मी कैद केलेले कळप ही कादंबरी का लिहिली?

0
72
_KaidKeleleKalap_1.jpg

आज जेव्हा या प्रश्नाचा विचार जेव्हा मी करतोय की ही ‘कैद केलेले कळप’ ही कादंबरी मी का लिहिली तेव्हा मुळात मी लिहितोच का या प्रश्नाचे उत्तर शोधणे मला आवश्यक आहे.

बऱ्याच वर्षांपूर्वी मी दिवाळी वा मे मधील सुटीची वाट बघत असे आणि जर मुंबईला बहिणीकडे जायचे ठरले तर अाणखी एका कारणामुळे मला आकर्षण असायचे – मला मुंबई भेटीत विजय तेंडुलकर भेटत. ते होते माझ्या ‘एक होता फेंगाड्या’ या कादंबरीचे फॅन. त्यांनीच ते मला सांगितले होते. त्यांनी मला तशा अर्थाचे एक पत्र पाठवले होते. ते पत्र माझा मौल्यवान ठेवा आहे.

एके दिवशी त्यांच्याशी बोलताना विषय निघाला की, मी का लिहितो? का? कादंबरी का? फेंगाड्या लिहीताना माझ्याकडे महिन्याला पन्नास डिलीव्हरी होत होत्या अन् पहाटे तीन वाजता उठून मी ती कादंबरी झपाटल्यासारखी लिहीली होती. त्याचा संदर्भ या चर्चेला होता. तेंडुलकर नेहमीच्या शांतपणे मला म्हणाले – “आपल्याला एक अदृष्य पण अस्तित्वात असणारे सहावे बोट असते अाणि ते आपल्याला ओढत टेबलाजवळ नेते. त्या बोटाची ती गरज असते.”

तेव्हापासून माझा ‘मी कादंबरी का लिहितो’ हा प्रश्न सुटला आहे. आता पुढचा प्रश्न – मी “कैद केलेले कळप” का लिहीली?

मी नास्तिक होतो तेव्हा मी ‘नियती’ हा शब्द वापरला होता. आता मी महात्मा फुल्यांनी प्रचलित केलेला शब्द – निर्मिक असा वापरू लागलो आहे – तर मी कैद केलेले कळप का लिहीली याचे उत्तर आहे निर्मिकाच्या मनात तसे होते.

मी लहानपणापासून मनाशी ठरवल्याप्रमाणे स्त्री रोग तज्ज्ञ झालो ते ज्या गावात काही सोय नाही तिथे जायचा निश्चय करूनच! मी अनेक टप्पे घेत अाणि टक्के टोणपे खात लासलगावला स्थिरावलो. पार वीस वर्षे.

मी माझे अायुष्य असेच आयुष्य चालू रहाणार हे गृहीत धरले होते. ते तसे चालू राहिले असते तर मी अाणखी कादंबऱ्या लिहिल्या असत्या, पण “कैद केलेले कळप” लिहिली नसती. कधीच लिहिली नसती. नैतिकतेने प्रॅक्टीस करताना हळुहळू असे लक्षात अाले, की धंदेवाईक प्रतिस्पर्धी माझ्या एका चुकीचे भांडवल करून माझ्यावर हल्ला करण्यास चाकू काढून तयार आहेत. माझ्या असेही लक्षात येऊ लागले, की वैद्यकीय व्यवसाय झपाट्याने बदलतो आहे. मला माझ्या वीस वर्षांच्या संघर्षानंतर त्यात रक्त आटवण्यात रस उरला नाही! बहुदा हे माझ्या मनातले बोलणे माझ्या हृदयाने ऐकले अाणि माझी एंजिओप्लास्टी झाली. माझ्यासमोर एंजिओप्लास्टीनंतर यक्षप्रश्न उभा होता. आता जिथे ईसीजीसुद्धा काढण्याची सोय नाही अाणि पहिली मदत मिळायला तिथे दोन तास लागतील तिथे मला जर अॅटॅक आला तर? तिथे आपण रहायचे का? सर्जरी मधले तणाव तसेच कायम होते. अजून ना रक्ताची सोय झालेली ना फिजिशिअनची.

मी निर्णय घेतला की पुन्हा एक उडी घ्यायची. शून्यात उडी घ्यायची. मला सांसारिक जबाबदाऱ्या अनेक होत्या अाणि हातात काहीही नसताना आता नवे आयुष्य सुरू करायचे होते. मी पुण्यात पोचलो. माझ्या कादंबरीचे दार तिथेच दार उघडले गेले. लेखनाची शक्यता निर्माण झाली. मला तेव्हा माहित नव्हते. पण आता माझी कादंबरी सुरू होणार होती.

मी पुण्यात डॉ. संजय गुप्ते यांच्या टीममध्ये दाखल झालो. मी एखादी डिलीव्हरी व सीझरही केले, पण खूप अस्वस्थ झालो. लासलगावला नुसती सर्जरी नव्हती. लासलगावला शरीरात एड्रेनेलीन ओतण्यास व सर्जरीची झिंग येण्यास त्या जोडीने अनेक अडथळे होते. मी त्या प्रतिकूलतेत वीस वर्षे घालवली होती. गुप्ते हॉस्पीटलमध्ये 12 मि.ली. हिमोग्लोबीन असलेली पेशंट होती. माझ्या मदतनीस स्वत: एमडी डॉक्टर होत्या. रक्ताच्या दोन बाटल्या रक्तपेढीत तयार होत्या. सीझर करण्यास मजा येत नव्हती. मला वाटू लागलं की येथे तर पोत्याने तज्ज्ञ आहेत. मी नसलो तर? माझी अशी काय गरज?

माझ्या त्या रुखरुखीमुळे कादंबरीने एक पाऊल पुढे टाकले. कारण मी जर अस्वस्थ झालो नसतो तर ही कादंबरी काही लिहिता आली नसती. मी गुप्ते हॉस्पीटल सोडले आणि स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करत पुढील आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. माझी कादंबरी अाणखी एक पाऊल पुढे सरकली.

मी ‘प्रयास’ संस्थेमध्ये डॉक्टर विनय कुलकर्णी व डॉक्टर संजीवनी कुलकर्णी यांच्याबरोबर आईकडून गर्भाला होणारा एचआयव्ही रोखण्यासाठी सुरू असलेल्या एका प्रोजेक्टमधे सहभागी झालो. तिथे मी पहिल्यांदा ऐकले – होमोसेक्श्युअलबद्दल. सेक्सवर्करबद्दल. पण ते फक्त ऐकीवच होते. माझी कादंबरी अजून दृष्टीक्षेपात नव्हती.

पुन्हा एकदा निर्मिकाचे बोट हलले. डॉ संजय गुप्ते यांना प्लेसमेंट एजन्सीचा फोन आला. एका एनजीओला ज्याने ग्रामीण भागात काम केले होते व ज्याला सामाजिक कामात रस होता अशा वरिष्ठ स्त्री रोग तज्ज्ञाची तशा गरज होती. बहुदा आखुडशिंगी व बहुदुधी असा मी एकटाच होतो.

डॉ संजय गुप्तें यांनू त्यांना माझा नंबर दिला. मला एनजीओचा फोन आला तेव्हा मी आश्चर्याने विचारले – अहो पण मी नोकरीसाठी अर्ज केलेला नाही किंवा मी नोकरी शोधतही नाही. त्यांनी मला सांगितले, की त्यांना माझ्यासारख्या व्यक्तीची नितांत गरज आहे. मी फक्त मुलाखतीला जावे व मग ठरवावे. मी गेलो. त्यांच्या सांगण्यानुसार मला लैंगिक आजारांचा एक्स्पर्ट म्हणून सेक्स वर्कर व होमोसेक्श्युअल व्यक्तींमध्ये काम करायचे होते. महाराष्ट्रभर फिरायचे होते. सेक्स वर्कर व होमोसेक्श्युअल यांमध्ये जागृती करायची होती. महाराष्ट्रातील आमच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेल्या डॉक्टरांना प्रशिक्षण द्यायचे होते. मी थोडा बुचकळ्यात पडलो, कारण मला ते दोन्ही गट फक्त कथा-कादंबऱ्यांतून परिचयाचे होते. त्यांचा माझ्या प्रत्यक्ष जीवनात संबंध अाला नव्हता. माझ्यासमोर प्रश्न होता, की मी माझ्यावर टाकलेल्या त्या जबाबदारीला न्याय देऊ शकेन का? पगार व्यवस्थित मिळणार होता. त्यासोबत अाव्हानदेखील! मला ते काम खुणाऊ लागले. मी उडी घेतली.

