रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील भोपण हे छोटेसे गाव खाडीकाठाला वसलेले आहे. भोपण्या नावाची व्यक्ती या गावात फार पूर्वी होऊन गेली, म्हणे ! त्यांच्या नावावरून गावाचे नाव भोपण असे पडले असावे. गावात मुख्य वाड्या तीन आहेत आणि त्यांत छोट्या छोट्या वाड्या अनेक आहेत. भोपण गावापासून जिल्ह्याचे ठिकाण रत्नागिरी हे सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. गावाजवळून NH66 हा मुंबई-गोवा महामार्ग जातो. खेड-दापोली हे जवळचे बस स्टँड आहे. दाभिल (दोन किलोमीटर), कारूळ (पाच किलोमीटर), तळवली (पाच किलोमीटर), कळकी सातेरी (पाच किलोमीटर) ही भोपणच्या जवळची गावे आहेत.
गावाजवळून कोडजाई नदी वाहते. ती गावाच्या वेशीजवळ खाडीला जाऊन मिळते. गावात केलील येथे एक तलावदेखील आहे, मात्र गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आंबेकरवाडीतून पाणी योजनेमार्फत, केला जातो. तेथे एक ओहोळ (पऱ्ह्या) वाहतो असे गावकरी सांगतात.
भोपण गावाची लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार (आठशे कुटुंबे) आहे. गावात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. गावातील साक्षरता दर पासष्ट टक्के आहे आणि महिला साक्षरता दर पस्तीस टक्के आहे. भोपण गावाचे क्षेत्रफळ सुमारे साडेसातशे हेक्टर आहे. भोपण गाव दापोली विधानसभा मतदार संघाच्या अंतर्गत येते; तर लोकसभेसाठी रायगड संसदीय मतदारसंघात येते. गावात पोस्ट ऑफिस आहे. त्याचा पोस्टल/पिन कोड 415711 असा आहे. गावच्या हरेकरवाडीत आणि शिंदगणवाडीत प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. विठ्ठलवाडीत पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून पुढील शिक्षणासाठी पाच किलोमीटर अंतरावरील ओणनवसे, आगरवायंगणी येथे आणि त्यापुढील उच्च शिक्षणासाठी पंधरा किलोमीटरवर चिखलगाव, उन्हवरे, खेड, दापोली येथे जावे लागते. गावात भोपण, पंदेरी व ओणनवसे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, तर फणसू येथे सरकारी रुग्णालय आहे.
भोपणच्या हरेकरवाडीजवळील जंगलात काही अंतरावर पोकळकडा भागात सुंदर धबधबा आहे. तेथे जाण्यासाठी सकाळी सात वाजता दापोलीहून भोपण-पंदेरी बस पकडून हरेकरवाडीत उतरता येते. जंगलात थोडे आत चालत गेले, की तो नयनरम्य धबधबा पाहता येतो. जंगलात वाट चुकण्याची शक्यता असते. धबधबा एका डोहात विसर्जित होतो. तेथे पाण्यात उतरणे, पोहणे शक्य आहे. भोपण दाभोळच्या खाडीमार्ग अंतर्गत येत असल्याने तेथे कांदळवनांची दहा ते पंधरा मीटर उंच अशी दाट वृक्षराजी पाहण्यास मिळते. खाडी किनारा स्वच्छ आहे. भोपणच्या खाडीमध्ये समुद्री काळा बगळा, ढोर बगळा, राखी बगळा, खरबा बगळा, मध्यम बगळा, कवड्या खंड्या असे अनेकविध पक्षी आढळतात.
गावाची ग्रामदेवता ‘शिंदगणकरीन’ ही देवी आहे. गावात गावदेवीचे जुने मंदिर आहे. तिच्या मंदिरात मुख्य देवीसोबत भैरी, वरदान आणि कालकाई या देवतांच्या मूर्तीदेखील आहेत. उत्सव दरवर्षी, शिमग्याच्या वेळी आणि नवरात्रात होतो. देवीमंदिराशिवाय गावाच्या विठ्ठलवाडीमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे तर हरेकरवाडीमध्ये हनुमान मंदिर आहे. हरेकरांचे कुलदैवत रेडजाई देवी हे आहे. ते खाजगी वहिवाटीचे मंदिर आहे. गावाच्या साहिलनगर भागात दर्गा आहे. तो भाग मुस्लिमबहुल आहे. मात्र गावात दोन्ही जमातींत ऐक्यभावना आहे. हिंदू-मुस्लिम एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होतात. गावात बौद्धविहारदेखील आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. गावाच्या कांबळेवाडीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव आणि तेथील प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्सव साजरा होतो.
