दापोलीचे पत्रकार मनोज पवार यांनी त्यांचा वाढदिवस स्मशानात करण्याचा उपक्रम सलग पंचवीस वर्षे राबवला ! ते मध्यरात्रीच्या सुमारास तथाकथित भुताखेतांना न घाबरता स्मशानात जात व तेथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करत. कधी त्यांचे मित्र त्यांच्याबरोबर असत. पण तो मुख्यत: सणकीत केलेला एकांडा पराक्रम होता. त्यांनी तो उपक्रम 1996 मध्ये सुरू केला तेव्हा मी वार्ताहर म्हणून सर्वप्रथम त्या घटनेची बातमी ‘दैनिक सागर’मध्ये दिली होती. पवार स्वत:ही ‘दैनिक तरुण भारत’चे काम पाहतात. असे काहीसे विचित्र वाटणारे धाडस करणाऱ्याला समाजातील लोकांची साथ सहज मिळत नाही; तसेच मनोज यांचे झाले. मनोज पवार महाराष्ट्र ‘अनिस’चे कार्यकर्ते होते. ते दापोली शाखेसाठी काम करत, मात्र त्यांनी स्मशानातील वाढदिवस व्यक्तिगत पातळीवर राबवला.
पंचवीस वर्षांपूर्वी, जेव्हा पवार वाढदिवस साजरा करण्यासाठी मध्यरात्री एकटेच स्मशानात गेले तेव्हा गंमतच झाली होती. पवार यांनी वाढदिवसाचा केक स्मशानभूमीत बसून कापला. तेवढ्यात त्यांना तेथून चालणाऱ्या एका वाटसरूची चाहूल लागली. त्यांनी त्या गृहस्थाला हाक मारली, “काका, या, केक घ्या, खाऊन जा.” बापरे ! स्मशानातून आलेली हाक ! तो बिचारा गावकरी घाबरून जवळजवळ धावत सुटला.
मनोज यांचे बंधू प्रवीण व काही मित्र-सहकारी पवार यांना साथ हळूहळू देऊ लागले. ते वाढदिवसाच्या रात्री त्यांच्यासोबत जाऊ लागले. आश्चर्य म्हणजे मनोज यांच्या धीट आईने- सुनंदा यांनी मुलाच्या त्या उपक्रमावर दबाव आणून बंदी घातली नाही. उलट, त्यांनी स्वतः वाढदिवसासाठी घरगुती गोडधोडही बनवून दिले. त्यांना त्यांचा मुलगा मनोज ऊर्फ नाना हा जिद्दी आहे व भय-भीती त्याला माहीत नाही हे ठाऊक होते.
मनोज तात्याजी पवार यांचा जन्म 1974 चा. वाढदिवस 12 ऑक्टोबर. म्हणजेच 11 ऑक्टोबर ही वाढदिवसाची रात्र ! तेव्हा तो स्मशानात साजरा होई. पवार यांना धाडस-धैर्य यांची आवड आहे. त्यांना छोटीमोठी आव्हाने तोलण्याची व संकटे झेलण्याची सवय लहानपणापासून आहे. ते दापोलीच्या ए.जी. हायस्कूलचे विद्यार्थी. त्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मुंबईतही गोरेगावला नंदादीप विद्यालय आणि पाटकर कॉलेज येथे झाले आहे. त्यांचे वय पन्नाशीच्या आसपास आहे. पवार म्हणाले, “मी स्मशानातील वाढदिवस सुरू केल्यानंतर माझे नुकसान झाले, मला बाधा झाली, वाईट स्वप्ने पडली; असे काही घडलेले नाही. उलट, पत्रकारितेच्या व्यवसायात मी स्थिर झालो व सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांतही सहभाग, सहकार्य करत गेलो.”