अाणि माझी कादंबरी बीजरूपात उतरली!

मी मनाने व विचाराने खुला होतो. मला त्या गटात वावरताना मानसिक अडथळा आला नाही. मी पहिल्या दिवसापासून वेश्यागृहामध्ये सहजपणे जाऊ लागलो. मी मोठ्या शहरातील एसटी स्टँडवर, मुताऱ्यांमध्ये होमोसेक्श्युअल व्यक्तींना भेटत होतो. ख्रिस्ताने त्या सेक्स वर्कर्सना ज्या न्यायाने सोडले होते मी त्याच न्यायाने त्या मानवी समूहांबद्दल विचार करत होतो. मी त्यांना अनैतिक ठरवणारा कोण? मी त्यांचा स्वीकार अगदी सहज केला होता. त्या सर्वांना एचआयव्ही होऊ नये यासाठी झटणे हे माझे – एका वैद्यकीय पेशातील व्यक्तीचे आद्य कर्तव्य होते. कदाचित डॉक्टरांना त्यांच्या वैद्यकीय प्रेरणेमुळे अशा समुदायांचा स्वीकार सहज करता येत असावा. मी त्या कामात रमलो. मनापासून त्या सर्वांमध्ये गुंतत गेलो. लेखकाला आयुष्याच्या मूलभूत प्रश्नांना भिडण्याचे, व्यक्तींच्या आयुष्यात डोकावण्याचे कुतुहल असते. निर्मिकाने माझ्यासाठी सेक्स वर्कर व होमोसेक्श्युअल लोकांच्या जीवनामध्ये डोकावण्याची मोठी खिडकी उघडली होती. तीन वर्षे लोटली. मी बदलत गेलो. माझा सेक्स वर्कर व होमोसेक्श्युअल यांमध्ये जे पीअर होते त्यांच्याशी घनिष्ठ संबंध येत होते. पीअर म्हणजे त्या समूहांतील व्यक्तींमधील अशी माणसे ती प्रोजेक्टसाठी काम करतात. तशा अनेक पीअरमध्ये मला कादंबरीतील गीताताई व दिनेश भेटले. ते सारे कमालीच्या उर्जेने काम करत होते! आम्ही त्यांना महिन्याला फक्त पंधराशे रुपये देत होतो. पण ते हजारो रुपयांचे काम करत होते. आम्ही पगार घेऊन जेवढे काम करत होतो त्यापेक्षा कदाचित अनेक पट जास्त. काय जिद्दीने लढत होते ते! माझे विस्थापित होण्याचे शल्य पार नाहीसे झाले. मी माझा भूतकाळ विसरलो. मला मी जन्मभर तेच काम करत अाहे असे वाटू लागले. काल जी सेक्स वर्कर संस्थेच्या कार्यालयासमोर दारू पिऊन आडवी पडली होती, आज ती त्याच संस्थेच्या अध्यक्षपदी निवडून येत होती. मी त्या घटनेचा साक्षीदार आणि थोडासा सहभागीसुद्धा होतो. ती माणसावरील विश्वास उडालेली माणसे होती. त्यांचा माणसांवर पुन्हा विश्वास बसवण्यात आमचा सहभाग होता.

मला जागा करणारा एक अनुभव आहे. मी रूजू होऊन महिना झाला असेल. मी एका वेश्यागृहामध्ये चालणाऱ्या आमच्या क्लिनीकला भेट द्यायला गेलो. तिथे गेल्यावर आमच्या प्रोजेक्टच्या डॉक्टर मला म्हणाल्या, की त्यांना एक केस ट्रीट करायला अवघड जात आहे. मी ती तपासणार का? मी होकार दिला. त्यांनी निरोप पाठवून त्या सेक्स वर्करला बोलावून घेतले. मी दुसरीकडे कामात असतानाच त्यांनी त्या सेक्स वर्करला आत एक्झामिनेशन टेबलवर तिची अंतर्वस्त्रे काढून तपासण्याच्या स्थितीत सज्ज ठेवले. मला पेशंट तयार असल्याचा निरोप मिळाला. मी सवयीने सहजपणे आत गेलो. मला – एका पुरुषाला पहाताच प्रतिक्षिप्त क्रियेने त्या सेक्स वर्करने स्वत:ला झाकून घेत उडी मारली. मी बुचकळ्यात पडलो. ती सेक्स वर्कर आतापर्यंत त्या एका दिवसात काही परक्या पुरुषांशी व्यवसाय म्हणून रममाण झाली होती. इथून बाहेर पडल्यानंतर ती अजून काही पुरुषांना तिच्याच भाषेत अंगावर घेणार होती. तरीही ती मला, एका पुरूषाला पाहून इतकी का दचकली? ती मी पुरूष डॉक्टरकडून तपासून घेणार नाही असं ठामपणे का सांगत होती? आमच्या डॉक्टरांनी, नर्सबाईंनी तिला समजावले. अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर मी तपासू शकलो. खरे म्हणजे ती आमची सर्वांची चूकच होती. तिला आधीच डॉक्टर पुरूष आहेत ही माहिती देऊन तिची संमती घेणे अावश्यक होते. मी ती चूक पुन्हा करणार नव्हतो. मी खजिल झालो होतो. मी विचार करत होतो, की मी ती चूक कशी केली? त्या प्रश्नाचे उत्तर मला शरमिंदे करणारे होते. मी तिला स्त्री नव्हे, तर सेक्स वर्कर समजत होतो. तरीही मी तिला कुतूहलाने विचारले, की तिला माझी लाज का वाटली? तिनं – त्या एका वीस वर्षांच्या अशिक्षित व पालापाचोळ्यासारख्या मुख्य प्रवाहातून भिरकावून दिलेल्या मुलीने मला उत्तरादाखल सहजपणे प्रश्न विचारला – “पण तुम्ही माझं गिऱ्हाईक थोडेच होता?”

ती घटना माझ्या कादंबरीची मुख्य प्रेरणास्रोत होती. मी पुढील पाच वर्षे तिच्या त्या उत्तरावर माझा प्रोजेक्ट मोजणार होतो.

अाणखी एक ठळक आठवण. सेक्स वर्करची. एका मोठ्या शहरातील गलिच्छ नाला. त्याच्या काठावरची सेक्स वर्कर्सची वस्ती. मी तिथे चाळीशीच्या सेक्स वर्करला भेटण्यासाठी गेलो होतो. ती तिच्या रेग्युलर पार्टनरबरोबर कंडोम वापरत नव्हती. ते तिला धोकादायक होते. रेग्युलर पार्टनर म्हणजे एखाद्या सेक्स वर्कर वा होमोसेक्श्युअलचा असा एक पार्टनर जो सेक्सचे पैसे देत नाही. जो नेहमी त्याच सेक्स वर्कर वा होमोसेक्श्युअलला भेट देतो. त्या सेक्स वर्कर वा होमोसेक्श्युअलसाठी जणू तो/ ती नवरा/ बायकोच असतो/असते. आता आमचा अनुभव असा, की ते केवळ मृगजळ असते. बऱ्याच वेळा तो रेग्युलर पार्टनर सेक्स वर्कर व होमोसेक्श्युअलकडून त्यांना धमकावून पैसे घेत रहातो. तसा रेग्युलर पार्टनर शेवटी तिला/ त्याला एचआयव्ही देऊन निघून जातो. संस्थेच्या कार्यकर्तीची अशी आशा होती, की ती सेक्स वर्कर निदान माझे ऐकेल. मी भले थोरले समुपदेशन केले. अगदी यथायोग्य. मी त्या बोलण्यावर समुपदेशनाच्या परिक्षेत 100 टक्के मार्क नक्की मिळवले असते. तिने माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. ती नशेत तर्र होती. तिने मला विचारलं – “तुमचं लग्न झालंय? बायको आहे तुम्हाला?” मी होकार दिला. मग ती जे काही बोलली ते एखाद्या चित्रपटात सीन असावा तशी. ती म्हणाली –

“बघा! तुम्हाला घरी परत जायचंय, कारण तुमची वाट बघणारी तुमची बायको तिथे आहे. तुमची जशी बायको तसा हा रेग्युलर पार्टनर माझ्यासाठी नवरा आहे. तुम्ही वापरता कंडोम तुमच्या बायको बरोबर? नाही ना? मग मी का वापरू कंडोम रेग्युलर पार्टनर बरोबर?”

