मागील पिढीवरील वाचन संस्कार (Reading – key to the personality development)

4
83

मराठी भाषाभ्यासासाठी वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे वगैरे दिग्गजांनी संपादित केलेली पाठ्यपुस्तके जुन्या पिढीत होती; खेरीज पुरवणी वाचनासाठी नेमलेली अवांतर पुस्तके असत. त्यातील गद्य विभाग हे गद्य बिलकुल नव्हते, तर अतिशय रोचक आणि समृद्ध होते. त्यातील साहित्याची विविधता तेव्हा जाणवली नाही, पण आता ती आठवली, की स्तिमित व्हायला होते. अभ्यास करता करता, तेव्हाच्या प्रवाहातील खांडेकर-काणेकर-फडके यांचे लघुनिबंध शाळकरी वयातच वाचून झाले. हास्यरस आणि करुणरस परिचित झाले. शाळेत पेटी वाचनालय असे. पुस्तकांचे लेखक पाठ्यपुस्तकांमुळे परिचित असत. माझी त्या लेखकांची प्रत्येकी किमान एक-दोन पुस्तके अकरावी ओलांडण्याआधीच वाचून झाली होती.

त्यांपैकी चार कथांचा उल्लेख करतो. आचार्य अत्रे यांची दिनूचे बिलही कथा कोणत्या वर्षी होती ते आठवत नाही. पण ती वाचून त्यांच्या कथासंग्रहातील समुद्राची देणगीही कथा वाचली. वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न करून दुरावलेली मुलगी, कालांतराने पत्रव्यवहारातून दिलजमाई आणि प्रत्यक्ष भेटीसाठी मुलगी रामदासबोटीने येत असताना बोट बुडून झालेला मृत्यू… दोन्ही कथा वाचून तेव्हा रडलो होतो आणि नकळत मनावर झालेला संस्कार म्हणजे भाषा शब्दबंबाळ न वापरता थेट निवेदन केले तर ते काळजाला भिडते. तोच संस्कार शेवग्याच्या शेंगाया कथेने केला. एका ऑफ तासाला महाजन नावाच्या मित्राला सरांनी संपूर्ण कथा वाचून दाखवण्यास सांगितली. कथेतील तारकेचे शेवटचे संवाद अवघ्या वर्गाला सुन्न करते झाले. साने गुरूजींची श्यामची आईम्हणजे मराठी भाषेतील करुण रसातील मैलाचा दगड. आम्हाला त्यातील एक अंशधडा म्हणून होता. श्यामच्या घरची गाय व्यालेली असते. वडील खरवस घेऊन चालत श्यामला देण्यासाठी येतात. श्यामला त्यांची लाज वाटते. तो त्यांना अपमानास्पद बोलतो आणि नंतर त्याला पश्चात्ताप होतो, वगैरे.

पुढे, मोठेपणी साने गुरुजींची इतर पुस्तके वाचली आणि श्यामच्या आईपासून दूर गेलो. पंढरपूरच्या मंदिरप्रवेशासाठी गुरुजींनी केलेले उपोषण, त्यांच्या बलसागर भारत होवो’, ‘आता उठवू सारे रानयांसारख्या कविता, ‘साधनासाप्ताहिक वगैरे. चौथी कथा म्हणजे दिवाकर कृष्ण यांची अंगणातला पोपट’. त्या कथेचा आशय कालातीत म्हणावा असा आहे. भाई आणि बाई यांचा एकुलता मुलगा पोपट थोडा अंतर्मुख आहे. पण त्याला माणसे हवी आहेत. आई निवर्तल्यावर नर्मदामावशी त्याला सांभाळत आहे. भाई सतत कामात गर्क असल्याने त्यांची आणि पोपटची भेट होत नाही. पोपट आजारी पडतो, ताप वाढतो, तो सतत भाईंचे नाव घेतो. पण भाई दूर असतात. ते परत येतात तेव्हा पोपटचे निधन झालेले असते. कथेच्या शेवटी, त्याचे शाळेतील मित्र रस्त्यावरून जाताना घरापाशी येऊन त्याला हाक मारतात, पण पोपट केव्हाच उडून गेलेला असतो!

त्या चारी कथा तेव्हा आवडलेल्या होत्या. शेवग्याच्या शेंगानंतर ती कथा असलेला य.गो. जोशी यांचा कथासंग्रह वाचला. पण त्या कथांनी आणखी पुढे नेले नाही. अंगणातला पोपटकार दिवाकर कृष्ण यांचे तीनच कथासंग्रह होते. त्यांतील भाषा, वर्णने त्या वयात सर्वस्वी परकी, कृत्रिम वाटली. त्या दोन्ही लेखकांचे इतर लेखन अपेक्षेनुसार – predictable – वाटत गेल्यामुळे वाचण्याचे राहून गेले ते गेलेच. श्यामच्या आईने गुरुजींच्या साहित्याचे जे दार उघडले त्यातून गुरुजींचे वेगळेच आणि आक्रमक रूप दृगोचर झाले. त्यांचे बरेच लेखन आर्जवी, अकृत्रिम आणि ओघवत्या भाषेमुळे सहजी व आवडीने वाचले गेले. दिनूचे बिलकथेमुळे आचार्य अत्रे आधी ठाऊक झाले असले तरी आठवीत गेल्यावर साष्टांग नमस्कारमधील वेचा आणि चहाच्या कपात पडलेल्या माशीवरील कविता या दोन्हींमुळे अत्रे यांचे अष्टपैलू लेखन मनात भरले. त्या वयाचा परिणाम म्हणून त्यांच्या विनोदी साहित्याकडे आधी आणि अधिक आकर्षित झालो.

