महाराष्ट्राची शान ‘पैठणी’
फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करून
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी
कवयित्री शांता शेळके यांनी पैठणीचे स्त्रीजनात असलेले हळवे स्थान मोजक्या शब्दांत किती सुंदरपणे गुंफले आहे! पैठणी म्हणजे महाराष्ट्रातील भरजरी पारंपरिक वस्त्रप्रकार. गर्भरेशमी, संपूर्ण जरीचा पदर आणि रुंद व ठसठशीत वेलबुट्टीचे काठ… पैठणीची ही प्राथमिक ओळख, तर संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी एकसारखी वेलबुट्टी दिसणे हे तिचे खास वैशिष्ट्य.
कपाट ढीगभर साड्यांनी भरलेले का असेना, विशेष प्रसंगी ठेवणीतील पैठणीच हवी, असा तमाम महिलावर्गाचा हट्ट असतो. त्यात ‘गृहमंत्री’ ठरवण्यासाठीच्या टीव्हीवरील ‘शो’ने पैठणी जिंकण्याच्या स्पर्धेला जन्म देऊन पैठणीप्रेमात भर घातली आहे.
नऊवारी ही मराठी स्त्रीची ओळख, तर पैठणी हे तिचे महावस्त्र! मराठा काळात पैठणची पैठणी महिलांमध्ये लोकप्रिय होती. पैठणीची रंगसंगती आणि पायाजवळच्या काठावर व पदरावर केले जाणारे जरीकाम तिला मौलिक ठेव्याचे वजन प्राप्त करून देत. मराठे स
रदारांपासून ब्राह्मण-वाण्यापर्यंत सर्व घरांतील महिलावर्ग सणा-समारंभांना पैठणी नेसत. पेशव्यांना पैठणच्या या कलेचे आकर्षण होते. त्यामुळे पेशव्यांच्या बायकांसाठी पैठणहून पैठण्या मागवल्या जात. पेशवे स्वतःसाठीसुद्धा पैठणीसारखी वरून पारंपरिक नक्षी असलेले दुपट्टे, उपरणी अशी वस्त्रे मागवत. थोरल्या माधवराव पेशव्यांनी त्यांना त्यांच्या धोतरावर ज्या पद्धतीची नक्षी हवी ती काढून पैठणला पाठवल्याचा उल्लेख १७६६ मध्ये सापडतो.
महाराष्ट्रात पैठणी इतकी लोकप्रिय का झाली, याबाबत इतिहासतज्ज्ञ डॉ. रा. श्री मोरवंचीकर सांगतात, “पैठणी लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे ती नववधूची साडी होती. तेव्हाची उच्चभ्रू कुटुंबेच पैठणी घेऊ शकत असत. कारण पैठणी तयार करायला वेळ बराच लागे आणि ती वैशिष्ट्यपूर्ण असायची. पैठणीचा रंग, त्यावरची नक्षी, त्यातील सोने-चांदीचा वापर, रंग या साऱ्यांमुळे पैठणीचे सौंदर्य खुलून यायचे. कोणतीही स्त्री पैठणीला पाहून खूष होऊन जायची. ती साडी हातमागावरून थेट नेसता यायची. तिच्यावर अजून काही संस्कार करण्याची गरज नव्हती. पैठणी म्हणजे राजकन्या, राजमाता यांचे व्यवच्छेदक लक्षण असायचे.” नंतर पैठणी ही श्रीमंतांची मिरास झाली.
