मानवतावादाचा अर्थ

0
174

मानवतावाद या संकल्पनेच्या पाठीमागचे मूलस्रोत

     भाषेतले काही शब्द असे असतात की त्यांचा नेमका अर्थ लावताच येत नाही. म्हणजे तेथे ठरावीक स्वरूपाचे हरमेन्यूटिक्स किंवा प्रॅगमॅटिक्स यांपैकी कोणतेच शास्त्र वापरून चालत नाही. अशा शब्दांना अर्थ अर्थातच असतो, पण तो सतत बदलत राहिलेला असतो आणि मग जसजसा अर्थ बदलतो, तसतसे त्याच्या पाठीमागचे हरमेन्यूटिक्स आणि प्रॅगमॅटिक्स देखील बदलत जात असते. आधुनिक भाषेमधे बोलायचे तर अशा शब्दांना ‘स्टॅटिक’ अर्थ नसून ‘डायनॅमिक’ अर्थ असतो.

     या प्रकारच्या शब्दाचे ठळक उदाहरण म्हणजे मानवतावाद हा शब्द. या शब्दाचा अर्थ गेल्या चारशे वर्षांमध्ये किमान अर्ध्या डझन वेळा तरी बदललेला आहे. असे असले तरी मानवतावाद या शब्दाला पाश्चात्य तत्त्वज्ञानामधे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजमितीला, आपण मानवता या शब्दाचा संदर्भ ‘माणुसकी’ या शब्दाच्या अर्थाशी जोडतो.

     मानवतावाद हा शब्द म्हणजे ह्युमॅनिझम या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर आहे. पण मुळात ह्युमॅनिझम म्हणजे तरी काय? अनेक पाश्चात्य विद्वांनाच्या मते, या शब्दाला मोठी परंपरा आहे आणि ती थेट प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानापर्यंत जाऊन पोचते. पण त्यांच्या मते, या शब्दाचा उगम आणि त्याच्या मागची परंपरा जरी प्राचीन असली तरी व्यवहारामधे या शब्दाचा उपयोग सुमारे दोन शतकांपूर्वी होऊ लागला, आणि तो जर्मनीमधल्या शैक्षणिक पद्धतीमधून आला. जर्मन शिक्षणपद्धत विकेलमान व गोएथे या दोघांनी बनवलेली होती. तिच्यामधे प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाला आणि ग्रीक भाषेला व त्याबरोबरच ग्रीक भाषेच्या इण्डोयुरोपीयन भाषाकुटुंबामधल्या स्थानालादेखील विशेष महत्त्व होते.

     या जुन्या जर्मन शिक्षणपद्धतीचे ध्येय ‘सुसंस्कृत मानवांच्या पूर्वापार चालत आलेल्या मानव-संस्कृतींचे शिक्षण विद्यार्थिवर्गाला देण्याचे होते. मानव-संस्कृतीचा अभ्यास (स्टुडिओ ह्युमानिटाटिस) या संकल्पनेवरून ‘ह्युमानिस्मस’ असा शब्द आला आणि त्यावरून ह्युमॅनिझम असा तात्त्विक शब्द बनला.  त्याबद्दलचे शिक्षण अशा अर्थाने आपण कलाशाखेच्या अभ्यासक्रमाकरता ‘ह्युमॅनिटीज’ शब्द वापरतो.