महाभारतातील दुय्यम पात्रांना नायकपदी नेमून लिहिलेल्या जाडजूड कादंबऱ्या तेव्हा बाजारात येऊ लागल्या होत्या. पाठ्यपुस्तकात गडकऱ्यांच्या राजसंन्यासमधील एक उतारा होता. शिवाय, त्यांच्या राजहंस माझा निजलाआणि एखाद्याचे नशीबया कविता होत्या. त्यांच्या पल्लेदार भाषेविषयी आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे पेटी वाचनालयातून समग्र गडकरीवाचून काढले. घरीदारी दिसू लागलेल्या सुपरहिट पौराणिक कादंबऱ्या आणि गडकऱ्यांची नाटके यांच्या भाषेत काहीतरी फरक आहे असे जाणवलेले; पण तो फरक नेमका काय ते सांगता येत नव्हते. अलंकारिक-पल्लेदार आणि शब्दबंबाळ भाषेतील फरक खूप उशिरा सांगता येऊ लागला.

अनंत काणेकर यांचे लघुनिबंध पाठ्यपुस्तकात नव्हते. त्यांचे लेखन खांडेकर-फडके यांच्यापेक्षा वेगळे आणि मोकळेढाकळे असे. माझा मराठीत एका वार्षिक परीक्षेत पहिला नंबर आल्यावर त्यांचे विजेची वेलहे पुस्तक मला पारितोषिकार्थ मिळाले होते. त्यातील गणुकाका हे भाबडे पात्र निवेदकाच्या विविध शंकांना मजेदार उत्तरे देत असे. लेखक त्यांना एका लघुनिबंधात विचारतो, की भाषेत झाडबिड, पणबिण, पाणीबिणी, पुस्तकबिस्तक, पेनबिन अशा जोड शब्दांतील बिड, बिण, बिणी, बिन, बिस्तक हे शब्द कोठून आले? त्यावर गणुकाका उत्तरतात – विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली होती, ते शब्द त्या सृष्टीतील मागे राहून गेलेले आहेत! पुढे, मोठेपणी, पुलंचे हरितात्याभेटले तेव्हा गणुकाकांची आठवण तीव्रतेने झाली. 

खांडेकर यांच्या अलंकारिक भाषेची भुरळ पडून एका सुट्टीत ययातीआणि अमृतवेलया त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या. ययातीमधील भाषा आवडली. अमृतवेलवाचताना कंटाळा आला नाही. कुतूहलवश त्यातील ओ सजना, बरखा बहार आयीहे गाणे ज्यूक बॉक्समध्ये दहा पैसे देऊन ऐकले आणि हिंदी गाण्यांविषयी आकर्षण निर्माण झाले. ययातीआणि अमृतवेलया दोन्ही कादंबऱ्यांमधील आशय समजण्यास खूप वर्षे जावी लागली. फडके यांच्या वाट चुकल्याचा आनंद’, ‘माझा पहिला पांढरा केसया धड्यांमुळे त्यांच्या गुजगोष्टीवाचल्या. त्यांनी माझ्या/आमच्या पिढीच्या लेखनावर संस्कार नक्की केले असतील. पुढे, त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या आणि त्या कादंबऱ्यांनी किशोरवयातील हार्मोन्सबदलाच्या अनुभूती सुखद केल्या.

त्या घडाभर तेलाचा सारांश सांगायचा तर त्या वेळच्या पाठ्यपुस्तकांनी आणि भाषाविषय शिकवणाऱ्या काही शिक्षकांनी आमच्या पिढीच्या मनात साहित्यविषयक कुतूहल जागृत केले; ज्याने त्याने त्याच्या त्याच्या आवडीनुसार लेखक निवडून त्यांचे साहित्य प्रेमाने वाचण्यास सुरुवात केली. वाचन संस्कृती त्या काळी त्याच मार्गे रुजली.

विजय तरवडे 9890301812 vijaytarawade@gmail.com

विजय तरवडे यांनी भारतीय जीवन बीमा निगममधून स्वेच्छानिवृत्ती 2011 साली स्वीकारली. ते पूर्णवेळ लेखन करतात. त्यांचे  सदर लेखन केसरी, तरुण भारत, देशदूत, नवा काळ, प्रभात इत्यादी वृत्तपत्रांत नियमित चालू असते. त्यांची विविध साहित्यप्रकारांतील बावीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते सध्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरील पुस्तके भाषांतरित करत आहेत. ते वास्तव्यास पुण्यात असतात.

—————————————————————————————————————-

About Post Author

4 COMMENTS

  1. वाचन संस्कार हेच संस्कृती संवर्धनाचे प्रमुख माध्यम होते.आजही हे माध्यम अत्यंत प्रभावी माध्यम आहे.हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

  2. शाळकरी जीवनातच वाचन संस्कृती चे संस्कार समृद्ध होतात ते भाषा शिक्षकांकडून…मी लेखक झालो ते शाळकरी वयात वाचनाची गोडी निर्माण झाली म्हणून. माझा ही असाच धडा पुस्कात यावा असे स्वप्न मी शाळेत असताना पाहिले. बारावीत असतांनाच अनुकरणातून लिहायला लागलो. आता मात्र सरावाने स्वतःची शैली निर्माण झाली. गेल्या अभ्यासक्रमात दहावीला (इंगर्जी मध्यम) माझा धडा, बाबूजी लागला. ह्याचे श्रेय शाळेतलं वाचन …. आता…..?लेख उत्तम विजयजी…. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here