बद्रिनारायण बारवाले यांनी उच्च शिक्षित नसतानाही स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात समाजाची गरज अचूक हेरली आणि महिको ही बीज उत्पादनाची कंपनी नावारूपाला आणली. त्यांनी शेतीत विविध प्रयोग केले. ते शेतकऱ्यांशी शेअर केले व त्यांचे उत्पन्न वाढवले. त्यांचे कार्य केवळ कृषी क्षेत्रापुरतेच मर्यादित नाही; तर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रांतही मोलाचे योगदान दिले आहे…
बद्रिनारायण हे जयकिशनजी कागलीवाल यांचे पुत्र. बद्रिनारायण यांच्या लहानपणीच पिताजी जयकिशनजी यांचे निधन झाले. तेव्हा बद्रिनारायण यांना जालना येथील भिकुलालजी बारवाले या त्यांच्या नातेवाईकांनी दत्तक घेतले. मूळ कागलीवाल घराण्यातील बद्रिनारायण हे बारवाले या आडनावाने प्रसिद्ध झाले ! बद्रिनारायण हे बारवाले यांचे दत्तकपुत्र म्हणून त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी जालन्यात आले. बारवाले हे नाव त्यांच्या (दत्तक) वडिलांच्या राजस्थानातील ‘बार’ या मूळ गावावरून पडले आहे.
बद्रिनारायण बारवाले यांचे शिक्षण फार होऊ शकले नाही, कारण ते हैदराबाद मुक्तिसंग्राम व ‘चले जाव’ आंदोलन यांत सहभागी झाले होते. त्यांनी कार्याला सुरुवात विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून केली. ते हुतात्मा जनार्दन मामा यांचे सहकारी होते. निझाम सरकारने त्यांना एक वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. मराठवाडा भारतात विलीन 17 नोव्हेंबर 1948 या दिवशी झाला. बारवाले मराठवाडा संपूर्ण स्वतंत्र होईपर्यंत त्या लढ्यात कार्यरत होते.
बारवाले यांनी त्यांना उच्च शिक्षण नसल्यामुळे वडिलोपार्जित शेती कसण्यास प्रारंभ केला. त्यांची शेती जालन्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घाणेवाडी या जलाशयाच्या काठावरच्या मांडवा (तालुका बदनापूर, जिल्हा जालना) येथे आहे.
बद्रिनारायण यांची बुद्धी सूक्ष्म अभ्यासाची होती. त्यांनी मांडवा येथील पुसा सावनी या भेंडीच्या जातीचे उत्पादन घेण्यास 1960 च्या दशकात सुरुवात केली. त्याची विक्रीही केली. त्यांनी पीक चांगले येऊनही अपेक्षित भाव मिळेना, तेव्हा ते सावध झाले. त्यांनी त्याबद्दल अभ्यास केला. भेंडीचे पीक हे अवेळी घेतल्याने तसे घडले असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पीक उत्पादनाचे नियोजन केले. त्यांच्या नियोजनाचे सूत्र होते, की बाजारातील मालाची आवक कमी होईल, तेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारात आला पाहिजे, तर त्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळेल. भेंडीचा उपयोग तिच्यातील चिकट पदार्थामुळे ऊसाच्या गुऱ्हाळात रसातील अनावश्यक घटकांना साफ करण्यासाठी होई. त्यामुळे, त्यांनी पुणे-सातारा-कोल्हापुरातील वृत्तपत्रांतून तशी जाहिरात दिली. त्यामुळे त्यांच्या भेंडीला बियाण्याला महाराष्ट्रभरातून मागणी होऊ लागली. कारण साधे होते. बियाणे हे धान्य पिकाचे मूळ असते. त्यांचा पीक नियोजनाचा तो प्रयत्न असा यशस्वी झाल्यामुळे त्यांनी बियाणे उत्पादनावर लक्ष केंद्रित केले.
बारवाले यांना नावीन्याची आस होती. त्यांनी संकरित मका (1962) व संकरित ज्वारी (1963) ही पिके त्यांच्या शेतात यशस्वीपणे घेतली. त्यांना त्यासाठी आयसीएआर आणि रॉकफेलर फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले. बारवाले यांनी पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रगत शेतीचे ज्ञान देणेही सुरू केले. त्यांनी चिनी आक्रमण काळात अधिक धान्योत्पादन घेणे सुरू केले; आजुबाजूच्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने गावात तीस विहिरी खोदल्या. तसेच, भूविकास बँकेकडून कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. त्यांनी गावातील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणली. तसेच, त्यांनी दाहोदहून संकरित मक्याचे बियाणे मागवले व ते शेतकऱ्यांमध्ये वितरित केले. बारवाले यांच्या अशा प्रयत्नांमुळे युद्धकाळात अन्नधान्याचा तुटवडा पडला नाही; आणि शेतकऱ्यांचा आर्थिक विकासही साधला गेला. शेतकर्यांचा शेती करण्यातील उत्साह वाढीला लागला.
