Home कला दौत, टाक आणि टीपकागद

दौत, टाक आणि टीपकागद

1
tipkagad-dautani-taak

ज्यावेळी माणसाला त्याचे विचार जसेच्या तसे इतरांना कळावेत आणि ते जसेच्या तसे संग्रहित करून ठेवावेत याची गरज निर्माण झाली त्यावेळी लिपीचा शोध लागला. माणूस त्याच्या मनात निर्माण होणाऱ्या भावभावना शिलालेखाद्वारे कायम स्वरूपात जतन करण्यात यशस्वी झाला, परंतु त्याला त्याचे म्हणणे दूरस्थ ठिकाणी पोचवण्याची गरज उत्पन्न झाली, त्यावेळी त्याने त्यासाठी द्रवरूप रंगाचा आणि नेण्या आणण्यासाठी व संग्रह करण्यासाठी वजनाने हलक्या अशा भूर्जपत्र किंवा तत्सम माध्यमाचा उपयोग सुरू केला. त्याचेच प्रगत रूप म्हणजे शाई, कागद किवा कापड. शिक्षणाचे महत्त्व कळून आल्यावर आणि त्याचा प्रसार होऊ लागल्यावर लिहिणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि त्यासाठी शाई, लेखण्या मोठ्या प्रमाणात लागू लागल्या. म्हणून त्या वस्तू बनवण्याचे तंत्रदेखील विकसित होत गेले.

जोपर्यंत लिखाण करण्याची गरज मर्यादित लोकांपुरती होती उदाहरणार्थ राजदरबारातील कारकून, हिशोबनीस, सावकारी पेढ्यांमधून काम करणारे मुनीम, गणिती-राशि भविष्य यांसंबधी आकडेमोड आणि लेखन करणारे यांना लेखन करण्यासाठी जी शाई लागत असे ती वनस्पतीपासून बनवलेली असे. वनस्पतीजन्य रंगापासून केलेले काळ्या रंगाचे द्रावण पातळ कापडातून गाळून घेतले जाई व त्याचा लिखाणासाठी शाई म्हणून वापर होत असे. अशा शाईचा लहान बुधला लेखनिकाच्या मेजावर असे. लेखणी म्हणून मोराचे किंवा इतर पक्ष्याचे पीस किंवा साळिंद्राच्या अंगावरील काट्याचा उपयोग केला जाई. वनस्पतीजन्य काळ्या रंगाची दाट शाई वाळण्यासाठी अधिक वेळ घेत असे. म्हणून ती मेजावर एका लहान लाकडी भांड्यात ठेवलेली असे. कागदावर पसरलेली सूक्ष्म बारीक वाळू त्या तयार मजकुरावर पसरून टाकत. ती वाळू लगेच परत त्याच भांड्यात पुनर्वापरासाठी ओतून ठेवत. ती काही काळानंतर बदलली जाई. शाई वनस्पतीजन्य असल्यामुळे, शाई ठेवलेल्या दौतीचा तळाशी साका जमत जाई. त्यामुळे ती शाईदेखील काही दिवसांनी परत गाळून पुनर्वापरासाठी घ्यावी लागे. बरीचशी ऐतिहासिक कागदपत्रे आणि महसूलाच्या नोंदी, ज्योतिषशास्त्राचे ग्रंथ अशा प्रकारे लिहिलेले आढळतील.

शिक्षणाचा प्रसार होत गेला आणि समाजातील अधिकाधिक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी लिहू-वाचू लागले. शाई-टाक या लेखनासाठी लागणाऱ्या प्रमुख साधनांमध्ये कालानुरूप सुधारणा होत गेली. कालौघात विद्यार्थी, शिक्षक, सरकारी, निमसरकारी कार्यालयांत काम करणारे लेखनिक आणि वरिष्ठ पदावरील अधिकारी, वकील, वैद्य, लेखक, गणिती वगैरे व्यावसायिक ज्यांना ज्यांना रोज लेखन करणे क्रमप्राप्त आहे अशांच्या टेबलांवर लेखनसामुग्री असणे आवश्यक होते. तेव्हा खाजगी कंपन्यांनी रासायनिक पद्धतीने शाई बनवण्याचे कारखाने काढले. शाई वेगवेगळ्या रंगांतदेखील तयार होऊ लागली- काळी, निळी, लाल, हिरवी आणि स्टँपपॅडसाठीची वेगळी शाई. सुरुवातीला, शाई पावडरच्या पुड्या बाजारात मिळत. त्या पुड्या पाण्यात घालून शाई तयार करता येत असे. नंतर शाईच्या वड्या मिळू लागल्या. लिखाणासाठी बोरू म्हणजे गवतवर्गीय वनस्पतीपासून तयार केलेली लेखणी वापरत. त्याची जागा कालांतराने धातूचे निब असलेल्या लाकडी लेखणीने म्हणजेच टाकाने घेतली. अक्षर जसे हवे त्या प्रमाणे निब वापरावे लागे. त्यासाठी सपाट टोकाचे निब, टोकदार निब आणि फाटा म्हणजे निब थोडे चपटे आणि टोकाशी रुंद आणि तिरके घासलेले असे. तरीही काही वर्षें अक्षर वळणदार येण्यासाठी पुस्ती लिहिण्याचा सराव करावा लागे. त्यावर लिहिण्याकरता बोरू वापरात होता. दरम्यानच्या काळात अगदी सुटसुटीत सहज खिशाला लावून कोठेही नेता येण्यासारखे शाईचे फाउंटन पेनदेखील बाजारात दिसू लागले होते. ते लिखाणासाठी आणि जवळ बाळगण्यासाठी सोयीस्कर होते. ते अशा त्याच्या बनावटीमुळे  लोकप्रियदेखील होत होते. त्याबरोबर टीपकागदाचीही गरज उरली नाही. कारण फाउंटन पेनमधील शाई लगेच वाळून जाते. बॉल पेनचा आविष्कार होईपर्यंत फाउंटन पेन सर्वदूर वापरले जाऊ लागले आणि त्याची जागा बॉल पेनने घेतल्यावर शाईचे फाउंटन पेनदेखील दुर्मीळ होत चालले आहेत. विद्यार्थ्यांना बॉल पेन वापरण्याची मुभा या शतकारंभी मिळाली. त्यापूर्वी बॉल पेन विद्यार्थ्यांसाठी वर्ज्य होते. त्यांना शाईचे पेनच लिखाणासाठी वापरावे लागत.

