मराठी भाषा आणि मराठी माणूस

2
257
_MarathiBhasha_MrathiManus_1.jpg

आजकाल साधी पण सुंदर मराठी भाषा कानावर पडत नाही; अथवा लिहिली जात नाही अशी खंत अरूण खोपकर यांनी एका टिपणाद्वारे व्यक्त केली. ती  रास्त आहे. शांता शेळके यांचे ‘वडीलधारी माणसे’ हे पुस्तक अलिकडेच वाचले. त्यावेळीदेखील तसेच विचार माझ्या मनात आले, की त्या पुस्तकात आहे तशी सहजसुंदर, प्रसन्न मराठी भाषा कोठे हरवली? माणसांच्या लिहिण्याबोलण्यातून मोठ्या प्रमाणात कानावर पडते ती इंग्रजाळलेली, कृत्रिम व धेडगुजरी मराठी. इंग्रजी शब्दांचा तिच्यातून इतका मारा होतो, की तिचे मराठीपण हरवून जाते. बोलण्या-लिहिण्यात एका वाक्यामध्ये पाचांपैकी तीन शब्द इंग्रजी वापरून ते फक्त मराठी विभक्ती प्रत्ययाने जोडणे हे मराठी नव्हे. शिवाय, विभक्ती-प्रत्यय कोठेही कोणताही जोडला जातो. त्यामागे असते मराठी भाषेचे अज्ञान आणि शब्दसंपत्तीचे दुर्भीक्ष्य. मराठीसारख्या अर्थसघन, समृद्ध भाषेला रोगट, अशक्त बनवण्यात वृत्तपत्रे व दूरदर्शन वाहिन्या यांनीही चोख भूमिका बजावलेली आहे. या माध्यमातून तरुणांना आकृष्ट करण्याच्या नावाखाली, ती बोलतात तसे इंग्रजाळलेले मराठी जाणीवपूर्वक वापरले जाऊ लागले, तेव्हा तशा बेगडी मराठीला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मग युवा पिढीवर रसाळ, सहजसुंदर मराठीचा संस्कार होणार कोठून?

