राजकारणात नैतिकतेचा सुप्त प्रवाह असावा लागतो. सध्या तो नष्ट होत चाललेला दिसतो. अशा वेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी हजारेंच्या आंदोलनाला पत्राद्वारे जो पाठिंबा दिला आहे, त्याचे स्वागत करावेसे वाटते.
सत्याग्रहींची निवड करताना महात्मा गांधी फार काटेकोर असत. त्याच्या नैतिकतेविषयी कुणालाही संशय नसावा, असा त्यांचा कटाक्ष असे. म्हणूनच त्यांनी विनोबा भावे यांची ‘पहिला सत्याग्रही’ म्हणून निवड केली होती. लोकपाल समितीवर नियुक्त्त करण्यात आलेल्या शांतीभूषण-प्रशांतभूषण यांच्याबाबतीत जो वाद निर्माण झाला. त्यातून या दोघांच्या नैतिकतेबद्द्ल काहीच खात्री देता येत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की, जी व्यक्त्ती इतरांचे भ्रष्टाचाराचे बिंग फोडते, ती स्वत:देखील भ्रष्टाचारात लडबडलेली असल्याचे समजते. त्यामुळे भ्रष्टाचाराविरूध्द बोलण्यासाठी जो नैतिकतेचा पाया लागतो, तो आज कुणाकडेच नसल्याचे जाणवते. यातून भविष्यात नैतिकतेच्या आधारावर आंदोलने उभी रहातील का? हा प्रश्नही निर्माण होतो. आज प्रत्येकालाच परस्परांच्या नैतिकतेवर संशय आहे आणि अशा स्थितीत असलेल्या समाजाला कुणीच वाचवू शकत नाही. त्यामुळे आज समाज आणि राजकारणातला नैतिक पाया अधिक बळकट करण्याची आवश्यकता भासत आहे.
– शरद देशपांडे
पुणे विद्यापिठ,
निवृत्त तत्त्वज्ञान विभागप्रमुख
दिनांक – 21/04/2011
{jcomments on}