गावात नवरात्र, दिवाळी, संक्रांत, शिमगा हे सण उत्साहात साजरे होतात. गणपतीमध्ये वाडीवाडीत, घरोघरी जाऊन रंगतदार आरत्या म्हटल्या जातात. पण खरी मजा येते ती शिमग्यात ! फाल्गुनात शिमग्याचा होम झाला, की गावदेवीची पालखी गाव प्रदक्षिणेसाठी निघते. ती जत्रा नऊ ते बारा दिवस चालते. यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. खेळे होतात. त्यात प्रभू राम, ताटको (त्राटिका) अशी सोंगे काढली जातात. मंदिरात गावातीलच लोक भजने चढाओढीने म्हणतात. तमाशाचेही आयोजन केले जाते. नोकरीसाठी गावाबाहेर गेलेले नोकरदार शिमग्याच्या वेळेला गावी परत येतात, तेव्हा एरवी शांत असणारे गाव गजबजून जाते.
शेती आणि शेतीपूरक उद्योग, मासेमारी हे भोपण गावातील उपजीविकेचे मुख्य व्यवसाय आहेत. शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तांदूळ, नागली, कुळीथ, पावटा हे जास्त करून पिकवले जात असले तरी पालक, मुळा, लाल माठ, वांगी, टोमॅटो अशा भाज्यादेखील केल्या जातात. नारळ, सुपारी, फणस, काजू, आंबे यांच्यासोबत तेथे कलिंगडेदेखील पिकतात. गावाच्या आजूबाजूला जंगलसदृश भाग असल्याने रानडुकरे आणि वानर यांचा शेती व फळझाडे यांना उपद्रव होतो. गावासभोवती जंगलात सागवान, साया, फणस, जांभूळ यांची दाट राई आहे.
कोरोनाकाळात रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी भोपण गाव दत्तक घेतले होते. त्यामुळे गावात बर्याच सुधारणा केल्या गेल्या आहेत. भोपण येथे प्रशासकीय सोयीसाठी ग्रूप ग्रामपंचायत आहे. त्याचे सभासद नऊ आहेत. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात भोपण, केलील, साहिलनगर अशी तीन गावे येतात. गावच्या सरपंच अर्चना हरेकर (9011975732), उपसरपंच परशुराम बोबडे, ग्रामसेवक गंगावणे (पंदेरी), तर पोलिस पाटील विशाल पालशेतकर आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे (9405879227) हे आहेत.
भोपणमध्ये राहण्याची सोय नाही तरी जवळच असलेल्या वारेबुआ गावात राहण्यासाठी खाजगी बंगले उपलब्ध आहेत. भोपणपासून जवळच बुरोंडी येथे नवीन झालेले परशुरामभूमी हे स्मारक आहे, तर तेथून चौदा किलोमीटर अंतरावर पन्हाळेकाजी लेणी आहेत. भोपणपासून एकतीस किलोमीटरवर असलेल्या उन्हवरे या कुंडात वर्षाचे बाराही महिने गरम पाणी असते.
भोपणपासून तेवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उंबर्ले गावात कातळशिल्प आढळले आहे. दहा-पंधरा हजार वर्षांपूर्वी मानवाने दगडात निर्माण केलेली ती कला अचंबित करणारी आहे. तेथे अभ्यासू पर्यटकांची गर्दी होते. त्याबरोबरच आंजर्ले येथील कासव महोत्सव, भोपणपासून दोन तासांच्या अंतरावरील मुरुड सागरकिनारा, थंड हवा आणि निवांतपणाचा अनुभव देणारे वारेबुआ वास्तव्य, भार्गवराम व रेणुकामाता यांची पेढे-परशुराम येथील मंदिरे ही सभोवतालातील ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत.
लेखासाठी माहिती सहाय्य – परशुराम बोबडे 9423207175, प्रेम आंबेकर 94218 32843
पुनर्लेखन – नितेश शिंदे
– मानसी चिटणीस 9881132407 manasichitnis1978@gmail.com