मराठीचे सौष्ठव, लालित्य, अर्थवाहकत्व यांवर भयावह परिणाम करणाऱ्या आणि मराठीला विद्रूप करणाऱ्या या भाषिक परिवर्तनाला चालना का मिळाली? त्याला जबाबदार कोण? त्याचे खापर तरुण पिढीवर फोडता येणार नाही. त्या प्रश्नाची मुळे शैक्षणिक, वैचारिक, भाषिक, राजकीय, आर्थिक अशा वेगवेगळ्या परिसरात पसरलेली आहेत. तरुण वर्ग लहान असताना त्याच्या वतीने त्याच्या पालकांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला – तो म्हणजे मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत न घालता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा. एका इंग्रजी विषयाचा उत्तम अभ्यास करून घ्यायचा आणि मुलाला मराठी शाळेत घालायचे हा पर्याय उपलब्ध असतानाही, फार मोठ्या प्रमाणात मराठी शाळांकडे पाठ फिरवली गेली. जागतिकीकरणाच्या काळात इंग्रजीचे महत्त्व कोणीच नाकारणार नाही. परंतु इंग्रजी येण्यासाठी मराठी त्यागण्याची गरज नाही. मराठी माणसांनीच ज्ञानभाषा म्हणून मराठीला नाकारले. मराठी नाही आली तरी चालेल पण इंग्रजी यायला हवी, ही मानसिकता धोकादायक आहे. एक भाषा मृत झाली तर तिच्याबरोबर तिच्यातील साहित्य, विचारधन आणि त्यामागे उभी असलेली संस्कृती लयाला जाते, हे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. मुलाने परदेशी जायचे, किमानपक्षी लठ्ठ पगाराची नोकरी मिळवायची, जीवनमान उंचावायचे, तर मुलांना इंग्रजी माध्यमातच घालायला हवे हे समीकरण माणसांच्या डोक्यात घट्ट झालेले आहे. मुलगा मराठी माध्यमात शिकला तर त्याला इंग्रजी येणार नाही या गंडाने आईबापांनाच पछाडलेले असते. त्या भयापोटी मुलांचा मातृभाषेत शिक्षण घेण्याचा हक्क डावलला जातो. इंग्रजी माध्यमाचे हे वेड समाजाच्या सर्व थरांतून गेल्या कित्येक वर्षांपासून पसरत चालले आहे. मुलांच्या ज्या शाळकरी वयात मातृभाषेतील कथा, कविता, निबंध यांचे मनावर, वाणीवर, लेखनावर संस्कार सहजपणे होऊन मराठीची गोडी लागते, त्याच वयात मुले त्या आनंदाला पारखी होतात. इतकेच नव्हे तर आईवडील स्वत:च मुलांचे मराठी कसे बिघडवतात, हे समाजात वावरताना अनेकदा दृष्टीस पडते. मराठी आईवडील ‘या संडेला आपण सीशोअरवर जाऊया हं’ किंवा ‘तुला यल्लो कलर आवडतो का पिंक?’ असले मोठ्या दिमाखात बोलत असतात. त्यांना त्यांचे मूल इंग्रजी माध्यमात शिकत आहे, याचा सूक्ष्म अभिमान वाटत असतो. पालकांचा इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलाशी तसेच बोलायला हवे असा बालिश समज त्यामागे असतो. त्यांना ते मुलाचे आणि त्याच्या मातृभाषेचे नुकसान त्या वागण्यातून करत आहेत, याची जराही जाणीव नसते. मराठी भाषेतून हळूहळू ‘आई’ हा शब्दसुद्धा हद्दपार होऊ लागला आहे. छोटी मुले आजीला आई म्हणतात. कारण त्यांच्या आईचे रूपांतर ‘मम्मी’त झाले आहे. नातेवाचक शब्दांची समृद्धी मराठीत आहे. पण ते शब्ददेखील मागे पडत चालले आहेत; आँटी-अंकलची गोळाबेरीजच मराठी भाषेने स्वीकारली आहे.

एका गृहस्थांनी मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यामागील जे कारण सांगितले ते ऐकून तर मी थक्कच झाले! ते म्हणाले, “खाली अंगणात खेळताना मुले इंग्रजीत बोलतात. आमच्या मुलाला न्यूनगंड वाटतो. म्हणून शेवटी आम्ही त्याला मराठी माध्यमातून काढून इंग्रजी शाळेत घातले. न्यूनगंड मुलाला वाटतो का त्याच्या पालकांना? शिवाय, मुलाला तो तसा वाटत असेल तर त्याच्या मनात मातृभाषेविषयी स्वाभिमान जागवायचा का त्याचे माध्यम बदलायचे? ज्या मुलांना इंग्रजीत शिकणे अवघड जाते; विषयांचे नीट आकलन होत नाही त्यांनी काय करावे? तशा मुलांच्या वाट्याला शाळेनंतरच्या खाजगी शिकवण्या आणि आईवडिलांच्या दरडावण्याच येतात. त्यांचे बालपण, त्यांचे खेळ, स्वच्छंद जगणे हे सारे हरवून जाते. त्यांना शैक्षणिक घाण्याला जुंपले जाते. उगवती पिढी आणि मातृभाषा यांतील नात्याचे खच्चीकरण केले गेलेले आहे. विचारवंतांनी मुलांना मातृभाषेतच शिक्षण द्यावे म्हणून कितीही कंठशोष केला तरी समाज त्यावर गांभीर्याने विचार करण्यास तयार नाही हे कटू सत्य आहे.