     म्हणूनच प्राचीन काळ, ह्युमॅनिटीज यावरच्या विविध अभ्यासक्रमांमधले शिक्षण म्हणजे संस्कृतीचे शिक्षण असे मानले जाऊ लागले. पण त्यानंतर, काळाच्या ओघामध्ये मानवतावाद या शब्दाला अनेकविध अर्थ प्राप्त झाले. वेगवेगळ्या कालखंडांमध्ये असे अर्थ वेगवेगळे असायचे. तेव्हापासून आतापर्यंत ह्युमॅनिझम या शब्दाला इतके विविध अर्थ प्राप्त झाले आणि इतक्या तर्‍हेत-हेच्या संदर्भांमध्ये हा शब्द वापरला गेला, की त्या सर्वाचा वेध घेणे हे फारच जिकिरीचे काम आहे. पण या बाबतीत आपल्या दृष्टीने विचारण्यासारखा प्रश्न म्हणजे अशा एखाद्या इंग्रजी शब्दाचे शब्दश: भाषांतर करून मराठी प्रतिशब्द बनवला, तर तो मराठी प्रतिशब्द त्या अगोदरच्या इंग्रजी शब्दाच्या अर्थामध्ये असलेला सर्व गोळाबेरीज अर्थ (कॉण्टेण्ट) स्वत:च्या शब्दार्थामधे सामावून घेऊ शकतो का?

     अलिकडच्या काळामध्ये मात्र मानवतावाद या शब्दाच्या अर्थामध्ये वैचारिकता (रीझन) आणि ती देखील विशेषत: सेक्युलर स्वरूपाची आहे असे सर्वसाधारणपणे मानले जाऊ लागले आहे. तेव्हा मानवतावाद म्हणजे नक्की काय? या शब्दाच्या अर्थामध्ये इतके विविध पैलू आहेत आणि त्या विविधते मध्ये (प्लुरॅलिटी) इतकी गुंतागुंत (कॉम्प्लेक्सिटी) आहे; शिवाय या सर्वांबरोबर या शब्दामध्ये कालपरत्वे इतका वाहतेपणा व गुळगुळीत घसरडेपणा (फ्लुइडिटी) आलेला आहे, की या शब्दाची नेमकी आणि व्यवस्थित व्याख्या करणे अशक्यप्राय होऊन बसले आहे.

     मानवतावादामध्ये गृहित अनेक अंतर्गत संकल्पनांच्यामध्ये काहीतरी समान धागा नक्की आहे. कारण त्याखेरीज हा शब्द इतक्या वेळा वापरला गेला नसता आणि त्यातला मथितार्थ आजवरच्या इतक्या लोकांनी समजून घेतला नसता.

     या शब्दाचा सर्वात प्राचीन मूलस्रोत ‘ह्युमस’हा लॅटिन भाषेतला शब्द. त्याचा अर्थ जमीन (ग्राउण्ड). कसली जमीन? तर वैचारिकतेची आणि प्रत्यक्ष वागण्यातल्या वर्तणुकीच्या खाली असलेली जमीन. म्हणजे मानवप्राणी म्हणून आपण जे जे काही करतो, त्याला मूलभूत आधार देणारे तत्त्व. अर्थात सर्व मानवी ‘अ‍ॅक्टिव्हिटीज’करता लागणारा पायाभूत आधार (फाउण्डेशनल सपोर्ट) म्हणजे ह्युमस.

     ह्युमसवरून पुढे ‘ह्युमिलिस’ असा शब्द तयार झाला. तोही लॅटिन भाषेत. त्याचा अर्थ म्हणजे इंग्रजीमधला ‘हम्बल’ हा शब्द. म्हणजे ज्याचे पाय जमिनीवर स्थिरावलेले आहेत आणि जो स्वत:बद्दलच्या अहंकाराने आणि गर्वाने फुग्यासारखा फुगून आकाशात उडत नाही असा माणूस. त्यावरूनच इंग्रजीमधले ‘ह्युमन’ म्हणजे मानवी आणि ‘ह्युमिलिटी’ म्हणजे नम्रता हे शब्द आले. त्यानंतर या शब्दाच्या अर्थाचा आणखी विस्तार होत गेला आणि त्या विस्तारावरून पुढे ‘होमो’ आणि ‘ह्युमेनस’ असे शब्द आले. त्यांचे अर्थ आपल्यासारखे असणे, माणसासारखे असणे असे झाले.

