भाषा, लिपी आणि वास्तवाची जाणीव

0
22
हिब्रू भाषेची मूळाक्षरे

मी ‘हे युनिकोड’ हे शब्द ‘विंडोज वर्ड’मधल्या देवनागरीत इन्स्क्रिप्टच्या कळपाटावर (किबोर्ड) लिहायला सुरुवात केली. मी लिहिण्याच्या ओघात, अभावितपणे संगणकावर देवनागरी उमटवायच्या वेगळ्या, इंग्रजी मुळाक्षरांवर आधारित प्रणालीमधील कळा वापरल्या, तेव्हा  ‘पा हलगमद्’ अशी अनाकलनीय अक्षरं उमटली. आपल्या ध्वनिचित्र स्वरूपी, तुकडे जुळवून बनवलेल्या गोधडीसारख्या लिखाणात एका तर्‍हेच्या लिपीबदलाची ही चुणूक होती. देवनागरीत टंकलेखन करणार्‍या सगळ्यांच्या वाट्याला हा अभावितपणा येत असणार.

मग मी मराठीला जरा वेळ बाजूला ठेवून हिब्रू भाषेचा भाषा, लिपी वगैरे दृष्टींनी विचार केला, माहिती मिळवली, तर काही मजेदार गोष्टी ध्यानात आल्या. अर्थात हा माझा शोध माझं स्वतःचं त्या भाषेचं अज्ञान आणि माझ्या संपर्कातल्या मूठभर लोकांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारलेला आहे. हे नवशिक्यानं साबुदाण्याची खिचडी चॉपस्टिक्सनी खाऊन स्वादविश्लेषण करण्यासारखं आहे.

हिब्रू लिपी उजवीकडून डावीकडे, स्वर वगळून लिहिली जाणारी आहे. व्यंजनसमूहांचा उच्चार संदर्भाप्रमाणे स्वर मिसळून करायचा; विरामचिन्हंही नंतर आली. हिब्रू लिपी काय व भाषा काय, दोन्ही आहेत अतिप्राचिन, पण अर्वाचिन वापरासाठी काहीशा पुनरुज्जीवित, पुनःप्रस्थापित होत असलेल्या. आज, या स्वरूपातील हिब्रू भाषा वापरणार्‍या लोकांची दुसरी किंवा तिसरीच पिढी आहे, त्यांची भाषिक आणि सांस्कृतिक मुळं एकशेएकोणीस वेगवेगळ्या देशांत पसरलेली आहेत. पूर्वी जेव्हा ज्यू जनांचा प्रवाह इस्रायलकडे लोटत होता तेव्हा निर्विवादपणे, आणि आजही मोठ्या प्रमाणात, अशा नवख्या स्वकीयांना हिब्रू भाषा आणि इस्रायली संस्कृती शिकवायचं काम करते ती तिकडची सैन्ययंत्रणा. इस्रायलमध्ये सक्तीचं लष्करीकरण आहे. प्रत्येक इस्रायली तरुण सैन्यात काही वर्षं काढूनच पोटापाण्याला किंवा उच्च शिक्षणाला लागतो, अगदी कालपरवा इस्रायलमधे दाखल झालेला असला तरी. इस्रायलमध्ये एकशेएकोणीस देशांमधून आलेल्या ज्यूंना जोडणारं समान सूत्र हिब्रू भाषा हेच आहे. विविध देशांमधून आलेल्या या माणसांच्या अठरापगड मूळ भाषांचे थर पार करून, वेगवेगळ्या वकुबाच्या तरुण माणसांना कमीत कमी वेळात हिब्रू शिकवणं ही सैन्यासमोर फारच अवघड अशी कामगिरी असते. शिवाय त्यांना तरुणांना किमान रणसिद्ध करण्याची जबाबदारीदेखील उचलावी लागते. हिब्रू भाषेतून एकात्मता आणि किमान रणसिद्धता साधणं हे जयपराजयात निर्णायक ठरू शकतं. ती जबाबदारी लष्कराची. त्यांनी मग किमान रणसिद्धतेसाठी आवश्यक शब्दांचा लघुत्तम साधारण कोष ठरवून त्याचा वापर अनिवार्य केला आहे. नवनवे शब्द येतात ते लष्कराच्या टांकसाळीतून. लष्कर ही तिकडची सर्वात महत्त्वाची शाळा आहे. ती मधूनमधून लढायाही जिंकते!

अशा पार्श्वभूमीमुळे प्रचलित हिब्रूमधे विशेषणं, लक्षणं, दृष्टांत सूचक निर्देश तसे कमीच. कविता असतात, पण यमकासारखी गेयसाधनं नाहीत. जाहिरातींमधे किंवा सार्वजनिक सूचनाचित्रांमधे ढोबळपणा बेसुमार. सर्वसामान्यांची शब्दसंपत्ती, संवादक्षमता निःसंदेह पण मर्यादित- इतकी की बर्‍याच लोकांना घरात एकमेकांचे विनोद समजतच नाहीत!

हे सगळं फार चिंताजनक आहे असं मानणारा एक वर्ग तिकडे आहे आणि त्‍यापैकी काही प्रज्ञामानसशास्त्रज्ञ त्याचं मूळ शोधताहेत ते थेट मानवी मेंदुरचनेत. ते म्हणतात की मेंदूचा डावा भाग हा भाषेतली सुसंगतता, तर्कशुद्ध विचारक्षमता, व्याकरण अशा गोष्टींशी संलग्न असतो, तर मेंदूचा उजवा भाग उच्चारण, हेल, संदर्भआकलन अशा गोष्टींशी. हिब्रू मुळात उजव्या मेंदूअर्धकाशी निगडित, संदर्भप्रधान भाषा. ती इंग्रजी, रशियन किंवा मराठी यांच्याप्रमाणे वेगवेगळी एककं नियमबद्धतेनं जुळवून त्यातून अर्थ दर्शवणारी डाव्या मेंदूअर्धकाशी निगडित भाषा नव्हे. परंतु इस्रायलमध्ये ती गेली आहे इंग्रजी, रशियन अशा, डाव्या मेंदूअर्धकाशी निगडित भाषांमध्ये ज्यांची विचारमुळं आहेत अशा लोकांच्या कह्यात.      इस्रायलमधे वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या लहानलहान जनसमुहांच्या आपापसात बोलायच्या खासगी बोली खूपच आहेत. ते समूह हिब्रू शिकतात तेव्हा त्यांच्या हिब्रूमध्ये त्यांच्या मूळ भाषेचे वळण येते. त्यामुळे वेगवेगळ्या जनसमुहांमधील परस्परसंवाद अवघड बनतो. हा अंतर्विरोध तीव्र आहे. इस्रायलच्या भौगोलिक आणि पर्यायानं राजकीय अस्तित्वाचा तीन हजार वर्षं जुना प्रश्न या तर्‍हेनं भाषा आणि लिपी यांच्याशी संबंधित प्रश्न बनत चालला आहे.

ऋचा गोडबोले – भ्रमणध्वनी : 9819321852,

इमेल : rcagodbole@gmail.com

About Post Author