मुजुमदार गणेशाची तीनशे वर्षांची परंपरा

2
90
carasole

श्रीगणेशाची सध्या पूजली जाणारी मूर्तीतीनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला सरदार मुजुमदारांचा गणपती उत्सव म्हणजे अवघ्या पुण्याचे भूषण!

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांना पुणे व सुपे या दोन परगण्यांची जहागिरी आदिलशाहीकडून मिळाली. त्यानंतर शहाजीराजांनी मुजुमदारांच्या पूर्वजांना, नारो गंगाधर ऊर्फ अयाबा यांना सुपे प्रांताच्या मजमूचा अधिकार दिला. मजमू हा शब्द फारसी असून त्याचा अर्थ राज्याच्या महसूल वसुलीचा हिशेब असा आहे. तेव्हापासूनच हे प्रभुणे घराणे मुजुमदार नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे, शाहू महाराज दक्षिणेत आल्यावर, नारो गंगाधर यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे त्यांना सर्व राज्याच्या मजमूचा अधिकार मिळाला. नारो गंगाधर यांची समाधी मुजुमदार वाड्याशेजारी कसबा पेठ येथे सुस्थितीत आहे.

श्री क्षेत्र मोरगाव हे पुण्याच्या नजीक. तेथे सरदार मुजुमदारांचा वाडा होता, तो पुढे मोरया गोसावींना अर्पण करण्यात आला. नारो नीळकंठ मुजुमदार यांना मोरगाव येथे क-हा नदीत स्नान करत असताना ‘डोक्‍यावर हिरा असलेला‘ नर्मदेय गणपती मिळाला. तो प्रसाद मानून त्यांनी घरी आणला. तेव्हापासून मुजुमदारांनी दरसाल भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला गणपतीचा उत्सव साजरा करण्‍यास सुरूवात केली. त्यानंतर 1708 मध्ये नारो गंगाधर प्रभुणे – मुजुमदार यांना शाहू महाराजांनी संपूर्ण मराठी राज्याचा मजमू (वसुली)चा अधिकार बहाल केला. केवळ गजाननकृपेमुळेच संपूर्ण मराठी राज्याच्या ‘मजमू’चा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे असे मानून गंगाधरपंतांनी घराण्याची परंपरा असलेला हा उत्सव दर वर्षी तेवढ्याच भव्यतेने करण्याची प्रथा अखंड चालू ठेवली. त्याची समाप्‍ती पंचमीला होते. संगीताचे रसिक जाणकार आणि इतिहास संशोधक सरदार आबासाहेब मुजुमदार यांनी हा उत्सव लोकाभिमुख केला.ती प्रथा मुजुमदारांच्या वंशजांनी चालू ठेवली आहे.

सरदार मुजुमदारांचा ऐतिहासिक वाडापुण्यातील कसबा पेठेत शनिवारवाड्याजवळ सरदार मुजुमदारांचा वाढा आहे. 1770 मध्ये हा वाडा पुण्यात बांधला गेला. 30 ते 35 खोल्यांच्या या वाड्यात दर्शनी कोरीव दरवाजा – छोटा दरवाजा, आतील बांधकाम – कोरीव काम, हंड्या – झुंबरे असलेला गणेश महाल आहे. हा वाडा ऐतिहासिक वास्तू म्हणून जाहीर झाला आहे. अडीचशेवर्षांपूर्वीच्या या वाड्यात सरदार मुजुमदार यांचे 1894 ते 1973 या काळात वास्तव्य होते. वाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून उत्सवाची सुरुवात होते. प्रतिपदेला मुजुमदारवाड्यातील खालच्या देवघरात वर्षभर असलेली ‘श्री’ मूर्ती वाजतगाजत वर, गणेशमहालात आणली जाते. तेथे लाकडी नक्षीदार मयूरासनावर तिची विधिवत प्रतिष्ठापना केली जाते.लघुरुद्र, ब्रह्मणेस्पती सुक्त व अथर्वशीर्षाची सहस्रावर्तने होऊन षोडशोपचार पूजा केली जाते. पुरणाच्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून नंतर प्रसाद भोजन असते. त्याकाळी सुबत्ता, समृद्धी होती. त्यामुळे मुक्तद्वार भोजन असे. पंक्तीवर पंक्ती उठत. उत्सवकाळात रोज सकाळी अथर्वशीर्षांची आवर्तने म्हणण्यात येतात.रात्री, गायनाचा कार्यक्रम असे. पंचमी हा उत्सवाच्या सांगतेचा दिवस. तीर्थप्रसादाचे कीर्तन- लळीत त्या दिवशी उत्तररात्री म्हणायचे व मखरावर पडदा टाकून मूर्ती ‘पुनरागमनयच’ म्हणत परत देवघरात स्वस्थानी न्यायची. प्रसाद म्हणून सर्वांना ‘श्रीफळ’ द्यायचे. अशा प्रकारे उत्सवाची सांगता करायची. वाड्यातील नेहमीच्या देवघरात वर्षभर खास ब्राह्मणांकरवी पूजा होते.