     लॅटिन शब्दाच्या बरोबर उलट म्हणजे विरूद्ध अर्थाचा शब्द म्हणजे ‘द्यूस’. हा लॅटिन भाषेतला शब्द देव या वैदिक संस्कृत भाषेतल्या देव या अर्थाच्या ‘द्यु’ या शब्दावरून आला आहे. द्यु म्हणजे प्रकाशमान असणे. आकाशातले तारे प्रकाशमान असतात. तसेच देवदेखील प्रकाशमान असतात. म्हणून देव(द्यूस) आकाशात (द्युलोकात) असतात आणि आपण माणसे (ह्युमिलिस) पृथ्वीवर (मृत्युलोकात किंवा जमिनीवर) असतो. देव आणि मानव यांच्यामधला हा मूलभूत फरक दोन शब्दांच्या अर्थांमधल्या फरकामधे आहे व तो त्यांतल्या फरकानेच दर्शवला जातो. किंबहुना, देव या शब्दाची व्याख्याच मुळात द्यु या शब्दावरून आलेली आहे.

     ( वि.सू – मी याच वेबसाइटवर पूर्वी लिहिलेला – ‘गॉड’ हा इंग्रजी शब्द कोठून आला? हा लेख वाचल्यावर काही वाचकांनी ‘मग देव शब्द कोठून आला?” असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर या परिच्छेदामध्ये सापडेल)

     लॅटिन द्यूसपासून पुढे लॅटिन भाषेतच ‘दिवस’ आणि ‘डिव्हिनस’ असे शब्द आले आणि त्यांच्यापासून इंग्रजी भाषेमध्ये ‘डिव्हाइन, डिव्हिनिटी’ वगैरे शब्द निर्माण झाले.

     ग्रीक भाषेत अशाच घटना घडल्या. वैदिक संस्कृत द्यु पासून ग्रीक भाषेत ‘थिओ’ हा शब्द आला त्यावरून ‘थिऑलॉजी’, ‘थिऑसॉफी’ म्हणजे देवाबद्दलच्या ज्ञानाची परंपरा दर्शवणारे शब्द आले. पण हे सर्व उलट बाजूचे म्हणजे देव आणि माणूस या दोहोंमधे असलेल्या देवाच्या बाजूच्या व माणसाविरुद्धच्या बाजूचे झाले. ब-याचदा एखाद्या संकल्पनेचा अर्थ सरळपणे सांगण्याबरोबर त्याच्या उलट म्हणजे विरूद्ध अर्थाचे काय? ते सांगितल्याने मूळ शब्दाचा अर्थ चांगल्या प्रकारे स्पष्ट होतो. म्हणून देव या शब्दाबद्दल लिहिले. पण हे सर्व लिहिण्यात आणखी एक हेतूदेखील आहे. तो म्हणजे देवाबद्दलचे सर्वकाही, म्हणजे अध्यात्म, धार्मिकता वगैरे एका बाजूला आणि मानवतावाद दुस-या बाजूला, ही विभागणी प्राचीन काळापासून झालेली आहे. परंतु या दोन बाजूंमधली दरी आज आपल्याला जितकी दिसते, तितकी ती पूर्वीच्या काळी नव्हती.

     आजमितीला काही मानवतावादी लोक चक्क नास्तिक होऊ लागले आहेत. स्वत:ला ‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट’ असे म्हणवू घेणा-या समाजवादी आणि त्याहीपेक्षा जास्त नास्तिक असलेल्या साम्यवादी मार्क्सिस्ट लोकांचे उदाहरण बघा.

