भारत स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला, तेव्हा हैदराबादच्या निजामाने हैदराबाद संस्थान हे एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले. त्या वेळी मीर लायक अली हा निजामाचा पंतप्रधान होता. भारतात सामील न होण्याचा सल्ला निजामाला देणाऱ्यांमध्ये त्याचे नाव अग्रेसर होते. मीर लायक अली हैदराबाद संस्थानात यशस्वी उद्योगपती होता. त्याला राजकारण किंवा राज्य प्रशासन यांचा कोणताही अनुभव नव्हता. तरीदेखील त्याची हैदराबाद संस्थानाच्या सर्वोच्च पदी निवड करण्यात आली. त्या पदावर नियुक्तीसाठी असलेले त्याचे महत्त्वाचे गुण म्हणजे एक म्हणजे त्याचा भारताबद्दलचा द्वेष आणि दुसरे म्हणजे त्याची कासीम रिझवी याच्याबरोबरची मैत्री. कासीम रिझवी हा कुख्यात रझाकार संघटनेचा प्रमुख होता. कासीम रिझवी हादेखील भारतद्वेष्टा होता. निजामाच्या राज्यव्यवस्थेचा ताबा अनौपचारिक रीत्या त्याच्याकडे 1947 सालापर्यंत आला होता. कासीम रिझवीला रझाकार संघटना पोसण्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य सरकारी खजिन्यातून होत असे आणि ते मुख्य काम मीर लायक अलीचे होते.
भारताने ‘ऑपरेशन पोलो’ या पोलिस कारवाईस आरंभ 13 सप्टेंबर 1948 रोजी केला. भारताने निझामाची सेना आणि रझाकार यांचा पराभव चार दिवसांत केला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन 17 सप्टेंबर 1948 रोजी झाले. निजामाने राज्यात झालेल्या अत्याचारांची आणि पर्यायी युद्धाची सर्व जबाबदारी मीर लायक अली आणि त्याचे मंत्रिमंडळ यांच्यावर टाकली आणि स्वतः नामानिराळा झाला. भारताने मीर लायक अली याला नजरकैदेत टाकले. परंतु तो नजरकैदेतून पसार 1950 मध्ये झाला. तो पाकिस्तानात पळून गेला. तो पळून कसा गेला ती एक मनोरंजक कहाणी आहे.
मीर लायक अलीला नजरकैद होऊन दीड वर्ष (मार्च 1950) लोटले होते. त्याला हैदराबाद शहरात बेगमपेठ भागात एका बंगल्यात ठेवण्यात आले होते. मीर लायक अलीच्या बेगमला त्याला रोज भेटण्याची परवानगी होती. बेगमने पहारेकऱ्यांना एके दिवशी सांगितले, “साहेब आजारी आहेत आणि झोपूनच असतात. त्यांना औषधपाण्याची गरज आहे.” बेगम डॉक्टरांकडे हेलपाटे घालू लागल्या आणि मीर लायक अली याच्यासाठी औषध नेमाने आणू लागल्या. तो प्रकार आठवडाभर चालू राहिला. त्याच सुमारास मीर लायक अली याच्या नात्यात एक लग्न निघाले. नातेवाईकांचा घरी राबता वाढला. एके दिवशी, एक लहान ट्रक भरून मिठाई घरी आली. पहारेकऱ्यांना लग्नाची मिठाई वाटण्यात आली. परत जाताना, शिताफीने मीर लायक अलीचे महत्त्वाचे सामान त्या रिकाम्या ट्रकमध्ये लादण्यात आले. पहारेकरी मिठाई खाण्यात मग्न होते. दुसऱ्या दिवशी, औषध आणण्यासाठी बेगमच्या वेशात मीर लायक अली बुरखा घालून गाडीत बसला. पहारेकऱ्यांनी बेगम नेहमी प्रमाणे डॉक्टरकडे जात आहेत असे वाटून दुर्लक्ष केले. मीर लायक अलीच्या बिछान्यावर लोड आणि उशा रचण्यात आल्या आणि त्यावर पांघरूण टाकण्यात आले. जणू मीर लायक अली विश्रांती घेत आहे असे दृश्य तयार झाले, बेगम कोणाच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी लपून बसली.
