Home मंथन मराठी प्रमाण भाषा व बोली यांची परस्पर परावलंबिता (Spoken languages make language...

मराठी प्रमाण भाषा व बोली यांची परस्पर परावलंबिता (Spoken languages make language perfect)

9

प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांतील फरक काय? सर्वसामान्यपणे असे बोलले जाते की प्रमाण भाषा ती असते जी लिहिली आणि बोललीदेखील जाते. बोलीभाषा ही फक्त बोलली जाते. प्रमाण भाषा ही बोलीभाषेचे एकत्रितपणे सजवलेले रूप आहे. चार माणसे जेव्हा एकत्र येऊन भाषा कशी असावी ह्याचे मानक बनवतात त्याला प्रमाण भाषा म्हणून संबोधले जाते. मराठी प्रमाण भाषेलाही तोच नियम लागू होतो व त्यास समाजमान्यता मिळते तेव्हा जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणे, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. दर बारा कोसांवर उच्चार, शब्दसंग्रह आणि वाक्प्रचार हे बदलत असतात ही अशी आपल्याकडे म्हणच आहे.

सद्य काळात मराठी प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांमध्ये वाद निर्माण करण्यात आला आहे. प्रमाण भाषा ही शुद्ध आणि बोलीभाषा ह्या अशुद्ध अशी मतप्रणाली लादण्याची प्रवृत्ती त्या वादामागे असते. परंतु, मी बोलतो ते शुद्ध आणि तू बोलतोस ते अशुद्ध असे प्रतिपादन करण्याचा हक्क कोणी कोणास दिलेला आहे? मराठीचा उगम पूर्वीची प्राकृत आणि नंतरची महाराष्ट्री यांतून झालेला आहे. ध्या मराठी समाजात जिला प्रमाण भाषा म्हणून संबोधतो ती कोठली भाषा आहे? आश्चर्य असे आहे, की ह्या प्रमाण भाषेचे जनक इंग्रज पंडित थॉमस कॅण्डी हे होते. ते पुणे संस्कृत महाविद्यालयाचे मुख्याध्यापक होते. त्यांनी इंग्रजी कायदेकानूव नियम मराठीमध्ये भाषांतरित करत असताना त्यात काही त्रुटी राहू नयेम्हणून 1931 साली जेम्स मोल्सवर्थ यांच्या सहकार्याने इंग्रजीमराठी शब्दकोश तयार केला; मराठी वाक्यरचनेतील शैथिल्य आणि अनियमितता काढून टाकून भाषेला बंदिस्तपणा आणला. थोडक्यात म्हणजे, अधिकृत कामकाज निभावण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम असलेली एक भाषा निर्माण केली. तीच मराठी समाजात प्रमाण भाषा म्हणून रूढ झाली.

कॅण्डी ह्यांनी शब्दकोश लिहिताना पुण्याच्या सदाशिव पेठेतील भाषेचा प्रमाण म्हणून अवलंब केला. ते लोक कधी बोलीभाषा बोलले नव्हते. म्हणजे ज्यांचा गावांशी काही संबंध नव्हता किंवा ज्यांचा महाराष्ट्र पुणेमुंबईच्या पलीकडे जात नव्हता, त्यांनी त्यांची ती पुणेरी भाषाच प्रमाण मराठी म्हणून घोषित केली. त्यावरून प्रमाण भाषा म्हणजे नागर लोकांची आणि बोलीभाषा म्हणजे कनिष्ट किंवा गावाकडील आम लोकांची अशी भाषाविषयक समजुतीत दुही निर्माण झाली. पुढे, जेव्हा जातीपातींचे प्राबल्य वाढले तेव्हा प्रमाणभाषेचा आग्रह हा उच्चवर्णीयांचा कावा असून, चातुर्वर्ण्य जपणाऱ्या मनुवादी संस्कृतीचा तो आविष्कार आहे अशीही मतमांडणी करण्यात आली.

