Home वैभव इतिहास महानुभाव पंथाच्या सिन्नरमधील खुणा

महानुभाव पंथाच्या सिन्नरमधील खुणा

carasole

भगवान श्रीचक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथ स्थापन केला. महानुभाव पंथ महाराष्ट्रात एक हजार वर्षांपूर्वी उगम पावला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला. महानुभाव पंथ श्रीदत्तात्रेय प्रभू यांच्यापासून म्हणजे कृतयुगापासून चालत आलेला आहे असे मानतात. भगवान श्रीकृष्ण, श्रीदत्तात्रेयप्रभु यांच्यापासून ज्ञानशक्ती स्वीकार केलेले चक्रपाणी महाराज शके १०४३ (इ.स. ११२१), श्रीगोविंदप्रभु शके ११०९ (इ.स. ११८७) व श्रीचक्रधरस्वामी शके ११४२ (इ.स. १२२०) अशी अवतार परंपरा आहे. त्यांना ‘पंचकृष्ण’ असे म्हणतात. त्या पंचकृष्णांचा निवास जेथे झाला, ते आसनस्थ जेथे झाले त्या जागांस ‘स्थान’ असे म्हणतात. ती स्थाने पवित्र मानली गेली आहेत. लोकांनी तेथे महानुभाव पंथातील मंदिरे बांधली आहेत.

श्रीचक्रधर स्वामींचा उपदेश, त्यांचे विचार सातशे वर्षापूर्वीच्या बोलीभाषेत लिहिलेल्या एका ग्रथांत आहेत. त्या ग्रंथाला ‘लिळाचरित्र’ असे संबोधतात. सत्य, अहिंसा, समता आणि ममता यांची दिव्य शिकवण देणारे महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान श्रीचक्रधर स्वामी यांचे मराठी भाषेवरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांचे पशुपक्ष्यांवर, प्राण्यांवर प्रेम होते. त्यांनी महाराष्ट्रभर पायी प्रवास करून गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर असलेल्या गावांना भेटी दिल्या. ते वेगवेगळ्या खेड्यापाड्यांत गेले. तेथील गरीब, साध्याभोळ्या स्त्री-पुरूषांमध्ये मिसळले;  त्यांच्या सुखदुखाशी समरस झाले.

भगवान श्रीचक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील. हरिपाल देव हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म शके १११६ ( इ.स. ११९४ ) मध्ये झाला. ते गुजरातमधील भरूच येथील विशालदेव प्रधान यांचे पुत्र, मालनदेवी हे त्यांच्या आईचे नाव. हरिपाल देव हा राजकुमार बालवयापासून शूर, धाडसी होता. महाराष्ट्रातील सिंघणदेव या यादवराजाने जेव्हा गुजरातवर स्वारी केली तेव्हा त्या युद्धात हरिपाल देवाने भाग घेतला होता. त्याने राज्यकारभारात प्राविण्य संपादन केले होते. त्यांनी श्रीगोविंदप्रभू यांच्याकडून ज्ञानशक्तीचा,जीवोद्धरण शक्तीचा स्वीकार केला व एकांतवास सुरू केला. ते सालबर्डी (ता. मोर्शी) च्या घनदाट जंगलात बारा वर्षें राहिले. त्यांनी राजा भर्तृहरीची भावजय मुक्ताबाई हिची पूजा स्वीकारली. त्यामुळे त्यांचे शरीर सदैव तरूण व तजेलदार दिसे. नंतर ते गोंडमध्ये गेले. त्यांनी आंध्रप्रदेश व कर्नाटक प्रांतांतही संचार केला.

स्वामींचे विचार अभिनव होते. त्यांनी म्हटले, ‘परमेश्वर व जीव हे परस्परांपासून भिन्न आहेत. परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ असून, जीवाचा उद्धार करणारा आहे. यासाठी जीवाने अनन्यभावाने परमेश्वराची भक्ती करावी. त्यासाठी यज्ञयाग आदी कर्मकांडाची आवश्यकता नाही.’ स्वामी हे जरी परमेश्वराचे अवतार होते तरी ते त्यांच्या संचारकाळात जनसामन्यांमध्ये मिसळले  त्यांच्या सुखदु:खाशी एकरूप झाले -त्यांची काळजी वाहिली. ते सर्वांचे हितकर्ता झाले. त्यांनी मराठी आणि महाराष्ट्र यावर प्रेम केले. त्यांनी मनुष्याप्रमाणे प्राणिमात्रांची काळजी घेतली.

