मराठ्यांचे मोर्चे निघत आहेत. त्या निमित्ताने दीपक पवार यांचे व्यक्तिगत अनुभवाधारित व तेवढ्याच निष्कर्षांना बळ पुरवणारे मनोगत.
आपण दीपक (पवार)शहाण्णव कुळी मराठा आहोत असे मला लहानपणापासून सांगितले गेले. रेशनच्या दुकानात लहानपणीच गेलो तेव्हा गावाकडचा असलेला दुकानदार ‘पवार म्हणजे धारेचे, की डबक्याचे’ असे विचारत होता. मला माहीत नव्हते. मी वडलांना विचारले, तेव्हा ‘आपण धारेचे पवार’ असल्याचे कळले. नंतर पुस्तके वाचताना ‘पवार हेच मध्यप्रदेशातील धारचे’ हे कळले. मग मराठेशाहीचा इतिहास वाचताना परमार-पवार अशी एक व्युत्पत्ती कळली. पण आपले आडनाव इतरांसारखे आहे आणि नाव तर आता, अगदी सर्वसामान्य वाटावे असे आहे याची जाणीव होत गेली.
मला शाळेत ज्यांनी पहिल्यांदा निबंध लिहायला शिकवला ते गोसावी गुरूजी, दरवाज्यात बोट चेपल्यावर डब्यातली भेंडीची भाजी खायला घातली त्या बोडसबाई. (तेव्हा मला पहिल्यांदा जेवणाचे डबे इतके लहान असू शकतात आणि चपात्या -त्यांना पोळ्याही म्हणतात हे कळले- इतक्या कमी प्रमाणात असलेला डबा असतो हे दिसले. नंतर मोठा झाल्यावर ते कोकणस्थ ब्राह्मणांचे वैशिष्ट्य आहे हे लक्षात आले.
सर्वोदय शाळेत माझे पालकत्व चक्रदेवसरांनी घेतले. त्यांच्याकडे पहिल्यांदा जेवायला गेलो तेव्हा सुरूवातीला भात वाढल्यावर मला वाटले, की एवढ्यातच भागवायचेय बहुतेक. नंतर कधीतरी पहिला भात, दुसरा भात असतो वगैरे कळले. माझे शाळेतील व नंतरचेही बरेच ब्राह्मण शिक्षक राष्ट्रीय स्वराज्य संघ किंवा भाजपबद्दल सहानुभूती असणारे असणार हे नंतर जाणवले. पण त्यांच्यातील कोणाकडूनही कधी मला ‘संघ’ हा शब्द माझ्या शाळेत ऐकायला मिळाला नाही. आता संघवाले असेच धूर्त असतात वगैरे म्हणणे म्हणजे आपण बेअक्कल आहोत असे अप्रत्यक्ष रीत्या म्हणण्यासारखे आहे.
मला मी मराठा आहे हे सुटीत गावाला गेल्यावर कळायचे. आमचे गाव पुनर्वसनापूर्वी मुख्यत: मराठा आणि धनगर यांचे. ब्राम्हण एक -पूजेपुरता. बाकीचे गांधीहत्येनंतर पळून गेले असावेत. त्यांच्या पडक्या घरांचा बायकांकडून परसाकडे जायला वापर व्हायचा. गावाला दोन्हीकडच्या आज्या आणि एक आजोबा, एक चुलते होते. माझे आजोबा हे बरीच मुले आणि त्यांना अल्पभूधारक शेतकरी करील एवढी शेती असलेले गृहस्थ होते. मी लग्नांच्या पंगतीत वाढायचो.-‘तू हे केले नाहीस तर मग तुझ्या बहिणीच्या लग्नात कोण वाढायला येईल’ असे विचारले जायचे. तेव्हा माझी बहीण चौथीत वगैरे होती. मी मोठा नसतो आणि शिकलेला नसतो तर तिचे कदाचित दहावीनंतरच लग्न झाले असते. ती यथावकाश एमए बीएड झाली आणि तिने तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न केले, पण त्याबद्दलचा विरोध कमी करण्यासाठी तिलाही ‘तिचा नवरा कोकणातील मराठा आहे’ असे म्हणावे लागले. तिलाही ती गोष्ट महत्त्वाची वाटत असावी अशी शंका मला येते.
