आणि पाहता पाहता ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ला पाच वर्षे पूर्ण झाली.दिनकर गांगल आणि समविचारी मंडळींनी 5 मार्च 2010 रोजी या संकल्पनेची रुजवात केली. गेल्या पाच वर्षांमध्ये ती संकल्पना केवळ माहितीच्याच नव्हे तर चांगली माणसं, उपक्रम आणि सांस्कृतिक वैविध्य यांच्या दृष्टीने बहरत गेली. यामध्ये तुम्हा वाचकांचा मोठा आणि महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये तुमच्यापैकी अनेकांनी माहितीच्या अंगाने सहकार्य केले, काहींनी आमच्या विविध उपक्रमांना पाठिंबा देत त्यात सहभाग घेतला, काहींनी त्या उपक्रमांसाठी आर्थिक बळ उभे करण्यात साह्य केले, तर अनेकांनी प्रतिसादांच्या पातळीवर आमच्या धडपडीला पोचपावती दिली. या सगळ्याच गोष्टी आमच्या उत्साह आणि उमेद वाढवत राहिल्या.या पाच वर्षांच्या प्रवासात आम्ही अनेक जिल्ह्यांची, अनेक तालुक्यांची, अनेक व्यक्ती-संस्थांची माहिती तुमच्यासमोर सादर केली. या क्षणी ‘थिंक महाराष्ट्र’वर असे पंधराशेच्या आसपास लेख उपलब्ध आहेत. ही संख्या अगदीच नगण्य आहे याची आम्हाला कल्पना आहे. कारण महाराष्ट्राचा कानाकोपरा कर्तृत्ववान मंडळींनी, सामाजिक संस्थांच्या निरपेक्ष कार्यांनी आणि सांस्कृतिक वैविध्याने रसरसलेला आहे. ती सारी माहिती सच्चेपणाने तुमच्यासमोर मांडणे हे शिवधनुष्य पेलण्याएवढे मोठे काम आहे. आणि आपण सगळे मिळून हे शिवधनुष्य नक्कीच पेलू शकू. तुमचे आजपर्यंत जे सहकार्य आम्हाला लाभत आले ते यापुढेही कायम राहो ही अपेक्षा!
तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
– टिम ‘थिंक महाराष्ट्र’