माधव चव्‍हाण – प्रथम शिक्षण!

5
56
carasole

माधव चव्‍हाणदेशातल्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोचवायचे आहे  या ध्यासाने झपाटलेल्या माधव चव्हाण यांनी ‘प्रथम’ संस्थेची स्थापना केली.  संस्था केंद्र सरकारच्या मदतीने शिक्षण तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम करते. तिच्या कार्यकर्त्यांचे जाळे जगभर पसरले आहे.

माधवचा जन्म मुंबईतला. ज्येष्ठ कम्युनिस्ट आणि कामगार चळवळीचे नेते यशवंतराव चव्हाण आणि विमल चव्हाण यांचा तो पुत्र. त्याचे आजोबा कोल्हापूर प्रांतातील न्यायाधीश. माधवचे वडील यशवंतराव सतराव्या वर्षी कम्युनिस्ट पक्षाकडे ओढले गेले. त्यांनी स्वतःला स्वातंत्र्याच्या लढ्यात झोकून दिले. माधवच्या आईवडिलांची परस्परांशी ओळख १९४२ मध्ये, चळवळीदरम्यानच झाली.

चव्हाण दाम्पत्याचे घर कम्युन म्हणूनच ओळखले जात असे. तिथे केवळ पक्षकार्यकर्ते नव्हे तर त्यांचा कुटुंबकबिलादेखील कधी कधी वास्तव्याला असे. यशवंतराव चव्हाण लाल निशाण पार्टीचे ज्येष्ठ नेते होते. त्यामुळे माधवला त्याच्या वडिलांच्या आणि अन्य थोरामोठ्यांच्या सान्निध्यात राहून कमी वयात सामाजिक आणि राजकीय विचारांचे बाळकडू मिळाले. त्याने स्वतःला हायस्कूलचे शिक्षण झाल्यानंतर डाव्या पक्षाच्या कामात झोकून दिले. त्याने विद्यार्थ्यांच्या चळवळीचे नेतृत्वही केले. त्याने मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून बी.एससी. केल्यानंतर जवळपास वर्षभर लाल निशाण पार्टीसोबत काम केले. त्याने विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना हात घातला. त्याच बेतास ‘स्त्री मुक्ती चळवळ’ सुरू झाली, तेव्हा त्याने त्यांतली बरीचशी गाणीही लिहिली आहेत. परंतु आणीबाणी जाहीर झाली आणि त्याला पुढील शिक्षणासाठी पुन्हा कॉलेजचा रस्ता पकडावा लागला. माधव ‘इनऑरगॅनिक केमिस्ट्री’ या विषयात एम.एससी. परीक्षेत डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाला.

माधवने केमिस्ट्रीसाठी जगभरात पहिल्या दहांत मोडणाऱ्या ‘ओहियो युनिव्हर्सिटी’तून पीएच.डी. मिळवली. त्याच कालावधीत त्याच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला. तो अमेरिकेत प्रत्ययास येणाऱ्या आणि तेथील चर्चांमधूनही सातत्याने जाणवणाऱ्या समानतेने प्रभावित झाला.

तो भारतात परत येऊन  पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) या संस्थेत काम करू लागला. त्याच दरम्यान त्याला युडीसीटी (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी)मध्ये प्रोफेसर म्हणून रुजू होण्याचा प्रस्ताव आला आणि तो मुंबईत दाखल झाला. युडीसीटीमध्ये शिकवणे त्याला आवडत होते, मात्र त्याचा संशोधन अर्ज दोन वर्षे लाल फितीत अडकला होता, याचे शल्यही त्याच्या मनात होते. त्याच दरम्यान, तो पुन्हा राजकारणात ओढला गेला. तो लाल निशाण पार्टीच्या बैठकांना हजेरी लावणे, पक्षाच्या वर्तमानपत्रासाठी मदत करणे अशा प्रकारची कामे करत असे.