_KaidKelelKalap_KadambariKaLihili_1_0.jpgमी काही समजवणार तोच ती म्हणाली, “ असं आहे साहेब, माणसाला आशा असते. तुम्हाला तुमच्या पुस्तकात कायपण सांगतील, पण बाई – मग ती कुठली का असेना, किती शिकलेली का असेना, तिला हक्काचा नवरा लागतो म्हणजे लागतो! ज्याच्यासाठी ती जीव देईल. नवऱ्याचा आधार लागतो तिला मनात खोल कप्प्यात. मला आशा आहे, की हा भाडखाव रेग्युलर पार्टनर कधी तरी माझा तसा नवरा होईल. मी काही खुळी नाही. मला माहिती अाहे, की अशा आशेवर पाण्यात नाव सोडलेल्या आम्हा प्रत्येक बाईची नाव बुडतेच बुडते. पण साहेब मला आशा अाहे, की कदाचित आपली नाव बुडणार नाही. ती लागेल किनाऱ्याला. साहेब ही माझी आशाच जर नाहीशी झाली, तर मग बिना एचाअायव्हीचे तरी या अशा धंद्यात जगायचे तरी कशाला? मला कोण आहे की ज्याच्यासाठी मी जगायचे?”

आम्ही परतलो. माझ्या मनात ती घटना घोळत रहाणार होती.

माझे तेव्हाही म्हणणे होते व आजही आहे की जी सेक्स वर्कर वा जो होमोसेक्स्युअल आपल्या परिस्थितीत समाधानी आहे, जोडीदाराशी परस्पर संमतीने लैंगिक संबंध ठेवतोय  त्यांना कायद्याने गुन्हेगार मानणॆ अयोग्य आहे. सेक्स वर्कर व होमोसेक्स्युअलना घृणा सोसावी लागू नये, सेक्स वर्कर व होमोसेक्स्युअल हे गुन्हेगार मानले जाऊ नयेत यासाठी कायदा बदलायला हवा. पण हळू हळू अगदी फंडरसकट येणारे कंसल्टंट हा आग्रह धरू लागले की सेक्स वर्क हे इतर कोणत्याही कामासारखे काम आहे व होमोसेक्स्युअल असणे नैसर्गिक (जीनेटीक) आहे ज्यात कुणीच बदल करू शकत नाही तेव्हा मात्र मला फील्डवरचे वास्तव काही वेगळेच सांगत होते. सेक्स वर्क हे इतर कोणत्याही कामासारखे काम आहे असे म्हणणे मला मान्यच करता येत नव्हते. मला रोज या अशा अनेक गीताताई भेटत होत्या ज्याना ते अमान्य होते. आम्ही एकदा नाशिकमधे जवळपास 800 सेक्सवर्करचा मेळावा घेतला होता. माझे मित्र व देवदासी निर्मुलनाचे काम केलेले उत्तम कांबळॆ त्या समारंभाला प्रमुख पाहुणे होते. त्यांनी छान पद्धतीने सेक्स वर्करचची एखाद्या झाडाशी तुलना केली अन बजावले की सेक्स वर्करनी आपले आरोग्य सांभाळले तरच त्याच्या सवलीत असलेल्या त्यांच्या वृद्ध आई वडीलांना/ फांदीवर बसलेल्या त्यांच्या पिलांना त्या आश्रय देऊ शकतील. त्यांचे एकमेव झाड उन्मळून पडले तर इतरांसाठी अनर्थ होईल. त्यांनी आवाहन केले की सेक्स वर्करनी आपल्या मुलींना आपल्या धंद्यापासून दूर ठेवावे. त्यांनी आशा व्यक्त केली की एखादी सेक्स वर्करची मुलगी कलेक्टर होईल. अक्षरश: सर्व जणी रडत होत्या. या अशा अनुभवाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा लाखो रुपये पगार घेणाऱ्या कंसल्टंट मोठ्या तावातावाने जणू आपण क्रांती करतोय अशा थाटात सांगायच्या की सेक्स वर्क हे इतर कोणत्याही कामासारखे काम आहे — मला स्पष्ट दिसायचे की की हे सगळ उथळ आहे. जसे माझे नाते या पीअरशी अजून जवळचे झाले तसे त्या आपल्या कथा मला सांगू लागल्या. पण एक ही जण मला असं म्हणाली नाही की सेक्स वर्क हे इतर कोणत्याही कामासारखे काम आहे. एका सेक्स वर्करला मी समजावत होतो – की ती किती दारू पितेय — तिने शांतपणे विचारले – “ डॉक्टर तुम्हाला काय माहितेय रोज वीस भाड्खाव अंगावर घेणे म्हणजे काय? कुणीही नाही घेऊ शकणार ते अंगावर दारू पिल्याविना.” मी तिला समजावयाचा प्रयत्न केला की बाकी काम करणाऱ्या कुणी पितात का तर खवळून ती म्हणाली –“ सेक्स वर्क हे इतर कोणत्याही कामासारखे काम नाही. खूप वंगाळ काम आहे ते. समाज घृणा करतो म्हणून नाही – आपली आपल्यालाच घृणा वाटते म्हणून”

अनेक अशा अनेक  सेक्स वर्करची व पीअरची मिसळण होत कादंबरीतली कॅरेक्टर – गीताताई आता माझ्या मनात राज्य करू लागली. हा जो विरोधाभास होताना – वास्तव आणि विचारवंतांच्या पोपटपंचीचा – तो आता कादंबरीचा कणा होऊ लागला.

या प्रोजेक्टमधे मी प्रथमच एम एस ड्ब्ल्यू – झालल्या प्रज्ञा व पुरूष कार्यकर्ते बघितले. मी अक्षरश: अचंबित झालो. अनेक जण ज्या तनमयतेने काम करत होते/ होत्या – मी थक्क होत होतो. काही जण रेल्वे फुटपाथवर महिना महीना रात्री फिरायचे – होमोसेक्स्युअल शोधत. आपल्या घरून डबे घेऊन जायचे सिविल हॉस्पीटलमधे दाखल केलेल्या सेक्स वर्कर ताईसाठी. रात्री अपरात्री अशी एखादी प्रज्ञा पोलीस स्टेशन वर जायची सेक्स वर्कर ताईला सोडवायला. अमेझींग. निव्वळ विस्मयकारक काम करत होते/ होत्या जीव ओतून. या सगळ्या (आता मी स्त्री व पुरुष अशा सर्व कार्यकर्त्यांना प्रज्ञा म्हणणार आहे कारण या कादंबरीत या सर्वांचे एकजीव मिश्रण प्रज्ञा या केरेक्टरमधे झाले आहे) प्रज्ञा खरं पहाता मध्यम वर्गातल्या. सोशल वर्कची डीग्री घेताना समुदायात थोडे काम केलेल्या. पण त्यांचे वैयक्तीक आयुष्य कुणाही इतर मध्यम वर्गीय व्यक्ती सारखेच. घरात एक संपूर्ण वेगळे पर्यावरण – अन कामावर वेगळेच. अशाच होत्या डॉ नीलीमा. असेच होते संस्था प्रमुख नाना. अन असेच होते माझ्या फंडींग एजन्सीचे माझे सहकारी, माझ्यासह.

हा जो तणाव होता, हा जो विलोभनीय असा पट होता या सर्वांच्या रोजच्या आयुष्यातला – दोन वेगळ्या जगात तन्मयतेने जगायचे, त्यामुळे कादंबरीसाठी उभे आडवे धागे मनात जुळून येत होते.

कादंबरी साठी हजारो अशा सीनचा माझ्या मेंदूत साठा होत होता की जो जवळपास कुणी वाचकाने कधी न पाहिलेला. अर्थात वास्तव इतके बटबटीत व अंगावर येणारा होते की कस् मांडायचं हेच समजत नव्हते. वाचक हा/ ही मध्यम वर्गीयच. मी जसा या प्रोजेक्टमधे जाण्याअधी अनभिज्ञ होतो तसाच/ तशीच वाचकही. अन हे वाचताना सतत धक्के बसत जाणार ही वस्तुस्थिती. मग कस मांडायचं हे सगळ?

काहीही विचारानं घडत नसते कादंबरीत. घडत जातं आपोआप. मनाच्या कोपऱ्यात मात्र हे प्रश्न असतात सतत जागे. या कादंबरीत मध्यम वर्गीय वाचक व हे आगळं वेगळं अंगावर येणार वास्तव यात जोड घातली गेली ती प्रज्ञा अन नीलीमाच्या केमेऱ्यातून या वास्तवाकडे बघण्याच्या एका रचने्ची. अचानक हे घडले लिहीताना अन हा प्रश्न सुटला.

