मुरबाडची म्हसेची जत्रा

4
64
murbad carasole

महाराष्ट्रातील बैलांचा सर्वात मोठा बाजार

मुरबाडजवळ म्हसेची जत्रा (म्हसे गावामध्ये भरणारी जत्रा) तिची मुख्य ओळख टिकवून आहे. म्हसे गावची जत्रा ओळखली जाते ती तेथे भरणाऱ्या महाराष्ट्रातील बैलांच्या सर्वांत मोठ्या बाजारासाठी. मुरबाड-म्हसे मार्गावर म्हसे गावाच्या पुढे, पडीक जमिनीवर बैलांचा तो बाजार भरतो. जत्रा पौष पौर्णिमेला सुरू होते. ती तीन-चार दिवस चालते. जत्रेत दहा हजारांपेक्षा जास्त बैलांची खरेदीविक्री होते. जत्रेच्या निमित्तातने म्हसे गावाचे ग्रामदैवत आणि अठरापगड जातींचा देव असलेल्या म्हसोबाच्या दर्शनासाठी लोक दूर दूरून येतात. ठाणे-कल्याण-कर्जत-नाशिकपासून ते अगदी डहाणूपर्यंत असा तो दूरचा टापू सांगता येईल. गावकऱ्यांच्यात सांगण्या नुसार जत्रेत येणाऱ्या लोकांचा आकडा दहा लाखांपेक्षा जास्त असतो.

कल्याणपासून अहमदनगरमार्गावर तेहतीस किलोमीटरवर मुरबाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. मुरबाड एसटी स्टँडच्या जरा पुढे उजवीकडे फाटा फुटतो. तेथून अकरा किलोमीटरवर म्हसे गाव आहे. रस्ता पुढे पुन्हा नगर मार्गाला मिळतो. त्या मार्गावरून गोरखगड,मच्छिंद्रगड, सिद्धगडचा ट्रेक करता येतो. स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या भाई कोतवाल ह्याचे स्मारक बघता येते. म्हसेगावातून एक रस्ता जातो तो थेट कर्जतला. कर्जत साधारण बेचाळीस किलोमीटरवर आहे.

व्यक्ती् जत्राउत्सवांमध्ये  देवदर्शनासाठी जात असत. लोकांना बाजारातील खरेदी-विक्रीत जास्त रस असतो. जत्रा-उत्सवाचे मूळ विस्मृतीत चालले आहे!

बाजार पावसाळ्याच्या (आषाढ महिना) सहा महिने आधी भरत असल्याने शेतकरी बैलांच्या खरेदीसाठी तेथे येतात. बैलांना सहा महिन्यांत शेतकऱ्यांच्या घरात माणसाळवले जाते; शेतीच्या कामासाठी तयार केले जाते. जत्रेत तीन प्रकारच्या बैलांच्या जाती विकल्या जातात. लांब-उभे कान, उंच धिप्पाड, मोठे वशिंड ( खांदा-पाठीवरचा उंचवटा ) असे वैशिष्ट्य असलेल्या  खिल्लार जातीच्या बैलांना तेथे मोठी मागणी आहे. ती जात शेतीच्या कामासाठी उत्कृष्टी समजली जाते. खिल्लार जातीची सर्वसाधारण बैलाची जोडी ही पस्तीशस ते चाळीस हजारांच्या घरात विकली जाते. जत्रेत 2008 साली एका बैलजोडीला एक लाख वीस हजार असा सर्वोत्तम भाव मिळाला होता. बैल पाच वर्षांचा झाल्यावर त्याला जत्रेत विकण्यास आणतात. त्याने तारुण्यात प्रवेश केलेला असतो आणि तो शेतीच्या कामाच्या योग्यतेचा झालेला असतो. चांगली जमीन किंवा मोठे शेत असलेले शेतकरी खिल्लार जातीच्या बैलांची खरेदी करतात.

गावठी बैल हा दुसरा प्रकार. शेतीची कामे वगळता इतर कामांसाठी, म्हणजे बैलगाडी किंवा इतर सामान वाहण्यासाठी बैलाची ती जात उत्कृष्ट समजली जाते. उंचीने बुटके, रुबाबदारपणात कमी, पाठीवरचं वशिंड त्याचे अस्तित्व दाखवण्यापुरते उंच, एकूणच रुपडे काटक असे गावठी बैलाचे वर्णन करता येईल. त्या बैलांची किंमत साधारण पंधरा ते वीस हजारांच्या घरात असते. कोकणात बैलांचा वापर शेतीसाठी कमी पण बैलगाडी किंवा इतर कामांसाठी जास्त होतो. त्यामुळे कोकणातील शेतकरी तो बैल घेणे पसंत करतात. अर्थात कोकणातील शेतकऱ्याची बेताची परिस्थितीही त्यासाठी कारणीभूत आहे.