मीर लायक अली गाडीतून थेट त्याची बहीण शौकतुन्निसा बेगम हिच्या घरी पोचला. तेथे ठरल्याप्रमाणे मीर लायक अली याचा वकील मित्र अब्दुल कावी हजर होता. अब्दुल कावी त्या योजनेत पाकिस्तानशी सतत संपर्कात होता. अब्दुल कावी याने मीर लायक अलीचा ‘गुलाम अहमद’ या नावाने पासपोर्ट पाकिस्तानच्या मदतीने तयार करून ठेवला होता. मीर लायक अली, अब्दुल कावी आणि शौकतुन्निसाचा मुलगा असे तिघे बंद गाडीतून गुलबर्ग्याकडे रवाना झाले. सिकंदराबादहून गुलबर्गामार्गे मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पहिल्या दर्ज्याचा कुपे आधीच राखून ठेवला होता. सारेजण त्या ट्रेनने मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी पोचले. मीर लायक अलीने गुलाम अहमद या नावाने मुंबई ते कराची विमानाने प्रवास केला आणि तो पाकिस्तानात पोचला. इकडे बेगमदेखील दोन दिवसांनंतर घरातून बाहेर पडली आणि गाडीने थेट मुंबईला पोचली. मीर लायक अली कराचीला पोचला याची खात्री झाल्यानंतर तिनेही विमानाने कराची गाठले.
मीर लायक अली कुटुंबासहित कराचीला पोचल्यानंतर पाकिस्तान सरकारने त्याच्या स्वागताप्रीत्यर्थ दावत ठेवली. त्याचे निमंत्रण भारताचे पाकिस्तानातील तत्कालीन दूत श्री प्रकाश यांनाही गेले. श्री प्रकाश यांनी त्या प्रकरणाची भारताकडे चौकशी केली. मीर लायक अलीच्या घराची झडती घेण्यात आली, तेव्हा मीर लायक अली हातावर तुरी देऊन पळून गेला हे सरकारच्या ध्यानी आले !
ही घटना वाचून इतिहासातील एखाद्या सदृश घटनेची आठवण होते का? अर्थात, शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ! मीर लायक अलीने शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा निश्चित अभ्यास केला असणार. मग भारत सरकारचे अधिकारी गाफील कसे राहिले? त्यांनी महाराजांचा इतिहास वाचला नव्हता का? वाचला असेल तर त्यातून बोध घेतला नसावा.
– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com
———————————————————————————————————
माहितपूर्ण लेख. लेख वाचून आश्चर्य वाटले आणि तेव्हाच्या भारतीय दक्षता अधिकाऱ्यांची किवही. सिकंदराबाद ते मुंबई आणि तेही भारतीय रेल्वे ने आणि तरी पण अधिकाऱ्यांना थांगपत्ता लागला नाही याला काय म्हणावे…..असो
खरंय. पाकिस्तानात गेल्यानंतर लायक अली याला पाकिस्तान सरकारने सरकारात मोठ्या हुद्द्यावर नोकरी दिली. भारत त्यावर कोणतीही कारवाई करू शकला नाही
खरोखर अगदी सेम टु सेम आग्र्याहून ज्या शिताफीने शिवाजी महाराज निसटले त्याच पद्धतीने हा मीर जाफर निसटला. फक्त फरक एवढाच आहे की त्यावेळी फुलादखानाचा करकचून आवळलेला वेढा होता तर इथे मीर जाफरलाच सामील असलेली सडकी यंत्रणा होती.
साहेब खूप छान कथा. आणखीन अशा कथा वाचण्यास उत्सुक असणारा.
रघुनाथ शिरगुरकर
पुणे
खरंय. शिवाजी महाराजांवर प्रखर वेढा होता. लायक अलीच्या बाबतीत सुरक्षा अधिकाऱ्यांचे संगनमत होते काय अशी शंका व्यक्त केली जाते.