मराठी माणसाला मराठी भाषा तर वगळाच, देवनागरी लिपीही कळेनाशी झाली आहे. परकी रोमन लिपी वाचता येते, पण देवनागरी नाही! मध्यंतरी एक प्राध्यापक मला म्हणाले, “अनेक मुलांना हल्ली जोडाक्षरे वाचता येत नाहीत. त्यांचे इंग्रजी स्पेलिंग केले, की मग त्यांना शब्दांचा उच्चार करता येतो.” मराठी शिक्षणाचा दर्जा किती खालावला आहे आणि इंग्रजी माध्यमात शिकल्याचा परिणाम मराठीवर काय होत आहे, हे यावरून स्पष्ट होते. पूर्वी आचार्य अत्रे, वि.स. खांडेकर, वि.द. घाटे यांसारख्या जाणकारांनी विचारपूर्वक तयार केलेल्या मराठी वाचनमालांचा अभ्यासक्रमात समावेश असे. त्यांद्वारा उत्तम मराठीचे संस्कार मुलांवर होत. अभ्याक्रमांची निर्मिती यावरही चिंतन करण्याची वेळ आली आहे.

मराठीबाबत सर्व प्रकारची अनास्था असतानाही, प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे वैचारिक सामर्थ्य काही मंडळींकडे आहे. ती मंडळी मराठी शाळा टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. मुख्य म्हणजे मराठी शाळांविषयीचे सरकारी पातळीवरील औदासीन्य. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जेवढा आटापिटा केला जातो, तेवढे लक्ष जर मराठी माध्यमाच्या शाळांच्या विकासावर दिले गेले तर मराठीचे काही तरी भले होईल. मराठी भाषेत जर अभिजात सुंदर साहित्याची निर्मिती झाली; मराठी ज्ञानभाषा बनली; मराठी माणूस जर सर्व स्तरांवर मराठीचा वापर करू लागला तर मराठीला खऱ्या अर्थी अभिजात रूप प्राप्त होईल. त्यासाठी कोणत्याही सरकारी समित्यांची वा विद्वानांच्या शिफारशींची गरज उरणार नाही. केवळ मराठी दिनाचे सण-सोहळे साजरे करून, गहिवरलेली भाषणे करून, मराठी बाण्याचे पोकळ नारे देऊन काहीही साध्य होणार नाही. मराठी माणूस आणि मुख्यत: तरुण पिढी मराठी भाषेकडे, साहित्याकडे, मराठी संस्कृतीकडे कशी आकृष्ट होईल, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भाषावार प्रांतरचना झाली. प्रत्येक प्रांतांच्या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. भारत सरकारने भाषिक त्रिसूत्रीचे धोरण आखले, ते योग्यच होते. भारतीयांच्या भाषिक वैविध्याचे जतन-संवर्धन करण्यासाठी त्रिसूत्रीमध्ये पहिले स्थान राजभाषेला देण्यात आले. दुसरे संवादभाषेला म्हणजे हिंदीला आणि तिसरे स्थान इंग्रजीला. तो क्रम उलटा झाला आहे. मराठी महाराष्ट्राची राजभाषा झाली त्याला आज सहा दशके लोटली तरीदेखील मराठी भाषा राजकीय पातळीवर उपेक्षित राहिली आहे. महाराष्ट्रात राहणारा तो मराठी असेल, तर अमराठी माणसांना मराठी यायलाच हवे. त्यासाठी सर्व शाळांतून मराठी हा विषय अनिवार्य करायलाच हवा. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता तसे धोरण अंमलात यायला हवे. दाक्षिणात्य राज्ये तेथील नागरिकांनी राजभाषा शिकण्याविषयी जशी कडवी भूमिका घेतात, तशी घेणे महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या सरकारला कधीही जमलेले नाही. तो राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. सरकारपाशी कायद्याचे बळ असते. भाषेला कायद्याचाही आधार गरजेचा असतो. मात्र सरकारने कायदे करून ते अमलातच आणले नाहीत तर ते कितीही उत्तम असले तरी निष्प्रभच ठरणार. सर्वसामान्य माणूस मराठीबाबत जितका उदासीन आहे, तितकेच उदासीन राजकारणीही आहेत. मग तो विषय न्यायालयीन कामकाजातील मराठीच्या वापराचा असो, विद्यापीठातील अभ्यासक्रमांचा असो, राज्यपालांचे भाषण मराठीत उपलब्ध करून देण्याचा असो अथवा शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य करण्याचा असो. ‘मराठी भाषा ही मंत्रालयाच्या दारात लक्तरे नेसून उभी आहे.’ असे दु:खोद्गार कुसुमाग्रजांना काढावे लागले ते उगीच नाही.