तिसरी जात म्हणजे जर्सी. त्याचे वर्णन करणे मला जमत नाही, कारण तो बैल कसा ओळखावा तेच माझ्या डोक्यात शिरले नाही. जत्रेत जर्सी जातीचा बैल कुठला असे विचारले असता अनेक बैलांमधील एका बैलाकडे मालक बोट दाखवतो. मालक सांगतो (आणि मला काहीच कळत नाही ) म्हणून तो जर्सी बैल हे मान्य करत मीही मान डोलवतो.

विक्री करणारा बैलांची पैदास वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही. तो इकडून- तिकडून बैलांची खरेदी करून चाळीस-पन्नास बैलांच्या ताफ्यासह जत्रेत चार दिवस ठाण मांडून बसतो. जत्रेत त्याचा सर्व माल नक्की खपला जाईल, एवढी उलाढाल होत राहते. बैलाबरोबर काही प्रमाणात रेडकू आणि म्हशी यांचीही खरेदी केली जाते. म्हसेच्या जत्रेमध्ये धुळीने आंघोळ नखशिखान्त होते.

म्हसोबा देव

बैलांचा बाजार साधारण दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाला असे स्थानिक सांगतात. मात्र बैलांच्या बाजाराचे निमित्त ठरले ते गावात असलेले देवस्थान म्हसोबा. त्यासच्या दोन कहाण्या गाववाल्यांकडून ऐकायला मिळतात. सध्या मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी म्हशींचा गोठा होता. त्यात शंकराची पिंड सापडली. त्यामुळे गावाला आणि देवाला म्हसे हे नाव मिळाले.

तर काहींचे म्हणणे आहे, की पूर्वी देवळाच्या जागी तलाव होता आणि तलावात स्वयंभू शंकराची पिंड आणि धातूचा एक खांब मिळाले. म्हसोबा शंकराचा अवतार म्हणून त्याची स्थापना करण्यात आली आणि काही फूट अंतरावर खांब विराजमान झाला. तलावाच्या ठिकाणी छोटेखानी देऊळ उभारण्यात आले आहे. देवस्थान जागृत असल्यााचा लौकिक आहे. बाजूला असलेला खांब तांब्याच्या पत्र्याने मढवण्यात आला आहे. म्हसोबानंतर लोक त्याचेही दर्शन घेतात. यामुळे जत्रेला ‘खांबलिंगेश्वराची जत्रा’ असेही नाव आहे. मात्र त्या खांबाचे प्रयोजन किंवा त्याच्याबद्दल ठोस माहिती मिळू शकली नाही.

बैलांचा बाजार म्हणून म्हसेच्या जत्रेची ओळख कायम असली तरी बैलांचे शेतकऱ्याच्या जीवनातील महत्त्व कमी होत आहे. तरी जत्रेला गर्दी होते ती इतर गृहपयोगी खरेदीसाठी. बैलांबरोबर शेतीच्या अवजारातील सर्व वस्तू तेथे मिळतात. सर्व प्रकारची धातूंची भांडी, प्लॅस्टिकच्या बहुविध वस्तू, तिखटमीठापासून कांदे-बटाट्यांपर्यंत सर्व काही मिळते. म्हसे गावापासून सुरू झालेल्या त्या जत्रेमध्ये अनेक दुकाने लागतात आणि त्यानंतर शेवटी बैलांचा बाजार असतो. जत्रेत सर्व काही मिळत असल्याने एका दिवसात देव-दर्शन कम खरेदी अशी टूर होऊन जाते. त्यामुळे मुरबाडहून एस.टी.च्या गाड्या म्हसे गावात धडकत असतात. खाजगी गाड्या, दुचाकी ह्यांची मोठी गर्दी असते. खाद्य पदार्थांची रेलचेल असते. सिनेमापासून (तंबूतील सिनेमा) ते मेरी-गो-राऊंड सारखी करमणुकीची साधने असतात. रात्री वेश्या व्यवसायही जोरात असतो.

– अमित जोशी

Last Updated On – 25th Jan 2017

About Post Author

4 COMMENTS

  1. खरच खुपच छान माहीती
    खरच खुपच छान माहीती

  2. छानच….

    छानच….
    मी गावातील यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करतोच …

  3. खुप छान माहिती
    खुप छान माहिती

Comments are closed.