युडीसीटीमधील शिक्षक १९८८मध्ये चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी संपावर गेले. माधवने त्या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्याचवेळी माधवने पंतप्रधानांना पत्र लिहिले. त्यात त्याने पत्रात म्हटले होते… ‘कॉलेजे बंद आहेत. मुलं इथं तिथं भटकत आहेत आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेत नेमकं चुकतंय तरी काय, याबाबत तुम्ही साधी चर्चाही घडवून आणत नाही. त्याऐवजी चर्चा होते ती फक्त प्रोफेसरांनी मस्टरवर स्वाक्षरी करावी की नाही, पगारवाढ पाच टक्के असावी की सात टक्के… यावर. ही अतिशय घृणास्पद बाब आहे.’
पंतप्रधान राजीव गांधींनी पत्र वाचून ते शिक्षणमंत्र्यांचे सचिव अनिल बोर्डिया यांच्याकडे पाठवले. त्यानंतर शिक्षकांचा तो संप मिटला खरा; परंतु बोर्डिया यांना माधवची भेट घ्यायची होती. ते दोघे भेटले. त्यांच्यात चर्चाही झाली.  ‘तुम्ही सामाजिक क्रांतीबद्दल, सामाजिक न्यायाबद्दल बोलता, गरिबांसाठी पोस्टर्स आणि पत्रकेही छापता, पण ज्यांच्यासाठी तुम्ही हे लिहिता, त्यांनाच ते वाचता येत नाही. त्याच्याशी तुम्हाला काहीही देणेघेणे नाही….’ बोर्डिया यांनी माधवसमोर सडेतोड निरीक्षणे मांडली.  त्यांच्यातील ते संभाषण माधवच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. ते साल होते १९८९. भारतात पन्नास  टक्के लोकांना वाचताही येत नाही, हे कटू सत्य माधवला टोचू लागले.

कम्युनिझम आंतरराष्ट्रीय पटलावर बदलत होता! भारतातही बदल होत होते. गरिबी हटाव, यांसारख्या घोषणा बदलून नव्या कल्पना, नव्या मोहिमा हाती घेतल्या जात होत्या. त्यातील एक मोहीम सॅम पित्रोदा यांच्या डोक्यातून जन्मली. ती होती ‘राष्ट्रीय साक्षरता मोहीम.’ ती प्रौढांमधली निरक्षरता कमी करण्यासाठी आखली गेली होती. ती चळवळ चालू ठेवण्यासाठी असामान्य व्यक्तींची गरज होती. माधव चव्हाण त्यातला एक झाला. माधवने coro (कोरो)ची स्थापना केली. त्याने त्या चळवळीचा भाग बनून वस्तीतल्या लोकांना कामाला लावले. वस्तीपातळीवर परिवर्तन, स्त्री-युवकांसोबत काम करणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. माधवचे वैशिष्ट्य म्हणजे तो कठीण गोष्ट सोपी करून सांगे. तो पंतप्रधानांपासून ते थेट वस्तीशाळेत शिकवणाऱ्या ‌मुलालाही तितक्याच सोप्या भाषेत समजावून सांगतो. मीही निर्मला निकेतनच्या माध्यमातून प्रौढ शिक्षणात होतेच. त्यामुळे आमचे ध्येय एक असल्याने आम्ही एकत्र आलो.

