महाराष्ट्र काँग्रेसतर्फे शंकरराव देवांनी सुचवलेल्या महाद्विभाषिकाच्या पर्यायाला गुजरात प्रदेश काँग्रेसने नकार दिला. त्यातून मोरारजी देसाईंनी केलेल्या विधानामुळे, महाद्विभाषिकाचे काय होणार हा प्रश्न उभा राहिला. शंकरराव देव, यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, नाना कुंटे, मामा देवगिरीकर ही नेतेमंडळी वाटाघाटींसाठी पुन्हा दिल्लीला गेली.
वाटाघाटी संपवून काँग्रेसची नेतेमंडळी मुंबईला परत आली. विमानतळावर वार्ताहरांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला एकाही नेत्याने उत्तर दिले नाही. तिथेच संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन चिघळणार असल्याचे स्पष्ट जाणवले.
शंकरराव देव आणि आचार्य अत्रे यांची मुंबईच्या रस्त्यात गाठभेट झाली. अत्र्यांनी देवांना सांगितले, की ''शंकरराव, मुंबईवाचून मी पाच मिनिटे जिवंत राहणार नाही असे लाखो लोकांसमोर तुम्ही त्या दिवशी शिवाजी पार्कवर म्हणालात, पण आता तुम्ही सा-या भारताला तारस्वराने ओरडून सांगा, की मुंबईवाचून महाराष्ट्राचा स्वीकार आम्ही कालत्रयी करणार नाही.''
अत्र्यांच्या या विधानावर शंकरराव एकही शब्द बोलले नाहीत. इथेच महाराष्ट्र काँग्रेस संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर शेपूट घालणार हे निश्चित झाले. नेहरूंना ठणकावून सांगण्याइतपत स्वाभिमान आणि ताठ कणा महाराष्ट्र काँग्रेसच्या एकाही नेत्यामध्ये नव्हता.
मुंबईचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले तर मुंबईचे प्रचंड नुकसान होईल असा अभिप्राय अनेक मंडळींनी दिला. त्यातही भारताचे माजी अर्थमंत्री डॉ. जॉन मथाई यांचा अभिप्राय अतिशय स्पष्ट आणि बोलका आहे. मथाई म्हणतात, ''ज्या मुंबई शहराच्या भोवतालच्या परिसरात कदाचित पाच वर्षांनी बदल होण्याचा संभव आहे, तेथील उद्योगधंदे आणि व्यापार स्थिरपणे कसे चालायाचे? ह्या पाच वर्षांत मुंबईची भव्यता, सौंदर्य आणि रुबाब कमालीचा कमी होईल. मोठमोठया सरकारी इमारती ओस पडतील. हजारो सरकारी नोकरांना स्थलांतर करावे लागेल. हायकोर्ट बंद होईल, शेकडो वकील, बॅरिस्टर देशोधडीला लागतील. एकंदर सात लाख लोकांना स्थलांतर करावे लागेल. उपनगरे ओस पडतील. व्यापारधंदा विलक्षण मंदावेल. बेकारी वाढेल. सारांश, मुंबईला जे आज अखिल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे ते एकदम कमी होईल!''
ज्या मुंबईबद्दल एवढे रण माजले, त्याबाबतची एक कथा त्यावेळी प्रसारित झाली होती. ती अशी, की मुंबई ही संयुक्त महाराष्ट्राची राजधानी असावी असा निर्णय राज्यपुर्नरचना समितीने मूळ अहवालात दिला होता. ही गोष्ट न्या. फाजलअली यांनी शंकरराव देव, धनंजयराव गाडगीळ आणि भाऊसाहेब हिरे ह्यांना समक्ष सांगितली होती. पण मोरारजी देसाई आणि ढेबर ह्यांनी आयत्या वेळी अहवालातला तो भाग स्वतःच्या हातांनी काढून टाकला आणि मुंबई ही संयुक्त महाराष्ट्राची राजधानी होऊ नये अशी व्यवस्था केली. हे जर सत्य असेल तर मोरारजी ही व्यक्ती किती पाताळयंत्री होती हेच जाणवते… या धामधुमीत स. का. पाटील यांनी 'द्विभाषिक राज्यातच मुंबईची भरभराट झाली असती!' असे विधान केले. प्रत्यक्षात, मुंबईचे स्वतंत्र राज्य व्हावे यासाठी स. का. पाटील हे पहिल्यापासून प्रयत्नशील होते.
राज्य पुनर्रचना समितीने सुचवलेल्या द्विभाषिक राज्याविरुध्द जेवढा संताप महाराष्ट्राचा झाला नाही त्याच्या हजार पटींनी संतापाचा भडका तीन राज्यांच्या घोषणेने झाला. मुंबई शहरात तर जणू वणवा पेटला. सा-या शहरभर सभा आणि परिषदा घडू लागल्या.
त्याचवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने काँग्रेसश्रेष्ठींनी घोषित केलेल्या त्रिराज्याला पाठिंबा दिला. त्यावेळेला शंकरराव देवांनी मुक्याचे व्रत धारण केले. काकासाहेब गाडगीळांनी अर्जुनाच्या थाटात घोषणा केली, ''सध्या माझी शस्त्रे मी शमीच्या ढोलीत ठेवली असली, तरी प्रसंग पडल्यास मी ती संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी बाहेर काढल्यावाचून राहणार नाही.''
काका गाडगीळांच्या त्या घोषणेला काहीच अर्थ नव्हता. काकांनी ढोलीतली शस्त्रे कधीच काढली नाहीत. अर्जुनाच्या थाटात घोषणा करणारे काका गाडगीळ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बृहन्नड्डेप्रमाणे वागले.
काँग्रेसश्रेष्ठींच्या तीन राज्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुंबई राज्याच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन 18 नोव्हेंबर 1955 रोजी भरवण्याचे जाहीर झाले. त्याबरोबर यावरून मुंबई शहरातच नाही तर महाराष्ट्रभर लोकक्षोभ उसळला.
उत्तर मुंबई संयुक्त महाराष्ट्र परिषद 15 नोव्हेंबर 1955 या दिवशी शिवाजी पार्कवर झाली. हजारो लोक या परिषदेला उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एसेम जोशी होते, तर स्वागताध्यक्ष आचार्य अत्रे, वयोवृध्द राजकारणी सेनापती बापट यांनी या परिषदेला आशीर्वाद दिला.
जनतेचा विराट मोर्चा विधानसभेवर 18 नोव्हेंबरला घेऊन जाण्याचा निर्णय या परिषदेत झाला. त्याचबरोबर लोकांनी विधानसभेत निवडून दिलेल्या प्रतिनिधींना आपले मत सांगावयास जाण्याचा कायदेशीर हक्क आहे आणि त्या हक्कावर जर सरकार गदा घालील, तर सत्याग्रहाचा आणि संपाचासुध्दा अवलंब करून तो हुकूम मोडून टाकावयाचा निर्धार या परिषदेत केला गेला.
या परिषदेपासूनच संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन म्हणजे 'काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र यांच्यातला लढा' असे त्याचे स्वरूप झाले.
– नरेंद्र काळे
narendra.granthali@gmail.com
9822819709
Last Updated On -1 May 2016