पण पूर्वीच्या काळी अध्यात्म व धार्मिकता एका बाजूला आणि मानवतावाद दुस-या बाजूला यांच्यामधली दरी इतकी मोठी नव्हती. कारण त्याकाळी धर्मश्रद्धा ही धार्मिक-आध्यात्मिक बाबतीतली असली तरीदेखील ती एक मानवीय अ‍ॅक्टिव्हिटी मानली जात होती, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे, तर ह्युमस शब्दावरून पुढे ‘ह्युमॅनिझम’, ‘ह्युमॅनिटी’ हे शब्द आले. ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद आणि ‘ह्युमॅनिटीज’ म्हणजे मानवाबद्दलच्या सर्व (किंवा मानवीय सर्व) विषयांचा अभ्यास. त्यामधे भाषा, लॉजिक, तत्त्वज्ञान, मनोविज्ञान, मानवी समाजाबद्दलचे म्हणून समाजशास्त्र आणि मानवांमधे होणा-या देवाणघेवाणीचे अर्थशास्त्र हे विषय निर्माण झाले. तसेच धार्मिकता आणि मानवतावाद या दोहोंमधला विरोध पूर्वीच्या काळी आजच्या इतका तीव्र नसल्याने धर्माबद्दलच्या ग्रीक व लॅटिन भाषांमधल्या धर्मग्रंथांच्या अभ्यासाचादेखील समावेश ‘ह्युमॅनिटीज’मध्ये असायचा.

     ग्रीको-रोमन काळ संपून गेल्यावर, तेव्हापासून मध्ययुगापर्यंत त्या काळातल्या विद्वान लोकांनी लॅटिन ‘ डिव्हिनिटास’ म्हणजे देवाबद्दलचे आणि ‘ह्युमॅनिटास’ म्हणजे मानवाबद्दलचे असा फरक करायला सुरुवात केली. चालू घडीला वापरला जाणारा ‘ह्युमॅनिटीज’ हा शब्द त्यावरूनच आला. त्यामधे भाषा, तत्त्वज्ञान आणि एकूणच, मानवाबद्दलच्या सर्व विषयांचा अभ्यास असा त्याचा अर्थ लावला गेला, तो आपण अजूनही वापरतो. हा अभ्यास देवाबद्दलचा नसून फक्त मानवाबद्दलचा असल्याने त्याला ‘सेक्युलर’ असे म्हटले गेले. एवंच, डिव्हिनिटास-ह्युमॅनिटास या फरकामधे जे डिव्हिनिटासमधले नाही, ते सर्व सेक्युलर मानले गेले.

     मध्ययुगानंतर रेनेसान्सच्या काळामध्ये ‘ह्युमॅनिटास’च्या अर्थाचा आणखी विस्तार होऊन त्यामध्ये ‘लिबरल आर्टस्’ अशा सर्व विषयांचा अंतर्भाव केला गेला. अर्थात त्यामध्ये सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय वगैरे अनेकविध विषयांचा अभ्यास घातला गेला. इथपासून पुढे हा बदललेला नवा अर्थच ‘मानवतावाद’ म्हणून रूढ झाला. त्याचे स्वरूप अर्थातच सेक्युलर आहे आणि त्याचा रोख माणुसपणा व माणसाबद्दलचे सर्व काही यांवर आहे. या नव्या पेहरावातला मानवतावाद मग ‘रिआलिझम’, ‘सोशालिझम’ य़ा शब्दांच्या जोडीला ह्यूमॅनिझम नावाची त्यांच्यासारखीच एक सेक्युलर ज्ञानशाखा म्हणून बसवला गेला.

     या नव्या मानवतावादाच्या जडणघडणीमध्ये हेगेल, हम्बोल्ट वगैरे जर्मन विचारवंतांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर मानवतावादाला नवा अर्थ प्राप्त झाला. त्याला ‘आयडियालिस्टिक’ व ‘रोमॅण्टिक’ मानवतावाद असे म्हटले गेले. हेगेलच्या अनुयायांमधे पुढे ‘राइट हेगेलियन’ आणि ‘लेफ्ट हेगेलियन’ असे दोन तट पडले. कार्ल मार्क्स हा या लेफ्ट हेगेलियन परंपरेतला होता. पण त्यानंतर पुढे स्वत:चे स्वतंत्र तत्त्वज्ञान मांडताना त्याने हेगेलपासून फारकत घेतली. पण समाजवादी व साम्यवादी लोकांना ‘डाव्या विचारसरणीचे लोक’ असे म्हणायला त्या ‘लेफ्ट हेगेलियन’ या शब्दावरून सुरूवात झाली.

