मराठी – अभिजात भाषा !

5
898

भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्यावर तिचा विकास-संवर्धन-अभिवृद्धी यासाठी राज्य सरकारला दरवर्षी तीनशे ते पाचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळते. महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी अभिजाततेचा दावा केंद्र सरकारकडे (2012-2013) करून, अटी सिद्ध करण्याचे काम केले. ते काम साहित्यिक-संशोधकांच्या एका अभ्यास समितीने पूर्ण केले.

मराठी भाषा बोलणार्‍यांची संख्या जगात नऊ कोटी इतकी असून ती जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा समजली जाते. भारतात सहा भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळालेला होता- तमीळ (2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलगू (2008), मल्याळम (2013) व उडीया (2014). मराठी भाषेने 2013 साली केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर अकरा वर्षांनी मराठीला तो दर्जा प्राप्त झाला आहे. मराठीसोबत अजून चार भाषांना तो दर्जा त्याच दिवशी मिळाला. मग मराठी ही देशातील सातवी अभिजात भाषा की अकरावी? भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या बावीस भाषांपैकी अकरा म्हणजे अर्ध्या भाषा आता अभिजात ठरल्या आहेत !

केंद्रीय संस्कृती मंत्रालयाकडून भाषा अभिजात ठरवण्यासाठी प्रमुख चार निकष निश्चित करण्यात आले आहेत: अ. भाषेची प्राचीनता दीड ते दोन हजार वर्षे जुनी असावी, ब. भाषेची मौलिकता आणि सलगता दिसून यावी, क. भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूषण- म्हणजेच भाषेत अभिजात ग्रंथ असावेत, ड. प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रुप यांची सांगड दिसण्यास हवी. म्हणजे प्राचीन भाषेचे संदर्भ आणि आजची भाषा एकच आहे असे सिद्ध करण्यासाठी त्यात संबंध ओढूनताणून आणलेला नसावा.

मराठी भाषेला मौलिकता, अखंडता आणि सलगता परंपरेने होतीच. तिच्यात कोठलाही कालिक खंड आढळत नाही. मराठी भाषेत ‘लीळाचरित्र’ आणि ‘ज्ञानेश्वरी’ यांसारखे अभिजात ग्रंथही आहेत. मराठीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. त्यांतील कमाल पाच हजार ग्रंथ जागतिक स्तरावर गुणवत्तेने श्रेष्ठ ठरवण्याच्या दर्जाचे आहेत. अभिजात म्हणजे श्रेष्ठ. मराठी भाषेचे आधुनिक रुप हे तिच्या अर्वाचीन रुपापेक्षा वेगळे असले तरी त्यांच्यातील आंतरिक नाते स्पष्टपणे अधोरेखित होते. प्राचीन मराठी भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांची सांगड तिच्या व्याकरणासह सहज घालता येते. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरकालीन (तेरावे शतक) मराठी भाषा आणि आताची मराठी भाषा, शिवकालीन (सतरावे शतक) भाषा आणि एकविसाव्या शतकातील भाषा ही एकच आहे. अठराव्या शतकातील मराठी भाषा आणि आताची मराठी भाषा यांत थोडाफार भाषिक फरक असला तरी ती भाषा एकच आहे आणि फक्त भाषाशास्त्राच्या नियमानुसार कालप्रवाहामुळे तिचे हे बदल आहेत हे सहज स्पष्ट होत होते. मुख्य अडचण होती ती मराठी भाषा ही दीड ते दोन हजार वर्षे जुनी आहे हे सिद्ध करण्याची.

मराठी भाषेचा उगम संस्कृत भाषेपासून झाला नसून ती पूर्ववैदिक बोलींमधून तयार झाली असे संशोधन अठराव्या शतकात राजारामशास्त्री भागवत यांनी करून ठेवले आहे. संस्कृत भाषा तयार होण्याआधी वैदिक भाषा अस्तित्वात होती. त्या सूत्राने मराठी भाषेचे वय दोन हजार वर्षांपेक्षा जास्त ठरते. दुसऱ्या शतकातील ‘वररुचीचे व्याकरण’ या ग्रंथात मराठी व्याकरणाचे नियम सांगितले आहेत. त्याचा अर्थ दुसऱ्या शतकात मराठी भाषा अस्तित्वात होती. अडीच हजार वर्षांपूर्वीच्या ‘विनयपिटक’ या, पाली भाषेतील धर्मग्रंथात ‘महारठ्ठ’ असा उल्लेख आढळतो, हे भाषेच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. श्रीलंकेतील सिंहली भाषेतील ‘दीपवंश’ ग्रंथात ‘महारठ्ठ’, ‘महाराष्ट्र’ असे शब्द आढळतात, त्या अर्थी हा प्रदेश आणि ही भाषा त्या काळी अस्तित्वात असणारच. यावरून मराठी भाषेची प्राचीनता किमान दीड-दोन हजार वर्षे जुनी असावी.