माधवने त्याची सर्व ऊर्जा प्रौढ शिक्षणासाठी वाहून लावण्याचे ठरवले. तो दिवसा युडीसीटीमध्ये नोकरी करायचा तर रात्री प्रौढ शिक्षणाचे काम करायचा. परंतु त्याच्या कामाला दिशा मिळाली ती चेंबूर आणि धारावी येथील झोपडपट्टीत काम करताना. त्या दरम्यान सरकारच्या राष्ट्रीय साक्षरता मोहिमे अंतर्गत मास प्रोग्राम फॉर फंडामेंटल एनर्जी (एमपीएफएल) हा कार्यक्रम सुरू झाला होता. माधवने त्या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींनी सहभागी व्हावे यासाठी पुढाकार घेतला. मात्र एमपीएफएल कसे सुरू करणार, याबाबत गोंधळ होता. मुंबईतल्या सेंट झेवियर्स आणिक रुइया कॉलेजांसारख्या उच्चभ्रू कॉलेजांमधली मुले झोपडपट्टीत शिकवायला जातील का, याबाबत प्रश्नचिन्ह होते. झोपडपट्टीतल्या आठवी, दहावी पास झालेल्या मुलांमध्ये काहीतरी करण्याची उर्मी होती. ‘कोरो’ने तशा मुलांना निवडले. मुले झोपडपट्टीतल्या ज्येष्ठ पण निरक्षरांना शिकवू लागली. सरकारकडून एक लाखाची ग्रँट मिळत होती. इतक्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने ती मोहीम राबवूनही एक वर्षानंतर अवघे दहा टक्के यश पदरात पडले. मात्र कधी पन्नास तर कधी नव्वद  टक्के यश मिळाल्याचे दाखवण्यात आले. तरीही माधव स्वस्थ बसणारा नव्हता. माधवने रात्रशाळा सुरू केल्या. लोकांचे विविध गट तयार करून त्यांना शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे वेगवेगळ्या झोपडपट्टीतील लोक एकत्र आले. एवढेच नव्हे तर अशा वेगवेगळ्या गटांतील महिलाही एका छताखाली आल्या. त्या छताखालीच त्यांना विविध महिला संघटनांनी दिशा दाखवली. रोजच्या कमाईतून बचतीचे अनेक धडे गिरवले जायचे आणिल घरगुती हिंसाचाराविरुद्ध  लढण्याचे बळही मिळायचे.

केंद्र सरकारने माधवची नेमणूक युडीसीटीमधून राष्ट्रीय साक्षरता मोहिमेवर १९९१मध्ये केली. केरळातील एर्नाकुलम जिल्हा शंभर टक्के साक्षर झाला होता. केंद्र सरकारने प्रत्येक जिल्हा शंभर टक्के साक्षर झाला पाहिजे, असे फर्मान सोडले. ती योजना मुंबईत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. माधवने ‘साहस’ची (साक्षरता हक्क समिती) स्थापना केली. ते काम अखिल मुंबई स्तरावर चालायचे. मुंबईत अनेक स्वयंसवेक तयार झाले. त्याच अंतर्गत ऑल इंडिया रेडिओवर स्थानिक पातळीवर ‘शाळेबाहेरची शाळा’ हा कार्यक्रम सुरू झाला. झोपडपट्टीतल्या निरक्षरांकडून मुळाक्षरे गिरवणारा तो कार्यक्रम  लोकप्रिय झाला. एकूण दहा  भागांमध्ये प्रक्षेपित झालेला तो कार्यक्रम अन्य कार्यक्रमांपेक्षा वेगळा ठरला. दूरदर्शनवर ‘अक्षरधारा’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली. दूरदर्शनच्या तेव्हाच्या निर्मात्या विजया धुमाळे यांनी झोपडपट्टीत चालणारे ‘कोरो’चे काम पाहिले. झोपडपट्टीतल्या मुलांकडून त्यांचे आईवडील मुळाक्षरे गिरवत आहेत, हा प्रयोग त्यांना सुखावून गेला आणि त्यांनी माधवच्या तीस मिनिटांच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवला. तो कार्यक्रम तब्बल दीड वर्षे चालला. कार्यक्रमात अकबर-बिरबलाच्या आणि तुमच्या-आमच्या गोष्टीतून प्रौढ साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले जाई. माधव त्याचा सूत्रधार असायचा. दूरदर्शनवर शिक्षणाचे ‘लाइव्ह’ धडे गिरवले जायचे. अशोक जैन, शांता गोखले असे मान्यवर त्या कार्यक्रमात येऊन गेले आहेत. तो कार्यक्रम लोकप्रिय झाला. त्या कार्यक्रमाला प्रेक्षक पसंतीची तब्बल बावीस हजार पत्रे आली! लोकांच्या अपेक्षाही वाढल्या होत्या. पण पॉलिसी डिसिजन तोकडे पडत गेले. पैसा कमी पडला. साक्षरता आली खरी, पण आम्हाला जशी अपेक्षित होती तशी झाली नाही.

