हिंदू धर्म हा हत्ती आणि सहा आंधळे यांच्या गोष्टीतील हत्तीसारखा आहे. अंध मनुष्य हत्तीच्या ज्या भागाला हात लावतो तो म्हणजेच हत्ती आहे असे त्या प्रत्येकाला वाटत असते. परंतु लेखकाला हत्तीचे संपूर्ण स्वरूप जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे तो म्हणतो, “मी हिंदू आहे म्हणजे कोण आहे, हे मला अद्याप सापडलेले नाही.“
मी हिंदू आहे म्हणजे मी नक्की कोण आहे असा प्रश्न मी स्वतःला अनेकदा विचारतो आणि उत्तराचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. ‘हिंदू आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलो म्हणून मी हिंदू आहे’ असे अत्यंत सोपे उत्तर लगेच मिळते. पण आईवडील हिंदू आहेत म्हणजे काय? अन् त्यांचे आई-वडील, मग त्यांचे आई-वडील असे करत करत माझे अनेक पूर्वज हिंदू होते, म्हणजे नक्की काय होते अन् कोण होते?
हिंदू धर्म हा काही एकच पोथी, एकच देव मानणारा आणि एकाच कोणा व्यक्तीने स्थापन केलेला धर्म नाही हे तर मला (सगळ्यांनाच) माहीत असते. त्या मानाने एक पोथी धर्मवाल्यांचे सोपे असावे. ती ती पोथी अन् त्या त्या पोथीत सांगितलेला देव मानला, की त्या धर्माचे होता येते. हिंदूंना तो पर्याय उपलब्ध नाही. हिंदू जन्माने हिंदू असतो; त्याच्यापुढे कर्माने हिंदू कसे बनावे ह्याचा एकच एक असा पर्याय नसतो.
मग, मी जसजसा शोध घेऊ लागतो, तसतशी, हिंदू धर्माची अनेक वेगवेगळी रूपे, वेगवेगळ्या व्याख्या अन् त्यांची व्याप्ती माझ्या लक्षात येऊ लागतात. त्यात धर्म म्हणजे एकेश्वरी Organized Religion ह्या अर्थाने शोधण्यास गेले तर काही म्हणजे काही सापडत नाही ! निसर्गाला अन् दगडांना देव मानण्यापासून ते मानवी स्वरूपातील देवापर्यंत आणि विशिष्ट ठिकाणी अमुक एका देवाचे तमुक दानवाशी युद्ध झाले होते किंवा वीर्य सांडले होते म्हणून ते देवस्थान आहे असे मानण्यापासून ते चराचरात देव वसलेला असतो असे मानण्यापर्यंत. द्वैतापासून अद्वैतापर्यंत. आस्तिकतेपासून नास्तिकतेपर्यंत… सर्व काही मला मी हिंदू धर्म किंवा हिंदू तत्त्वज्ञान शोधू गेलो की सापडते.
देव, धर्म, समाज, कुटुंब, व्यक्तिगत आयुष्य अन् समृद्धी ह्या सगळ्यांबद्दल एका प्रचंड मोठ्या ‘स्पेक्ट्रम’मध्ये झालेले विचार मला सापडत राहतात. आणखी शोध घेतला की मला हे सर्व विचार, हे सर्व तत्त्वज्ञान Organize करणारी सहा दर्शने सापडतात. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत अशी ती सहा दर्शने (Schools of Thought) हे हिंदू धर्माचे किंवा तत्त्वज्ञानाचे मूळ ज्ञानभांडार आहे.
हिंदू धर्म हा हत्ती आणि सहा आंधळे यांच्या गोष्टीतील हत्तीसारखा आहे. अंध मनुष्य हत्तीच्या ज्या भागाला हात लावतो तो म्हणजेच हत्ती आहे असे त्या प्रत्येकाला वाटत आहे. ते ठीकच आहे. बहुसंख्यांना स्वत:च्या थेट आकलनापलीकडील जग समजत नाही. पण मला मी जेथे हात लावत आहे तो हत्तीचा पाय आहे म्हणून हत्ती म्हणजे खांबच आहे असे म्हणणे पटत नाही. मी हत्तीचे संपूर्ण स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.
अन् माझ्या सुदैवाने, धर्माची चिकित्सा करणे अथवा प्रश्न विचारून धर्माचे स्वरूप जाणून घेणे हा हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे ! अन् चिकित्सा हा माझ्या धर्माच्या एका शाखेचा एक भाग असल्याने गेली हजारो वर्षे हा धर्म टिकला आहे, ह्या पुढेही टिकेल अन् समृद्ध होत राहील !
मी हिंदू आहे म्हणजे कोण आहे, नेमका कोणत्या परंपरेचा आणि दर्शनाचा पाईक आहे हे मी अजून शोधत आहे; ह्यापुढेही शोधत राहीन. हा शोध घेण्याचे स्वातंत्र्य माझ्या धर्माने मला दिले आहे.
मी हिंदू म्हणजे नेमका कोण हे मला अद्याप सापडलेले नाही. पण मी हिंदू आईवडिलांच्या पोटी जन्मलो हे माझे भाग्य आहे असे मी समजतो. मला माझ्या धर्माचा अभिमान वगैरे नाही, पण इतक्या समृद्ध वैचारिक परंपरेत मी जन्मलो म्हणून मी भाग्यवान आहे असे मला नक्की वाटते. अन् ती वैचारिक परंपरा अधिकाधिक समृद्ध व्हावी म्हणून मीही खारीचा वाटा द्यावा असे मला वाटते. हा अन् असा हिंदू धर्म असावा कदाचित !
– प्रसाद शिरगावकर prasad@aadii.net
——————————————————————————————————————————
मी हिंदू आहे समजा…मी हिंदू धर्मातील चांभार आहे
मला ब्राम्हण जातीत जाता येईल का?
हिंदू म्हणजे नक्की कोण/काय याचा उलगडा झाला की अवश्य आम्हाला ही समजवा ही विनंती!
अशीच घुसमट सगळ्यांची होत असते…. यातून मनात फक्त गोंधळ निर्माण होतो…. सगळेच अभ्यासू नाहीत…. मग कदाचित यातून नविन एक पंथ निर्माण होतो…. पंथ निर्माण झाला तरी आजपर्यंत मूळ धारा वाहत होती……. इथून पुढे सांगता येत नाही….