चक्रधरस्वामींमुळेच महानुभाव पंथातील लोकांनी चार हजारपर्यंतची ग्रंथनिर्मिती केली. व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे, तर त्याच्यातील तत्त्वज्ञानातून ठरते, हे तत्त्व महानुभाव पंथात आहे. त्या पंथांची श्रद्धा वैदिक धर्मावर नसली तरी महानुभाव पंथीयांना वैदिक धर्माबद्दल आस्था आहे. महानुभावांचा चातुर्वर्ण्यावर एक सामाजिक गरज म्हणून विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख काही नियम म्हणजे प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत.

महानुभाव पंथाची काही चरणांकित तीर्थस्थाने नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातही आहे. महानुभाव पंथाच्या ‘पंचकृष्णां’पैकी चक्रधर स्वामी यांचा चरणस्पर्श सिन्नर तालुक्यात चौदा चौकाचा वाडा, भोजनतळ, पट्टीशाळा, गोंदेश्वर मंदिर, महानुभाव मंदिर (खोपडी) या स्थानी झाला. तेथे त्यांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. खोपडी येथील महानुभाव मंदिरात चक्रधर स्वामींचा काल्पनिक चेहरा बनवला गेला आहे. तो चेहरा चौथऱ्याजवळच आहे. तेथे चैत्र पौर्णिमेच्या वेळी तीन दिवस जत्रा असते. तीन दिवसांच्या त्या जत्रेत त्या पुतळ्याची देऊळ गाडीवरून जवळच्या गावांत मिरवणूक काढली जाते. मंदिरात जे भाविक दर्शनासाठी येतात ते स्वामींच्या चरणी विडा अर्पण करतात. त्या विड्यात दान, सुपारी आणि नारळ या वस्तू असतात. महानुभाव पंथातील लोकांना मांसाहार व कोठल्याही प्रकारचे व्यसन करण्यास मनाई आहे.

– शैलेश पाटील

(‘थिंक महाराष्‍ट्र’कडून महानुभाव पंथाच्‍या सिन्‍नर तालुक्‍यातील खुणांचा आणखी शोध घेतला जात आहे. अधिक माहिती उपलब्‍ध होताच ती लेखात समाविष्‍ट करण्‍यात येईल.)

About Post Author

19 COMMENTS

  1. महानुभाव पंथातल्या ग्रंथरचनेत
    महानुभाव पंथातल्या ग्रंथरचनेत आजच्या मराठी भाषेचा उगम आहे असं मानलं जातं. ‘सकळ’लिपी या गूढ लिपीमधे सदर रचना केल्या गेल्यामुळे त्यांचा अनेक वर्षं अर्थ लागत नव्हता. लीळाचरित्रातले दृष्टांत हा अप्रतिम वाङमयप्रकार आहे. सात आंधळे आणि हत्ती.. इत्यादी दृष्टांत प्रसिद्ध आहेत. या पंथातल्या महदअंबिकेचे धवळे ही रचना महत्वाची आहे. दृष्टांतपाठ, चक्रधरांच्या लीलांचे लीळाचरित्र महत्वाच्या रचना आहेत..

  2. अतिशय छान माहिती आहे.
    अतिशय छान माहिती आहे.

  3. दंडवत खुपखुप छान दंडवत
    दंडवत खुपखुप छान दंडवत

  4. प्रत्येक जिवाला सत्याकडे नेणे
    प्रत्येक जिवाला सत्याकडे नेणे.
    कलीयुगाचा धमँ सांगुन परमेशवर प्राप्तीचा ऊपाय/मागँ दाखविणे
    धन्यवाद
    दंडवत प्रणाम!

  5. दंडवत प्रणाम फारच सुंदर
    दंडवत प्रणाम फारच सुंदर संकल्पना आहे. अशीच माहिती देत रहा. शतशः धन्यवाद, आभार

  6. छान माहीती,पण ग्रंथ साडे सहा
    छान माहीती,पण ग्रंथ साडे सहा हजार च्या वर आहेत.

  7. अतिशय सुंदर माहिती
    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद -दन्डवत प्रणाम

  8. अतिशय सुंदर माहिती…
    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद -दन्डवत प्रणाम

  9. छानच उपयुक्त माहिती असून…
    छानच उपयुक्त माहिती असून दिशादर्शक माहिती आहे,

Comments are closed.

Exit mobile version