सरकारने कोरो संस्थेला निधी देणे बंद केले. कार्य तर सुरू ठेवायचेच होते. त्यासाठी निधीची आवश्यकता होती. त्याच दरम्यान ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ (डीएसटी) तर्फे सॅनिटेशन आणि् वेस्ट मॅनेजमेंट कार्यक्रमाची रुजुवात झाली. सांडपाण्यातून ऊर्जानिर्मिती आणि् झोपडपट्ट्यांमध्ये ‘पैसे द्या आणि् वापर करा’ या तत्त्वावरील टॉयलेट्स उभारणे हा त्या मोहिमेचा उद्देश होता. त्यावेळी डी.एस.टी.चे सचिव आणिे  पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे सल्लागार होते डॉ. वसंत गोवारीकर.  गोवारीकरांनी ‘अक्षरधारा’ पाहिले होते. त्यांनी माधवला ‘पैसे द्या आणिर वापर करा’ या मोहिमेवर चित्रपट बनवण्यास सांगितले. माधव तिथे गेला. तिथली टॉयलेट्स चांगली होती. परंतु कॉण्ट्रॅक्ट सिस्टिममुळे सरकार बुडीत खात्यात जात होते. माधवने त्या ठिकाणी को-ऑपरेटिव्ह सोसायट्या स्थापन करून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याची कल्पना सुचवली. तिथे काम करणाऱ्यांना तिथूनच मिळणाऱ्या उत्पन्नातून पैसे मिळाले पाहिजेत, असे त्याने सुचवले.  त्या कल्पनेत कॉण्ट्रॅक्टर किंवा सरकारचा निधी यांची गरजच भासणार नव्हती! गोवारीकरांनी ती सूचना स्वीकारली. परंतु केवळ नव्याने बांधण्यात आलेल्या टॉयलेट्समध्येच तशी अंमलबजावणी करण्यात आली.  त्या उपक्रमाला यश मिळाले. शिवाय,  त्या माध्यमातून ‘कोरो’च्या स्वयंसेवकांना नोक-याही मिळाल्या. तरुण ऑल इंडिया रेडिओतून निर्मितीच्या तांत्रिक बाबी शिकले. त्या उत्पन्नातून साक्षरता मिशन चालू राहिली आणि ‘कोरो’ वाचली.

'प्रथम'च्या माध्यमातून शिक्षणप्रसार मी ‘निर्मला निकेतन’मध्ये कार्यरत होते. मीही ‘कोरो’च्या आणि महापालिकेच्या पुढाकाराने त्यात ओढले गेले. राजीव गांधी यांची हत्या १९८९ मध्ये झाली. १९९२ला दंगली झाल्या. तेव्हा आम्ही साक्षरतेसंबंधात काम करत होतो. ‘श्रमिक’ म्हणजे लाल निशाण पार्टीच्या लोकांची बैठक ठरली, काही तरी करायचे हा निर्धार होता, पण पुढे नेमके करायचे काय हे ठरत नव्हते. हेल्पलेसनेस आला होता. पण शिक्षणाला तरणोपाय नाही, तेव्हा साक्षरता प्रसाराचे काम चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. तितक्यात माधवला साक्षरता हक्क समिती (साहस) मधून कोणतीही नोटिस किंवा कारण न सांगता काढून टाकण्यात आले. माधवच्या मनात स्वतःचे काहीतरी सुरू करण्याचा विचार घोंगावू लागला (१९९३-९४) तेव्हा ‘युनिसेफ’ला मुंबईच्या ‌शैक्षणिक सद्यस्थितीवर अभ्यासपूर्ण संशोधन करून हवे होते. महाराष्ट्रात ‘साहस’चे सदस्य होतेच, माधवने त्यांच्या सहाय्याने शैक्षणिक सद्यस्थितीवर पुस्तिका काढली. स्टेटस ऑफ एज्युकेशन इन मुंबई, ही ती पुस्तिका.