मराठीचा भाषिक प्रवास प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी, महाराष्ट्री, प्राकृत, अपभ्रंश मराठी, आजची मराठी असा झाला आहे. या भाषा वेगवेगळ्या नसून ती रुपे मराठी या एकाच भाषेची आहेत, असे ल. रा. पांगारकर यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ हे मराठीतील आद्य ग्रंथ नव्हेत, तर ते मराठी प्रगल्भ व श्रीमंत झाल्यानंतरचे श्रेष्ठ ग्रंथ आहेत. ते ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या मराठी भाषेत लिहिले गेले ती त्याच्या आधी किमान चौदाशे वर्षे समृद्ध भाषा होती याचे शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रंथ असे पुरावे उपलब्ध झाले आहेत. मराठीत उपलब्ध असलेला आणि दोन हजार वर्षे जुना असलेला ग्रंथ म्हणजे ‘गाथासप्तशती’ अथवा ‘गाथा सत्तसई’ हा आहे. तो ग्रंथ दुसऱ्या शतकातील सतरावा सातवाहन राजा व कवी ‘हाल’ याने लिहिला आहे. पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेकडे सुमारे तीस हजार प्राचीन पोथ्या उपलब्ध आहेत. त्यांतील ऐशी ग्रंथ दीड ते दोन हजार वर्षे इतके जुने आहेत. त्यांत प्रामुख्याने कालिदासाचे शाकुंतल (चौथे शतक), शुद्रकाचे मृच्छकटिक (सहावे शतक), प्रवरसेनाचे सेतुबंध (पाचवे शतक), भद्रबाहूचे नियुक्ती (तिसरे शतक) आदींचा समावेश आहे. शेकडो मराठी शब्द रामायण-महाभारतातही सापडतात. गुणाढ्य या मराठी लेखकाने दोन हजार वर्षांपूर्वी ‘बृहत्कथा’ हा पैशाची भाषेतील ग्रंथ लिहिला आहे. विनयपिटक, दीपवंश, महावंश या बौद्ध ग्रंथांमध्ये पाली व सिंहली भाषांत महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख दोन हजार दोनशेवीस वर्षांपूर्वीचा म्हणजे इसवी सन सुरू होण्याच्या आधीचा आहे. तो ब्राम्ही लिपीतील आहे. तो शिलालेख पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटात सापडला. तसेच मराठीतील ‘लीळाचरित्र’ व ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथांना युनोने अभिजात ग्रंथांचा दर्जा दिलेला आहे. मराठी भाषेच्या भौगोलिक क्षेत्रात पासष्ट प्रकारच्या विविध बोली आहेत. साहित्यात त्या बोलींच्या उपयोजनेमुळे ‘प्रमाण मराठी’ दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे. मराठीतील एक घटकबोली अहिराणी ही माझी बोली. ती इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून बोलली जात असल्याचे पुरावे मिळतात. प्रमाणभाषा मराठीही तितकीच जुनी असल्याचे असे उपोद्‍बलक पुरावे आहेत. म्हणून मराठीबरोबर मराठीतील सर्व घटक बोलीही-बोलीभाषाही अभिजात ठरतात असे आम्हा बोलीभाषा अभ्यासकांना वाटते. बोलींच्या खांद्यावरच प्रमाणभाषा उभी असते!