मी कोकणस्थ ब्राह्मण मुलीशी लग्न केले तेव्हा कोकणी लोक म्हणजे बाल्ये एवढेच सामान्यज्ञान असलेल्या माझ्या एका मामाने पाटीवाल्याच्या मुलीशी लग्न करतोयस का असे विचारले. पदर लागतो का असेही म्हणाला. असा विचार करत बसलो तर पदर फाटेल असे मी त्याला सांगितल्यावर आमचे सगळे चुलत-मावस मामा यांनी लग्नावर बहिष्कार घातला! मी माझ्या आई-वडिलांच्या मनातली जातीची भीती तेव्हा पहिल्यांदा बघितली. बहिणीच्या वेळेस तर वडलांनी अंथरूण धरले. माझे काही मित्र ‘ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न करूनही तुझ्या घरून विरोध कसा’ असे मला विचारायचे. त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांच्या अभिमानाच्या कल्पना माहीत नाहीत. माझ्या लग्नाला येऊन रीतसर अहेर घेऊन गेलेले चुलते ‘सहज मुंबईत गेलो होतो आणि जाता जाता लग्न लागले म्हणून गेलो’ असे म्हणाले. माझ्या वडलांची आई, आईचे वडील आणि तिच्या दोन्ही आया मात्र लग्नात रमल्या. त्यांचा माझ्यावर इतका जीव होता, की त्यांनी तेव्हा आणि नंतरही मला एका शब्दाने विचारले नाही. माझ्या आजोबांनी एकहाती सत्यनारायणाची पूजा आणि गोंधळ हा कार्यक्रम पूर्ण केला. (लग्नानंतर मी दोनदा सत्यनारायणाच्या पूजेला बसलो. ही कथा ब्राह्मणी वर्चस्वाचे निदर्शक आहे का वगैरे उद्बोधक प्रश्नांपेक्षा बसून बसून पाठीला कड येते आणि बहुतेक भटजी चुकीची पूजा सांगतात. त्यामुळे त्यांना हाकलून द्यावे हा विचार माझ्या मनात प्रबळ होता.)
माझी आजी माझ्या लग्नानंतर सहा महिन्यांनी गेली. तोपर्यंत आमच्यावरील बहिष्कार उठलेला नसल्याने ज्यांच्या घरातील माणूस गेलेय त्याच्याकडे भाकरीतुकडा आणून द्यायचा असतो, तोसुद्धा आम्हाला मिळाला नाही. सोयर आणि सुतक अशा प्रसंगीसुद्धा काही पीळ सुटत नाहीत.
मला कॉलेजात अनेक चांगले शिक्षक मिळाले. डाव्या-उजव्या विचारांचे. त्यातील बहुतेक ब्राह्मण होते. माझ्यावरचा सर्वाधिक आणि दीर्घकालीन प्रभाव मात्र प्रकाश परब सरांचा आहे. दोघांनी वयाच्या विविध टप्प्यांवर पाहिलेली गरिबी आणि दोघांचेही वडील गिरणीच्या संपात बेकार होते हा समान धागा. माझ्या आयुष्याला दिशा देण्यात परबसरांचा वाटा मोठा आहे.
कॉलेजातील माझे सर्वात जवळचे मित्रमैत्रिणी ब्राह्मण होते. -पण ते त्यांच्याशी मैत्री होण्याचे कारण नव्हते. नंतर नोकरी लागल्यावर वीणा सानेकर वगळली तर बाकीचे तिघे ब्राह्मण होते. या सगळ्या ठिकाणी मराठे किंवा मराठेतर जातीचे लोक नव्हते असे नाही, पण माझे मित्र निवडण्यासाठी मला माझ्या आडनावाची गरज पडली नाही. मी तसा बरा आहे, पण ब्राह्मणांच्या नादाला लागून बिघडलोय असे माझ्या एका स्वयंघोषित सबाल्टर्न सहकारी बार्इंना वाटायचे. मी प्रमाण मराठीत बोलतो म्हणजे मी ब्राह्मणी आहे असे आमच्या एका बहुजन समाजातील शिक्षकाला वाटायचे. पण मला इंग्रजीही चांगले येते. त्यामुळे मी शेक्स्पीयरी आहे असे कोणी म्हटल्याचे ऐकिवात नाही.
मी वर्गात शिकवायचो, तेव्हा मुले राखीव जागांवर चर्चा करायची. दोन्ही बाजूंनी भांडायची, पण दोन्ही बाजूंचे युक्तिवाद फार बदलताना दिसले नाहीत.
गावाकडे मराठ्यांची मुले सोने-चांदी गाळण्यासाठी देशभरात गेलेली दिसायची. शिक्षण थांबलेले, मुलींचे तर लौकरच, लग्नात बक्कळ खर्च, बक्कळ दारू, जत्रांचा पूर या सगळ्यांत माझ्यासमोरचा मराठा गुंतलेला होता, तेव्हा दलितांची मुले शिकत होती. मराठ्यांना ते कळायला वेळ लागला. त्यांची ती फसगत सामूहिक झालीय. आता ग्रामपंचायती, दूध डेअऱ्या, पतपेढ्या हातातून निसटल्यावर त्यांना आडनावांताल मोठेपण पुरणार नाही हे लक्षात आलेय. मी शाळेत असताना स्थावर, जंगम मालमत्ता दोनेक कोटीची असलेल्या माझ्या सख्ख्या चुलत्यांच्या घरातील कोणी बारावीपुढे गेले नाही. साधे, नात्यात लग्न करू नये, त्यामुळे अपत्य दुबळे निपजते हे न कळल्याने काही मुले हकनाक मेली!
