‘महाराष्ट्र’ शब्द उच्चारला की, शाळेमध्ये असल्यापासून ऐकत आलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा’ या ओळी आठवतात. अशा या ‘माझ्या’ महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांमध्ये या ओळींची प्रासंगिकता तपासून पाहण्याची गरज वाटते. मागील 50 वर्षांत महाराष्ट्राने काय काय पाहिले-अनुभवले आहे याचा लेखाजोखा यानिमित्ताने अनेक जाणकार मंडळी घेतीलच खरेतर 50 वर्षं हा काळ एखाद्या राज्य-राष्ट्राच्या दृष्टीने एक महत्वाचा मैलाचा दगड ठरु शकतो. अर्थात त्यासाठी उत्सवी मोड मधून आत्मपरिक्षण मोड मध्ये यावे लागेल. नाहीतर आजकाल बहुतेक कार्यक्रम हे सांकेतिक व उत्सवी स्वरुपाचे होतात. त्यात सिंहावलोकनाचा भाग कमीच असतो. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पण असे होऊ नये यासाठी आढावा, पुढची वाटचाल व दिशादिग्दर्शन यासंदर्भात विचारमंथन होणे गरजेचे वाटते. प्रांतिक दुराभिंमान टाळून, पण मराठी भाषा व महाराष्ट्राचे मोठेपण जपण्यासाठी नेमकेपणाने काय करायला हवे याचा शोध घेण्याची प्रक्रिया या सुवर्णमहोत्सवी वर्षात सुरु व्हावी. आजच्या महाराष्ट्रापुढील विविध सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्नांची पण आवश्यकता आहे.
प्रांत, भाषा, संस्कृती, अस्मिता असे जे काही म्हणतात त्या सर्वांची प्रासंगिकता वरचेवर तपासून पाहण्यासाची गरज वाटते. नाहीतर त्यांचे ओझे व्हायला लागते व ते झुगारुन देण्याकडे माणसाचा कल होतो. असे होऊ नये यासाठी, बदल हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे व त्याला अनूसरून सर्व काही नव्याने मांडणी करुन घेण्याची तयारी ठेवावी लागणार.
माझा जन्म महाराष्ट्रातच झाला. स्वतंत्र महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या पुढच्याच वर्षी मे महिन्यातच मी जन्मलो. आणखी एक संयोग म्हणजे, हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, मातोश्री जिजाबाईंचे सिंदखेड राजा हेच माझे जन्मगाव. थोडक्यात महाराष्ट्र राज्याचा व माझा जीवनप्रवास काळाच्या मोजमापात समांतर सुरु आहे. शीतावरुन भाताची परिक्षा म्हणतात तसे या काळात माझ्या वैयक्तिक अनुभवाच्या औंजळीत सापडलेल्या क्षणांच्या आधारे, महाराष्ट्रात झालेले बदल मी पहातो व अनुभवतो आहे जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्याख्याने-शिबिरांच्या निर्मित्ताने फिरुन झालाय. सिंधुदुर्ग ते गोंदिया व भामरागड ते नवापूर अशा उभ्या-आडव्या महाराष्ट्रात हक्काची शेकडो घरे बांधता आलीत एकीकडे स्वत:ची स्वतंत्र अस्मिता व वैशिष्टे जपण्याची धडपड; तर दुसरीकडे शहरीकरण व जीवनाच्या वाढत्या वेगाने पायाखालची वाळू सरकण्याचा अनुभव व बरेच काही हातातून निसटून जात असल्याने हृदयात खोलवर कुठेतरी गलबलल्यासारखे होणे असे चित्र सर्वत्र दिसते. माझे स्वत: जन्मगाव सुद्धा आता न ओळखण्याइतपत बदललेले जाणवते. आकाराने तर विस्तारलेलेच आहे. पण मनाने मात्र, आक्रसलेले दिसते आहे याचा मनाला त्रास होतोय, काळचक्रामध्ये असे होणे हे स्वाभाविक आहे हे समजूनही स्विकारणे अवघड जाते.
एकूणच माणसे, मग त्यात मराठी माणसे पण एक दुस-यांपासून दूर होत चालली आहेत असे जाणवते नविन पिढीला माणसांची ओढ कमी होत असल्याचे पण दिसते आहे. ‘श्यामची आई’ आताच्या पिढीला समजेल व वाचतांना डोळ्यात अश्रू उभे राहतील अशी परिस्थिती दिसत नाही ते जग केंव्हाच बदलते आहे. महाराष्ट्रीयन/मराठी असल्याचा अभिमान, जागतिकीकरण व जगण्याच्या वेगात धुतला गेल्याचे जाणवते. मात्र त्याचवेळी ‘सारेगमपा’ सारख्या रिअँलिटी शो द्वारे, सामान्यांपर्यंत पोहचणारे मराठी गीत-संगीतामधील सौंदर्य व त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद असा विरोधाभास पण आढळतो. एक बाजूला राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक क्षेत्रात उत्तुंग उंचीची मराठी माणसे दिसतात. मात्र सामान्य मराठी माणसांचे प्रश्न अजूनही भेडसावणा-या प्रकारांचे व भयावह प्रमाणात आहेत. मागील 50 वर्षांत दारुची दुकाने सर्वदूर पोहचविण्याचा पराक्रम आम्ही केलाय. मात्र विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्या थांबविणे मात्र शक्य नाही झाले. आदिवासी भागातील कुपोषणाचा प्रश्नही अजून तसाच आहे शिक्षणाच्या दुकानदा-या फोफावतच आहेत. शेतक-यांची मुले शेती करण्यास तयार नाहीत. केवळ आकड्यांचा घोळ घालून व पोकळ चर्चा करुन आम्ही कसे प्रगतीपथावर आहेत हे दाखविण्याचे केलेले प्रयत्न म्हणजे आत्मवंचनाच होय.
प्रगतीची परिमाणेच चुकीची वापरल्यास सर्व काही चुकणारच, साधनांचा अतिरेकी वापर टाळण्यामध्ये प्रगती मोजायला हवी. काटकसरीची ही वृत्ती दृढ करण्यासाठी या सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रयत्न करायला हवेत. माणसामधील माणूसपण जपण्यासाठी खासकरुन प्रवृत्ती बदलासाठी शोध व प्रयोग व्हायला हवेत. हे सर्व करण्यासाठी तरुण मराठी मनांना चेतविण्याचे काम पुन्हा एकदा हाती घेऊ या. त्यासाठी आपसातील अहंकार बाजूला ठेऊन पुन्हा एकदा एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करु या सदिच्छेसह
डॉ. अविनाश सावजी
9420722107, 9422855607
Last Updated On – 1 May 2016
तबला ची मीहिती
तबला ची मीहिती
Comments are closed.