प्रवचनकार ह.भ.प. शाममुरारी निजामपूरकर बुवापुढे आर्थिक आपत्ती व रेशनिंग यांमुळे उत्सवावर बंधन आले. भोजनाची परंपरा खंडित झाली. मार्च 1965च्या दरम्यान नर्मदेय गणपती या प्रास्ताविक मूर्तीची द्रव्यलालसेने चोरी झाली. त्यानंतर, वल्लभेष गणपती या पंचधातूच्या मूर्तीचा उत्सव होऊ लागला. ती मूर्ती सहा इंच उंचीची, दहा हातांची, सर्व हातांत आयुधे असून शारदेसहित पितळी मखरात कमळावर आसनस्थ झालेली आहे. धार्मिक कार्यक्रम, कीर्तन व गायन हे सर्व तसेच चालू राहिले.

पुणेकरांना सरदार मुजुमदारांचा गणपती उत्सव स्मरणात आहे तो गाण्यांच्या अपूर्व बैठकींमुळे. घरातील कार्याचे आमत्रण द्यावे तसे, एक ते दीड महिना अगोदरपासून लांब कोट, पगडी, उपरणे, भाळी आडवे गंध, शेंदूर, पायात पुणेरी जोडा अशा खास पुणेरी पोशाखात हातात चांदीची वाटी घेऊन आमंत्रणास येणारे आबासाहेब अजूनही जुन्या पुणेकरांच्या स्मरणात आहेत. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत हंड्या- झुंबरांनी सुशोभित केलेल्या गणेश महालात ऐशवाई बैठकीवर ‘श्रीं’च्या सानिध्यात अवीट सुरांची मेजवानी पुणेकर रसिकांनी अनेक वेळा अनुभवली आहे.

फोटोत केंद्रस्थानी मोहना चितळे. त्या प्रवचनकार आहेत. मुजुमदार वाड्यात गणपती उत्सवात त्यांचे प्रवचन ठेवले जाते.भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे, मास्तर कृष्णराव, बडे गुलाम अलीखॉं अमानत अली खॉं, सवाई गंधर्व, बालगंधर्व, छोटा गंधर्व, भीमसेन जोशी, स्वामी डी.आर. पर्वतीकर, गोविंदराव टेंबे, वसंतराव देशपांडे, हिराबाई बडोदेकर, मोगुबाई कुर्डीकर, माणिक वर्मा, उत्साद थिरकवॉं, सनईसम्राट शंकरराव गायकवाड या आणि अशा अनेक कलावंतांनी तेथे हजेरी लावली; स्वरांची कारंजी उडवली. लोकांना स्वरानंद दिला. हिंदू-मुसलमान एकत्र आले. एकत्र गायले. प्रसादाचे एकत्र ग्रहण केले. असा हा परंपरासिद्ध गणेशोत्सव आहे. गणेशोत्वातील कीर्तन परंपरा तर अविस्मरणीय आहे. काशीकरबुवा, मुरुडकरबुवा, फलटणकरबुवा हे आणि असे कित्येक कीर्तनमहर्षी स्वत: कीर्तनरंगी रंगून पुणेकरांनाही देहभान विसरायला लावत. ही कीर्तन परंपरा चालू आहे.

गणेशाची आरास अन् पूजा केलेली मूर्तीकालमानारूप सध्याच्या उत्सवात बदल झाला आहे. तरी उत्सवाचा मूळ गाभा तसाच आहे. परंपरेप्रमाणे ‘श्रीं’ची मूर्ती भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला गणेश महालात वाजतगाजत आणली जाते. रोज सकाळी प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन होते. लघुरुद्र, ब्रह्मणेस्पती सुक्त व अथर्वशीर्षाची सहस्रावर्तने होतात. नैवेद्य, आरती होऊन दुपारी चार वाजता प्रवचन होते. सायंकाळी कीर्तन व रात्री गायन होते. असंख्य लोक दर्शनाला येतात.

मोठी पारंपरिक पार्श्वभूमी लाभलेला, पुण्यातील सर्वांत जुना गणपती मुजुमदार कुटुंबीयांनी तसाच चालू ठेवला आहे. गणपती ही सर्व वर्णांना सामावून घेणारी लोकाभिमुख देवता आहे आणि त्या देवतेचा उत्सव कुण्या एकाचा असू शकत नाही. तो जरी आमच्या वाड्यात होत असला तरी तो सर्व पुणेकरांच्या सहकार्याने घडत असतो. तीनशे वर्षांची परंपरा टिकून राहते, याचाच अर्थ लोकांची श्रद्धा, भक्ती व सहकार्य आहे.

