Home उद्योग भूतखांबचा लोकलढा

भूतखांबचा लोकलढा

0
-bhutkhambachaladha-

गोव्याच्या शांत, सुशेगात भूमीत गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात पर्यावरणासाठी एक उग्र आंदोलन घडून आले. त्यात एका सत्याग्रहीचा बळी गेला, परंतु ड्युपाँटसारख्या बलाढ्य अमेरिकन कंपनीला गोव्यातून पळ काढावा लागला. लोकशक्ती काय चमत्कार करू शकते याचे ते उत्तम उदाहरण आहे. आंदोलन सर्वसामान्य गावकऱ्यांनी, विशेषत: महिलांनी चालवले. त्यांचा निर्धार असाधारण दिसून आला. त्यांना साथ व मार्गदर्शन मिळाले ते स्थानिक बुद्धिजीवी वर्गाचे – डॉक्टर, आर्किटेक्ट अशा व्यावसायिकांचे. त्या लढ्याच्या, त्यास पंचवीस वर्षें उलटून गेल्यानंतर, दोन स्मारकांखेरीज खुणा काही शिल्लक राहिलेल्या नाहीत. पैकी एक आहे तो स्थानिक बंडखोर तरुण निलेश नाईक यांच्या नावाचा चौथरा. निलेश एका निर्णायक प्रसंगी गोळीबारात मरण पावले. सत्याग्रहींनी त्यांचे दहन फॅक्टरीच्या गेटसमोर रस्त्याच्या कडेला केले. अंत्ययात्रेला तीन-चार हजार लोक जमले. दहनासाठी बांधलेला चौथरा म्हणजेच त्यांचे स्मारक. ते तेथेच रस्त्यावर उभारण्याचा निर्णय केला. त्या स्मारकाची उभारणी हा त्या आंदोलनाचाच भाग होऊन गेला.

दुसरे आहे ते स्मारक नसून, ते पळून गेलेल्या ड्युपाँट कंपनीने उभारलेल्या कुंपण, ऑफिस इमारती अशा बांधकामाचे अवशेष आहेत. ते सुमारे पाचशे एकर माळरानावर पसरलेले आहेत. किल्ल्यातील शिल्लक गोष्टी पाहताना अंगावर जसे रोमांच उठतात तसे रोमांच त्या उजाड डोंगरमाळावर फिरत असताना उमटत होते. लढ्याचे स्थानिक नेते डॉ. दत्ताराम देसाई त्या विस्तीर्ण प्रदेशात फिरत असताना, लढ्यातील एकेक हकिगत मला वर्णन करून सांगत होते. तो माळ गेली पंचवीस वर्षें तसाच पडून आहे. त्या माळावरील भूतखांब नावाचा पुरातन पत्थर आधी होता तसाच कणखरपणे उभा आहे.

कमलाकर साधले नावाचे फोंड्याचे पर्यावरणप्रेमी आर्किटेक्ट; त्यांच्यापासून लढ्याची हकिगत, त्यांना जाणवलेल्या केरी गावातील अस्वस्थतेतून 1987 साली सुरू होते आणि ड्युपाँटचा कारखाना हलवल्याची दिल्लीची बातमी 1995 सालच्या एप्रिल महिन्यातील एका रात्री कळते तेव्हा ती संपते. बातमी दिल्लीची एक महिला पत्रकार त्यांच्या कानावर फोन करून घालते. साधले तशा मध्यरात्री साऱ्या गोवाभर, देशभर फोन करत सुटतात – त्यांचा आठ वर्षांचा लढा यशस्वी झाला होता. साऱ्या जगातील निसर्गप्रेमींच्या चळवळीला बळ देईल अशी ती बातमी होती. कमलाकर साधले यांनी ती हकिगत ‘भूतखांबचा लोकलढा’ या नावाने एका पुस्तकात साद्यंत, वेधक, नाट्यमय पद्धतीने सांगितली आहे. साधले यांना शब्दांनी वेगळे सांगावे लागलेच नसावे एवढे नाट्य त्या लढ्यामध्ये आहे, कारण ती कथा काहीशे गाववाड्यांतील काही हजार लोकांनी ड्युपाँट नावाच्या जबरदस्त अमेरिकन कंपनीला नमवल्याची आहे. त्यात एका स्थानिक घटनेचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिणाम येतात.