प्रवास पैठणहून येवल्याकडे
पैठण हे त्या कलेचे केंद्र म्हणून गेली दोन हजार वर्षे ओळखले जाते. ‘पैठणी’ हे नाव त्या साडीला पैठण गावावरूनच मिळाले. पैठण हे पैठणी, पीतांबर व धोतर यासाठी प्रख्यात होते. सातवाहन राजांचा पैठणी विणण्याच्या कलेला आश्रय होता. साडीनिर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याची स्वतंत्र बाजारपेठ पैठणला निर्माण झाली होती. सद्यकालात तेथे पैठणी साहित्य मिळत नाही. बाजारपेठांची तेव्हाची नावे मात्र कायम आहेत. उदाहरणार्थ, ‘पावटा गल्ली’ (चांदीच्या तारांना दावा देणारे साहित्य), ‘जरगल्ली’ ‘तारगल्ली’ व ‘रंगारगल्ली’ ही गल्ल्यांची नावे. सतराव्या शतकात रघोजी नाईक या सरदाराने शामदास वालजी नावाच्या एका गुजरात्यास हाती धरून पैठणहून येवलेवाडीला म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील येवल्यात पैठण विणणारे काही कसबी कारागीर आणून तेथे पेठ वसवली आणि त्यांच्याकडून पैठणीचे उत्पादन सुरू केले. त्यांना कच्चा माल मिळावा व विणलेल्या मालाला बाजारपेठ लाभावी म्हणून मुद्दाम गुजरातेतून व्यापारी आणण्यात आले व त्यांच्या पेढ्या तेथे उघडण्यात आल्या. तेथील पैठण्यांना सरदार व धनिक यांचा ग्राहकवर्ग लाभला. नाशिकच्या येवला, नागडे, वडगाव, बल्लेगाव, सुकी या गावांमध्ये अनेक कारागीर पैठणी बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. त्या परिसरातील कारागीर हे क्षत्रिय खत्री, साळी, कोष्टी, मराठा, नागपुरी समाजातील आहेत. त्यांतील खत्री समाजातील कारागीर स्वतःच्या नावामागे ‘सा’ लावतात.
पैठणी कारागीरांचे आर्थिक दृष्ट्या तीन प्रकारांत वर्गीकरण प्रामुख्याने करता येईल. १. कोणतेही भांडवल उपलब्ध नसलेले, उधारीवर कच्चा माल आणून पैठणी तयार करून देणारे, २. कच्चा माल खरेदी करून पैठणी तयार करून देणारे, ३. कच्चा माल देऊन पैठणी तयार करवून घेणारे व्यापारी. बहुतांश कुटुंबे वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात. अशा कुटुंबांत भाऊ मागावर बसतात, तर घरातील महिलाही डिझाइन बनवण्यास हातभार लावतात.
अनेक कुटुंबांनी स्वतःच्या विणकराच्या व्यवसायाला मोठ्या उंचीवर नेऊन बसवले आहे. त्यातील एक म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार विजेते पैठणी उत्पादक शांतिलाल भांडगे. त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संत कबीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तो वस्त्रशिल्पासाठी पैठणीच्या नवीन नक्षीकामासाठी मिळाला आहे. भांडगे परिवारात पैठणीसाठी मिळालेला केंद्र सरकारचा तो सलग पाचवा राष्ट्रीय पुरस्कार, तर स्वतः शांतिलालसा भांडगे यांचा तो दुसरा राष्ट्रीय पुरस्कार. भांडगे यांना यापूर्वी १९९१ मध्ये पैठणी उत्पादनातील ‘आसावली ब्रॉकेड’ या नक्षीकामाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. शांतिलालसा यांचे बंधू दिगंबरसा भांडगे यांना ‘टसर पैठणी’साठी पुरस्कार १९९८ मध्ये मिळाला होता. शांतीलाल यांचे पुत्र महेशसा भांडगे यांना टिश्यू ब्रॉकेड’साठी २००१मध्ये तर राजेशसा भांडगे यांना ‘जरी स्ट्रेप्स’ पैठणीसाठी पुरस्कार २००३ मध्ये मिळाले आहेत.
अर्थात अद्वितीय कामगिरी करणारी भांडगे यांच्यासारखी कुटुंबे अपवादात्मक. बहुतांश कारागीर वर्ग हालअपेष्टात जीवन कंठत असतो. काही लोक इतके गरीब, की त्यांना स्वतःच्या घरी हातमाग टाकणे शक्य नसते. एका हातमागाला आठ बाय आठ फूट इतकी जागा लागते. तेवढे घरही काही कारागिरांच्या नशिबी नसते. मग असे कारागीर सुस्थितीतील कारागिरांकडे मजुरी करतात. काही घरांत दोन, तीन, पाच, सहा माग असतात. मग तो कारखानाच बनतो. पण पैठणी बनवली, म्हणजे पुढील सर्व सोपे अजिबात नसते. पैठणी बनवली म्हणजे ती विकता येईलच, अशी खात्री नसते. शिवाय, साड्या क्रेडिटवर विकाव्या लागतात. त्यासाठी भांडवल नसल्याने बहुतांश कारागिरांना नाईलाजाने केवळ शंभर-दोनशे रुपये जादा घेऊन पैठण्या व्यापाऱ्यांना विकाव्या लागतात. विणकरांची मजुरी ही पदर आणि त्यासाठी लागणाऱ्या दिवसांवर मोजली जाते. म्हणजे पदरावरचे डिझाइन जितके कौशल्यपूर्ण तितके अधिक दिवस पैठणी बनवायला लागतात.