मराठीचे अस्तित्व महाराष्ट्राच्या राजधानीतही जाणवत नाही. तिचे दृकश्राव्य रूप इंग्रजी-हिंदीच्या माऱ्यात दबून गेलेले असते. गाड्यांतील उद्घोषणा, टेलिफोनवरील संदेश, विकासकामांचे फलक… सर्वत्र हिंदी-इंग्रजीला प्राधान्य! मराठी भाषेला डावलून गुरुमुखी, हिंदी वा गुजरातीत चौकांची नावे लिहिली जातात आणि आमचे राज्यकर्ते त्यावर काहीही उपाययोजना करत नाहीत. सर्वसामान्य माणूसही मातृभाषेची पावलोपावली उपेक्षाच करत असतो. माणसांची ओळखपत्रे (व्हिजटिंग कार्डस्) इंग्रजीत आणि फक्त इंग्रजीत! त्याची एक बाजू कोरी ठेवतील पण त्यावर मराठीत मजकूर असावा असे वाटत नाही. मुंबई-पुण्यात व महाराष्ट्राच्या बऱ्याच प्रदेशांत घरातून बाहेर पडल्या क्षणापासून मराठी माणसाचे हिंदी-इंग्रजी बोलणे सुरू होते. अमराठी माणसांच्या कानावर मराठी पडणार नाही याची काळजी घेतली जाते. मराठी आले नाही म्हणून येथे कोणाचे अडत नाही, हे अमराठी माणसांनी ओळखले आहे. महाराष्ट्राच्या राजभाषेचा आदर राखला गेलाच पाहजे हा संदेश ना सरकारी पातळीवरून पोचतो; ना नागरिकांच्या वर्तनातून. मराठी माणूसच मराठीचा आग्रह धरत नाही. त्याची घरे, निवासी संकुले, दुकाने यांवरील पाट्या इंग्रजीत. मराठी नाव दिसेल न दिसेलसे. दुकानदार रात्री त्यावर उजेड पडणार नाही याची दक्षता घेतातच. ती गोष्ट केवळ अमराठी दुकानदार करतात असे नव्हे; मराठी दुकानदारांचीही तीच तऱ्हा आहे. उपहारगृहातील पदार्थांची नावे इंग्रजीत. व्यायामशाळेतील गाणी इंग्रजीत. मराठी माणसेच मराठीची मारेकरी आहेत. विविध उत्पादनांवरील नावे सर्रास इंग्रजीत असतात. ज्यांना इंग्रजी येत नाही, त्यांनी काय करायचे? चित्रांवरून उत्पादने ओळखायची? याबाबत कायदे आहेत; मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही. मराठी माणसाला त्याने मराठीचा आग्रह धरला तर तो कोत्या मनोवृत्तीचा ठरेल हा आणखी एक गंड आहे. मराठी ही स्वत:ची मातृभाषा इतक्या विविध स्तरांवरून नाकारणारा आणि तरीही मराठी अस्मिता, मराठी बाणा यांच्या फुशारक्या मारणारा दुसरा कोणताही समूह नसेल! मराठी माणसाचे मातृभाषेविषयीचे औदासीन्य हेच भाषिक समस्यांच्या मुळाशी आहे. मराठी माणसामुळेच मराठी भाषेची पीछेहाट होत असताना, रसाळ साधी सुंदर मराठी कानावर पडत नाही यात नवल नाही. भाषा वृद्धिंगत होते तिचा वापर ती विविध जीवनपरिसरात झाला; तिला व्यवहारात व दैनंदिन जीवनात स्थान असेल; माणसामाणसांतील दळणवळण त्या भाषेत होत असेल तर. भाषेचे सामर्थ्य तिच्या वापरातून जाणीवपूर्वक वाढवावे लागते. वैचारिक आळस न करता प्रतिशब्द घडवावे लागतात. लोकमान्य टिळक, राजारामशास्त्री भागवत, वि.दा. सावरकर, दुर्गा भागवत, वा.ल. कुळकर्णी यांसारख्या विचारवंतांनी वेळोवेळी ते कार्य केले. ते आज मागे पडले आहे.