हे जे सगळे वास्तव अनुभवत होतो –– माझी एक नैसर्गिक प्रतिक्रीया उमटत होती – हे सेक्सवर्कचे जग सैतानी आहे. यात नको यायला कुणीच. सेक्स वर्कला इतर कोणत्याही कामासारखे काम समजा असा आग्रह धरणारे हा प्रश्न सहजपणे टोलवत होते की कुणाही स्त्रीला असे काम करावे लागणे हा समाजाचा पराभव नाही का?

होमोसेक्स्युअलबद्दल थोडं वेगळं स्वरूप होते. आकलन अवघड होते. मात्र काही वर्षे गेली या प्रोजेक्टमधे , अनेक दिनेश माझ्याबरोबर त्यांचे मन मोकळे करत गेले अन मी अक्षरश: हादरलो. असाच एक दिनेश. आदल्या संध्याकाळी दोन तास मला असं सांगत होता की त्याच्यावर जबरदस्ती झाली लहानपणी अन तो कोठी – होमोसेक्स्युअल मधली स्त्री – झाला. पण त्याला स्त्रीचे आकर्षण आहे आणि आता तो कैद केला गेला आहे. तो लग्न करू शकत नाही स्त्रीशी, ना संसार करू शकतो. त्याचे पंथी – होमोसेक्स्युअल मधले पुरूष- त्याला धमक्या देत आहेत की त्याने लग्न केले तर त्याच्या पत्नीला ते सत्य सांगतील. हे त्याने मला सांगितल्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आयोजित केलेल्या होमोसेक्श्युअलच्या संमेलनात तोच बेभान होऊन बिकीनी नृत्य करत होता. ते बघताना मी अक्षरश: बधिर झालो होतो. माझ्या कादंबरीसाठी एक वेदना अधोरेखीत होत होती. अशा अनेक दिनेशची शोकांतिका कादंबरीत आता एकवटणार होती.

होमोसेक्स्युअलमधे असे दिनेश भेटले अन मी माझ्या या वैद्यकीय ज्ञानाचा व भूमिकेचा पुनर्विचार करू लागलो – की आपण समजतो तसे होमोसेक्स्युएलीटी ही नैसर्गिक/ जीनेटीक आहे का? की ती एक चॉईस आहे? एक मात्र प्रामाणिकपणे सांगायला हवे की या प्रश्नाचे उत्तर काही मी या प्रोजेक्टमधे काम करताना शोधले नाही. तेव्हा मी मला समजाऊन सांगत होतो – “एव्हढे तज्ञ सांगताहेत कशाला संशय घ्यायचा?” अस समजावताना हा प्रश्न सुटत नव्हता की मग या दिनेशचे काय करायचे?  वास्तविक पहाता या सगळ्या प्रज्ञा रोज वैतागत मला हे सांगत होत्या – “होमोसेक्स्युअल बरोबर काम करण कठीण आहे” सेक्स वर्कर सोप्या व्यक्ती होत्या कारण त्यांच्यासाठी सेक्स एक्ट नैसर्गिक होता, त्यांना असे परके पुरूष अंगावर घेणे जड जात होते. व्यवसायाचा त्रास, संघर्ष अन नैराश्य यांना या सेक्स वर्कर तोंड देत होत्या तरी आमच्या या प्रज्ञांना त्यांचे व्यवस्थापन करणे सोपे जात होते.  अनेक वर्षे एकत्र काम करूनही प्रज्ञांसाठी होमोसेक्स्युअल मात्र गूढ असेच राहिले होते. ते अति भावनिक होते. सेक्स एक्टशिवाय त्यांना जणू दुसरे आयुष्यच नव्हते. त्यांच्यातले मानसिक आजार अनेक पटिंनी तीव्र होते. प्रोजेक्ट मधे काम करताना हे मी ही पहात् होतो. पण माझ्या सभोवती एक असे एक वैचारीक वातावरण होते की त्या पेक्षा काही वेगळा विचार करणं म्हणजे स्वत:ला अवैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणारा व मागासलेला असा जाहीर करणे होते. मग मी बाकिच्यांसारखाच मार्ग अवलंबला होता. आपणही आपल्याला कैद करून घ्यावे या चौकटीत अन जे काही असे वेगळे सापडेल होमोसेक्स्युअलमधे ते एका ठराविक स्पष्टीकरणात गुंडाळून टा्का्वे “की बुवा आजवर होमोसेक्स्युअल हे घृणेचे बळी आहेत म्हणून हे असे आहेत किंवा – कुणि असे दिनेश सांगायला लागले की त्यांना स्त्रीचे पण आकर्षण आहे तर ते केवळ दबावामुळे बोलताहेत, त्यांना अजून जास्त समूपदेशनाची गरज आहे, इत्यादी इत्यादी”.

प्रोजेक्ट सुटल्यावर वर्ष दोन  वर्षे गेली अन विजय तेंडूलकरांनी दर्शवलेले माझे सहावे बोट हालचाल करू लागलं. कादंबरी आता लिहावीच लागणार होती, गीताताई व दिनेश काही मनातून हलत नव्हते.  निदान इतक्या वर्षात होमोसेक्श्युअल मधे काम करताना, अनेक दिनेशशी गप्पा मारल्यावर मला पडलेल्या होमोसेक्श्युएलीटी बद्दल प्रश्नांची उत्तरे मला अभ्यासातून मिळवणे कादंबरी साठी गरजेचे झाले होते. सुदैवाने

गुगल नावाचा अल्लौद्दीन सेवेला हजर होता. मी होमोसेक्श्युएलीटी अभ्यास करू लागलो अन अक्षरश: हादरलो. मला मिळालेला पहिला झटका हा होता की होमोसेक्स्युअलीटी ही जीनेटीक वा नैसर्गिक नव्हती.. अर्जुनाला जसे विष्वरूप दर्शन झाले तसा प्रकार घडला होता माझ्या बाबतीत. अजून एक धक्का बसला ते हे समजल्यावर की मुळात होमोसेक्श्युएलीटी ही नॉर्मल आहे या निर्णयामागे मी समजत होतो तसे वैद्यकशास्त्र/ विज्ञान नव्हते.

काही मोजकीच उदाहरण इथे देतोय. डॉ रोनाल्ड बेयर हा एक होमोसेक्श्यौअल बद्दल आत्मीयता असणारा सायकीएट्रीस्ट आहे. त्याचे पुस्तक आहे – द पॉलिटीक्स ऑफ डायग्नोसीस. (1981) त्यात त्याने अमेरीकन सायकिएट्रीक असोशिएशनने 1974 मधे एका रात्रीत आधी मानसिक आजार असणारी  होमोसेक्स्युअलीटी ही नॉर्मल कशी जाहीर केली गेली त्याचे विस्तृत विवेचन केले आहे. हा सर्व निर्णय अजिबात शास्त्रीय पद्धतीने झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. या निर्णयासाठी मतदान घेतले गेले आणि 45% सायकिएट्रीस्ट विरोधात असताना एका ठरावाद्वारे हा निर्णय घेतला गेला. म्हणजे असे नव्याने कोणतेही शात्रीय पुरावे/ अभ्यास/ वा पेपर नव्हते की जे हे सिद्ध करत होते की होमोसेक्स्युअलीटी ही नॉर्मल आहे. तरीही हा ठराव पास झाला होता.

तर घडल असं की या मागे एक राजकीय होमोसेक्स्युअल अजेंडा होता.  फ्रेंक केमेनी या होमोसेक्स्युअल एक्टिव्हिस्ट्ने 1971 मधे झालेल्या सायकिएट्रीस्टच्या सभेत घुसून घोषणा केली होती – “सायकीएट्री आमची शत्रू आहे. आम्ही तुमच्याविरुद्ध युद्ध पुकारत आहोत” 1974 च्या सभेत याने प्रवेश मिळवला आणि केन्ट रॉबिनसन या सायकीएट्रीस्टच्या मदतीने हा ठराव आणण्याची तरतूद केली.

डॉ सोकरेडीस या अजून एका लेखकाने – ‘सेक्स्युअल पॉलिटीक्स एंड सायन्टीफ़िक लॉजिक’ या एका पुस्तकात विस्तृतपणे लिहीले आहे. तो म्हणतो – “एखादी कंडीशन – नॉन कंडीशन म्हणून जाहीर करणे, एखादा आजार हा आता नॉर्मल गोष्ट आहे असे जाहीर करणे आणि तेही असा कोणताही नव्याने पुरावा नसताना – अत्यंत अशास्त्रीय आहे व हे असेच घडले होमोसेक्सुअलीटी नॉर्मल केली गेली तेव्हा. होमोसेक्सुअल गटाच्या राजकीय दबावाखाली हे घडले. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.”