पैठणीच्या साड्या साधारणतः चार ते पाच हजारांपासून सुरू होऊन त्यांची किंमत दोन-तीन लाखांपर्यंत असू शकते. त्यामध्ये मजुरी खर्च, निर्मिती खर्चही जमा असतो, अशी माहिती येवल्याच्या ‘महात्मा फुले अकादमी ट्रेनिंग सेंटर’मध्ये ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ विभागात गेली पाच वर्षे विणकरांच्या ट्रेनिंगची जबाबदारी असलेल्या अस्मिता गायकवाड यांनी दिली.
पैठणीच्या निर्मितीत अनेक कारागिरांचा हातभार लागतो. हिरवा, पिवळा, लाल, कुसुंबी हे पैठणीचे खास रंग. ते करडीच्या मुळांपासून तयार केले जात. त्यांना सुवासही असे. रंगारी रेशमावर पक्क्या रंगाचा हात फिरवत. सोनार सोन्यारूप्याचे पत्रे ठोकून देत व ते पत्रे ठोकून एकजीव करण्याचे काम चपडे करत. चपडे हे काम ज्या मठाराच्या (हातोड्याच्या) साहाय्याने करत, त्या मठारावर व ऐरणीवर पाण्याची विशिष्ट प्रक्रिया केल्यामुळे त्या पत्र्यांना झळाळी येई. त्यानंतर लगदेकरी पत्र्यांच्या तारा सफाईने ओढत. नंतर त्या बारीक तारा तारकशी काढत. त्यानंतर वाटवे त्या सुबक तारा चाकावर गुंडाळून कारागिरांच्या हवाली करत असत. उंची रेशमी धागेही विविध प्रक्रिया करून तयार करण्यात येत. उदाहरणार्थ, रहाटवाल्याने रेशीम धाग्यांची निवड करणे, कातणाऱ्याने ते असारीवर चढवणे, असारीवरील रेशीम चाचपून त्यातून चांगले रेशमी धागे निवडणे, तात नावाच्या यंत्रावरून निवडलेल्या धाग्यांच्या देवनळाच्या साहाय्याने लहान लहान गरोळ्या बनवणे, नंतर त्यावरून ते रेशीमधागे ढोलावर घेणे व ढोलावरून फाळक्यावर नेणे इत्यादी विविध प्रक्रिया करण्यात येत. कातलेल्या रेशमी धाग्याला ‘शेरिया’ म्हणत. नंतर रहाटवाला रेशीम रंगाऱ्याकडे देई व रंगारी ते हव्या त्या विविध रंगांत रंगवून मागवाल्याकडे देई. अखेर मागवाला त्याला खळ वगैरे देऊन ते मागावर चढवी व त्यांपासून ताणा आणि बाणा यांच्या साहाय्याने पैठणी विणून पूर्ण करी. विणकर रेशमी पोताच्या खाली हव्या असलेल्या नक्षिकामाचे आकृतिबंध असलेले कागद ठेवत व मग त्यानुसार विणकाम करत. त्यात विणकराला बरेच कसब दाखवावे लागे. तसेच, अत्यंत काटेकोरपणाही राखावा लागे. पैठणी तयार करण्यासाठी एकवीस दिवस लागत. त्यांपैकी केवळ पदराच्या विणकामासाठी सात दिवस खर्ची पडत. नव्या युगात यंत्रसामग्री आली असली तरी पदराचे काम हातानींच केले जाते. त्यात सोन्याचा धागा ओवायचा, मग जरीच्या रंगीत धाग्यांनी नक्षी काढायची हे काम कुशल कारागीर करतात.