ते नाट्य घडले केरी आणि सावईवेरी या दोन मोठ्या गावांच्या पट्ट्यात. तो भाग भरगच्च बागायतीचा, झरे-तळ्यांनी थबथबलेला आहे. डोंगरांआड लपलेल्या वाडीवस्त्या आणि मध्ये गोव्यातील सर्वांत उंच भूतखांबचे पठार. तो सारा निसर्ग पाहताना थरारून जायला होते. त्यामुळेच की काय, तेथे असाधारण माणसे होऊन गेली – केसरबाई केरकर, दीनानाथ मंगेशकर, जितेंद्र अभिषेकी, बा.भ. बोरकर, अ.का. प्रियोळकर अशी अनेकानेक. मोहन रानडे यांचा क्रांतिकारक लढा त्याच टापूतील. ड्युपाँट कंपनीला त्यांच्या 6.6 प्रकारच्या नायलॉन फॅक्टरीला तीच जागा बरोबर सापडली व एका उग्र आंदोलनास तोंड फुटले. त्यात त्या परिसरातील यच्चयावत माणूस सामील झाला. त्या कंपनीकडून त्या स्थानिकांना आश्वासन होते, ते विकासाचे; पण स्थानिकांना भीती वाटत होती ती प्रदेशाचे शतकानुशतकांचे नैसर्गिक सौंदर्य गमावण्याची. लोकांनी विकासापेक्षा -smarak-govaसौंदर्य व शांतता पसंत केली आणि ड्युपाँटविरुद्ध लढा उभा करण्याचे ठरवले. त्याआधीच्या जुवारी खत कारखान्याच्या प्रकल्पाने गोव्याची केलेली नासाडी त्यांना माहीत होतीच.

गोव्यातील प्रस्तावित कारखान्यात नायलॉन 6.6 निर्माण करण्यात येणार होते. नायलॉन 6.6 च्या निर्मितीमध्ये हेक्झामिथिलिन डायमायन व एडिपिक अॅसिड ही जी प्रमुख द्रव्ये वापरली जातात ती विलक्षण प्रदूषणकारी आहेत हे जगभर सिद्ध झाले होते. शिवाय ड्युपाँट कंपनी तिच्या स्थापनेपासून मानवी जीवनाचा विचार न करता रासायनिक विषारी द्रव्यांशी खेळत आली होती; तिचा व्हिएतनाम युद्धातील विनाशकारी सहभाग सर्वत्र प्रसिद्ध होता. 

साधले आयुष्यभर गोव्यात पर्यावरणासाठी लढत आले आहेत – त्यांनी अनेक छोट्यामोठ्या चळवळी केल्या आहेत. ते ‘युद्ध’ असेच वर्णन भूतखांबच्या आंदोलनाचे करतात आणि सांगतात त्या युद्धाचे काही पदर – ते त्यांतील वैचारिक बाजू जशी वर्णन करतात; तसेच, केरी ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंतचे राजकारण. तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप राणे, रवी नाईक यांचा दुटप्पीपणा व त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी ते देऊ पाहत असलेली देशाची किंमत – ते सारे राजकारण व त्यातील स्वार्थ कोणाही संवेदनशील माणसाच्या अंगावर शहारेच निर्माण करील! न्यायालयानेही त्या लढ्यात मोठी कामगिरी बजावली आहे. पद्मश्री नॉर्मा अल्वारिस यांनी सार्वजनिक हितासाठी स्थानिकापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लोकलढ्याची बाजू समर्थपणे मांडली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचा सहभाग. एका मीटिंगमधून सुरू झालेली ती लढाई घराघरांत पोचली. कंपनीने योजलेल्या त्या मीटिंगमध्ये लंडनहून आलेले डॉ. अनिल देसाई काही प्रश्न उपस्थित करतात व वणवा पेटतो, वर्तमानपत्रे बातम्या प्रसृत करतात, जवळजवळ प्रत्येक माणसास ड्युपाँट कारखान्याची मेख कळते. ‘इकोफोरम’च्या मीटिंगा ठिकठिकाणी होऊ लागतात. लोकशाहीत हेच अभिप्रेत असते ना! असे जनमत वेगवेगळे सांस्कृतिक प्रभाव निर्माण करते– त्यात राजकारण असू शकते, पण ते हितकर असते, मते घडवणारे असते. उलट, सत्तेचे राजकारण बीभत्स असते. राजकारणाच्या तशा दोन्ही तऱ्हांचे यथायोग्य वर्णन कमलाकर साधले यांच्या पुस्तकात येते. त्याचे आधुनिक काळातील महाभारत असे वर्णन करता येईल – त्यात गीतेप्रमाणे तत्त्वज्ञानही समाविष्ट आहे. साधले यांचा वैचारिक पाया पक्का असल्याने त्यांनी ते विवरण फार सुरेख केले आहे.

