महाराष्ट्रातील नांदेड खालोखाल मनमाडमधील गुरुद्वाराला अखिल शीख समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे स्थान आहे. ते गुरुद्वाराला प्रेरणा आणि प्रार्थना स्थळ म्हणून फार मानतात. मनमाड हे शहर नाशिकपासून पंच्याहत्तर किलोमीटर दूर आहे. मनमाड गावाला महत्त्व रेल्वेमुळे आले. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ आणि जमशेदजी जीजीभाई यांनी भारतात रेल्वे रुळ इंग्रज राजवटीच्या काळात पहिल्यांदा आणले. भारताची पहिली रेल्वे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुंबईच्या बोरीबंदर (सध्याचे सीएसटी स्थानक) ते ठाणे या दरम्यान 1853 मध्ये चालवण्यात आली. रेल्वेचे स्थानक मनमाड ह्या ठिकाणी त्यानंतर अवघ्या तेरा वर्षांच्या काळात कार्यान्वित करण्यात आले. मनमाड स्थानक 1866 पासून उत्तर भारताला महाराष्ट्राशी; तसेच, दक्षिण भारताशी जोडणारे मोक्याचे ठिकाण ठरलेले आहे. त्यामुळेच मनमाड स्थानक जंक्शन बनून गेले. लोहमार्गाच्या सुविधेमुळे मनमाडचा विकास होऊन लाखभर जनसंख्या सामावलेले ते लहानसे शहर होऊन गेले आहे. ते व्यापारी दृष्ट्या परिसरातील महत्त्वाचे ठिकाण मानतात.
मनमाडचा परिसर इतिहासकाळात विंचूरकर घराण्याच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्यलढ्यात तेथील सर्व जातिधर्मांच्या लोकांनी सहभाग घेऊन तुरुंगवास भोगला आहे. अंकाई-टंकाई असे जोडकिल्ले मनमाड शहराच्या दक्षिणेस आठेक किलोमीटर अंतरावर आहेत. तेथे दोन हजार वर्षे जुनी अशी जैन लेणीही आहेत. अगस्ती ऋषींचा आश्रम अंकाई किल्ल्यावर आहे. रामाने वनवासकाळात सीतेसह अंकाई किल्ल्याच्या डोंगरावर येऊन, अगस्ती ऋषींची भेट घेतल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे अंकाई किल्ल्यावर चढून गेल्यावर, पहिल्या दरवाज्यानंतर राम-सीता गुंफा आणि दगडात कोरलेली लेणी पाहण्यास मिळतात.
शीखांचा गुरुद्वारा मनमाड शहरात मधोमध दिसतो. मराठमोळ्या भूमीत अचानक, एवढे मोठे शीख धर्मीय स्थळ असल्याने, त्याबाबत कुतूहल जागृत होते. त्याची कथाही तशीच रोचक आहे. मुघल बादशाह जहांगीर यांनी 1606 साली शीखांचे पाचवे धर्मगुरू अर्जन देव यांची हत्या पाकिस्तानातील लाहोरमध्ये अमानुषपणे केली. तेव्हा लाहोर हा भारताचा भाग होता. तेव्हापासून मुघल-शीख संघर्ष तीव्र झाला. गुरु अर्जन देव यांनीच शीख धर्मग्रंथाची पहिली आवृत्ती ‘आदिग्रंथ’ नावाने संकलित केली; पुढे, तीच आवृत्ती शीखांच्या पवित्र ग्रंथात म्हणजे ‘गुरु ग्रंथ साहिब’मध्ये विस्तारली. मुघल-शीख संघर्ष औरंगजेब बादशाहच्या काळात अधिकच चिघळला. औरंगजेबानेदेखील 1675 साली धर्मांतरास विरोध दर्शवल्याने शीखांचे नववे गुरू तेग बहादूर यांचा दिल्लीतील चांदणी चौकात शिरच्छेद केला. त्यानंतर, त्यांच्या अवघ्या नऊ वर्षीय पुत्रास गुरु गोविंद सिंह यांना शीखांनी धर्मगुरू म्हणून स्वीकारले. गुरु गोविंद सिंह हे पुढे सर्व विद्या शिकून चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व बनले. अद्वितीय योद्धा, लेखक, विचारवंत, आध्यात्मिक गुरू आणि संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार अशी त्यांची गुणवत्ता होती. त्यांनी मुघलांशी एकूण चौदा लढाया केल्या, अनेक ग्रंथ रचले. गुरु गोविंद सिंह म्हणजे भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा मिलाफ होते. म्हणून त्यांना ‘संत शिपाई’ असेही संबोधले जाते.
गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना 1699 मध्ये बैसाखीच्या दिवशी केली. त्यांची भूमिका जुलूम आणि अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्यासाठी आणि मानवतेच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी समर्पित अशा महान योद्ध्यांची मजबूत फौज असणे आवश्यक आहे अशी होती. खालसा पंथ शीख धर्माच्या विधिवत आरंभ केलेल्या अनुयायांचे सामूहिक स्वरूप म्हणून उदयास आला. गुरू गोविंद सिंह यांनी औरंगजेबास उद्देशून ‘जफरनामा’ म्हणजेच विजयाचे पत्र पाठवले आणि खालसा पंथ मुघलांचे अस्तित्व संपवून टाकेल असा धाक व्यक्त केला. ते पत्र मूळ पर्शियन भाषेत आहे. त्या पत्रात गुरू गोविंद सिंह यांचे मुत्सेद्देगिरी, शौर्य आणि अध्यात्म हे तिन्ही गुण एकत्र जाणवतात.
गुरू गोविंद सिंह यांना फक्त बेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांपैकी त्यांनी चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ पंजाब व त्या परिसरात व्यतीत केला. ते आयुष्याच्या शेवटच्या दोन वर्षांत महाराष्ट्रात आले. त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास मराठवाड्यातील नांदेड येथे घेतला. त्यांनी शीख अनुयायांना ‘गुरु ग्रंथ साहिब’ ग्रंथालाच प्रमाण तथा गुरू मानून त्यानुसार शीख धर्माचे आचरण करावे असा संदेश तेथेच दिला. ते नांदेड या स्थानाचे असाधारण महत्त्व होय. गुरू गोविंद सिंह हे शीखांचे शेवटचे (दहावे) देहधारी गुरू म्हणून मान्यता पावले.
गुरु गोविंद सिंह नांदेड येथे का आले असावेत याबाबत दोन मतप्रवाह आढळून येतात. एक म्हणजे, महाराष्ट्रातील संत नामदेव यांचे पंजाबमधील महत्कार्य आणि त्यांना तेथे, पंजाब प्रांतात मिळालेला ‘संत शिरोमणी’ असा दर्जा. यांमुळे गुरू गोविंद सिंह संत नामदेवांच्या मूळ स्थानी, नांदेडमध्ये आध्यात्मिक किंवा धार्मिक कारणामुळे आले असावेत असे मानले जाते. पण ह्यापेक्षा दुसरे कारण जास्त सयुक्तिक वाटते. ते म्हणजे औरंगजेबाच्या 1707 साली मृत्यू पश्चात त्याच्या बहादुरशाह आणि कामबक्ष ह्या दोन मुलांमध्ये राज्य मिळवण्यासाठी द्वंद्व सुरू होते, त्यात गुरू गोविंद सिंह यांनी बहादुरशाहला पाठिंबा दिला. ते त्याच्यासोबत दक्षिणेकडे कूच करत असताना नांदेडमध्ये आले.
गुरु गोविंद सिंह यांनी नांदेड येथे मुक्काम असताना बाळा राव आणि रुस्तम राव या दोन मराठा सरदारांची साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावरून सुटका केली आणि त्यांना मनमाडला आणले. मनमाड एक लहानसे खेडे होते आणि आसपास घनदाट जंगल होते. ते पुढेही, बरीच वर्षे तसेच असावे. तो काळ 1707-1708 या दरम्यानचा. गोविंदसिंह यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ. ते दोन सरदार कोण होते, ते गुरू गोविंद सिंह यांच्या संपर्कात कसे आले, त्यांनी त्यांना मनमाडला का आणले, याबाबत माहिती मिळत नाही.
गुरू गोविंद सिंह यांच्या नांदेड निवासकाळात सरहद्द प्रांतातील नवाजवझीर शाहच्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यातच त्यांचा अवघ्या बेचाळीस वर्षे वयाचे असताना 1708 साली मृत्यू झाला. पंजाबचे महाराजा रणजितसिंह यांनी 1830 च्या आसपास ‘तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिब’ या नावाने गोदावरी नदीकाठी नांदेडमध्ये गुरुद्वारा बांधला. शीख अनुयायांनी नांदेडभूमीतून गुरू गोविंद सिंह यांच्या शिकवणीचे आचरण पुढे नेऊन, धर्माचा प्रसार केला. त्यामुळे हिंदूंसाठी काशीचे जे महत्त्व आहे, तसे पावित्र्य शीख धर्मियांसाठी नांदेडला आहे. ते शीखांच्या पाच महत्त्वपूर्ण तख्तांपैकी आहे.