जुनी पैठणी सोळा हात लांब व चार हात रुंद असायची. तिच्या काठापदरावर वेलबुट्टी किंवा पशुपक्ष्यांच्या प्रतिमा असत व तिचे वजन साडेतीन शेरापर्यंत म्हणजे सुमारे तीन किलो तीनशे ग्रॅम बसायचे. एका पैठणीसाठी साधारणत: बावीस तोळे चांदीबरोबर सहा, आठ, बारा व क्वचित अठरा मासे म्हणजेच सुमारे १७.४ ग्रॅम सोने वापरण्यात येई. बारामासी, चौदामासी, एकवीसमासी यांसारख्या नावांनी पैठणीचा प्रकार, दर्जा व किंमत ठरवण्यात येई. १३० नंबरचे रेशीम वापरलेल्या छत्तीसमासी पैठण्या राजघराण्यात गेल्याची नोंद जुन्या कागदपत्रांत आढळते. फूल, पाने आणि नदी यांच्या नक्षीकामाच्या पैठणीला आसवली, रुईच्या नक्षीला रुईफुल, चौकोनी फुलांच्या नक्षीला अक्रोटी असे म्हटले जाते. राजहंसाचा पदर असलेली पैठणी म्हणजे राजेशाही मानली जाते. इतकेच नव्हे तर पैठणीच्या रंगांनुसारही तिला नावे दिली आहेत. पिवळ्या रंगाच्या पैठणीला सोनकळी, काळ्या रंगाच्या पैठणीला चंद्रकळा, गुलाबी रंगाच्या पैठणीला राणी तर कांद्याच्या रंगाच्या पैठणीला अबोली असे म्हटले जाते. या रंगांखेरीज अंजिरी, सोनकुसुंबी व दुधी या रंगांचाही वापर करण्यात येई.
पैठणीमध्ये आधुनिक काळात सेमी पैठणी, सिंगल पदर, डबलपदर, टिश्यू पदर आणि रिच पदर असे पाच प्रकार दिसून येतात. त्याशिवाय पदर व काठ यांच्या विशिष्ट नक्षिकामानुसार मुनिया ब्रॉकेड व ब्रॉकेड असे वर्गीकरण केले जाते.
पैठणी साडीची किंमत अडीच हजार रुपयांपासून तीन लाखांपर्यंत असते. पैठण्यांची किंमत दोनशे वर्षांपूर्वी हजाराच्या घरात असायची. दुसऱ्या बाजीरावाने त्याच्या सासूला असेच लुगडे भेट दिल्याची नोंद पेशवे दफ्तरात आहे. त्यात त्या लुगड्याची किंमत आठशे रुपये असल्याचे म्हटले आहे. लाखो रुपये किमतीची पैठणी बनवताना शुद्ध सोन्याची जर, चांदीच्या तारा वापरल्या जातात. रेशीम बंगळुरू येथून विकत घेतले जाते तर सोने व चांदीची ‘जर’ गुजरातमधून मागवली जाते. असावली पैठणी महिलांमध्ये अधिक लोकप्रिय होती. त्या पैठणीवर असावलीच्या फुलांचे सुंदर नक्षिकाम सोन्याच्या तारेने केलेले असायचे. सध्या सहावारी, नऊवारी पैठण्याच पाहायला मिळतात, परंतु मराठा काळात पैठण्यांची लांबी दोन-तीन मजले असायची. लांबीने मोठ्या असलेल्या व संपूर्ण साडीभर सोन्याचे जरीकाम असल्यामुळे आणि राजेशाही वस्त्र असल्यामुळे पैठणीला महावस्त्र म्हणण्याचा प्रघात पडला.
पैठणीचे भाग्य पेशवाईच्या ऐन भरभराटीच्या काळात अधिक उजळले व तिचे मोल ‘मजल्यांच्या भाषे’त होऊ लागले होते. पेशव्यांच्या लग्नात महागड्या पैठण्या घेतल्या गेल्याची नोंद आहे. पैठणी सोन्यारूप्याच्या वापरामुळे भरदार व वजनी बनली आणि ‘पैठणी झोक’हा वाक्प्रचार रूढ झाला.
सध्या जी पैठणी दिसते ती परंपरागत शैलीची नसून ती ‘अजंठा’शैलीची म्हणून ओळखली जाते, कारण तिच्यात अजिंठा येथील भित्तिचित्रांत असलेले पानाफुलांचे व पशुपक्ष्यांचे आकृतिबंध साधलेले असतात. तसेच, काठाच्या किनारपट्टीसाठीही ‘फरसपेठी’ व ‘इंदौरी’ या दक्षिणी शैलींचा वापर करण्यात येतो. यादव काळात पैठणी सुवर्ण कमळाने नटलेली असे, तर शालिवाहनांच्या सत्ताकाळात पैठणीवर बगळे व हंस यांची चित्रे विणली जात होती. ज्या ग्राहकांना पैठणीतील परंपरागत कलाकुसरीचे बारीक नक्षिकाम आणि पदराची भव्यता रुचत नाही, त्यांना ‘अजंठा’ शैलीच्या पैठणीतील हलकेफुलकेपणा आवडतो. पैठणीवरील पारंपरिक कलाकुसरीत मोगलांच्या आक्रमणानंतर बदल झाला. शिकारखाना, हुमापरिंदा या खास मुगलकालीन नक्षी पैठणीवर आल्या.
