महाविदर्भ सभेची स्थापना !

0
336

महाविदर्भाची स्थापना ही संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे पहिले पाऊल ठरेल हा विचार त्या वेळच्या नेत्यांना तत्त्वत: मान्य होता. तरी पण संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तर त्यात पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व असेल अशी भीती विदर्भातल्या नेत्यांना त्या वेळेपासून वाटली असावी. त्याकाळी तीन तुकड्यांत विभागलेल्या महाराष्ट्रातल्या प्रांतांवर भिन्न भिन्न शक्तींचे वर्चस्व होते. मराठवाडयावर निजामाचे वर्चस्व होते, त्यामुळे मराठवाड्याचा किंवा मध्यप्रांतात असलेल्या विदर्भावर हिंदी भाषिक नेत्यांचा वरचष्मा होता. म्हणून मराठवाड्याचा व विदर्भाचा विकास पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत तोकडा होता. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाची गळचेपी होईल असे वैदर्भियांना वाटणे स्वाभाविक होते.

अशा स्थितीत, महाविदर्भाच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी 1940 च्या ऑगस्टमध्ये, वर्धा येथे बॅ. रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाविदर्भ सभेची स्थापना करण्यात आली. तिचे सूत्रधार बापुजी अणे हेच होते. महाविदर्भ सभेच्या चिटणीसपदाची जबाबदारी ग.त्र्यं. माडखोलकर यांनी स्वीकारावी अशी अणे यांची इच्छा होती, पण माडखोलकरांनी त्यास नकार दिला. मात्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाविदर्भ सभेचे विसर्जन होईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ वीस वर्षे माडखोलकर महाविदर्भ सभेचे काम करत होते.

महाविदर्भ सभेची घटना अस्तित्वात आली. महाविदर्भाची निर्मिती म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणायचे की नाही याबद्दल मौन पाळण्यात आले होते. हे संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांना खटकले! या बाबतचा परामर्श 3 ऑक्टोबर 1943 रोजी अमरावती इथे भरलेल्या महाविदर्भ सभेच्या अधिवेशनात अध्यक्ष बॅ. मुकुंदराव जयकर यांनी घेतला.

बॅ. जयकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बजावून सांगितले, की '' महाविदर्भ निर्मितीची तुमची मागणी यशस्वी होणे हे मुख्यत: तुम्ही, महाविदर्भ हा सर्व मराठी भाषिकांच्या एकीकरणाच्या व्यापक मागणीचा पहिला हप्ता बनवता की नाही यावर अवलंबून आहे. महाविदर्भाची आपली मागणी पदरात पडली आणि सर्व महाराष्ट्राचे एकीकरण झाले तर येथून दूर, अनेक मैलांवर राहणा-या एका गटाच्या आणि काही अंशी उप-या वाटणा-यांचे वर्चस्व स्वीकारावे लागेल असे भय येथील काही गटांना वाटत असल्याचा मला संशय आहे. त्यामुळे असे भाष्य करण्यास मी प्रवृत्त झालो आहे. सुदैवाने, ज्यांच्या वर्चस्वाची तुम्हा सर्वांना धास्ती वाटते, त्यांना त्याची कल्पना आहे. त्यांच्या या ज्ञानामुळे आणि आधुनिक काळात या वर्चस्वाला पायबंद घालू शकणा-या शक्ती अस्तित्वात असल्यामुळे तुम्हाला जे अरिष्ट ओढवेल असे वाटते ते टाळता येईल.''

महाराष्ट्र एकीकरणामागची तात्त्विक भूमिका धनंजयराव गाडगीळ यांनी नेमक्या शब्दांत मांडली आहे. धनंजयराव गाडगीळांनाही जयकर यांच्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र हा एक प्रांत असावा असे वाटत होते. धनंजयराव गाडगीळ मूळ नागपूरचे पण पुण्यात स्थायिक झाले.

'केसरी' चा हीरक महोत्सव विशेषांक प्रसिध्द झाला. त्यात धनंजयरावांनी लिहिले आहे,
''हिंदुस्थान हे इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स यांच्यासारखे एकजिनसी राष्ट्र आहे असे कोणी प्रतिपादत नाही. चीनमध्ये एका भाषेमुळे अस्तित्वात असलेले एकराष्ट्रीयत्वही आपल्या वाट्यास आलेले नाही, हिंदुस्तान हे एक 'महाराष्ट्र' आहे. त्यात अनेक पोटराष्ट्रांचा समावेश होतो.''

एकभाषी महाराष्ट्राचे राज्यकारभाराच्या सोयीसाठी चार किंवा पाच विभाग पाडावे लागले तरी इतिहास, एका भाषेचा प्रभाव, धार्मिक परंपरेचे वैशिष्ट्य, लोकरीती, आचार, ग्रामरचना, समाजघटना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष भावना, यांमुळे येथील लोकसमुहास आपण एका समाजाचे आहोत असे वाटू लागल्याचे धनंजयरावांनी म्हटले आहे.

आपण एक असल्याची भावना लोकमानसात खोलवर रुजली की मग आपली हक्काची भूमी कोणती ते सांगितले जाते. मराठे, महार व ब्राह्मण हे महाराष्ट्र समाजाचे मुख्य घटक असून त्यांचे परस्परसंबंध निश्चित व सलोख्याचे झाल्याशिवाय आपणांस तरणोपाय नाही असे धनंजयरावांचे मत होते. महाराष्ट्र हा त्रैवर्णिकांचा प्रदेश असून महाराष्ट्रीयांतील वैश्य परंपरेचा अभाव त्यांना जाणवत होता.

धनंजंयरावांना महाराष्ट्राच्या आर्थिक प्रश्नाचे स्वरूपही विशिष्ट असल्याचे जाणवत होते, कारण इथले उद्योग, व्यवसाय व व्यापार भूमिपुत्रांच्या हातात नसून परप्रांतांतून आलेल्या उप-यांच्या हातात आहेत हे धनंजयरावांना तेव्हाही प्रकर्षाने जाणवले होते.

संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तर ब्राम्हण-ब्राम्हणेतर वादासारख्या जातीय वादाचे निर्मुलन करता येईल; तसेच, महाराष्ट्राचा आर्थिक विकास साधणे सोपे होईल असा आशावाद धनंजयरावांच्या भूमिकेमागे होता.

Last Updated On – 1 May 2016

About Post Author