श्री. व्यं. केतकर, राजारामशास्त्री भागवत, रघुनाथ गोडबोले, रामकृष्ण भांडारकर, रावसाहेब मंडलिक, वेबर (‘ए ग्रामर ऑफ द मराठी लँग्वेज’), वि. भि. कोलते, वि. का. राजवाडे, इरावती कर्वे, कृ. पां. कुलकर्णीदत्तो वामन पोतदार, वि. ल. भावे, रा. भि. जोशी, ल. रा. पांगारकर, द. ग. गोडसे या संशोधकांच्या संशोधनानुसार मराठी भाषेची संगती लावणे सोपे होते. तशी संगती लावण्याचे किचकट काम 2012 ला रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केले. तीत श्रीकांत बहुलकर, मैत्रेयी देशपांडे, कल्याण काळे असे विद्वान सभासद होते. समितीने जुन्या पोथ्यांमधून मराठीतील तब्बल सात लाख शब्द शोधून काढले. समितीतील हरी नरके, आनंद उबळे, सतीश काळसेकर आदींसह भालचंद्र नेमाडे यांनीही या कामास सहाय्य केले.

मराठी भाषा इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकाच्या सुमारास बोली स्वरूपात अस्तित्वात आली असावी. या समितीने एकशेसत्तावीस पानांचा मराठीत तर चारशे पानांचा इंग्रजीत अभ्यासपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला अकरा वर्षांपूर्वी (2013) सादर केला होता. युनोने संस्कृत भाषेला अभिजात ठरवले आहे, मग ती भारतात अभिजात का नाही? असा प्रश्न उपस्थित होऊन घाईघाईने संस्कृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा त्यावेळी (2005) देण्यात आला होता.

ज्या भाषेला केंद्राकडून अभिजात दर्जा दिला गेला अशा उडीया (2014) भाषेसंदर्भात एक घटना घडली. ‘उडीया ही भाषा अभिजात ठरू शकत नाही, म्हणून तिला दिलेला अभिजात दर्जा मागे घेण्यात यावा’ अशी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्याची बातमी, तीन वर्षांपूर्वी वृत्तपत्रात आली होती. उडीया भाषेच्या अभिजात दर्जाला- शासकीय निर्णयाला आव्हान देणारी याचिका एका नागरिकाने दाखल केली होती. ती याचिका मद्रास उच्च न्यायालयाने रद्द ठरवून ऑगस्ट 2017 मध्ये तो खटला फेटाळून लावला होता.

अभिजात भाषा भारताच्या पुरातन वारशाचे जतन करण्याचे काम करतात. अभिजात भाषेची पहिली मागणी तमिळ भाषेने केली. ती मान्य झाली. मग दक्षिणेकडील सगळ्याच भाषांची तशी मागणी वाढली. भाषेला अभिजात दर्जा मिळवणे हा राजकीय भाग होऊन गेला.

भाषा केवळ अभिजात ठरवल्याने अमर होत नाही, मराठी भाषेला सगळ्यांना मिळून जगवावे लागणार आहे. केवळ प्राथमिक शाळांत नाही तर पदवीपर्यंत मराठीची सक्ती असली तरच मराठी जगणार आहे. म्हणजे शिक्षणाचे माध्यम मराठी हवे. इंग्रजी भाषा उच्च शिक्षणासाठी शिकण्यास परवानगी, ठीक आहे, परंतु आपली विचार करण्याची भाषा मराठीच असायला हवी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा नसल्या तरच हे साध्य होणार आहे. अर्थात मराठी भाषेतून शिकूनही नोकर्‍या, व्यवसाय उपलब्ध होऊ लागले तरच ते शक्य आहे. त्यासाठी मराठी ही बोली, व्यवहारभाषेसह वाणिज्य, शास्त्र, तंत्रज्ञान, विज्ञान अशी सर्वांगीण ज्ञानभाषा होण्यास हवी. महाराष्ट्रात आपापसात संवादाची भाषा ही मराठीच असली पाहिजे, ती बहुतांश हिंदी होऊन गेली आहे. स्वत: मराठी माणूस परप्रांतीयांसोबत हिंदी बोलण्यास सुरुवात करतो. मराठी माणूस कोणत्याही हॉटेलात, चहाच्या टपरीवर, बाजारात अनोळखी माणसांशी हिंदी बोलू लागतो. त्यामुळे समोरच्या परभाषिक माणसांना संवादासाठी या राज्यात मराठी शिकून घ्यावी असे वाटत नाही. दरम्यान, महाराष्ट्रात हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून सक्तीची करण्यात आली. एकीकडे मराठी भाषा अभिजात होते तर दुसरीकडे राज्यात हे भाषिक- शैक्षणिक धोरण मराठीच्या मुसक्या आवळीत आहे. खेड्यापाड्यातही दुकानांच्या पाट्या अन्य भाषांत लावल्या जातात. केवळ सत्ताकारणासाठी राजकारण करणार्‍या राज्यकर्त्यांकडून याची अंमलबजावणी शक्य नसल्याने सामाजिकतेसाठी संस्थाकारण करणार्‍या नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे!