मराठी प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्या परस्पर चाहत्यांमधील ही ओढाताण निष्फळ आहे. कारण प्रमाणभाषेच्या घडवणुकीत बोलीभाषांनी समृद्धी आणलेली आहेमराठी ही सर्वसामान्य लोकांची भाषा आहे. तिचे रे रूप मऱ्हाटी असे आहे. सातवाहन, राष्ट्रकू, यादव, वाकाटाक, त्यानंतर मु, छत्रपतींची राजवट, पेशवा व इंग्रजी राजवटीचा काळ या सर्वांतून तिचा प्रवाह चालत राहिलेला आहे. तिचा संकर अनेकानेक भाषांसोबत झालेला आहे. बोलीभाषा बोलणाऱ्यांना त्यांच्या भाषेबद्दल आपुलकी असते. ती भाषा त्यांच्या बालपणच्या मित्रांबरोबर खेळण्याची, बागडण्याची, घरातील माणसांशी संवादाची असते. कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी, मालवणी, झाडीबोली, आगरी, ऱ्हाडी, वसईची वाडवळी, नगरची नगरी अशा अनेक बोलीभाषा लहानपणापासून जे बोलतात त्यांना कोणी आमची पुणेरी ती खरी आणि तुमची ती बावळट असे बोललेले खुपणार नाही का? म्हणून बोलीभाषेमुळे प्रमाणभाषा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. भाषा आधी बोलली गेली आणि मग तिचे नियम वगैरे लिहिले गेले. भाषा बोलणाऱ्या व्यक्तींनी ज्या पद्धतीने भाषा बोलली जाते त्या पद्धतीने भाषेचे नियम वगैरे लिहिले. पुण्याच्या सदाशिव पेठेची भाषा हीदेखील कोकणातील बोलीभाषेमधून विकसित होत गेलेली आहे. तिला सुधारित, नियमबद्ध स्वरूपात प्रमाण भाषेचे शासकीय अधिष्ठान मिळाले, एवढेच!

मराठी भाषेएवढाच मराठी साहित्याचा इतिहास मोठा आहे. तो इतिहास घडवण्यात महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या संतांचा, शाहिरांचा, बखरकारांचा, विचारवंतांचा, कवीनाटककारनिबंधकारप्रवासवर्णनकारभाषाशास्त्रज्ञ या सर्वांचा वाटा सिंहाचा आहे. वास्तविक, मौखिक साहित्य परंपरा आणि बोलीभाषा यांचे नाते जवळचे आहे. त्यामध्ये ग्रांथिक आणि मौखिक असे दोन साहित्यप्रवाह आहेत. त्यांपैकी ग्रांथिक प्रवाहाला साहित्यिकांनी महत्त्व दिले; पण मौखिक साहित्य परंपरा उपेक्षित राहिली. मात्र ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीसारख्या अलौकिक ग्रांथिक प्रबंध रचनेत प्रमाणभाषेबरोबर छप्पन बोलीभाषांना स्थान दिले. त्या सर्व बोलीभाषा मराठीच्या होत्या. बोलीभाषांचा पाया पक्का करायचा असेल तर ज्ञानदेवांचे विचार आणि वाङ्महे आदर्श ठरतात. आपण बोलीभाषा अधिक पक्क्या केल्या, तर तो मराठी भाषेचा भक्कमपणाचा पाया होऊ शकेल. बोलीभाषेचे संवर्धन करणे हा प्रमाण मराठी भाषेच्या संवर्धनाचा पाया होऊ शकतो

