महिकावतीची बखर (Mahikavati Bakhar)

0
162
_mahakavtichi_bakhar

महिकावतीची बखर हे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२४ साली तर दुसरी आवृत्ती १९९१ साली प्रकाशित झाली. राजवाडे यांना ती बखर कल्याणच्या सदाशिव महादेव दिवेकर नामक व्यक्तीने वसईच्या हिरा हरी भंडारी यांच्याकडून मिळवून दिली होती. ती बखर राजवाडे यांच्या धुळे येथील संस्थेत आहे. 

महिकावती म्हणजे माहीम. हे माहीम म्हणजे पालघर जिल्ह्याच्या केळवे-माहीममधील माहीम. त्या बखरीत उत्तर कोकणचा इतिहास आहे. ती साधारणपणे चौदाव्या शतकात लिहिली गेली. बखरीमधील इतिहास काळ शके १०६० पर्यंत (सन ११३८) मागे जातो. आतापर्यंत सापडलेल्या सर्व बखरींमध्ये ती अत्यंत जुनी अशी बखर आहे. त्या बखरीची एकूण सहा प्रकरणे असून त्यात विविध प्रकारची माहिती दिली आहे. 

बखर एकाच लेखकाने सलग लिहिलेली नाही. तो विविध सहा प्रकरणांचा एक ग्रंथ आहे. ती प्रकरणे वेगवेगळी रचली गेली असल्याने त्या सलग ग्रंथाला स्वतंत्र असे नाव दिले गेले नाही. माहीम प्रांताचा इतिहास हे या बखरीचे वैशिष्ट्य असल्याने इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी तिला ‘महिकावतीची बखर’ असे संबोधले आहे. राजवाडे यांनी त्या बखरीचा अभ्यास करून एकूण एकोणपन्नास मुद्यांआधारे एकशेदहा पानी प्रस्तावना तयार केली आहे. प्रस्तावनेतील अर्धा भाग मूळ बखरीचा काळ, त्यातील सत्यासत्यता, भाषा यासंबंधी चर्चा करणारा आहे. उर्वरित भागात, राजवाडे यांनी इतिहासासंबंधी केलेले चिंतन आहे. ते अतिशय मूलगामी आहे. त्या चिंतनात त्यांनी भारत खंड अन्न-धान्यसंपत्तीने विपुल असल्यामुळे आक्रमकांचे या भूभागाकडे लक्ष गेल्याचे म्हटले आहे. बखरीत गद्य, पद्य, तत्कालीन निवाडे, हकिकती; तसेच, अनेक लढ्यांची वर्णने आणि वंशावळी आढळतात. बखरीचे पहिले प्रकरण ‘पूर्वपरंपरा, वंश, उत्पत्ती, वर्णावर्ण व व्याख्या’ हे आहे. ते ओवीपद्य स्वरूपात आहे. भगवान दत्त हा त्या प्रकरणाचा कर्ता आहे. ते सन १५७८ च्या सुमारास रचले गेले असावे. त्या प्रकरणातील दोन अध्यायांमध्ये पुराणाच्या आधारे वंशोत्पत्ती आणि वंशावळ याविषयी माहिती दिलेली आढळते. ग्रंथाचे दुसरे प्रकरण ‘राजवंशावळी’ हे असून ते सर्वात जुने प्रकरण मानले जाते. केशवाचार्य हा त्या प्रकरणाचा कर्ता आहे, ते प्रकरण सन १४४८ मध्ये रचले गेल्याची नोंद आहे. तिसर्या् प्रकरणाची रचना दुसऱ्या प्रकरणानंतर काही दिवसांतच झाली असावी. ते प्रकरण गद्यात असून त्यात एकंदरीत दहा लहानमोठे निवाडे आणि हकिकती यांचा समावेश आहे. बखरीतील चौथे प्रकरण ‘चिंतामणी कौस्तुभ पुराण’ हे आहे. ते भगवान दत्त नामक व्यक्तीने लिहिलेले आहे. ते सन १५७८च्या सुमारास लिहिले गेले असावे. ते ओवीपद्य स्वरूपात आढळते. पाचवे प्रकरण गद्यमय असून त्यात पाठारे जातीची वंशावळ आढळते. ते सन १५३८च्या सुमारास लिहिले गेले. ते सहाव्या प्रकरणातही शिळंबा, कोळंबा कुळांची वंशावळ आढळते. ते प्रकरण १४७८मध्ये लिहिले गेले. वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेल्या सहा प्रकरणांचे एकत्र संकलन महिकावतीच्या बखरीत आढळते.

– नितेश शिंदे
(आधार – समग्र राजवाडे, मराठी वाड्मयाचा इतिहास – स.गं. मालशे, शं.गो. तुळपुळे)

About Post Author