डॉ जेफरी सेटीनोव्हर यांनी त्यांच्या “होमोसेक्स्युअलीटी अॅड पॉलिटीक्स ऑफ़ टृथ’ या पुस्तकात अजून काही प्रकाश पाडला आहे. 1994 मधे त्यांना लंडनमधे 1994 मधे होमोसेक्सुअल नसलेला पण 1974 मधे जो होमोसेक्श्युअल होता व होमोसेक्श्युअलीटी नॉर्मल जाहीर करण्यासाठी कार्यरत असलेल्या गटाचा जो कार्यकर्ता  होता तो भेटला. त्याने डॉक्टरांना  1974 मधे घडलेल्या आतल्या घडामोडींबद्दल माहिती दिली. उदाहरण द्यायच तर होमोसेक्श्युअलीटी नॉर्मल जाहीर करण्यासाठी कार्यरत असलेल्या – द नेशनल गे टास्क फोर्स – या संघटनेने अमेरीकन सायकिएट्रीस्ट असोशिएशनची मेल लिस्ट “विकत” घेऊन सर्व सदस्यांना  होमोसेक्श्युअलीटी नॉर्मल म्हणून जाहीर करण्याचे आवाहन केले होते!   मेलची खरेदी ही गुप्त होती. या मेल आपल्याला – द नेशनल गे टास्क फोर्स  कडून येत आहेत हे या सभासदांना माहीत नव्हते. या भेटललेल्या कार्यकर्त्याने 1994 साली डॉ जेफरी सेटीनोव्हर यांना ही माहीती सुद्धा पुरवली की होमोसेक्स्युअलीटी ही नॉर्मल आहे असा निर्णय झाल्यावर अमेरीकन सायकिएट्रीस्ट असोशिएशनमधील एक वरीष्ठ होमोसेक्सुअल अधिकारी व त्याचा प्रेमिक, हा कार्यकर्ता व त्याचा प्रेमिक यांनी ती रात्र कशी सेलीब्रेट केली होती!

असे होते पॉलिटीक्स या होमोसेक्श्युअलीटी नॉर्मल जाहीर करण्यामागचे. विज्ञानाने सत्याचा कोणत्याही दबावाशिवाय शाह्त्रीय पद्धतीने पाठपुरावा करणे अपेक्षित असते. या वैज्ञानिक या होमोसेक्श्युअलीटी नॉर्मल जाहीर करण्यामधे संपूर्ण हरताळ फासला गेला होता. आता हे सत्य निर्विवादपणे सिद्ध झाले आहे.

थोडक्यात होमोसेक्स्युअलीटी ही नॉर्मल आहे असा निर्णय तद्दन राजकीय होता. त्यात सायन्स नव्हते.  अर्थात आपली लाज राखायला अमेरीकन सायकिएट्रीस्ट असोशिएशनने दावा केला होता की काही शास्त्रीय पुरावे आहेत, पण ते कधीच नव्हते.

हे असे सर्व वाचताना मी अस्वस्थ होत गेलो. विचार करू लागलो की मी मला वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला असा समजतो. मग मी विश्वास कसा टाकला या फंडींग एजन्सींच्या कंसल्टंटवर सहजपणे काहीही चौकशी न करता की अन मान्य केले की होमोसेक्स्युअलीटी ही नॉर्मल आहे? अर्थात मी तसेच शिकलो होतो वैद्यकीय अभ्यासात म्हणा. मी अजून वाचत राहीलो.

वाचता वाचता अजून काही बाबी पुढे येत गेल्या. 2014 साली गार्डीयन या वृत्तपत्रात एक अलिकडचे संशोधन प्रसिद्ध झाले त्याचा आधार घेऊन ब्रायन फिशर या कॉलमिस्ट्ने –( अगदी अलिकडचा पुरावा) – “होमोसेक्ष्युअलीटीचा असा वेगळा जीन नाही” असा लेख लिहीला.

त्यात त्याने काही महत्वाची माहीती दिली आहे. होमोसेक्ष्युअलीटी संबंधात दोन जीन सापडले आहेत  पण ते थेट नाहीत. म्हणजे ते असतील तर ती व्यक्ती होमोसेक्ष्युअल होतेच अस नाही. ती होमोसेक्ष्युअल होण्याची शक्यता असते. हे जीन हे व्यक्ती होमोसेक्स्युअल व्हायला आवश्यकच असलेलले (ते नसले तर व्यक्ती होमोसेक्श्युअल होणार नाही)  वा आपले आपण स्वतंत्र प्रभाव टाकणारे (ते असले तर ती व्यक्ती होमोसेक्श्युअल होईलच) असे नाहीत.

अजून एक अभ्यास हा आयडेन्टीकल ट्वीनस वर (सारख्या दिसणाऱ्या जुळ्यांवर) बाहेर आला आहे. कोलंबीया युनिवर्सिटीचे बीअर्नर व येल युनिवर्सिटीच्या हनाह ब्रुकनर यांनी दाखवून दिले आहे की अगदी समान जनुके असूनसुद्धा जर जुळ्यातली एक व्यक्ती होमोसेक्स्युअल असेल तर दुसरी असण्याची शक्यता फक्त 5 ते 7 % असते.

या सर्वाचा हा अर्थ आहे की होमोसेक्स्युअल असणे हे व्यक्तीचा चॉईस असतो. तो काही नैसर्गिक व जनुकांमुळे त्या व्यक्ती साठी अपरिहार्य व अटळ भाग नसतो.

अमेरीकन सायकीएट्रीक सोसायटीचा होमोसेक्स्युअलीटी नॉर्मल जाहीर करण्याचा तेव्हाचा निर्णय हा वैद्यकीय निर्णय नव्हता तर एक राजकीय निर्णय होता, त्यात शास्त्रीय सत्य नव्हते.

माझ्या अभ्यासात हे समजले अन मी हादरलो. कारण दुर्दैवाने जगभर या राजकीय निर्णयामुळे हजारो – लाखो होमोसेक्श्युअल आपल्या निर्णयाच्या कैदेत पडले आहेत अन जरी एखाद्याला वाटले की आपण होमोसेक्स्युअल असणे हे आपल्या स्वत:लाच मानसिकदृष्ट्या झेपत नाहीये, आपण अस्वस्थ आहोत तरीही त्या दिनेशला आता मदत मिळतच नाही . सायकीएट्रीस्ट, मीडीया व समाज आज सगळे त्याला अजून समुपदेशनाचा – मारा करत आहेत अन काही ही करून त्या अस्वस्थ कैद केलेल्या होमोसेक्स्युअलला  एका अशास्त्रीय पण राजकीय अशा खुंटीत फिट बसवताहेत! जसे आम्ही जीव ओतून बसवत होतो या प्रोजेक्टचा एक अत्यंत महत्वाचा उद्देश म्हणून. अक्षरश: सुन्न होऊन मी हे वाचत होतो. या कशाचीच माहीती आमच्या प्रोजेक्टमधे काम करणाऱ्यांना नव्हती हे एक कटू सत्य आहे.

बऱ्याच विचारवंतांचा सेक्सवर्क व होमोसेक्श्युअलीटीचे गौरवीकरण मानवतावादावर आधारीत आहे असा समज आहे व फार एतिहासिक अभ्यास वगैरे न करता आज सामाजिक पर्यावरणाचा एक स्थाईभाव असा मानवतावाद स्वीकारला जातो. आमच्या प्रोजेक्टमधे काम करणाऱ्या आणि कदाचित तिथे कन्सल्टंट म्हणून येणाऱ्या सर्वांचा मानवतावादाबद्दल गैरसमज असा आहे – की मानवतावादाची मूल्ये नैसर्गिक आहेत. प्रत्येक माणसाला ती आपोआप सापडणारच. आज आपण समता व प्रतिष्ठा ही दोन मूल्ये इतकी नैसर्गिक मानतो की आपल्याला वाटते की जसे दोन डोळे, दोन हात तशी ही मूल्ये आपल्याला आपल्या जन्माबरोबरच मिळालेली असतात. तर ते तसे नाही. जरी माणसाकडे या मूल्यांकडे बोट दाखवणारे मूलभूत भावविश्व असले तरी ते बहुतांशी सुप्तावस्थेत असते किंवा आजूबाजूच्या जीवनदृष्टीच्या प्रभावाखाली विपरीत छटा व स्वरूप घेऊनच ते व्यक्त होत असते.