मनमाड रेल्वे स्थानकातून हैदराबाद रेल्वे मार्ग 1900 साली सुरू झाला. तो मार्ग नांदेड येथूनच पुढे नेण्यात आला. मनमाड ते नांदेड हे अंतर चारशे किलोमीटरहून अधिक आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या बहुसंख्य शीख धर्मियांना नांदेड येथे जाण्यासाठी किंवा तेथून परतण्यासाठी मनमाड येथून रेल्वे पकडणे अथवा बदलणे शक्य झाले. परिणामी, शीख भाविकांचा मुक्काम मनमाड येथे होऊ लागला. स्वाभाविक, मनमाडमध्ये शीख समुदायातील लोकांची रेलचेल वाढली. नांदेडला निघालेल्या शीख लोकांसाठी मनमाडमध्ये निवासाची, भोजनाची सोय व्हावी यासाठी गुरुद्वाराची निर्मिती करण्यात आली. बाबा निधान सिंह यांनी शीख धर्मीय स्वयंसेवकांच्या मदतीने मनमाडमधील सध्याच्या गुरुद्वाराच्या ठिकाणचे घनदाट जंगल साफ करून तेथे गुरुद्वारा बांधण्यासाठी कारसेवा केली. मनमाड येथील गुरुद्वारा बांधताना, लपलेली एक बावडी (विहीर) सापडली. विहीर साफ केल्यानंतर तिचे पाणी गोड व ‘दिव्य’ असल्याचे लक्षात आले. त्या लपलेल्या विहिरीमुळे (गुप्त कुआ) तेथील गुरुद्वाराला ‘श्री गुप्तसर साहिब’ असे नाव देण्यात आले. जोगिंदर सिंह साही यांनी जगातील गुरुद्वारांबाबत 1978 साली पुस्तक लिहिले आहे. त्यात या माहितीचा समावेश आहे.
मनमाडमधील गुरुद्वारा हे शीख समुदायासाठी महत्त्वाचे असे स्थान आहे. अमृतसरपासून नांदेडला येण्यासाठी ‘सचखंड एक्स्प्रेस’ 1995 मध्ये सुरू झाली. त्यामुळे शीख अनुयायी मनमाड येथे न थांबता, थेट नांदेडला जाऊ शकतात. तरीही नांदेडला येणारे अनुयायी मनमाडमधील गुरुद्वारास आवर्जून भेट देतात. तो धार्मिक-भाविक संकेत होऊन गेला आहे. शेकडो शीख मनमाड येथील निवारास्थळी वास्तव्य करतात. तेथील लंगर म्हणजेच भोजनाची सेवा चोवीस तास चालू असते. कोरोनाकाळात, गुरुद्वारातील लंगर सेवेने हजारो लोकांच्या भोजनाच्या सेवेचे महत्कार्य केले. गरजू नागरिकांसाठी अत्यल्प दरात प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणारा वैद्यकीय कक्ष गुरुद्वारामार्फत 2022 साली कार्यान्वित करण्यात आला आहे. गुरुद्वाराच्या आवारात साध्या दुमजली प्रवेशद्वारातून जाता येते. प्रांगणाच्या डावीकडे मोठा दिवाण हॉल आहे, त्याच्या पूर्वेकडील भागात गुरू ग्रंथ साहिबासाठी व्यासपीठ आहे. मुख्य तीन मजली इमारतीच्या वरच्या बाजूला मध्यवर्ती घुमट आणि कोपऱ्यांवर छोटे सजावटीचे घुमट आहेत. सभामंडपाच्या भिंतींवर पांढऱ्या संगमरवरी स्लॅबच्या रेषा आहेत. त्यात राखाडी रेषा मध्यम उंचीपर्यंत आहेत. पुढील भिंतींवर बहुरंगी काचेचे तुकडे आणि परावर्तित आरसे भौमितिक नमुन्यांमध्ये मांडलेले आहेत. हॉलचे छत वेगवेगळ्या छटांमध्ये चकचकीत टाइल्सचे बनलेले आहे. फरशी संगमरवरी अशी पक्की आहे. धार्मिक सेवा सकाळी आणि संध्याकाळी आयोजित केल्या जातात. लंगर जवळजवळ संपूर्ण दिवस-रात्र उघडे असते. शीख लोक होला महल्ला (होळी) आणि इतर सणांच्या वेळी त्यांचे शेवटचे धर्मगुरू गुरू गोविंद सिंह यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गुरुद्वारा दर्शनासाठी मोठ्या संख्येने मनमाडला भेट देतात. गोविंद सिंहजी यांच्या ‘प्रकाश पूरब’ निमित्त दरवर्षी तेथे अखंड पाठ, भजन, कीर्तन, लंगर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. सर्वधर्मीय नागरिक सोहळ्यात सामील होतात.
– संदीप चव्हाण 9890123787 drsandeep85@gmail.com
—————————————————————————————