एखादी गोष्ट समजून सांगण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नाही. मुळातच तो सायण्टिस्ट; त्यात तो इनोव्हेटिव्हही आहे. प्रत्येक मिनिटाला त्याच्याकडे एक नवी ‘आयडिया’ असते. माधवचा लोकशक्तीवर खूप विश्वास आहे. साक्षरतेचा प्रसार करायचा असेल तर तो प्राथमिक स्तरावरून होणे अपेक्षित आहे, असे माधवचे ठाम मत आहे. तब्बल दोन लाख मुले शाळांबाहेर होती. साडेआठ हजार मुले दरवर्षी शाळांबाहेर फेकली जात होती. तेव्हा असे मॉडेल हवे होते, जे जागतिक पण असेल आणि स्वस्तही. प्रत्येक मूल शाळेत हवे, प्रत्येक मूल शिकलेले हवे. त्यामुळेच केवळ प्रोजेक्टपुरते सीमित न राहता, एक चळवळ सुरू करुया, असा निर्धार केला गेला. महापालिकेचे आयुक्त शरद काळे होते. सरकारसोबत काम करताना, एक पर्याय नव्हे तर पुरवणी म्हणून काम करुया, असा विचार केला गेला. पण ट्रस्ट सुरू करायचा तर सामाजिक संस्था, उद्योगविश्व आणि सरकार अशा सर्वांनी मिळून वस्तीस्तरावर शिक्षण पोचवणे गरजेचे होते. त्यातून ‘प्रथम’ संस्थेचा जन्म झाला. संस्थेवर अशा सर्वांचे नेतृत्व होते. उद्योगविश्वातील व्यक्तीची चेअरपर्सन म्हणून नेमणूक झाली. व्हाइस चेअरपर्सन म्हणून शरद काळे होते. ‘युनिसेफ’ने थोडे दिवस फंडिंग करावे, असेही ठरले. ती आयडिया ‘युनिसेफ’च्या रिचर्ड ब्रायडल यांची. शिवाय, ‘कोरो’ आणिम ‘निर्मला निकेतन युथ’ यांचेही सहकार्य होते. ट्रस्टमध्ये विजया मेहतांचाही सहभाग होता. त्या वेगळ्या शिक्षणाबद्दल बोलतील, हा त्यामागचा उद्देश होता. त्यातूनच ‘प्रथम’ची स्थापना झाली. माधवचे वैशिष्ट्य म्हणजे तो प्रॉब्लेम हाताळायच्या आधीच सोडवतो. मुळात सायंटिफिक दृष्टिकोन असल्यामुळे तो सोपं करून सांगतो. ‘लेट्स डू व्हॉटेवर इट टेक्स, नॉट व्हॉट वी कॅन’ हे त्याचे ब्रीदवाक्य आहे.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचावी म्हणून प्रयत्नशील डॉ. माधव मुंबईत चोवीस वॉर्ड होते. प्रत्येक वॉर्डात बालवाड्या चालवणे ही मोठी गोष्ट होती. शंभर बालवाड्यांपासून सुरुवात झाली, ती चार हजार बालवाड्यांपर्यंत पोचली. वस्तीत बालवाड्यांसाठी, मुलांना व्यायाम करण्यासाठी, खेळण्यासाठी जागा नव्हती, तिथे मुलांना गोळा करून शिकवण्याचे आव्हान होते. मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्या मुली दहावी शिकल्या नाहीत, त्यांना बालवाड्यांत शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिले गेले. तीस मुलांसाठी एक शिक्षक असे प्रमाण होते. प्रत्येक बालवाडीत एक अशी चार हजार बालवाड्यांमधून एक लाख वीस हजार मुले मुळाक्षरे गिरवत होती. मंदिर असो, शिवसेना शाखा असो किंवा कोणाचे घर… अशा सर्व शक्य त्या ठिकाणी बालवाड्या भरायच्या. वस्तीमध्ये बालवाड्या सुरू झाल्या, सबलीकरण झाले आणिा ही शिकवणारी मुले एकदम ‘दीदी’, ‘सर’ बनून गेली. अर्थात स्वयंसेवकांचे ‌शिक्षण नाही, त्यांना प्रशिक्षण नाही.. अशी चौफेर टीका झाली. मात्र लहान मुलांना मुळाक्षरे शिकवण्यासाठी या मुलांचे एवढे प्रशिक्षण पुरेसे होते. आम्ही पालिकांच्या शाळांतही काम सुरू केले. माधव ‘आयसीआयसीआय’च्या व्हाइस चेअरमनना भेटले. त्यांनीही निधी दिल्यामुळे उपक्रमाची मुळे देशभर पसरू लागली. त्याचवेळी विशेष मुलांसोबत, रस्त्यावरच्या मुलांसोबत काम केले तर मोठा परिणाम होईल, हे जाणून त्या दृष्टीनेही आम्ही पावले टाकू लागलो.

