Home व्यक्ती आदरांजली महर्षि धोंडो केशव कर्वे

महर्षि धोंडो केशव कर्वे

कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे गेले. ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. तेथे ते गणित शिकवत. त्यांनी 1891 मध्ये, पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विधवा स्त्रीशी पुनर्विवाह केला. विधवांसाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था 1896 साली हिंगणे येथे स्थापन केली. त्यांनी त्या संस्थेला उर्जितावस्था आल्यानंतर 1916 साली महिला विद्यापीठ स्थापन केले. नंतर ते त्या दोन्ही संस्थांतून निवृत्त होऊन त्यांनी ग्रामशिक्षणाची चळवळ हाती घेतली. त्यांनी जगातील मानवसमाजात सर्व प्रकारची समता नांदावी या उद्देशाने समता संघ 1944 साली काढला. त्यांचे ‘आत्मवृत्त’ हे पुस्तक अनेकांना सामाजिक काम करण्याची प्रेरणा देऊन गेले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभुषण’ पुरस्कार दिला. त्यांना ‘भारत रत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार 1958 साली मिळाला.

मुरुड येथील महर्षी धोंडो केशव कर्वे स्मारक व फोटो संकलन पाहायलाच हवे असे आहे. कर्वे बसत ती खुर्ची, ते ज्या मेजावर लिखाण करत ते मेज, ते वापरत तो कोट, काठी, ताट, वाटी, भांडे या सार्‍या वस्तू पर्यटकाला त्यांच्या आठवणी सांगतात. सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे तेथील दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह. कर्व्यांची ठळक माहिती तर पर्यटकाला मिळतेच. त्याशिवाय कर्व्यांच्या काळचा सर्व इतिहास छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडत जातो. जगप्रवासाला गेलेले कर्वे अमेरिकेत आईनस्टाइनला भेटून आले. सहसा कोणाबरोबर फोटो काढून घेण्यास उत्सुक नसलेल्या आईनस्टाइन यांनी स्वत: कर्वे यांच्यासोबत फोटो काढण्यास लावला. आईनस्टाइन नेहमी ज्या खुर्चीत बसत ती खुर्ची त्यांना बसण्यास दिली व स्वत: दुसर्‍या खुर्चीवर बसले! कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी त्यांच्या वयाची शंभरी ओलांडली होती. सर्वसामान्यपणे प्रघात असा आहे, की पुरस्कार स्वीकारणार्‍याने राष्ट्रपतींजवळ जाऊन तो स्वीकारायचा असतो. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद तो प्रघात मोडून दोन पायर्‍या खाली उतरून कर्वे यांच्याकडे गेले व त्यांनी कर्वे यांना पुरस्कार दिला!

मुरुड गावात कर्वे यांचे नाव घ्यावे असे स्मारक नव्हते. ती कमतरता त्या स्मारकाने भरून काढली. त्याचे सारे श्रेय वझे कुटुंबीयांना जाते. ते स्मारक वझे कुटुंबाने त्यांच्या खाजगी जागेत स्वखर्चाने बांधले आहे. ते पर्यटकांना पाहण्यास मोफत खुले आहे. स्मारक जतन करणारे नीलेश वझे त्यामागचे कारण सांगतात. वझे कुटुंबाचा कल्याण येथील खिडकीवडा प्रसिद्ध आहे. त्यांच्या बर्‍याच पिढ्या कल्याणलाच वाढल्या. दरम्यानच्या काळात कौटुंबिक कागदपत्रांचा शोध घेताना त्यांना मुरुड येथील त्या जागेचा पत्ता लागला. धोंडो केशव कर्वे यांचा दुसरा विवाह आनंदीबाई या विधवा स्त्रीशी झाला. त्याचे पौरोहित्य वझे घराण्यातील वेदमूर्ती भिकंभटजी वझे यांनी केले होते. त्या कारणाने कर्वे यांच्याबरोबर वझे कुटुंबालाही गावाने वाळीत टाकले! वेदमूर्ती वझे यांचे निधन पुढे, सहा महिन्यांतच झाले. कर्वे व वझे या कुटुंबांचे संबंध लक्षात घेऊन वझे कुटुंबाने कर्वे यांचे कायमस्वरूपी स्मारक बांधून कर्वे यांच्याप्रती नितांत आदर दाखवला आहे.

वणंद या दापोलीपासून अवघ्या चार किलोमीटरवर असलेल्या गावातील माता रमाई राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन 7 फेब्रुवारी 2015 रोजी झाले. रमाबाई या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नी. त्यांचे माहेर वणंद गावातील. त्यांचे माहेरचे आडनाव धोत्रे. रमाबाईंनी बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या खडतर आयुष्यात त्यांना मोलाची साथ दिली. रमाबाईंनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आंबेडकरांठायी समर्पित केले. त्यांनी बाबासाहेबांच्या संसाराचा-घरगृहस्थीचा गाडा सोशिकतेने चालवला. त्या हिमालयाएवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची सावली होत्या. पण ते स्मारक पाहून त्या सावलीलाही स्वतंत्र महत्त्व व अस्तित्व होते, या गोष्टीची जाणीव होते. बौद्ध स्तुपाची आठवण करून देणारी देखणी वास्तू रमाबाई आंबेडकर यांच्या सुनबाई मीराताई आंबेडकर यांच्या प्रयत्नांतून उभी राहिली आहे. रमाबाईंचा सात्त्विक चेहरा असणारा पुतळा, त्यांची पूर्ण माहिती, गौतम बुद्धाचा पुतळा व बाबासाहेबांचे छायाचित्र हे त्या स्मारकाचे आकर्षण आहे. स्मारकाच्या वास्तूतील धीरगंभीरता तेथे जाणाऱ्यास अंतर्मुख करते.

दापोलीच्या कुशीतील जालगाव येथे प्रशांत परांजपे यांच्या मालकीचे ‘परांजपे संग्रहालय’ हे खाजगी प्रदर्शन आहे. ‘संग्रहालयात असलेली उपकरणे काही काळानंतर नष्ट होऊन ती संग्रहालयांतच पाहण्यास मिळतील’ असे वयोवृद्धांचे बोल खरे झाल्याची प्रचीती ते संग्रहालय पाहिल्यावर होते. घरात व शेतात पूर्वी वापरली जाणारी आयुधे, वस्तू, उपकरणे हे त्या संग्रहालयाचे खास आकर्षण आहे.

– डॉ. विद्यालंकार घारपुरे

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version