     त्यानंतर सुमारे सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी हायडेग्गरसारख्या जर्मन विचारवंतांने मानवतावादाच्या नव्या स्वरूपाला विरोध करून मानवतावादाला पुन्हा प्राचीन काळातले स्वरूप दे्ण्याचा प्रयत्न केला. हायडेग्गरचे ‘द एस्सेन्स ऑफ मॅन इज एक्सेन्शियल टु द ट्रुथ ऑफ बीइंग’  हे वाक्य प्रसिद्ध आहे.  हायडेग्गर ‘बीइंग’ हा शब्द दोन प्रकारे वापरतो. त्यातला being (स्मॉल बी) हा अर्थ निव्वळ ‘अस्तित्वदर्शक’ आहे आणि Being (कॅपिटल बी) हा अर्थ मानवाची जाणीव, नेणीव आणि माणुसपणाचा मूलभूत आधार असलेले ‘चैतन्य’ असा आहे. हायडेग्गरने मानवतावादाला तोपर्यंत प्राप्त झालेला रोमॅण्टिक व अ‍ॅन्थ्रोपोमॉर्फिक अर्थ काढून टाकून या शब्दाला त्याचा मूळचा प्राचीन अर्थ प्राप्त करून द्यायचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्याने मानवामध्ये असलेली जिवंतपणाची खूण म्हणजेच चैतन्यरूपी जीवात्मा यालाच प्राधान्य दिले. संस्कृती हा या चैतन्याचा आविष्कार असतो आणि तोच मानवतावादाचा खराखुरा पाया असतो असे हायडेग्गर म्हणतो

     प्राचीन हिंदू तत्त्वज्ञानामध्ये ‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम्’ अर्थ- जगातल्या सर्व लोकांना सुसंस्कृत बनवा… असे जे म्हटले आहे गेले त्याच्याशी हायडेग्गरने ‘मानवतावादावर आधारलेली संस्कृती’ या शब्दांना दिलेला अर्थ बराचसा समांतर आहे. ( आर्य या संस्कृत शब्दाचा अर्थ सुसंस्कृत माणूस असा आहे.)

     गेल्या सत्तर वर्षांच्या काळामध्ये मात्र मानवतावाद या शब्दाचे नाणे फारच गुळगुळीत बनले आहे. त्याच्या अर्थामध्ये विस्कळितपणा आला आहे, इतका की मानवतावाद म्हणजे नेमके काय? या प्रश्नाच्या उत्तराबद्दल कमालीचा संभ्रम उत्पन्न झाला आहे. कदाचित या शब्दाच्या अतिवापरामुळे असे झाले असू शकेल, पण कारण काही असले, तरी जसा पेरेस्त्रोइका नंतर सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यावर आणि बर्लिनची भिंत पडून गेल्यावर साम्यवाद या शब्दाला फारसा अर्थ उरलेला नाही आणि जागतिकीकरणाच्या युगामध्ये जसा समाजवाद या शब्दालाही फारसा अर्थ उरलेला नाही, त्याप्रमाणेच मानवतावाद हा शब्ददेखील आपला अर्थ हरवून बसला आहे.

     तरीदेखील, मानवतावादाला गेल्या सव्वादोनशे वर्षांचा इतिहास आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही. तसेच, आपण सर्वजण मानवजातीचे घटक असल्याने आणि मानवजातीच्या एकूणच ‘मानव्यते’चे भविष्यकाळामध्ये काय होणार हा प्रश्न आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा असल्याकारणाने मानवतावाद या मूळ संकल्पनेचे महत्त्व मनावर ठसले जाते. त्यामुळेच सर्व विस्कळितपणा एकत्रित करून, त्याची सुव्यवस्थित मांडणी करून त्याची स्वतंत्र ज्ञानशाखा विकसित करण्याची निकड अधिकच भासू लागली आहे.

– डॉ. अनिलकुमार भाटे,
निवृत्त प्राध्यापक,
विद्युत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान,
माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेण्ट
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका
इमेल : anilbhate1@hotmail.com

About Post Author