पैठणीच्या साड्यांबरोबर हल्ली ड्रेस मटेरियल, कुर्ते, जॅकेट्स, परकर-पोलके; एवढेच नव्हे तर पैठणीचे दुपट्टे, टाय आणि क्लचही मिळू लागले आहेत. नऊवारी पैठणीचीही क्रेझ पुन्हा आली आहे. लग्नसमारंभात नऊवारी पैठणी ही तरुणींची पसंती दिसून येते. अस्मिता गायकवाड यांनी खऱ्या सोने-चांदीच्या जरीची सुमारे सत्तर हजार रुपये किंमतीची नऊवारी पैठणी बनवून दिली. पैठणी साकारताना इमिटेशन सोने-चांदी वापरली जाते. त्याचा दर पंधराशे ते दोन हजार रुपये किलो असतो. खर्याश चांदीची जर वापरायची म्हटले तर त्याची किंमत चांदीच्या दरानुसार त्या परिसरात मागेपुढे असते.
दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्याचांदीचे भाव चढले, यंत्रांवरील विणकामामुळे उत्पादनाचा वेग वाढला, लोक स्वस्त खरेदीकडे झुकले, परिणामी, पैठणीचे बाजारातून उच्चाटन झाले आणि तिची जागा बनारसी शालू व कोईमतुरी साड्या यांनी घेतली. नायलॉन, शिफॉन व अन्य धाग्यांचे आकर्षण; तसेच, नवीन पिढीतील पैठणीबाबतची अनास्था यामुळे निष्णात कारागिरांनी त्यांच्या पुढच्या पिढ्यांना अन्य नोकरीधंद्यात पाठवले आहे. प्रचंड कष्टाच्या त्या व्यवसायातून अनेक विणकर बाहेर पडले. मात्र काही विणकर कुटुंबांनी तो वारसा पुढच्या पिढ्यांना सोपवला. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र सरकारने त्या कलेचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले व १९६८ मध्ये पैठण येथे ‘पैठणी उत्पादन केंद्र’ सुरू केले. सरकारने पैठणी उद्योगाचा विकास करण्याचे काम १९७४ पासून ‘महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळा’कडे सोपवले आहे. मंडळाने पैठण व येवला या दोन्ही ठिकाणच्या विणकरांना उत्तेजन देऊन पैठणी निर्मितीचे कार्य पुन्हा जोमाने सुरू केले व त्यात मंडळास यशही लाभले.
शुद्ध रेशीम, आकर्षक डिझाइन आणि हस्तकला हे पैठणीचे वैशिष्ट्य. त्यामुळे पैठणीचा निर्मितिखर्च वाढतो. पैठणीची किंमत चार ते पाच हजारांपासून सुरू होते, तर डुप्लिकेट पैठणीत सिंथेटिक धागा वापरला जातो. रेशीम तीन ते चार हजार रुपये किलो असते तर सिंथेटिक धाग्याची किंमत रेशमाच्या तुलनेत एक दशांश इतकी असते. रेशीम धाग्याची किंमत तीन-चार हजार रुपये किलो आहे. शिवाय, पैठणीत जे चित्र पुढून दिसते तेच मागे दिसते. मात्र बनारसी साड्यांमध्ये मागे जाळी असते. अस्मिता सांगते, की ‘ग्राहकांना पदरावर मोर असला म्हणजे ती पैठणी असे वाटते (पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा– सारख्या गाण्यांनी तो विचार पक्का रुजवला गेला). खरे तर, पैठणीवर अनेक प्रकारची डिझाइन असतात. पण ग्राहकांच्या मोराच्या हव्यासापायी डुप्लिकेट पैठण्यांचा व्यवसाय जोमाने वाढू लागला आहे. दक्षिणेकडील राज्यांतील कारागीर सिंथेटिक धाग्याने मोराचे डिझाइन असलेली पैठणी बनवतात. शिवाय, साड्या पॉवरलूमवर बनवल्या जात असल्यामुळे त्यांचा निर्मितिखर्च खूपच कमी होतो. एक अस्सल पैठणी बनवण्यास खूप वेळ लागत असल्याने पैठण्यांचा तुटवडा असतो. त्यामुळे अनेक व्यापारी त्यांच्या दुकानात डुप्लिकेट पैठण्या ठेवतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये पैठण्या बनवल्या जातात. त्याच पैठण्या येथील दुकानदार त्यांच्या दुकानांमध्ये ठेवतात. डुप्लिकेट पैठण्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांना पैसा मिळतो आणि ते केवळ कमी किंमतीच्या साड्यांच्या बाबतीत घडत नाही, तर पंधरा हजार रुपये किमतीच्या साड्याही पैठण्या म्हणून विकल्या जातात. त्यामुळे त्यात स्थानिक कारागिरांचे नुकसान तर होतेच, पण ग्राहकांच्या माथीही नकली पैठण्या मारल्या जातात.