चौदा हजारांच्या आसपास मराठी शाळा मागील दहा वर्षांत बंद पडल्या आहेत. पैकी काही विकण्यासही सुरुवात झाली आहे. ज्या मराठी शाळा अस्तित्वात आहेत तेथे जिल्हा परिषदांकडून कंत्राटी पद्धतीने (1 सप्टेंबर 2024 पासून) शिक्षकभरती होत आहे. माझ्या बागलाण तालुक्यात तीनशे शिक्षकांची भरती अशा करारानुसार मासिक वेतन केवळ सहा ते दहा हजार रुपयांत झाली आहे. कंत्राटीचा हा निर्णय महाराष्ट्र सरकारचा आहे व फार बाधक आहे.

महाराष्ट्राच्या राजधानीत- मुंबईत तर मराठीची भीषण अवस्था आहे. ‘मराठी माणसाला प्रवेश नाही’ अथवा ‘मराठी तरुणांनी नोकरीसाठी अर्ज करू नये’ अशा सूचना महाराष्ट्रातच नोकर्‍यांच्या जाहिरातींत जाहीरपणे प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. विशिष्ट सामाजिक भागात राजकारणी लोक ठरवून हिंदीत भाषणे करू लागले आहेत. महाराष्ट्रातील घरांच्या काही सोसायट्यांमध्ये मराठी माणसाला नाकारले जाते. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांत मराठीऐवजी गुजराती भाषा लिहिली जाते. ही सर्व कशाची लक्षणे आहेत? मराठी भाषा अभिजात झाली, म्हणून ती मरू शकत नाही असे मुळीच नाही. उदाहरणार्थ, संस्कृत ही मृत भाषा असली तरी तिलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, हेही मराठी माणसाने लक्षात ठेवावे.

–  सुधीर राजाराम देवरे 7588618857drsudhirdeore29@gmail.com

187, सायास, टेलिफोन कॉलनी, बस स्थानकामागे, पाठक मैदानाच्या पूर्वेला, सटाणा – 423301, जि. नाशिक (महाराष्ट्र).

About Post Author

5 COMMENTS

  1. अभ्यासपूर्ण लेख. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात संशोधन करायला संधी आहे. त्यासाठी कशाप्रकारे अनुदान उपलब्ध होईल की काय ? नवे रोजगार काही उपलब्ध होऊ शकतात का ? इत्यादी मुद्द्यांवरही पुढील लेखात प्रकाश टाकता आला तर अभ्यासकांना दिशादर्शक ठरेल.

  2. डॉ सुधीर देवरे, सप्रेम नमस्कार.. आपले मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर लिहिलेले सविस्तर टिपण वाचण्यात आले.
    सदर टिपण अभ्यासपूर्ण असून,भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून समाधान मानावे व ही बाब अभिमानाने मिरवत फिरावे असे नाही.कारण भाषिक दृष्टया मराठी माणसाची मराठीच्या भाषिक विकासासाठी जबाबदारी वाढली आहे.
    मराठी म्हणवणाऱ्यांनीच मराठीची अनास्था करीत आहेत.ती थांबवली पाहिजे.एक मराठी म्हणून ती आपली जबाबदारी आहे.छान..अभिनंदन!

  3. मराठी भाषा संधी आणि आव्हाने या विषयाच्या अनुषंगाने दिवाळी सरांनी केलेली मांडणी अत्यंत उद्बोधक अभ्यासपूर्ण आणि नवीन अभ्यास करणाऱ्या संशोधकांना अभ्यासकांना दिशा देणारी आहे अशा प्रकारचे लेखन सातत्याने होत राहणे हेच अभिजात मराठी भाषेचे संवर्धनाचे महत्त्वाचे कारण ठरू शकेल त्यामुळे देवरे सरांनी लिहिलेल्या लेख मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी अवलोकन करावा त्यावर चिंतन करावे आणि ज्या ज्या ठिकाणी आपणास संधी मिळेल त्या त्या ठिकाणी मराठी भाषेच्या अभिजात दर्जा चिरंतन होऊ शकेल अशा पद्धतीने या विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा असे मला वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here