कोठल्याही कार्यालयात जवळ जवळ सत्तरच्या दशकापर्यंत संगणक भारतात येण्यापूर्वी सर्वसामान्य कारकुनापासून सर्वोच्चपदी असलेल्या व्यक्तींच्या समोर लेखनासाठी शाईची दौत, लेखणी म्हणून टाक आणि लिहून झालेल्या मजकूराची शाई सुकावी म्हणून टीप कागद असा सरंजाम मांडलेला असे. लेखन करणाऱ्या व्यक्तीच्या हुद्यानुसार त्या वस्तूंचा थाट बदलत जाई. सर्वसामान्य कारकुनाच्या टेबलावर चिनी मातीचा शाईचा लहान बुधला व टाक आडवा ठेवण्यासाठी लोखंडी स्टॅंड असे आणि टीपकागद किंवा ब्लॉटिंग पेपरचा चतकोर. साहेबांच्या टेबलावर मात्र दोन खणांची  पारदर्शक काचेची शाईदाणी असे. तिच्या एका खणात निळी शाई आणि दुसऱ्या खणात लाल रंगाची शाई. लाल, निळ्या शायांसाठी वेगवेगळे टाक असत. ते एका नक्षीदार छोट्या घोडीवर (दुमडून ठेवण्याची छोटी उतरंड) आडवे ठेवण्याची सोय असे. शाई वाळायला थोडा अवधी लागे, म्हणून लिहून झालेला मजकूर लगेच टिपण्यासाठी अर्धगोलाकार आकर्षक ब्लॉटिंग पेपर लावलेले ब्लॉटिंग पॅड असे किंवा टेबलवर पसरलेला नक्षीदार कोन असलेल्या एका पॅडमध्ये मंद गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचा टीपकागद पसरलेला असे. वापर जसजसा वाढत गेला तशा तशा या सर्व वस्तू वेगवेगळ्या आकर्षक रूपात बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. अधिकाऱ्याच्या हुद्यानुसार त्या टेबलावर मांडल्या जात. त्या सर्व वस्तू म्हणजे दौती, टाक आणि टीपकागद कालांतराने बदलावे लागत. शाई दौतीत नव्याने भरावी लागत असे, टाकाची निबे लिहून लिहून घासली गेल्याने खराब होत, त्यामुळे ती बदलावी लागत आणि टीपकागदावर वारंवार मजकूर टिपत गेल्यामुळे तोदेखील डागाळून जाई. लेखनसाहित्य बदलण्याचे काम कार्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यावर सोपवलेले असे. लेखनसाहित्य बहुतेक सोमवारी प्रत्येक टेबलावर बदलले जाई.

वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी छप्पन-सत्तावन सालापर्यंत शाई आणि टाक रोज शाळेत घरून आणावा लागत असे. विद्यार्थ्यांकरता टीपकागद त्यांच्या कंपासपेटीत इतर साहित्याबरोबर दिला जात असे. विद्यार्थी शाईच्या लहान बाटलीस दोऱ्यांनी शिंकाळे तयार करून ती हाताच्या बोटात पकडून शाळेत जात. वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस असत. त्याला शाईची बाटली ठेवण्यासाठी गोल आकाराची खाच आणि टाक ठेवण्यासाठी आडवी खाच कोरलेली असे. आता गोष्टी पेपरलेस सोसायटीच्या आहेत. तेथे या गोष्टींना स्थान नाही. बॉल पेन केवळ सही करण्यापुरते गरजेचे आहे. सहीदेखील अनके कागदांवर बिनमहत्त्वाची आहे असे म्हणायला हरकत नाही.

– मोहन गद्रे
gadrekaka@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. खूप छान माहिती
    खूप छान माहिती.

Comments are closed.

Exit mobile version