गंगाधर गाडगीळ एकदा म्हणाले होते, “एका विशिष्ट दिशेने वाहणारा सांस्कृतिक प्रवाह अचानक मार्ग बदलून विरूद्ध दिशेने वाहू लागतो. तो चमत्कार कधी कधी घडतो.” तसेच काही झाले व तरुण पिढीच्या मनातच जर भाषाप्रीतीचा उदय झाला, तर मराठीला चांगले दिवस येऊ शकतील. मला शाळकरी दिवसांतील प्रसंग आठवतो. मी दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत होते. त्या काळी त्या संस्थेच्या शाळा किंग जॉर्ज शाळा या नावाने ओळखल्या जात. मी सहावीत होते. मैदानाच्या एका टोकाला नवीन शाळेचे बांधकाम चालू होते. इंग्रजी माध्यमाची शाळा तेथे पुढील वर्षापासून सुरू होणार होती. वर्ष संपता संपता आमच्या सामंतबार्इंनी आम्हाला एक प्रश्न विचारला, “पुढील वर्षी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कोणाकोणाला जाण्याची इच्छा आहे?” जवळजवळ सर्व मुलींनी उत्साहाने हात वर केले. त्यानंतर दहा मिनीटे बाई मराठी व इंग्रजी माध्यमातून शिक्षण याविषयावर तळमळीने बोलत होत्या. आम्ही स्तब्धपणे ऐकत होतो. त्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे मोल आमच्यावर प्रभावीपणे बिंबवले. नंतर त्यांनी परत तोच प्रश्न विचारला. त्या वेळी फक्त दोन मुलींनी हात वर केला. घरी आईबाबांनीही मराठीच्याच बाजूने कौल दिला. अशा अनेक सामंतबार्इंची आणि मराठी माध्यमाचा आग्रह धरणाऱ्या आईवडिलांची नितांत आवश्यकता आहे!

– अंजली कीर्तने

About Post Author

Previous articleवर्किंग लंच
Next articleगावगाथा (Gavgatha)
अंजली कीर्तने यांनी बी. ए.ला मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांक पटकवला आहे. त्यांनी 'मोलिएरचा मराठी नाटकावरील प्रभाव' याविषयावर पि.एच.डीसाठी प्रबंध लिहिला आहे. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, नवशक्ती, तरुण भारत, सकाळ या वृत्तपत्रातून अनेक सदरलेखन केले आहे. त्यांची प्रवासी पावलं, नोंदवही कवितेची, लिबर्टी बेल, संगिताचं सुवर्णयुग अशी अनेक सदरलेखने प्रसिद्ध आहेत. त्यांचे डॉ. आनंदीबाई जोशी(चरित्र), पाऊलखुणा लघुपटाच्या यांसारखे चरित्र, अनुभवकथा, लघुकथा, प्रवासवर्णनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. लेखकाचा दूरध्वनी - 99675 16913

2 COMMENTS

  1. आवडली तुमची पोस्ट.
    आवडली तुमची पोस्ट.

Comments are closed.