तरंग म्हणजे देवस्थानास आवश्यक असलेले विशेष प्रकारचे उपकरण. वेळूच्या जाडीइतक्या लाकडी दांड्याच्या एका टोकाला लुगडे गुंडाळून भलामोठा बोंगा करतात. रवळनाथ, भूतनाथ, वेताळ, भैरव इत्यादी देवांच्या आणि सातेरी, माऊली यांसारख्या भूमिदेवतांच्या देवळांत ही ‘तरंगे’ असतात. ती दसरा, शिमगा, जत्रा अशा वेळी बाहेर काढून, गुरव किंवा भगत खांद्यावर घेतात. ‘तरंग’ खांद्यावर घेणार्याच्या अंगात त्या त्या देवतेचे वारे येते. मग अंगातील देवाकडून भक्तगण कौल, प्रसाद घेतात. ही तरंगे जत्रेत व गावच्या पंचक्रोशीत फिरून परत मंदिरांत येतात. तरंगांचा संचार ही प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य आहे.
जिल्ह्यातील सर्व जातींच्या घरांतून कुलधर्म व कुलाचार पाळण्याची प्रवृत्ती कायम आहे. अशी परंपरा राखण्यात स्त्रियांचा वाटा अधिक आहे. कोणत्याही कार्यास हात घालताना देवाचा कौल (त्याला प्रसाद घेणे म्हणतात) लावण्याची प्रथा आहे. ही कौलाची पध्दत वेगवेगळ्या देवस्थानांत वेगवेगळ्या प्रकारची आहे. काही देवळांत दगडी पूजामूर्तीला करमळीच्या झाडाची पाने किंवा ‘पिटकुळी’चे कळे यांचे ‘प्रसाद’ लावतात. इतर काही ठिकाणी चौकावरील मूर्तीला किंवा खांबाला प्रसाद लावतात. कधी पानां-कळ्यांऐवजी उकडे तांदुळ वापरतात. ही फुले, तांदुळ, पाने उजवीकडे किंवा डावीकडे पडतात. त्यावरून ‘प्रसाद’ घेणारा भटजी किंवा गुरव देवाच्या ‘बोलण्या’चा अर्थ विशद करून सांगतो.
बारा-पाच हा दक्षिण कोकणातील गूढ संप्रदाय आहे. ह्या संप्रदायाची निर्मिती कधी व केव्हा झाली ह्यासंबंधी मतभेद आहेत.
‘बारा पाचाचे गणित एक कर’ या गार्हाण्यातील पाच देव कोण? तर विष्णू, गणपती, सूर्य, देवी आणि शिव या शंकराचार्यांनी रूढ केलेल्या पाच देवता होत असा समज आहे. बारा स्थळांत प्रत्येकी एक याप्रमाणे बारा वंस (वंश) आहेत. त्या शिवाय पूर्वसत्तेच्या स्थळात मायेचा म्हणजे माहेरचा व बाराचा असे दोन पूर्वस (पूर्वज) आणि रवळनाथ, भूतनाथ व पावणाई यांचे प्रत्येकी एक असे तीन पूर्वस, असे मिळून एकूण पाचांची संख्या पुरी होते असाही समज दृढ झाला.
देवस्कीचे मुख्य घटक तीन आहेत. 1.बारापाचाची देवस्की, 2.तरंगे, 3.ग्रामदेवता . वंस व पूर्वस हे देवस्की सुरू करण्याच्या वेळी मनुष्याच्या अंगात संचार करतात. या संचाराला ‘अवसर वारे देणे’, ‘अंधार उभा राहणे’ असे शब्द रूढ आहेत. त्यास शिवकळा येणे असेही म्हणतात. या वंस-पूर्वसाच्या अधिकारी देवता वेगवेगळ्या असून त्यांचे वंस-पूर्वस प्रत्येक स्थळात असतात.
बारापाचाची देवस्की
पहिले स्थळ-पूर्वसत्ता: (पूर्वी किंवा मूळ भूमिका): देवस्कीची सुरूवात या स्थळाच्या साक्षीने व्हावी लागते. देवळात दगड पुजलेला असतो. त्याच देवळात हात जोडून उभीमूर्ती असते. तिचा ज्याच्याकडे स्थळ असते त्यास वंस म्हणतात. हे स्थळ ज्याच्याकडे असते त्याच्याकडे या स्थळाची पूजाची करण्याचा मान असतो. बारांचा पूर्वस व मायेचा पूर्वस (माहेरचा पूर्वस) दोन्ही पूर्वसांपुढे देवाच्या नावाने बाहेर बळी देतात. त्यास देवाचा ‘चाळा’ म्हणतात. तो चाळा देवळाबाहेर असतो. ह्या स्थळात मायेचा पूर्वस, बाराचा पूर्वस व हे स्थळ चालवणार्या कुलांचा वंस अशी तीन स्थाने येतात.
