचे हे वृत्तपत्र नायक बनेल, असा संदेश त्यातून दिला गेला. त्यांतील अग्रलेख प्रामुख्याने समाजकारण, राजकारण, धर्मकारण अशा विविध घटनांशी निगडित होते. आंबेडकर यांचा अभ्यास समाज, संस्कृती, साहित्य, राजकारण, इतिहास, कायदा अशा विविध विषयांचा होता. त्यांनी त्या प्रत्येक विषयांतील सूक्ष्म निरीक्षणे ‘मूकनायक’मधील लेखनातून नोंदली आहेत. आंबेडकर यांच्या लेखनातून मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार आहे. त्याची साक्ष ‘मूकनायक’मधील अग्रलेख देतात. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’च्या रूपाने वृत्तपत्रसृष्टीत पाऊल टाकले. ‘मूकनायक’मधील बाबासाहेब आंबेडकर यांचे लेख शैलीसौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य आहे. मराठी साहित्याने मात्र त्यांचा ‘निबंधकार’ म्हणून उल्लेख केला नाही.’)
‘मूकनायक’ एप्रिल 1923 मध्ये बंद पडले. बाबासाहेब लंडनला शिक्षणासाठी गेल्यावर ‘मूकनायक’चे संपादकपद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांनी सांभाळले होते. ‘मूकनायक’चे एकोणीस अंक सध्या उपलब्ध आहेत.
बाबासाहेब आंबेडकर यांची ‘मूकनायक’ सुरू करत असताना भूमिका स्पष्ट होती. ते म्हणाले होते, की “कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, त्या चळवळीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते.” ‘मूकनायक’ पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली. ‘मूकनायक’चे ध्येयधोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकारामांच्या ओव्या छापलेल्या असत.
काय करून आता धरुनिया भीड|
नि:शक हे तोड वाजविले ||1||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण|
सार्थक लाजोनी नव्हे हित ||2||
त्यांनी पहिल्या अंकाच्या ‘संपादकीया’मध्ये जन्मप्रतिज्ञा अशी व्यक्त केली-
आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचवण्यास; तसेच, त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमी नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल, की त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. त्यांना इतर जातींच्या हिताची पर्वा नसते; इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा, त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच, की कोणतीही जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातींत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौका आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे, एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष, नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून त्यांचे हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये.
‘मूकनायक’च्या पहिल्या अंकातील मजकूर पुढीलप्रमाणे होता — “हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही, की या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्राज्ञा नाही.
‘मूकनायक’ची इतिश्री झाल्यावर जे सामाजिक प्रश्न निर्माण झाले होते त्यांची सोडवणूक करण्यासाठी बाबासाहेबांनी पुन्हा वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच प्रयत्न चालवले. त्यासाठी ‘मूकनायक’नंतर ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन करून बाबासाहेबांनी पुन्हा एकदा त्यांच्या पत्रकारितेला प्रारंभ केला. आंबेडकरांनी नवे प्रकाशन ‘बहिष्कृत भारत’ वेळेवर प्रसिद्ध व्हावे म्हणून ‘भारत भूषण प्रिंटिंग प्रेस’ विकत घेतला. त्यांनी त्याच प्रेसमध्ये पुढे ‘जनता’ व ‘प्रबुद्ध भारत’ छापण्याची व्यवस्था केली.
– नितेश शिंदे, 9323343406, info@thinkmaharashtra.com