बारवाले यांनी ‘महाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनी’ (महिको) या कंपनीची स्थापना 11 नोव्हेंबर 1964 रोजी केली. ती जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील दावलवाडी या औरंगाबाद रस्त्यावर आहे. त्यांनी भारताच्या पहिल्या हरित क्रांतीच्या यशस्वीतेसाठी दिलेले ते महत्त्वाचे योगदान होय. त्यांनी अमेरिका-युरोपमधील प्रगत देशांत चालणाऱ्या शेती संशोधनाचा अभ्यास करून, शेती बियाणे संशोधनाचा विस्तार 1967 मध्ये केला. ‘महिको’ कंपनीत नवनवीन वाणांवर प्रयोग झाले. त्याच काळात ज्वारीचे पहिले संकरित बियाणे तयार करण्याची संधी डॉ. फ्रिमन यांच्यामुळे ‘महिको’ कंपनीला मिळाली. त्यांनी संकरित ज्वारीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्यांनी एकरी साडेआठ क्विंटल ज्वारी उत्पादित करून दाखवली. त्या संशोधनात समस्या बऱ्याच होत्या. एक तर उत्पादन तातडीने घेण्याचे ठरले होते. ज्वारीचे ते पीक नियमित हंगामात घेण्याचे नसून प्रतिकूल हंगामात घेण्याचे होते. त्या बियाण्यामध्ये नर-मादी म्हणजे स्त्रीकेसर व पुंकेसर यांचे प्रमाण कमीजास्त होते. त्यांचा समतोल साधून अपेक्षित असणाऱ्या संकरित बियाण्यांमधून तयार होणाऱ्या कणसाला उपचार द्यावे लागणार होते. सावधगिरीचा उपाय म्हणून पुंकेसर योग्य काळाच्या आधी सोडावे लागणार होते. ज्वारीचे ते भारतातील पहिले संकरित बियाणे ठरले !
महाराष्ट्र व आजूबाजूच्या राज्यांमध्ये 1965-66 मध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तशा वेळी कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या बियाण्यांची लागवड केली जावी असे धोरण शासनाने स्वीकारले होते. त्या वेळीही ‘महिको’ने गहू, तांदूळ, ज्वारी, मका अशा पिकांच्या संकरित वाणांची निर्मिती केली व शेतकर्यांनी अधिक उत्पन्न घेतले. ‘महिको’च्या या वाणांना महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार अशा राज्यांमध्येही मागणी होती. ‘महिको’चे नाव सर्वदूर पसरले.
बारवाले यांना संकरित तांदळाच्या पहिल्या जागतिक परिषदेसाठी चीनला जाण्याची संधी ऑक्टोबर 1986 मध्ये मिळाली. तेथे त्यांनी तांदळाचे उत्पादन, प्रक्रिया उद्योग, प्रयोगशाळा, वितरण व्यवस्था या सर्व बाबींची माहिती घेतली. भारतात परत आल्यावर, त्यांनी त्यांचे लक्ष संकरित गहू व तांदूळ यांच्यावर केंद्रित केले.
बारवाले यांची जैवतंत्रज्ञान क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. त्यांनी ‘महिको’मध्ये झालेल्या संशोधनानंतर शेतकऱ्यांना तंतुविरहित बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढली व प्रती एकर बियाणे वापराची मात्रा कमी झाली.
त्यांचे ‘बीटी कॉटन’ या कापसाबाबत झालेले संशोधनही लक्षवेधी ठरले. ‘बीटी’ हे बॅक्टेरियावरून पडलेले नाव आहे. ‘बॅसीलस थुरीनजिएन्सीस’ या बीटी कॉटन जातीचे वैशिष्ट्य असे, की त्यातील ‘बीटी’ हा बॅक्टेरियाच कापसातील बोंडामध्ये असलेल्या अळीचा बीमोड करणारे कीटकनाशक तयार करतो. बीटी हे जैवतंत्रज्ञान प्रथम मोन्सँटो या कंपनीने विकसित केले होते. भारतात हे जैवतंत्रज्ञान विकसित आणि प्रसिद्ध करण्याचे काम मोन्सँटोच्या सहकार्याने ‘महिको’ने केले. या ‘बीटी’चे रोपण संशोधनाअंती कापसाच्या एका जातीवर केले. त्याला ‘जेनेटिक मॅन्युपिलेएशन’ असे म्हणतात. हा ‘बीटी कॉटन’ महाराष्ट्रात संकरित करण्याचे श्रेय ‘महिको’ला जाते. भारताच्या शेतकऱ्यांनी अमेरिकेला कापूस उत्पादनात मागे टाकले. त्यामुळे बारवाले यांच्या बियाण्यांची जागतिक पातळीवर उमटलेली छाप स्पष्ट दिसली. त्यांनी तसेच संशोधन बाजरीवरही केले. पंजाबमधील बाजरीचे बियाणे भेसळयुक्त झाले होते. बाजरीच्या मादीतील स्त्रीकेसरात भेसळ झाली होती. म्हणून त्यातील पुंकेसर वेगळे करणे आवश्यक होते. ‘महिको’ने ते काम केले व त्यातून बाजरीचे शुद्ध संकरित बियाणे तयार केले.