१०X१४च्या घरात सहा माणसे राहणाऱ्या आमच्या घरात मात्र हे घडले नाही, कारण माझ्या आईला शिक्षणाचे महत्त्व कळले!
देशोधडीला लागलेली मराठ्यांची मुले, न नांदवल्याने माहेरी आलेल्या आणि मेल्याहून मेल्यासारख्या जगणाऱ्या मुली हे चित्र मी अनेक ठिकाणी पाहतो. या सगळ्याला ब्राह्मणी व्यवस्था किंवा आरक्षण जबाबदार नाही. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला त्याच्या मराठापणात काही अभिमानास्पद किंवा इतरांना दडपावे असे काही आहे असे वाटत नाही.
पण सगळीकडे लोक त्यांच्या त्यांच्या जातींच्या छत्र्यांखाली उभे आहेत. अगदी विद्यापीठांसारख्या तथाकथित समता केंद्री वगैरे ठिकाणी कोणी फुल्यांची, कोणी आंबेडकरांची तर कोणी शाहूंची तर कोणी संयुक्त छत्री उघडून बसलेय असे दिसते. कोणी परशुरामाचे दुकान टाकलेय.
जातिमुक्त समाजाचे मुखंड असणारे लोक त्यांच्या कळपात तुम्हाला स्वीकृत सदस्य करून घेतात. त्याला नकार देणारा सवर्ण असला तर आरेसेसवाला, ब्राह्मणी आणि दलित असला तर छुपा मार्क्सवादी असतो. माझ्या गावात ज्या फळ्या दिसतात त्याची उन्नत रूपे मला शहरात, विद्यापीठांमध्ये दिसतात.
आता जसे मराठे जथ्थ्याने आहेत, तसे मला नवबौद्ध, ब्राह्मणसुद्धा ठिकठिकाणी दिसतात. वर्गातील दलित मुलांना तुम्ही माझी मुले आहात, तुमच्यासाठी मला काही करायचेय असे इतरांसमोर, शिकवण्याला पर्याय म्हणून सांगणाऱ्या पुरोगामी प्राध्यापिका मला माहीत आहेत. असे वेगवेगळ्या जातीतील लोक करत असणारच.
माझ्यासारख्या स्वत:च्या जातीला एक अपघात इतके महत्त्व देणाऱ्याच्या मनातील प्रश्न असा, की तुम्ही लाख तुमची जात सोडाल,पण लोकांना ते पटवून घ्यायचेय का? का तुम्हाला ती न सोडता येणे इतरांच्याही फायद्याचे ठरणार आहे?
या गुंतवळीमुळे मला मराठ्यांच्या मोर्च्याबद्दल कोठल्याही बाजूने मुठी आवळून बोलता येत नाही.
– दीपक पवार
Must read article..
Must read article..
Must read article..
Must read article..
दिपकजी खूपच सुंदर लिहलाय आपण
दिपकजी खूपच सुंदर लिहलाय आपण लेख…
अत्यंत महत्वपूर्ण विवरण दिया
अत्यंत महत्वपूर्ण विवरण दिया है और इस प्रकार प्रदर्शित किया गया है कि किसी भी व्यक्ति को इस बात पर ध्यान देने की आवश्यकता है
चांगलाच विषय आणि तुमच मत
चांगलाच विषय आणि तुमच मत मांडायची शब्दरचना पण छान आहे, परंतु अद्वैतिक वेदांत मधे हे सर्व जाती आणि धर्म मोड़त नाहीत. म्हणजे जात किंवा धर्म हां एक सामाजिक ग्रूप किंवा समाज नव्हे तर एक व्यक्तिगत प्रवास आहे. परमेश्वरला त्या ग्रूप किंवा समाजाशी क़ाही देण घेण नाहीं तर व्यक्तिगत आत्मा जे काय घेउन ज़ाईल त्या शिदोरीत उसुकता असेल.
Very practical and true
Very practical and true analysis. But it is very difficult to convince mob when they assemble with some prejudice in their mind. Some body like you should try to convince and open the eyes.
पोटतिडिकेने लिहिलंय तुम्ही.
पोटतिडिकेने लिहिलंय तुम्ही. माझ्या मते अापली पिढी अशाच तडफडीत जाणार. अाज विशी पंचवीशीत असलेली मुलं हे असं सगळं वाचतील पहातील तेव्हा त्यांच्या मुलांशी काही वेगळं बोलतील असे वाटते.
उत्तम…लिखाण
उत्तम…लिखाण
Comments are closed.