भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ. हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांत केली जाते, म्हणूनच तो काल शुभ मानला जात नाही. त्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करत नाहीत; त्याविषयी बोलणी करत नाहीत आणि मोठी खरेदीही करत नाहीत. मध्य प्रदेश आदी हिंदी भाषी प्रदेशांत पौर्णिमान्त महिने पाळले जातात. तो तेथील आश्विन महिन्यातील पहिला पंधररवडा असतो.
प्राचीन काळात आश्विन शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत. सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केले. ते चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होते. त्यामुळे हिंदू नववर्ष चैत्र पाडव्याला सुरू केले जाते, मात्र महालय काळ बदलला गेला नाही. तो भाद्रपदाचा दुसरा आठवडाच राहिला. ती प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे असे सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी नोंदले आहे. हिंदू माणूस त्याच्या नातेवाईकाचे श्राद्ध नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, पितृपक्षातील त्याच तिथीस करतो. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. त्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. श्राद्धविधीत अन्य गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. त्या पंधरवड्यात यमलोकातून पितर (मृत पूर्वज) कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत आहे. म्हणून, तो पक्ष (पंधरवडा) तशा पितृकार्याला योग्य समजला जातो.
महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. कल्पना अशी, की त्या काळात घर ‘मोठे’ होऊन जाते. सर्व नातेवाईक येतात त्याबरोबर पितरही आलेले आहेत, म्हणजे खरे तर, आनंदोत्सव, मौजमजा. त्यात अकाली निधन झालेल्या व्यक्तींबाबतचे कातर दु:खही असते. शास्त्रवचन भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज ‘महालय श्राद्ध’ करावे असे आहे. पण, ते शक्य नसल्यास ज्या तिथीला संबंधित व्यक्तीचा पिता मृत झाला असेल, त्या दिवशी त्या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. एरवीही, व्यक्तीच्या निधनानंतर तेरा दिवसांपर्यंत श्राद्धविधी केला जातो. दरवर्षी निधनतिथीला वर्षश्राद्ध केले जाते. तसे असले तरी महालयात पितरांच्या पूजनाला महत्त्व आहेच.
हे ही लेख वाचा-
तरंग आणि बारापाचाची देवस्की
मकर संक्रांत २२ डिसेंबरला हवी
महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन इत्यादी विधी करायचे असतात. महालय योग्य तिथीवर करणे अशक्य झाल्यास पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला केला तरी चालतो. अशा फटी हिंदू धर्मात सोयीने ठेवलेल्या दिसतात. त्यामुळे हिंदू लोकांचा स्वभाव जुळवून घेणारा व अघळपघळ झाला असेही मानतात. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण-पूजन महालय श्राद्धात पिंडरूपाने केले जाते. त्यामध्ये दिवंगत आई-वडील, आजी-आजोबा, पणजी-पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या, सासू-सासरे, व्याही-विहीण, अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान केले जाते. माणूस विविध गुरूंकडून आयुष्यभर काही ना काही शिकत असतो. उलट, माणूस काही लोकांना शिकवत असतो. त्यामुळे असे गुरु आणि शिष्य जे निधन पावले असतील त्यांचेही स्मरण केले जाते. हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही त्यात स्मरण केले जाते. त्याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या संबंधित व्यक्तीच्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तीना उद्देशून देखील श्राद्ध केले जाते. अनेक लोकांवर निधनानंतर कोणताही संस्कार केला जात नाही. त्यांच्याप्रतीही त्या विधीत कृतज्ञता व्यक्त केली जाते. झाडे तोडली जातात, कीडे-मुंगी-कीटक माणसांच्या हातून नकळत मारले जातात. त्यांचीही आठवण त्यावेळी केली जाते. निसर्गातील पशु-पक्षी, झाडे यांचेही निसर्गचक्रात महत्त्वाचे स्थान असते. त्यांच्यामुळेही माणूस नकळत का होईना चांगल्या गुणवत्तेचे आयुष्य जगत असतो. त्यांच्याविषयी आपुलकी व्यक्त करण्याचे माध्यम म्हणूनही महालयाकडे पाहिले जाते. सारांश, हे विश्वचि माझे घर या न्यायाने सर्वच दिवंगत घटकांचे स्मरण महालय श्राद्धात केले जाते.
मातामह श्राद्ध (आईच्या वडिलांचे श्राद्ध) आश्विन शुक्ल प्रतिपदेला असतेच, पण त्या शिवाय, त्या दिवशी ज्यांचा मृत्युदिन नक्की माहीत नाही त्या सर्व पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे. म्हणून त्यास सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात.
जसे गणपती, गौरी यानिमित्ताने सर्व घर एकत्र येते त्याचप्रमाणे श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. त्यांच्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या एकत्र स्मरणाने वंशवृक्ष समजतो. त्यानिमित्ताने कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती होते. त्यांनी केलेली विशेष कामे, समाज व कुटुंब यांसाठीचे त्यांचे योगदान याबद्दल माहिती संबंधितांना मिळते. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीने उर्वरितांचा आत्मविश्वास वाढतो व पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून प्रेरणा मिळत राहते असे महालयाचे महात्म्य सांगता येते.
सोन्याची खरेदी, घराची खरेदी या गोष्टी करणे पितृपक्षात टाळले जाते. खरे म्हणजे, दिवंगत पूर्वज त्या काळात पृथ्वीलोकात येऊन सर्व गोष्टींचे अवलोकन करत असतील तर चालू कार्याला त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत असा विचार का करू नये? माणसाचे अस्तित्व ज्यांच्यामुळे निर्माण झाले आहे त्या त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद त्यांच्या वंशजांसाठी असावेत असा सकारात्मक विचार केला जायला हवा.
– आर्या जोशी 9422059795 jaaryaa@gmail.com