‘महिको’ ही नऊशे कोटी रुपयांची उलाढाल असलेली भारतातील अग्रगण्य बीज उत्पादन संस्था आहे. जालना जिल्ह्यातील दावलवाडी येथे वसलेले महिको रिसर्च अँड लाइफ सायन्स सेंटर, तसेच महिको सीड प्रोसेसिंग युनिट, जालना सीड प्रोसेसिंग अँड कोल्ड स्टोरेज असे विभाग ही ‘महिको’च्या यशाची चिन्हे आहेत.
बारवाले यांचे कार्य केवळ कृषी क्षेत्रापुरते मर्यादित नाही; तर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रांतही मोलाचे योगदान दिले आहे.
कृषि क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करताना डॉ. बद्रिनारायण बारवाले यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले. जालना ही बारवाले यांची कर्मभूमी. तेथे दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी यासाठी 1962 मध्ये बद्रिनारायण बारवाले यांनी जालना एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तसेच गोल्डन ज्युबिली नावाची शाळा सुरू केली. त्यांनी मराठवाड्यासारख्या भागात उद्योगाची उभारणी केली; पण त्या बरोबर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवून माती आणि माणसाशी असलेली बांधिलकी निष्ठेने जोपासली. त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय, लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटल यांच्या उभारणीत भरीव सहकार्य केले. त्यांनी गणपती नेत्रालय या संस्थेचीही उभारणी केली. जालन्यातील अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान शिक्षण देणारे डॉ. बद्रिनारायण बारवाले महाविद्यालय, मांडवा गावची शाळा, औरंगाबाद येथील श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांचे ते उपाध्यक्ष होते.
जालना जिल्ह्याचे व शहराचे नाव जगभर पोचवणारे बद्रिनारायण बारवाले हे कृतिशील उद्योजक होते. ते महाराष्ट्र सरकारच्या सिकॉम आणि सिडको या संस्थांचे सदस्य होते. त्यांना केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे शेती संशोधन आणि विकास या विषयाचा राष्ट्रीय पुरस्कार 1989 मध्ये देण्यात आला. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेती बियाणे संशोधन आणि तंत्रज्ञान संघटनेतर्फे 1990 मध्ये पुरस्कार देण्यात आला. त्यांना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा संशोधन पुरस्कार, इंटरनॅशनल सीडस् सोसायटीचा पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा तमिळनाडू कृषी विद्यापीठाने 2002 मध्ये गौरव केला. त्यांना बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 23 जानेवारी 2010 रोजी एकावन्नव्या दीक्षांत समारंभात डी लिट पदवी प्रदान केली होती. बारवाले यांना बियाणे उद्योग व तत्संबंधी संशोधनातील योगदान याबद्दल नोबेलच्या तोडीचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांना जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेचा 1998 चा जागतिक अन्न पुरस्कार (वर्ल्ड फूड प्राइज) देण्यात आला होता. त्यांचा केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन 2001 मध्ये गौरव केला.
भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांनी बारवाले यांचे कौतुक केले. त्यांनी ‘ग्रामीण भागातील दुर्बल घटकाला बारवाले यांनी बियाणे क्षेत्रात कामे देऊन अधिक सक्षम बनवले’, या शब्दांत त्यांचे वर्णन केले. कृषितज्ज्ञ डॉ. नॉरमन ई. बोरलॉग यांनी ‘बियाणांचे जेनेटिक्स शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे श्रेय बारवाले यांना जाते’, असे म्हणून बारवाले यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्या शिवाय जॉन रॉन, डॉ. वेईन फ्रीमन, बिल गेट्स, डॉ. ब्रेंट झेर, डॉ. हरभजनसिंग या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गजांशी बारवाले यांचे सलोख्याचे संबंध होते. बारवाले यांचा श्वास अखेरपर्यंत शेतकरी आणि शेती उत्पादनांची प्रगती हाच होता.
बद्रिनारायण बारवाले यांचे 24 जुलै 2017 रोजी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पुत्र राजेंद्र बारवाले हे कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
– संदीप राऊत 9892107216
———————————————————————————————————————–