मुलांना मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरत होता हे खरेच होते.  मुले शाळेत जात आहेत, मात्र तरीही त्यांना लिहिता-वाचता येत नाही, अशी परिस्थिती दिसू लागली. त्यामुळे फोकस कशावर करायचा हे महत्त्वाचे होते. त्यातूनच ‘अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (असर) या उपक्रमाला प्रारंभ झाला. ‘प्रथम’मधील यंत्रणा, शिक्षकी कौशल्य, विश्लेषण करण्याची हातोटी आणि विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान कितपत पोचते हे जाणून घेणारी तपासयंत्रणा ही सर्व एकत्र आली आणि ‘असर’ चा जन्म झाला. ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर ‘प्रथम’ केंद्र सरकारला ठामपणे सांगू शकते, ‘ शाळेत जाणाऱ्या पन्नास टक्के मुलांना वाचता येत नाही… तुमची शैक्षणिक धोरणं बदला.’ हा आत्मविश्वास ‘प्रथम’मध्ये आला आहे. दरवर्षी ‘असर’चा अहवाल येतो आणि देशातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राला हादरा बसतो. शैक्षणिक धोरणे, त्यांची अंमलबजावणी… साऱ्यावरच प्रश्नचिन्ह उमटते आणि केंद्र सरकारला त्यांच्या धोरणांबाबत पुन्हा विचार करावा लागतो.

माधव सन २००४ ते २००८ दरम्यान राष्ट्रीय सल्लागार समितीचा सदस्य होता.  भारत सरकारच्या सर्व शिक्षा अभियान मोहिमेच्या गव्हर्निंग कौन्सिलचा सदस्यही आहे.

स्कोल संस्थेचा सामाजिक आंत्रप्रिनरशिपचा पुरस्कार स्वीकारताना भारतासाठी आंतरराष्ट्रीय योगदान दिल्याबद्दल प्रथम (यूएसए) संस्थेला टाइम्स ऑफ इंडियातर्फे २०१३ सालचा सोशल इम्पॅक्ट अॅवॉर्ड प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. माधव चव्हाण यांना २०१२ साली प्रतिष्ठीत अशा वाइज (WISE)  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराला शैक्षणिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानले जाते.

ग्लोबल जर्नलतर्फे २०१३ला सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या १०० सेवाभावी संस्थांमध्ये प्रथमचा समावेश करण्यात आला होता. सोशल आंत्रप्रिनरशिपसाठी डॉ. माधव चव्हाण यांना २०११ साली ऑक्सफर्ड येथे स्कोल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्लेरमॉण्ट मॅकेना कॉलेजने २०१० साली पाचव्या वार्षिक हेन्री आर. क्रेव्हीस लीडरशिप पुरस्कारासाठी ‘प्रथम’ची निवड केली.

माधव ‘मल्टीटॅलेंटेड’ आहे. तो उत्तम लेखकही आहे. त्याने लिहिलेल्या ‘संभव’ कादंबरीच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. विशेष म्हणजे स्त्री मुक्ती संघटना स्थापन होण्यापूर्वीची गाणी माधवच्याच लेखणीतून उतरली आहेत. ‘प्रथम’ संस्थेचे स्टडी मटेरियल, लेख हेही त्यानेच आकाराला आणले आहेत. (असर)च्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेवरही वरचेवर लिहितो. दूरदर्शनवर साक्षरता प्रसारार्थ एके काळी चालणाऱ्या अक्षरधारा या मालिकेचे लेखन आणि सूत्रसंचालन त्याने केले आहे. ती प्रबोधनपर मालिका विलक्षण लोकप्रिय झाली होती. तो फोटो उत्तम काढतो. अर्थात त्याची मते कधी कधी प्रवाहाबाहेरचीही असतात. उदा. शिकण्यासाठी शाळाच कशाला हवी? शाळेबाहेरही मुले शिकू शकतात… असे माधवचे ठाम मत आहे. प्रॅक्टिस इनटू पॉलिसी हे धोरण त्याने अंगिकारले. राज्य सरकारच्या मदतीने त्याने मुंबईतील सुमारे तीस हजार बालकामगारांसाठी काम केले. अर्थात यामध्येही ‘अमुक मी केलं’ असे म्हणायचे नाही, तर ‘आपण केलं म्हणायचं’, याकडे माधवचा कटाक्ष कायम राहिला आहे. त्याचीच परिणती म्हणून लवकरच बालकामगारविरोधी कायदा लवकरच येत आहे.