हे ही लेख वाचा – 
गोव्यातील देवदासी समाजाचे उन्नयन!
राईट टू पी : आम्ही हार मानलेली नाही! – सुप्रिया सोनार

कमलाकर साधले यांची चिकाटी व जिद्द प्रचंड आहे. ते त्यांच्या ‘निर्मलविश्व’ या पर्यावरण संस्थेमार्फत कचऱ्याच्या विल्हेवाटीचे पर्याय सध्या शोधत आहेत. विकासप्रक्रियेला पर्याय, पाणलोटक्षेत्र विकास हा सामाजिक कार्यकर्त्यांचा विद्यमान अजेंडा त्यांच्याही कार्यक्रमपत्रिकेवर आहेच. एक सत्शील पर्यावरणप्रेमी म्हणून साधले लोकांच्या वाढत चाललेल्या परावलंबी वृत्तीवर संतप्तपणे बोलतात. ते म्हणतात, की लोकशाहीत फक्त सरकारने सर्व काही करायचे असते जणू आणि खुल्या अर्थव्यवस्थेत सर्व काही बाजारात मिळते अशी लोकांची वृत्ती झाली आहे.

कमलाकर साधले व मंडळी या प्रश्नातील प्रांताची, देशाची, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चालवलेल्या अनर्थाची बाजू मांडत होते तर स्थानिक पातळीवरील असंतोष प्रभात शिकेरकर, दत्तानंद गोब्रे, मधुसुदन जोशी, जानू कोळेकर अशा मंडळींनी संघटित केला होता. त्यांच्यातीलच महत्त्वाची व्यक्ती होती डॉ. दत्ताराम देसाई. त्यांनी ज्या संयमाने आणि कुशलतेने आंदोलन वेळोवेळी हाताळले त्यास तोड नाही. देसाई हे मूळ गोव्याचे, पण वेगळ्या प्रदेशातील. त्यांनी सावईवेऱ्याला, मामाच्या गावी येऊन दवाखाना थाटला व ते तेथील होऊन गेले. त्यांच्या पत्नी उर्मिला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेत असतात. डॉ. देसाई यांचा त्या गावातील वावर पाहताना मला ‘अनुराधा’ सिनेमातील बलराज साहनी आठवले – देसाई तितकेच गावकऱ्यांच्या सुखदु:खाशी एकरूप झाले आहेत. ते रुग्णांशी तेवढ्याच ममतेने बोलतात.

भूतखांबचा माळ ओसाड पडला असला तरी तेथे काही ना काही प्रकल्प उभा करण्याचे मनसुबे चालू असतात. तेथे ‘सेझ’ विभाग सुरू करण्याचे खूळ आले होते, परंतु एकूण देशातच ती संकल्पना बारगळली गेली. तो प्रदेश आता सरकारच्या ताब्यात आहे, म्हणजे त्यावर मुक्त वावर आहे. पण तेथे अतिक्रमण झालेले नाही. गोव्यात निसर्ग भरभरून राहिलेला आहे व गोवेकर त्यात मनसोक्त डुंबलेले-रमलेले असतात. तरी आधुनिक राहणीची जीवनसरणी गोव्यात आलेली आहे. बंगले, फार्म हाऊस बांधण्याकडे कल आहे. देशभर सर्वत्र आहे तशी नवी पिढी गावाकडे राहिलेली नाही, ती दूरदेशी, नोकरीव्यवसायानिमित्त गेलेली आहे. उलट, बाहेर प्रांतातील लोक येऊन गोव्यात स्थिरावत आहेत. डॉ. देसाई बोलण्याच्या ओघात मला म्हणाले, की भूतखांबचा लोकलढा, पुन्हा तशी परिस्थिती उद्भवली तर सद्यकाळात उभा राहील का याबाबत शंका आहे.

माझ्या ध्यानात असे येते, की गेल्या शंभर-दोनशे वर्षांत विकसित होत आलेली प्रत्येक प्रदेशातील स्थानिक संस्कृती क्रांतिकारी बदलाच्या उंबरठ्यावर आहे; नव्हे तिने उंबरठा ओलांडला आहे. जगभर सर्वत्र सारे भुईसमांतर होणार आहे. ते केरी-सावईवेरीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशात प्रकर्षाने जाणवते. दत्ताराम देसाई, कमलाकर साधले आणि तशी सर्वत्र पसरलेली मंडळी एकत्र आली, त्यांचे नेटवर्क उभे राहिले तर त्यांच्या विचारमंथनातून नव्या, घडत असलेल्या संस्कृतीची बीजे उकलतील, नव्या मनोपरिवर्तनाचा सुगावा लागेल.

– दिनकर गांगल  9867118517
(‘झी दिशा’वरून उद्धृत)

About Post Author

Previous articleजलक्षेत्रात बिनतांत्रिकतेचा उच्छाद
Next articleदौत, टाक आणि टीपकागद
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version