रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात वसलेले महाळुंगी हे छोटेसे गाव आहे. तेथील वातावरण निसर्गसंपन्न आहे. गावाच्या आजूबाजूला जंगल आहे. त्यामुळे झाडांची संख्या जास्त आहे. गावाच्या जवळ डोंगर आहे. त्या गावाची लोकसंख्या चारशेचोवीस आहे. गावात मारूती मंदिर आणि गावदेवीचे पुरातन मंदिर आहे. गावदेवी हेच गावाचे ग्रामदैवत आहे. गावदेवीची यात्रा एप्रिल महिन्यात असते. गावात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
गावातील लोक शेती करतात. काही लोक जवळच पाच किलोमीटर परिसरात असलेल्या एम.आय.डी.सी नावडा फॅक्टरीमध्ये नोकरी करतात.
गावात येण्यासाठी वाहतुकीची सार्वजनिक व्यवस्था नाही. एसटी पनवेलपासून येते ती दोन किलोमीटरवर असलेल्या मोरबे गावापर्यंत. तेथून गावात येण्यासाठी जीपगाडीची व्यवस्था आहे. गावाजवळच एम.आय.डी.सी असल्यामुळे प्रदूषणाचा त्रास थोडाफार जाणवतो.
गावात एक ओढा आहे. ‘धबाकी’ असे त्या ओढ्याचे नाव आहे. डोंगराच्या पायथ्याशी तळे आहे. गावात पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडतो. त्या पावसावरच शेतकरी भाताची शेती करतात. उन्हाळ्यात मात्र पाण्याची टंचाई असते. तेथे बाजार भरत नाही. येथील लोक पाच किलोमीटरवर असलेल्या देवीचा पाडा या गावी रविवारी बाजारासाठी जातात.
गावात अंगणवाडी आणि चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी देवीचा पाडा किंवा पनवेल या ठिक़ाणी जावे लागते. त्या गावाच्या आजूबाजूला चार-पाच किलोमीटर परिसरात चिंधन, खाणाव, वावंजे, खेरणे, कानपोली ही गावे आहेत. गावात शोभा बोलाडे या सामाजिक कार्यकर्त्या राहतात.
माहिती स्रोत : शोभा बोलाडे – 9273557715
संकलन – नितेश शिंदे