माणसाचा सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक इतिहास आपल्याला हे सांगतो की अगदी अलिकडच्या काळापर्यंत ‘समता व प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा’ अशी ठळकपणे माणसाची जीवन दृष्टी कधीच नव्हती. माया संस्कृतीत नव्हति, इजिप्शिअन संस्कृतीत नव्हती, वैदिक काळात वा नंतरच्या मनुस्मृतीमधे नव्हती. पोपच्या मजबूत पकडीत नव्हती, मुस्लिम समाजातही नव्हती. आपण आज जे सहज व नैसर्गिकच असे मानतो ते गेल्या 5-6 शतकांच्या विचारमंथनाचे लढ्यांचे फलित आहे व आपण सजग राहिलो नाही तर ही मूल्ये पहाता पहाता नाहीशी होऊ शकतात आपल्या सामाजिक आणि व्यक्तीगत जाणिवेतून!
दुसरे एक वास्तव असेही आहे की या सर्वाना मानवतावादाचा पाया गेल्या 5-6 शतकांच्या प्रवासात जवळजवळ 180 डीग्रीतून बदललेला आहे हे वास्तव माहीत नाही. आज कळत नकळत मानवतावादाचा पाया हा पोस्टमॉडर्नीझम आणि रीलेटीव्हीजम हा आहे, थोड्याच वेळात आपण त्याचा अर्थ समजावून घेऊ. आजच्या शिक्षणात चार पाच शतकापूर्वी मानवतावादाची पायाभरणी याहून खूप वेगळ्या पायावर झाली हे शिकवले जात नाही.  पूर्वासूरींचा व काही अगदी अलिकडच्या समाजसुधारकांच्या मानवतावादाचा पाया पोस्टमॉडर्नीझम आणि रीलेटीव्हीजम नाही. या शिक्षणाचा अभाव असल्यामुळे पोस्टमॉडर्नीझम आणि रीलेटीव्हीजम शिवाय मनवतावाद असू शकत नाही अशीच समजूत आज रूढ आहे. आणि खाली दिलेल्या चार उदाहरणापैकी दोन नावे – जॉन वेस्ली आणि केरी ही आजची इतिहासाची पुस्तके आपल्याला शिकवत नाहीत हे ही कटू वास्तव आहे. मात्र या चार जणांचा उल्लेख आज मानवतावाद ज्या वळणावर आहे ते समजून घ्यायला करणे अत्यावश्यक आहे.

१) मार्टीन ल्यूथर: (1483- 1546) ख्रिस्ती समाजात बंड करून बायबलआधारीत मानवतावादी घुसळण केली. बायबल हे पोप पासून मुक्त केले व जनसामान्यांना खुले केले. केथोलिक चर्चच्या सदस्यांना मात्र पोप वा पाद्र्यांच्या मदतीशिवाय बायबल वाचण्याची (मग ते कितीही सुशिक्षित असोत) परवानगी मिळायला 400 वर्षे अजून जायला लागली. 1965 मधे ती परवानगी पोपकडून त्यांना मिळाली.

२) जॉन वेस्ली: (1703 -1791) हे मुक्त झालेले बायबल चर्चच्याभिंतींबाहेर लोकांमधे गावोगाव घेऊन जात त्याआधारे अनेक मानवतावादी मोहिमांना जन्म दिला. लहान मुले, महिला, वृद्ध, कैदी या सारख्या गटांसाठी त्याने जे उपक्रम सुरू केले – आज नास्तिकतावादाच्या पायावर काम करणारे सर्व त्यांचीच उजळण करताना आढळतात. शेजारचा फ्रान्स रक्तरंजित क्रांतीकडे जाताना तशाच अवस्थेतल्या ब्रिटनला जॉन वेस्लीने बायबलच्या आधारावर मानवी चेहरा दिला. (अत्यंत भ्रष्ट व धनडांड्ग्या गुलामांचा व्यापार करणाऱ्या राज्यकर्त्यांविरुद्ध व व्यापाऱ्यांविरुद्ध प्रथम आवाज जॉन वेस्लीने उठवला ज्याची परिणीती ही हा व्यापार बंद होण्यात झाली. जॉन वेस्लीवर भ्रष्ट राजकीय व धार्मिक सत्तांनी सतत हल्ले केले.

३) विल्यम केरी: (1761- 1834): हा जागतिक ख्रिस्ती मिशनरी चळवळीचा जनक. चौथी पास चांभार. याच्या मिशनमधे भारतात कोलकत्याजवळ सीरामपूर येथे आधुनिक भारतातली पहिली शाळा भरली जिच्यात मुले – मुली व सर्व जातीची मुले एकत्र शिकली. कॉलेज काढले जे बंगाली माध्यमातून शिकवत होते – या कॉलेजात इंग्रजी हा विषय म्हणूनसुद्धा नव्हता. अन राजा राम मोहन रॉय अगोदर तीस वर्षे विल्यम केरी सतीविरुद्ध सतत लढा देत होते ते बायबलच्या आधारावर,

४) मार्टीन ल्यूथर किंग ज्युनिअर: (1929 -1968) अगदी अलिकडे अमेरिकेतले काळ्या माणसांचे समतेचे युद्ध मार्टीन ल्यूथर किंग ज्युनिअर ज्या मानवतावादासाठी लढला; त्या लढ्याचा पाया नास्तिकता नव्हता तर बायबल होता – सर्व मानसे – स्त्रिया/ पुरूष/ काळे/ गोरे देवासमोर समान आहेत, सर्वांना समान प्रतिष्ठा व हक्क आहेत असे देवाने बायबलमधे अंतीम सत्य म्हणून सांगितले आहे हा होता. त्याचे जे जगप्रसिद्ध 1964 चे भाषण आहे ज्याची गणना एक अग्रगण्य मानवतावादी भाषण म्हणून केली जाते ते भाषण आहे बायबलमधे मोशेने जे भाषण केलेले आहे त्याच्या आधारावर.

का समजून घ्यायचे या दिग्गजांना? कारण या मानवतावादाची पायाभरणी करण्यात अग्रगामी अशा या चौघानीही सेक्सवर्क हे कुठल्याही कामासारखे आहे असे प्रतिपादन कधी मान्य केले नसते आणि होमोसेक्ष्युअलीटी नैसर्गिक मानली नसती.  अस जर असेल तर सेक्स वर्क हे कुठल्याही कामासारखे आहे असे आजचे विचारवंत जे प्रतिपादन करतात आणि होमोसेक्ष्युअलीटी नैसर्गिक मानतात (शास्त्रीय आधार नसताना) त्यांच्या मानवतावादाचा पाया कोणता आहे? या विषयावर वेगळा लेख होईल. पण थोडक्यात सांगायच तर आजच्या मानवतावादाचा पाया हा सर्वसाधारणपणे मागे उल्लेख केल्याप्रमाणे पोस्टमॉडर्नीझम – आणि

रीलेटीव्हीजम आहे. पोस्टमॉडर्नीझम – आणि रीलेटीव्हीजमचा अर्थ थोडक्यात असा:

प्रथम ‘अंतीम असे सत्य नसते’ अशी भुमिका घेतली जाते. (वर बघितललेल्या चार ही व्यक्ती “अंतीम असे सत्य असते व ते बायबलमुळे समजते” अशी पोस्टमॉडर्नीझम – आणि रीलेटीव्हीजम विरुद्ध भूमिका घेत होते आणि तरीही उत्तुंग असे मानवतावादी होते). इथे एक अंतर्विरोध आहे जो बहुसंख्य पोस्टमॉडर्नीझम – आणि रीलेटीव्हीजम वादी आहेत त्यांच्या लक्षात्सुद्धा येत नाही. हा अंतर्विरोध अस:  ‘अंतीम असे सत्य नसते’ ही भुमिका आजच्या विचारवंतांसाठी मात्र अंतीम असते, त्याविरुद्ध असलेली कोणतीही भूमिका ही चूक असते. आणि या पोस्टमॉडर्नीझम – आणि रीलेटीव्हीजमवाद्यांनी सांगितले म्हणून आपण इतरांनी त्यांची भूमिका अंतीम म्हणून मान्य करायचा त्यांचा आग्रह असतो! इतकच नव्हे तर या त्यांच्या आग्रहाला विरोध करणारी व्यक्ती बुरसटलेली व प्रतिगामी असते. ‘अंतीम असे सत्य नसते’ या पायावर एकदा भूमिकेच ईमारत उभी राहीली की आपसूकपणॆ आपसूकच जगातल्या कोणाही व्यक्तीने आपले “आपले सत्य” हे आपले आपले ठरवायचे हे ओघाने येते. अर्थात मग एखादीने ठरवले की सेक्सवर्क हे इतर कोणत्याही कामासारखे तर ते तसे, एखाद्याने ठरवले की मी होमोसेक्ष्युअअल व हे नैसर्गिकच  तर ते तसे. ‘अंतीम असे सत्य नसते’ ही मोठी आकर्षक आणि भुलवणारी भूमिका आहे. सत्य हे सापेक्ष (रीलेटीव्ह) आहे ही भुमिका प्रत्येकालाच  सोईचीही असते कारण मग आपण स्वत: काय कृती करतो त्याचे स्पष्टीकरण कुणाला आपल्याकडून मागायचा अधिकारच नाहिसा होतो! पण वस्तुत: याचा अर्थ हा होतो की अशा या उदार पायवर उभ्या अशा मानवतावादाचा आश्रय कुणिही कशासाठीही घेऊ शकतो. “अंतीम सत्य नसते” ही भूमिका घेणारे विचारवंत वा घेणारा समाज कोणत्याही वाईटाला (एव्हीलला) विरोध करण्याची आपली तात्विक क्षमता घालवून बसलेला असतो. ज्याला वाटेल त्याने कशाचे ही गौरवीकरण करायचे. सेक्सवर्कचे – होमोसेक्स्युअलीटीचे. तात्विकदृष्ट्या मोहक असले तरी पण व्यवहारात मात्र प्रश्न जटील होतो. मुद्दा येतो की हे सगळ मान्य करायच तर मग कुणाचा एकाला दिसलेले सत्य कुणा दुसऱ्याने आपले म्हणून का मान्य करायचे? या प्रश्नाला एकच उत्तर असते – समाजात त्या वेळेला जे पोलिटीकली करेक्ट असेल ते सत्य. मग हे पोलिटीकली करेक्ट ठरणारे सत्य कधी बहुसंख्यवादाने ठरेल – कधी विचारवंत आणि मीडीयाच्या दट्त्याखाली ठरेल, (ज्सा होमोसेक्ष्युअएलीटी नॉर्मल करण्याचा निर्णय)  राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली ठरेल नाही तर बाजारपेठ ठरवेल. आज तर अप्रत्यक्शरीत्या विचारवंत, राजकारणी आणि बहुसंख्य लोक हे बाजाराने वज्रमुथीत घेतले आहेत म्हणजे आज पोलिटीकली तेच करेक्ट जे बाजार ठरवतो!

असंच घडल होमोसेक्श्युएलीटी नॉर्मल घोषित करण्याचा निर्णय जेव्हा घेतला गेला तेव्हा. हा निर्णय शास्त्रीय कसोटीवर नव्हता तर पोस्टमॉडर्नीजम व रीलेटीव्हजमच्या रेट्यात एक पोलीटीकली करेक्ट असा होता. अशी ही वैद्यकीय निर्णय (होमोसेक्श्यएलीटी)  अशास्त्रीय पद्धतीने समूहाच्या/ राजकीय दबावाखाली घेण्याची विचित्र पद्धत सुरू झाली तिने समाजासाठी जणू एक धरणच फोडले गेले आहे. नवनवीन लाटा कोसळू लागल्या आहेत. आता जेंडर (लिंगभाव) सुद्धा व्यक्तिगत चॉईस झाला आहे. खर पहाता गर्भावस्थेपासून व नंतर वयात येताना कार्यरत असणाऱ्या टेस्टेस्टेरॉन वा ईस्ट्रोजनच्या प्रभावाने व्यक्तीचा लिंगभाव ठरत आला होता व आहे. आजही बहुसंख्यांना हा प्रश्नही पडत नाही की मी पुरुष आहे की स्त्री? त्यांना हे सहज समजते आहे की मी पुरुष / स्त्री आहे अन मला विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण आहे. पण माणसाचे हे लैंगिकतेचे मूलभूत भावविश्वसुद्धा आता – धोक्यात आले आहे!  माणसाने आपल्या मूलभूत भावविश्वावर सुद्धा सर्जरी सुरू केली आहे. एखाद्या स्त्रीला आज वाटले मी पुरुष – तर ती पुरुष, एखाद्या पुरुषाला आज वाटले मी स्त्री तर तो स्त्री – अन हे किती कूल!  या सर्वाला विरोध म्हणजे प्रतिगामीपणा. इतका अतिरेक आता याचा होतो आहे की विचार स्वातंत्र्याचा घोशा लावणाऱ्या अमेरीकेत जर एखाद्या व्यक्तीने असे म्हटले की मी होमोसेक्श्युअल व्यक्तीचा तस असण्याचा अधिकार मान्य करतो पण माझे मत असेही आहे की होमोसेक्श्युएलीटी ही अनैसर्गिक आहे तर त्याला होमोफोबिक – होमोसेक्श्युअलचा द्वेष करणारा मानले जाते व त्याला नोकरीतूनही काढले जाते. कसले विचार स्वातंत्र्य? लोकशाही व मुक्त विचारपद्धतीचा उदो उदो करणाऱ्या या समाजात ही इतकी असहिष्णुता आली तरी कुठून? कुणाला आज अमेरीकेत हा प्रश्न सुद्धा पडत नाही कारण ही अशिष्णुता आहे हे समजतही नाही एव्हढे या समाजाचे होकायंत्र पोस्टमॉडर्नीझम – आणि रीलेटीव्हीजमवाद्यांनी ताब्यात घेतले आहे — !

हा रणगाडा थांबत बसतो. ज्या आधारांवर 1974 साली होमोसेक्स्युअलीटी नॉर्मल आहे असा ठराव पास करण्याचा दबाव आणला गेला होता त्या तशाच आधारांनीच आता लहान मुलांबरोबर सेक्स नॉर्मल जाहीर करा (पीडोफीलीया) अशी मोहीम सुरू झाली आहे! आज सुदैवाने सेक्स वर्कला इतर कुठल्याही कामासारखे मानणारे व होमोसेक्श्युअलीटीचे राजकीय समर्थन करणारे विचारवंतसुद्धा  पीडोफीलीयाच्या बाजून नाहीत बहुसंख्येने. पण अंतीम सत्यच नाकरण्याच्या या युगात पोलीटीकली करेक्ट रहाताना कधी हा विरोध विरून जाईल आपल्याच नकळत; ते समजणार पण नाही आणि ज्याने त्याने अस ठरवल की मी लहान मुलाबरोबर सेक्स करणार तर ते त्याचे त्याचे सत्य म्हणून मान्य करायची वेळ येईल. कारण अंतीम सत्य नसते ही भुमिका घेतली की कॊण कुणाला व का विरोध करणार?

असा हा अभ्यास करताना मी हादरत होतो. प्रोजेक्टमधे काम करताना मी भेटलो होतो कैदेत असलेल्या सेक्सवर्कर व होमोसेक्श्युअलना. पण अभ्यासानंतर मला हे कळत गेले की कैद केल्या गेलेल्या कळपांत मानवतावादाचा पोस्टमॉडर्नीझम आणि रीलेटीव्हीजमच्या पायावर आग्रह धरणारे विचारवंतसुद्धा आहेत!

या  पोस्टमॉडर्नीझम आणि रीलेटीव्हीजमच्या कैदेत सेक्सवर्क व होमोसेक्ष्युअएलीटीचे गौरवीकरण फंडींग एजन्सी दिलेल्या दिलेल्या फंडच्या जोरावर पसरवण्याचा परीणाम होत्या गीताताई. त्या स्वत:ला पटत नसतानासुद्धा प्रत्येक समारंभात खोटा त्वेष आणून पोलिटीकली करे्क्ट रहाण्यासाठी म्हणत होत्या – “मी एक सेक्स वर्कर आहे याचा मला अभिमान आहे”.  मला दिसत होते हे लक्षावधी रुपये मानधन घेणारे तथाकथित मानवतावादी विचारवंत जे स्वत:च्या मुलींना कधीही ही सेक्स वर्कर बनवणार नव्हते, तरी शिकवत होते सेक्स वर्करना की या सेक्सवर्करने तिच्या मुली्ला तिच्या व्यवसायात अभिमानाने घालावे!  मी अचंबित झालो होतो.