बंगळुरूमध्ये व दक्षिणेकडील काही शहरांत यंत्रमागावर बनवलेल्या नकली व कमी किंमतीत मिळणाऱ्या पैठणी याला कारणीभूत आहेत. या पैठणी कमी प्रतीच्या असूनही त्यांचे रंग व दिसणे अगदी खऱ्या पैठणींसारखे दिसते. पैठणीच्या जीवावर अशी फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी नुकतेच एक क्रांतिकारी पाऊल उचलले गेले आहे. पैठण आणि येवले यांच्या पैठणीला बौद्धिक मालमत्ता हक्क (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी) अंतर्गत केंद्र सरकारचे जिओग्राफिक इंडिकेशन (भौगोलिक उपदर्शन) मिळाले आहे. त्या दोन्ही ठिकाणांना आणि पैठणी विणणाऱ्या विणकरांना हा विशिष्ट दर्जा मिळाल्याने त्यांना कायदेशीर अधिकार मिळाला आहे. त्यामुळे कर्नाटकात किंवा दक्षिणेकडील राज्यांत जर विणकरांनी पैठणी बनवून ती ‘पैठणी’ म्हणून विकण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरू शकतो ही माहिती जिऑग्रॉफिकल इंडिकेशन देणाऱ्या पुण्याच्या ‘ग्रेट मिशन ग्रूप कन्सल्टन्सी’चे गणेश हिंगमरे यांनी दिली.
‘जिओग्राफिक इंडिकेशन’ मिळाले असले तरी अस्सल पैठणीची विक्री व्हावी आणि कारागीर व ग्राहक यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी व्यापाऱ्यांनीही साथ देणे गरजेचे आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यास अस्सल पैठणी जगू शकते. पैठणीला दोन हजार वर्षांचा भरजरी इतिहास लाभला आहे, तो इतकी वर्षे टिकून राहिला आहे, तो या विणकरांचे कष्ट आणि कौशल्य यांमुळेच. तो टिकवणे आणि वाढवणे, ही जबाबदारी महाराष्ट्रीय नागरिक म्हणून तरी आपण नक्की स्वीकारली पाहिजे.
– सुचित्रा सुर्वे
(संदर्भ : मराठी विश्वकोष: इतिहासाचे साक्षीदार)
पैठणी आवडली.
पैठणी आवडली.
विस्त्रुत माहितीही छानच दिली आहे.
महाराष्रट्रीय नवरी शोभून दिसते अशा
पैठणीतूनच!!!!!
लेख खूप माहिती पूर्ण आहे
लेख खूप माहितीपूर्ण आहे. पण खरी पैठणी कशी ओळखावी?
पैठणीचा महिमा अप्रतीम
पैठणीचा महिमा अप्रतीम
मला येवल्याची पैठणी साडीचा
मला येवल्याची पैठणी साडीचा बिजनेस करायचा आहे
We want price of paithani…
We want price of paithani with lotus, peacock, bangal design, or related to it
मला येवल्याची पैठणी साडीचा…
मला येवल्याची पैठणी साडीचा बिजनेस करायचा आहे
agdi sundar varnan kele aahe…
agdi sundar varnan kele aahe ..
ashich ek paithani ghenyasathi bheta http://paithanisari.in/
खरा पैठणीचा विणकर हा कोष्टी…
खरा पैठणीचा विणकर हा कोष्टी आहे.हे आपण विसरलात.
पैठणी बाबत महत्व पूर्ण…
पैठणी बाबत महत्व पूर्ण माहिती मिळाली
पैठणी बनवणाऱ्या कारागीर यांचे संपर्क क्रमांक मिळाल्यास त्यांना संपर्क साधून थेट खरेदी होऊ शकेल त्यात कारागीर व ग्राहक यांचाही फायदा होईल
Comments are closed.