अनुपमा मुजुमदार,

187, कसबा पेठ,
मुजुमदार वाडा, सरदार मुजुमदार मार्ग,
शनिवार वाड्याशेजारी, पुणे – 11
दूरध्‍वनी – 020-24579364

Last Updated On – 9th September 2016

About Post Author

2 COMMENTS

  1. आदरणीय अनुपमा मॅडम,

    आदरणीय अनुपमा मॅडम,
    प्रभुणे या आडनावाशी आपला संदर्भ आला असल्याने हा प्रपंच करत आहे. मूळात मुजुमदार घराणे प्रभुणेच. आम्हीही मूळ प्रभुणेच. गोत्र अगस्ती. बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे आमचे मूळ गाव. मोरगाव येथील मयुरेश्वर हे आमचे उपास्यदैवत. मागील सात पिढ्यांपासून आम्ही मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात असलेल्या कोठा या गावी आमचे मूळ पुरुष धुंडिराज बाप्पासाहेब आले होते. पुढे त्यांना नागपूरकर भोसल्यांची जहागीरी वगैरे मिळाली. त्यानंतर देशमुख हे आमचे आडनाव झाले. घरात लग्नादी मंगलकार्ये झाल्यानंतर आम्हाला दर्शनासाठी मोरगाव तसेच मूळ गावी यावे लागते. लोणी येथे आमचादेखील वाडा आहे. त्या वाड्यातही आसरासारख्या काही देवता आहेत. त्यांची पूजा आम्हाला करावी लागते. मी शाळेत असताना भावाचे लग्न झाले. त्या वेळी आम्ही लोणी येथे आलो होतो. तेथे बंडाकाका नामक कोणी विधूर ग्रहस्थ होते. त्यांनी आमची उत्तम बडदास्त ठेवली होती एवढेच आठवते. मोरगाव येथे विनायक लंबोदर ढेरे यांचेकडे आम्ही उतरलो होतो. तेथे कुलाचार, कुलधर्म आटोपून पुढे जेजुरी, तुळजापूर वगैरे ठिकाणी आमचे वहर गेले होते.
    हे सगळे संदर्भ सांगण्याचे कारण एवढेच की गेल्या कैक दिवसांपासून मी आमचा इतिहास शोधण्याच्या प्रयत्नात आहे. तथापि, त्याचे फारसे धागेदोरे हाती लागत नाहीत. शिवाय आमच्या गावात मूळपुरूष धुंडिराज बाप्पासाहेब यांचे प्राचीन मंदिर आहे. हे ग्रहस्थ आपल्या आईसोबत आमच्या गावी आल्याचे म्हटले जाते. परंतु त्यांचा आधीचा काहीच इतिहास आमच्या पिढीला तरी ठाऊक नाही. आमच्यातील एक ज्येष्ठ श्री. नारायणराव देवीदास कोठेकर, जिंतूर (माझे काका) हे काही गोष्टी सांगत असत. त्यांच्याच तोंडून आबासाहेब मुजुमदारांचे नाव मी ऐकलेले आहे.
    तेव्हा आपल्या घराण्यासंबंधी, पूर्वज अर्थात रामशास्त्रींसंबंधी काही माहिती आपल्याकडे असल्यास कृपया कळवावी. तसे आपल्या संबंधित दूरध्वनी क्रमांकावर मीदेखील आपल्याशी संपर्क साधतोच.
    आपला
    संदीप देशमुख-कोठेकर
    3, साई प्लाझा, प्लॉट नं. 21, अयप्पा मंदिरासमोर, सातारा परिसर, बीड बायपास रस्ता, औरंगाबाद.
    भ्रमणध्वनी 7875758715

  2. सुखकर्ता दुःखहर्ता……ही
    सुखकर्ता दुःखहर्ता……ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.

    समर्थे सुंदरमठी गणपती केला !
    दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!
    सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला !
    भाद्रपद माघ पर्यंत !!
    समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.
    या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो.
    वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची !
    हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे.
    या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो .
    समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!
    आकारा आकरी खंडी कोठी पाठविली !
    हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!!
    ११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा…..
    दास रामाचा वाट पाहे सदना !
    संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!
    शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.
    आज महाराष्ट्रात प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे पुरावे सापडतात ते हया उत्सवानंतरचे आहेत. हा उत्सव सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू झाला असून या उत्सवातून प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई हे गुरुकुल येथेही हा उत्सव सुरू झाला आहे. आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ही माहिती जरूर पुरवावी.वरील संशोधन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी केले असून हया माहितीचे सर्व अधिकार राखीव आहेत. या माहितीचा संबंध कोणत्याही जात, धर्म ,पंथ ,सांप्रदाय ,पक्ष ,संघटना यांच्याशी नाही.
    रामदास पठार – सुंदरमठावर येण्याकरीता महाड-पुणे रस्त्यावर वरंधाघाटात माझेरी जवळ कमानी खालून डाव्या हाताने सरळ पुढे कि.मी. मठाच्या माळावर शेवट पर्यंत डांबरी रस्त्याने यावे.निवास, भोजन व्यवस्था पूर्व सूचना दिल्यास विनामूल्य होऊ शकते.

Comments are closed.