मनोज पवार हे इतर अनेक उद्योग-छंद करत असतात. ते मल्लखांब संघटनेच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते. ते म्हणाले, “वाढदिवसाच्या रात्री आम्ही मित्र गप्पा करत स्मशान परिसरात बसायचो. ‘भुताटकी असेल तर त्या भूताने मला धरावे! आहे का कोणी? द्या मला अनुभव’ असे आव्हानच मी द्यायचो. मला कधी वेगळे असे काहीही जाणवले नाही. तशा गोष्टी नाहीत तर जाणवणार कशा? पहिल्या वेळी, मी एकटा होतो. भुताखेतांवर माणसाचा कमीजास्त विश्वास असतो, पण तसे माझे नाही. माणूस मरण पावला, की सगळे संपले ! एखादी फिल्म जळून गेल्यावर पुन्हा सिनेमा व ते पात्र दिसेल का? तसेच या जीवनाचे आहे. मला संसारी माणसाचे समाधान व माध्यमात काम करत असल्यामुळे मिळणारे नाव एवढे श्रेय पुरेसे वाटते. माझे विचार माझ्या पत्नीने- मानसी किंवा एकुलत्या एका कन्येने- मधुराने मानले पाहिजेत असा माझा आग्रह नाही. माझे म्हणणे फक्त एवढे, की “लोकांनी स्मशानातील माझ्या वाढदिवसातून बोध घ्यावा की भूतेखेते अस्तित्वात नाहीत. तेव्हा ती भीती काल्पनिक आहे. ती लहानपणी बालकाच्या मनात त्याच्याच लोकांनी घातलेली असते. अशा सामाजिक अंधारात मी माझ्यापुरता एक दिवा लावला. आरामखुर्चीत बसून, नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा कृतीतून त्या गोष्टी सिद्ध कराव्या या मताचा मी आहे. विज्ञाननिष्ठ असणे, सत्यशोधक असणे यांत चुकीचे काय आहे?”
“तुमच्यावर बुद्धिवादी संस्कार कोणी केले?” या माझ्या प्रश्नावर पवार म्हणाले, “मला वाचनाची आवड आहे. श्याम मानव यांचा एखादा कार्यक्रम मुंबईत शिक्षण घेत असताना पाहिला तरी मला प्रेरणा मिळे. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी माझा प्रत्यक्ष परिचय होता. कोवळ्या वयात त्यांच्या आचारविचारांचा प्रभाव माझ्यावर पडत गेला. मी गोरेगावात राहत असे त्या टोपीवाला बंगल्यात समाजवादी, परिवर्तनवादी विचारांचे वातावरण होते. मृणाल गोरे तेथेच राहत. युवराज मोहितेसारखे समाजभान असलेले पत्रकार मला मोठ्या भावासारखे आहेत. मुंबईमुळे माझ्या सुधारणावादी विचारांना खतपाणी मिळाले. दापोलीत डॉक्टर मंडलिक यांच्या जाणत्या परिवाराशी घरोबा आहे, तेथे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू झाले, तेव्हा मी त्यात सहभागी झालो.” मनोज पवार यांचा ‘स्मशानात वाढदिवस’ हा उपक्रम पंचविसाव्या वर्षी वाढदिवस साजरा करून थांबवण्यात आला. अजित सुर्वे, शैलेंद्र केळकर, मंगेश शिंदे, अरविंद वानखेडे, प्रशांत कांबळे, स्वप्निल जोशी, संदेश मोरे ही मंडळी भयभीत न होता, त्यांच्या त्या वेगळ्या उपक्रमात सहभागी होत असत. प्रशांत जुवेकरपासून सर्पमित्र किरण करमरकर यांच्यापर्यंत इतर स्नेहीदेखील असत.”
मनोज पवार यांच्या साहसाला भावनिक पदरदेखील आहे. ते म्हणाले, “माझा मोठा भाऊ हेमंत याचे कोवळ्या वयात, विद्यार्थी असताना अपघाती निधन झाले. त्याला दापोलीजवळच्या ज्या स्मशानभूमीकडे नेण्यात आले तेथे मी हा वाढदिवस साजरा करत आलो आहे. मी त्या ठिकाणी गेल्यावर भावाचे स्मरण दरवेळी केले. माणूस एकदा या जगातून गेला आणि परत दिसणार किंवा येणार नसला, तरी आठवणी हा एक दिलासा आहे.”
पवार मुंबईत राहत असताना, पिंजऱ्यातील पक्षी विकत घेऊन, त्यांना खाद्य देण्याचे, रानात स्वातंत्र्य देण्याचे यशस्वी प्रयत्न एका निसर्गप्रेमी व्यक्तीबरोबर करत असत. त्यांनी तो उपक्रम एक दशकभर राबवला. ते मुक्त केलेले पक्षी नंतर त्यांना दिसत. ‘त्यात एक वेगळा आनंद होता’ असे पवार सांगतात. त्यांनी सर्प पकडणे-हाताळणे हे कौशल्य आत्मसात केले आहे. त्यांनी वृक्षारोपणाची, बागेची आवड जोपासली आहे. व्यायामशाळा हे त्यांचे आवडते ठिकाण. व्यायाम केल्याशिवाय ते स्वस्थ बसू शकत नाहीत. त्यांना तबलावादनाची आणि चित्रकलेचेही आवड आहे. वार्तांकन हा त्यांचा पेशा आहे.
– माधव गवाणकर 9765336408
——————————————————————————————————————-