दुसरे स्थळ –राजसत्ता (विठ्ठलादेवी): या स्थळाची मुख्य देवी भगवती. या मूर्तीजवळ दुसरी चतुर्भूज मूर्ती असते. तिला विठ्ठलादेवीचा चाळा म्हणतात. हे स्थळ ज्याच्याकडे असते त्याचा वंस जवळच असतो. विठ्ठलादेवीला ‘इटलाई’ देवी असेही म्हणतात.
तिसरे स्थळ-गावडा: या स्थळात पुरूष व स्त्री अशा दोन मूर्ती असतात. ज्याच्याकडे हे स्थळ असते, त्याचा वंस म्हणून एक दगड पूजलेला असतो.
चौथे स्थळ-गांगो: हा एक दगड पुजलेला असतो. हे स्थळ घाडी पाहतात.
सहावे स्थळ-मडवळ: हा एक दगड पुजलेला असतो. हे स्थळ धोब्याकडे असते. मडवळ या मूळ कानडी शब्दाचा अर्थ धोबी असा आहे.
सातवे स्थळ-जैन: या स्थळात शिवलिंग हा मुख्य देव, नंदी, गणपती, एक किंवा अधिक पुरूषांच्या मूर्ती आसन, मांडी घालून, हात जोडून ध्यानस्थ बसलेल्या असतात. यातल्या एका मूर्तीस ‘जैनास वंस’ किंवा ‘नितकारी’ म्हणतात. मग आरंभी नारळ ठेवून गार्हाणे करतात. हे स्थळ लिंगायत गुरव किंवा जंगम याच्याकडे असते.
आठवे स्थळ-ब्राम्हण: बारांचा ब्राम्हण हा एक दगड पुजलेला असतो. हे स्थळ कर्हाडे ब्राम्हणाकडे असते.
नववे स्थळ-कूळ: या स्थळात पाण्याने भरलेली झारी पुजेस लावतात. या ठिकाणी बळी देतात. हे स्थळ ज्याच्याकडे असते त्याला कुलकार म्हणतात.
दहावे स्थळ-भराडी (भद्रकाली, भवाई): या स्थळात मांडी घालून बसलेली देवीची मूर्ती असून तिच्या दोन्ही हातांत शस्त्र व दोन्ही बाजूस पशूंचे देह व पक्ष्यांची तोंडे अशी चित्रे असतात. ह्या देवीला बळी अर्पण करतात.
अकरावे स्थळ- बेळा: हे महाराचे स्थळ असून त्या गावाचा बेळा महार ते स्थळ पुजतो. त्यात अंतर्भूत असलेले निरनिराळे दगड पुजले जातात.
बारावे स्थळ –पान: हे स्थळ देखील महाराचे असून त्या गावाचा पान महार हे स्थळ पुजतो.
बेळा महार व पान महार यांच्या स्थळात पुजणार्या देवतांची नावे, “साळबाई. सोमय्या, अज्ञात महालक्ष्मी, झोलाई, खेमाई वीर, मनाई, पडलाई, भैरीभवानी, काळकाई, वाघाई, जखाई अशी नावे सांगितली जातात.
अकारी पुरूष– देवस्कीत गाव जोडला म्हणून ‘अकारी पुरुष’ ही देवता मानली जाते. गाव वसवणारा पुरूष म्हणून ह्याला महत्वाचे स्थान आहे.
– ज्योती शेट्ये
Last Updated On – 6th May 2015
I want to know much
I want to know much information about word :AKAR’ what is mean by akar? WHAT ia mean by devchar and chala. ? whay thay are given or pleased by killing cock or hen in front of them .what is roll of Gango god in this play.
khup mahatvachi mahiti
khup mahatvachi mahiti ,aankhi thodi milali tar share kara.
माहिती म्हणून ठीक, पण बळी
माहिती म्हणून ठीक, पण बळी देणे वगैरे प्रकार अंधश्रद्धा अशी टीप द्यायला हरकत नाही.
So nice information share…
So nice information share here.
छान माहिती ,हे सर्व ऐकून…
छान माहिती ,हे सर्व ऐकून होतो पण प्रत्यक्ष हे सर्व आहे हे सर्व वाचून ,जे नीट मांडणी करून लिहिले आहे त्यामुळे जेकाही केले जाते बोलले जाते यालकही प्रमाण असावे असा विश्वास निर्माण झाला.
Comments are closed.