माधव सध्या ‘प्रथम एज्युकेशन फाउंडेशन’चा सीईओ आहे. ‘प्रथम’ त्यांच्या मूळ उद्दिष्टावर कायम आहे. तळागाळातल्या मुलांपर्यंत शिक्षण पोचवण्याचे व्रत निरंतर सुरू आहे. कॉर्पोरेट जगताचेही निधीच्या रूपात योगदान मिळते. शिवाय, परदेशातील अनेक दानशूर मंडळी निधीच्या रूपात शिक्षणाचे मिशन पुढे सुरू ठेवण्यासाठी मोलाची मदत करत आहेत. ती मंडळी आणि भारतातल्या कार्यकर्त्यांचे बळ यातून ‘प्रथम’ची घोडदौड सुरू आहे. अर्थात माधवशिवाय ते शक्य नव्हते.

फरिदा लांबे
(फरिदा लांबे या ‘प्रथम’ संस्थेच्या स्थापनेत माधव चव्हाण यांच्याबरोबर सहभागी होत्या. त्या संस्थेच्या सहसंचालक आहेत.)
९८२००९८०८५
faridalambay@pratham.org

शब्दांकन – सुचित्रा सुर्वे

About Post Author

5 COMMENTS

    • केदार,

      केदार,
      तुमच्‍या प्रतिसादाबद्दल धन्‍यवाद. तुम्‍ही मांडलेली शंका योग्‍य आहे. हे वेबपोर्टल इंग्रजी भाषेतही व्‍हावे ही भावना आमच्‍याही मनात आहे. मात्र मराठीतून माहिती संकलित करण्‍याचा व्‍याप मोठा आहे. तसेच त्‍या कामासाठी लागणारा मनुष्‍यबळाचा प्रश्‍नही मोठा आहे. त्‍यामुळे सध्‍या या प्रकल्‍पामध्‍ये आम्‍ही मराठी वेबपोर्टलवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्‍यात तुम्हीही मदत करू शकाल.
      किरण क्षीरसागर
      9029557767

  1. Me renuka jadhav,rahnar
    Me renuka jadhav,rahnar mumbai yehte mala aplya pratham org. kam karnyachi manapasun echa ahe.me ya purvi pratham org.kam kele ahe. Mo.No.8082089175

  2. आगळा वेगळा पथप्रदर्शक ध्यास
    आगळा वेगळा पथप्रदर्शक ध्यासवेड्या शिक्षा विदाचा प्रवास. या पद्धतीचा वापर सर्वदूर व्हायला हवा. माधवरावांच्या द्रष्टेपणाला सलाम !

  3. आपण डिजिटल साक्षर या…
    आपण डिजिटल साक्षर या माध्यमातून इयत्ता पहिलीचे मराठी मार्गदर्शन सुरू केलेले आहे परंतु ते नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार नसून हिंदी मिडीयम आणि इंग्रजी माध्यमाच्या पुस्तका प्रमाणे आहे शक्य झाल्यास मराठी माध्यम याप्रमाणे पुस्तक रचनेनुसार आपण व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे आपण इतर केलेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरत आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ते मोफत उपलब्ध होऊ शकत आहे आणि त्यामुळेच इयत्ता पहिली पासून मराठी विषय महाराष्ट्र शासनामार्फत तयार केलेल्या पुस्तकानुसार उपलब्ध झाल्यास नक्कीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल याबद्दल आपण नक्की विचार करावा

Comments are closed.