प्रमाण भाषा का असावी तर, शेवटी भाषा हे विचार व भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. त्याला व्याकरणाच्या चौकटीत बंदिस्त केले तर काहीतरी घुसमट होणारच, पण त्याचबरोबर व्याकरणाची शिस्त नसेल तर भाषा भरकटत जाण्याची भीतीही असते. वैचारिक लेखन, कायदेशीर कागदत्रे बनवण्यासाठी एका प्रमाण भाषेची, लिपीची आणि शुद्धलेखनाच्या नियमांची जरुरी असते. रंतु ललित लेखन मात्र बोलीभाषेतून केल्यास त्याला अधिक गोडी येऊ शकते. कारण त्यामध्ये स्थानीय अलंकार आणि तेथे रुजलेली संस्कृती यांचे प्रतिबिंब आढळते. असे स्थानिक अलंकार जेव्हा प्रमाण भाषेत निर्माण झालेल्या साहित्यात अंतर्भूत होतात तेव्हा प्रमाण भाषेच्याही सांस्कृतिक समृद्धीस वृद्धी आणि व्याप्ती मिळते. मराठी ही तिच्या बोलीभाषांमुळे अधिकाधिक समृद्ध झाली आहे. तिने इतर भाषांनाही सामावून घेतले आहे. गुजराती, प्राकृत, संस्कृत, फ्रेंच, पोर्तुगीज, पर्शियन, अरेबिक या सर्व भाषांमधील शब्द मराठीत आले आहेत. भाषा अभ्यासक ना.गो. कालेलकर म्हणतात,जेव्हा आपण प्रमाणभाषा हा प्रयोग करतो, तेव्हा प्रत्यक्ष जीवनात, व्यापक सामाजिक व्यवहारात अनेक परस्परसदृश्य भाषिक परंपरा रुढ आहेत हेच आपण मान्य करतो. प्रमाणभाषा हे सोयीसाठी मानलेले, लेखनाशी आणि त्या मार्फत शिक्षण, राज्यकारभार, वर्तमानपत्रे ह्यांसारख्या माध्यमांशी संबंधित असलेले एक भाषिक रूप आहे. सर्व प्रचलित भाषिक रूपांशी संबंधित असलेले, पण त्यांतील कोणाशीही पूर्णपणे एकरुप नसलेले, व्यक्तीने केलेल्या प्रयोगांपेक्षा व्याकरणात्मक संहितेतील नियमांनी ज्यांतील प्रयोगांची शुद्धाशुद्धता ठरवता येते, असे ते एक आदेशात्मक भाषिक रुप आहे. ती एक सोय आहे. तिची एक वेगळीच सवय करून घ्यावी लागते.

त्याचप्रमाणे आजच्या काळात बोलीभाषा अस्तंगत होतील की काय अशी चिंता बळावत आहे. परंतु बोलीभाषा टिकवल्या पाहिजेत असे प्रतिपादन आज होत आहे ते प्रमाण भाषेत. म्हणजेच मराठी प्रमाण भाषा आणि बोलीभाषा ह्या एकमेकांच्या विकासासाठी पूरक आहेत, एकमेकांवर परावलंबित आहेत असे म्हणावे लागेल. 

दीपक मच्याडो 9967238611 deepak.machado@yahoo.com

दीपक मच्याडो हे ‘नाबार्ड’मधून निवृत्त झाले. त्यांचे ललितलेखन, प्रवासवर्णन, कथा, समाज प्रबोधनपर आणि विनोदी असे लेखन प्रसिद्ध आहे. ते ज्युलिअस-दीपक मच्याडो ह्या नावानेदेखील लेखन करतात. त्यांचा ग्रामीण विकास, बँकिंग आणि आर्थिक समावेशन या विषयांचा अभ्यास आहे. ते मराठी बोलीभाषांचे अभ्यासक आहेत.

——————————————————————————————————————————————————

About Post Author

9 COMMENTS

  1. छान माहितीपूर्ण लेख. इंग्रजी शब्द त्याचे ऊच्चार आणी देवनागरी लिपीतील मराठी बोली भाषेतील लेखन आत्तापेक्षा निराळे आहे December ला दिजेंबर लिहीले आहे ठाण्याच्या जुन्या देवळांमधे

  2. जुन्या देवळांमधल्या टाईल्स ज्यावर माहे दिजेंबर असे लिहीले आहे.डिसेंबर चा ऊच्चार दिजेंबर आढळतो असा सव्वादोनशे वर्षापूर्वीचा

  3. बोलीभाषा जतन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक झाले आहे.परंतू वाढत्या शहरीकरणामुळे बोलीभाषेतील अनेक शब्द लुप्त होऊ लागले आहेत. ही चिंताजनक बाब आहे.

  4. बोलीभाषेतील शब्द लुप्त होण्यासाठी वाढत्या शहरीकरणाबरोबर इतरही अनेक कारणे आहेतच.

  5. बोलीभाषा व प्रमाणभाषा यांच्या संबंध खूप सोप्या शब्दात पटवून दिलाय !👌🙏© प्रा.पुरुषोत्तम पटेल

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version