एकदा तर भर चर्चेत म हा प्रश्न विचारला की इथल्या सर्व स्त्री कार्यकर्त्या वा कन्सल्तंट आपल्या मुलीला सेक्स वर्कर हो अशी प्रेरणा देताहेत का आपापल्या घरी तेव्हा एकीने त्वेषाने सांगितले की जर तिच्या मुलीने तो व्यवसाय स्वीकारला तर तो तिला मान्य असेल. मी अचंबित झालो. अचानक मला वाटायला लागल की असं या विचारवंतांकडून जणू तसे वदवून घेतलं जात आहे एखाद्या रोबो प्रमाणे! जणू त्यांच्या मेंदूचा ताबा कुणितरी घेतला आहे त्यांच्या नकळत. मला वाटू लागल की ही विचारवंत माणससुद्धा एका अज्ञात व अदृष्य शक्तीच्या हातातल्या कठपुतळ्या आहेत. हे सर्व पोपटाप्रमाणे बोलताहेत जे बोलण्यासाठी सांगितलं जातय यांना! कल्पना मनात आली अरे –खरच अशी काही वस्तुस्थिती आहे का की पृथ्वीवरच्या माणसांवरसुद्धा सैतानाचा एक प्रोजेक्ट चाललाय? इंटरनेशनल पातळीवर असणाऱ्या एनजीओ व फंडींग एजन्सी मधे काम करणाऱ्यांच्या लक्षावधी रुपयांचा पगार, त्यांचे पॉश हॉटेल मधले चकचकीत व छापील भाषेतले आग्रही परिसंवाद, या पोथीनिष्ठ कंसल्टंटचे स्वतचे एक उंच होत जाणारे करीअर. पोलीटीकली करेक्ट बोलण्याचे अंगात भिनवलेले कौशल्य अन तसे बोलता बोलता जणू सैतानानेच बिंबवलेली एक जीवनदृष्टी आपल्या नकळत स्वतमधेच बेमालूमपणॆ रुजत जाण्याचे वास्तव! मी लेखक म्हणून थरारलो. कादंबरीला आता एक आगळावेगळा धागा निळाला होता. कादंबरी अजून ठळक झाली होती. विचारवंतांकडून हव ते वदवून घेणारा एक काल्पनिक असा सैतानाचा प्रोजेक्ट माझ्या कादंबरीत प्रवेश करता झाला होता.

माझा कादंबरीचा आराखडा पूर्ण झाला होता.
प्रश्न उभा राहीला की माझा हा रीसर्च कादंबरीत कसा आणायचा?

एक आठवण उभी राहिली. प्रयास मधे काम करत असताना मी अनेक हॉस्पीटलना जिथे एच आय व्ही बाधित स्त्रीची डीलीव्हरी होते तिथे भेट दिली होती. केथोलिक पंथाच्या नननी चालवलेले एक छोटे डीलीव्हरीचे हॉस्पीटल त्यात होते. त्या वेळी खूप कमी हॉस्पीटल अशा पेशंटना आधार देत होती. त्यात ख्रिस्चन हॉस्पिटल अग्रभागी होती. सेकस वर्कर व होमोसेक्स्युअल बरोबर काम करत असतानासुद्धा अशा अनेक शेवटच्या अवस्थेतल्या एचायव्ही बाधित सेकस वर्कर व होमोसेक्स्युअलना ख्रिस्चन हॉस्पायसेस (जिथे उपचार होत नाहीत पण काळजी घेतली जाते) मधे पाठवले जाताना बघितले होते. याना सिविल हॉस्पीटलमधून रस्त्यावर टाकलेले असायचे. खाजगी हॉस्पीटल शक्यच नव्हती. घरात अन ब्रोथेलमधे जागा नव्हती. शेवटी ख्रिस्चन हॉस्पपायसेस हाच एकमेव आधार होता सर्व संस्थांना.  आणि कादंबरीत दाखवल्यासारखे ख्रिस्ती जोडपे माझ्या परिचयाचेसुद्धा आहे अन ते एचायव्ही मधे निरलस पणे काम करत आहे. माझा रिसर्च कादंबरीत आणण्यासाठी मी त्या जोडप्यालाच कादंबरीतल्या नाशिक मुक्कामी आणले! या एक हॉस्पाईस चालवणाऱ्या सॅंडी नावाच्या पात्राला मी कादंबरीत रिसर्च करायला लावला. तयार होऊ लागली एक कलाकृती. अनेक आढळल्लेल्या व्यक्ती एकत्रित होऊन निरनिराळी पात्रे तयार झाली. घटना निर्माण झाल्या. गुंफण तयार झाली.

ही कादंबरी लिहिण्याचे खर प्रयोजन एकच; मला भेटलेल्या अशा अनेक दिनेश व गीताताईंच्या वेदनेला आवाज देणे. मला हे साफ दिसते आहे की आज कैद असलेल्या गीताताई व दिनेश यांना काहीही फायदा या कादंबरीमुळे होणार नाही कारण या समूहांच्या अस्तित्वाला आकार देणाऱ्या विचारवंतांचे कळप हे पोस्टमॉडर्नीझम व रीलेटीव्हीजमच्या कैदेत असणार आहेत — कैदेत!  सेक्सचा बाजार, प्रत्येक माणसाला फक्त एक ग्राहक नावाचे जनावर बनवत मग्न असलेले जागतिकीकरणाचे अर्थकारण या मोकाट वास्तवाच्या वारूला रोखण्याची क्षमता हे कैद केलेले विचारवंत हरवून बसले आहेत.  स्वतला आधुनिक म्हणवणारा आपला समाज  चंगळवाद व उपभोगवादाच्या कैदेत कैद झाला आहे आणि आपण कैद झालो आहोत ही जाणिवसुद्धा विसरून बसला आहे. या सर्वाचा परीणाम असा की समाज म्हणून  आम्ही आता त्वेषाने व कशी क्रांती करत आहोत या विश्वासाने माणसाच्या मूलभूत भावविश्वाचे –  त्यातून सहजरित्या उमटणाऱ्या लिंगभावासारख्या  नैसर्गिक समजांचे अन आकलनाचेच एंप्युटेशन (सडलेला म्हणून छेदून टाकणे) अहमिहमिकतेने करतो आहोत! तेही अशा विजयी आविर्भावात की ही माणसाची प्रगतीची दिशा आहे. माझी कादंबरी वाचकाला व मानव जातीला या दुर्दैवी अध:पतनाकडे फरफटत नेणाऱ्या विजयी आविर्भावासंबंधी जर काही अंतर्मुख करू शकली तर त्यात मी कादंबरीचे यश मानीन.

ॲनिमल फार्म ही जगप्रसिद्ध कादंबरी लिहिणाऱ्या जॉर्ज ऑर्वेल या प्रख्यात लेखकाचा एक उतारा – जो त्याने 1940 साली त्याच्या ‘नोटस ऑन द वे” या पुस्तकात लिहीला होता – जो आज जास्त धगधगीतपणे लागू पडतो, तो देऊन मी माझे मनोगत संपवतो.

‘दोनशे वर्षांपासून आपण ज्या फांदीवर बसलो आहोत ती फांदीच करवतीने आपण हळू हळू कापतो आहोत. शेवटी एक दिवस तो क्षण अचानक येणार आहे. अन फांदीसकट आपण खाली कोसळणार आहोत. पण कोसळल्यावरच आपल्याला आपली चूक ध्यानात येणार आहे. ती अशी की खाली जमिनीवर आपण ही फांदी कापताना जसे गुलाबाच्या फुलांचे ताटवे अपेक्षित केले होते ते तिथे नाहीतच! आहे ते एक काटेरी कुंफणाचे वेटोळे.

जेव्हा हे समजेल, की आपला सोल/ जीव/ आत्मा कापून काढणं वाटलं होतं तेव्हढ निष्णात शल्यल्कर्म नव्हते तर त्या जखमेला – सडत जाण्याचा शाप होता! पण जेव्हा समजेल तेव्हा उशीर झालेला असेल!’

– डॉ अरुण गद्रे

About Post Author

Previous articleकैद केलेले कळप!
Next articleइये मराठीचिये नगरी
डॉ. अरुण गद्रे हे स्त्रीरोगतज्ज्ञ व मराठी लेखक आहेत. त्यांची चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त ग्रामीण लोकांची वीस वर्षे सेवा केली. त्यांच्या तीन कादंबऱ्यांना मराठी साहित्य संस्थेकडून तीन वेळा वर्षातील सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून गौरवण्यात आले आहे. अरुण गद्रे हे वृत्तपत्रांतून वैचारिक व अन्य लेखनही करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here