मस्तिष्क नियंत्रण

0
109

      दैनंदिन आयुष्याचा आपल्यावर होणारा परिणाम आपण व्यक्त करतो आपल्या रोजच्या भाषेतून. उदाहरणार्थ कसं तर काही गोष्टी आपली झोप उडवतात, तर काही आपल्याला जागेपणी स्वप्नांच्या देशात नेतात. म्हणजे आपल्याला जाणवतं, अजाणतं वास्तव कुठेतरी येऊन भिडतं ते आपल्या झोपेशी.

      मेंदूच्या, थोडं सैलपणे बोलायचं तर मनाच्या रचनेबद्दल प्रचलित विचारही ह्याच्याशी सुसंगत आहे. बाहेरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन, आवश्यक तिथे जुळतं घेऊन आपल्या स्वतःबद्दल एक सुसंगत निरूपण करत रहाण्याचं काम करण्यात आपल्या मेंदूची एक विचारपद्धती, एक परिभाग सतत गढलेले असतात. त्यांना तल्लख आणि कार्यरत ठेवायला झोप अत्यावश्यक असते. झोप जर का मिळाली नाही तर आपण आणि बाहेरचं जग असा ताळमेळ विस्कटतो, कारण ही यंत्रणा मंदावते.

      परदेशात जाऊन लढणा-या अमेरिकन सैनिकांच्या हातून घडणा-या स्वतःच्या पायावर कु-हाड मारुन घेण्याच्या किंवा friendly fire च्या प्रकारांचं प्रमाण आणि त्यांच्यातला झोपेचा अभाव हे त्रैराशिक बहुचर्चित आहे. त्यातही महत्वाचं निरिक्षण असं, की झोपेच्या अभावामधे यांत्रिकपणे करता येतील अशी ठरीव कामं एकवेळ करत रहाता येणं शक्य असतं, जरा जरी काही वेगळं घडलं, तर त्याला तोंड देताना मात्र जीवघेण्या चुका घडू शकतात. लोकांच्या चेह-यावरचे भाव, स्वरबदल वगैरे सूक्ष्म संकेतांचं आकलन झोप अपुरी असताना त्रासदायक ठरतं. अनपेक्षित बदलांना समजून घेऊन त्यानुसार प्रतिक्रीया दर्शवणारी मेंदूच्या दर्शनी भागातली ही ताळमेळाची यंत्रणा झोपेअभावी अकार्यक्षम होते.

      गरजेपोटी असेल किंवा केवळ खुमखुमी म्हणून अशा ढोबळ कार्यकारणसंबंधांच्या तपासातून आलेली निरिक्षणं व्यवहारात वापरली जातात दोन प्रकारांनी – एकतर जो काही परिणाम दिसत असेल तो शक्य तितका ठळक करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे बाकीची चौकट कायम राखून हा परिणाम दडपण्‍यासाठी. आपण घेतो ती बरीचशी औषधं ह्याच तार्किक पायावर घडवली किंवा तपासली जातात. तर अशा झोप, तल्लखपणा किंवा दक्षता ह्यांच्या अनुभवातून, विकसित झालेलं, अमेरिकन, फ्रेंच आणि इस्त्रायली सैन्यांत सर्रास वापरात असलेलं एक औषध आहे मोडाफेनिल. योग्य मात्रेत हे औषध घेऊन सैनिक ३६ तासांपर्यंत झोपेच्या अभावाचे कोणतेही दुष्परिणाम न दाखवता काम करु शकतात. मेंदुतल्या रासायनिक प्रक्रियांमधे हस्तक्षेप करणा-या इतर पदार्थांच्या तुलनेत मोडाफेनिलपासून व्यसनाधीन बनण्याचा धोका काहीसा कमी असल्याचाही समज आहे.

      हे औषध आमजनतेच्या आवाक्यातलं असल्याने आणि त्याचा मेंदूच्या कार्यक्षमतेशी संबंध असल्याने त्याबद्दल सामान्य औषधशास्त्राच्या निकषांपलिकडे जाऊन विचार करायला हवा. झोपेचा वेळ कमीतकमी करुन सतत काम करायची क्षमता सहजसाध्य झाली तर तिचा उपयोग कोणते व्यावसायिक कशाकशासाठी करतील? त्याचा एकूण समाजजीवनावर काय परिणाम होईल? मेंदूची क्षमता वाढवण्याचे कोणतेही वैध उपाय स्वगतार्ह असतात, पण ह्या संदर्भात वैध म्हणजे नक्की काय? भारत, चीन, द. कोरिया अशा अपेक्षित उत्तर संच आणि तीव्र शैक्षणिक स्पर्धेच्या देशांत दररोज आठाच्या जागी अकरा तास घोकू शकण्याचा फायदा कोणालाही पटेल. तर मग एखाद्या विद्यार्थ्याचं केवळ हे औषध घेता न आल्यामुळे अन्याय्य नुकसान कसं होऊ द्यावं? दृष्टीदोषासाठी जर चष्मा चालतो, एकूण आरोग्यासाठी च्यवनप्राश चालतं तर मग मेंदू तल्लख ठेवायला मोडाफेनील का नाही अशा स्वरुपाचं मत काही तत्वज्ञ अभ्यासक व्यक्त करतात.

      मेंदूवर आणि मनावर असा रासायनिक ताबा मिळवायचे प्रयत्न मानवाच्या संस्कृतीविकासाच्या प्रत्येक टप्प्यावर झालेले आहेत, त्यातले बरेचसे प्रयत्न आज हजारो वर्षांपासून आपल्यापर्यंत चालत आलेले आहेत. विष पाजून एखाद्याला ठार मारणं हे जिवंतपणी त्याला आपल्या मनासारखं वागायला लावण्यापेक्षा अगदीच सोपं आहे. असा कृतीशील ताबा घेण्यातली महत्वाची बाब म्हणजे असा ताबा घेतला जाण्यापेक्षा दिला जातो, किंवा मेंदूच्या पूर्ण सहकार्याशिवाय त्यावर रासायनिक पगडा बसू शकत नाही. हे पुरातन उत्तर मोडाफेनीललाही लागू पडेल अशी आशा बाळगूया.

ऋचा गोडबोले – भ्रमणध्वनी : 9819321852, इमेल :    rcagodbole@gmail.com 

संबंधित लेख –

गर्दीतली वृक्षराजी .

भाषा, लिपी आणि वास्तवाची जाणीव

भाषेचे उत्पादक होऊ !

मुंबईकरांच्या ‘टॉप टेन’ समस्या

{jcomments on}

About Post Author