Home वैभव गावांच्‍या अंतरंगात भारतातील एकमेव सांदण दरी!

भारतातील एकमेव सांदण दरी!

_Sandan_dari_1.jpg

नगर जिल्‍ह्याच्‍या पश्चिम घाटातील सांदण दरी हा एक आगळावेगळा भू-आकार आहे. ती त्‍या प्रकारची भारतातील एकमेव तर आशिया खंडातील क्रमांक दोनची दरी समजली जाते. तशी पाटी ‘महाराष्ट्र वनविभागा’ने तेथे लावली आहे. परंतु दऱ्यांचे नंबर वन-नंबर टू वेगवेगळ्या प्रकारे – म्हणजे लांबी, रुंदी, खोली अशा – वर्णन केले जातात व त्यांवरून दरीची भव्यता लक्षात येते, इतपतच नंबराचे महत्त्व. जमिनीला पडलेली दीड किलोमीटर लांबीची मोठी घळ म्‍हणजे ती सांदण दरी. स्वाभाविकच, सांदण दरीची लांबी पंधराशे मीटर असून रुंदी दरीच्या बाजूला पन्‍नास मीटर तर उगमाच्या बाजूला चार मीटर इतकी आहे. दरीची खोली अंदाजे शंभर ते दीडशे मीटर असावी. ती दरी एवढी अरूंद आहे, की दरीत काही ठिकाणी सूर्यप्रकाशदेखील पोचत नाही. दरीला ‘सांदण’ या नावाने ओळखले जाते, त्‍याचे कारण त्‍या दरीचा आकार – तेथे जणू दोन डोंगरांचे कडे एकमेकांना सांधले (जोडले) जातात. तसे दृश्‍य तेथे दिसते. दोन उंच कडे एकमेकांच्या जवळ आणून ठेवलेले दिसतात. सांदण दरीचे स्‍वरूप पाहून ती दरी कशी तयार झाली असावी हा प्रश्‍न थक्क करतो. ती दरी प्रस्तरभंगामुळे किंवा प्रचंड झिजेमुळे तयार झाली असावी असा तर्क आहे. दरी ‘बसॉल्‍ट’ खडकासारख्‍या ‘हार्ड रॉक’पासून तयार झाली आहे.

सांदण दरी नगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यामधील भंडारदरा धरणाच्‍या परिसरात आहे. नाशिकवरून मुंबई महामार्गाने पुढे गेल्यानंतर घोटी गाव लागते. तेथून भंडारदरा धरणापासून उजवीकडे धरणाला वळसा घालून घाटघर रस्त्याने पुढे जावे लागते. तेथे छोटे घाटघर धरण आहे. धरणापासून डावीकडे वळण घेतल्‍यानंतर सामरद हे छोटे खेडे लागते. सामरद गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतर पायी गेल्यावर सांदण दरीला सुरुवात होते.

दरीच्या सुरुवातीला पाण्याचा झरा लागतो. त्‍या झ-याचे पाणी वर्षभर आटत नाही असे सामरदचे गावकरी आणि ट्रेकर्स सांगतात.

सांदण दरीच्या तळभागात मोठमोठे दगड गोटे आहेत. त्‍यातून वाट काढत काढत दरीतून पुढे जावे लागते. दरी वळणे घेत पुढे जाते. आत प्रवेश केल्‍यानंतरचा भाग जमिनीच्‍या पातळीपेक्षा खाली असल्‍याचे जाणवते. म्‍हणूनच दरीत फिरत असताना पृथ्‍वीच्‍या भूगर्भात आल्याचा भास काही वेळा होतो. दरीतून चालत असताना दोन्‍ही बाजूंला उंच ताशीव कडे दिसतात. त्‍यांच्‍या उंचीमुळे ते कडे अंगावर कोसळतील की काय अशी भीती मनात सतत असते. वर आकाशाचा लहानसा तुकडा दिसत राहतो.

दरीतून पुढे जाताना लहानसा डोह आडवा येतो. तो बारा ते तेरा फूट लांब असून दीड फूट खोल आहे. त्‍यात पावसाळ्यात गार पाणी असते. त्‍या दिवसांत शेवाळलेल्‍या दगडांवरून चालणे कठीण जाते. त्‍या परिसरात सरपटणारे प्राणी दृष्‍टीस पडतात. त्‍यापुढे तीव्र उतार आहे. तेथून दरी अधिक अरूंद होत जाते. सुरूवातीला दरीच्‍या सौंदर्याची पडलेली भुरळ दूर होऊन तिचे अक्राळविक्राळ स्‍वरूप प्रगट होऊ लागते.

सांदण दरीच्या शेवटच्या टोकाजवळ प्रचंड खोल कडा आहे. तो कडा अर्धगोलाकार आहे. तेथे पावसाळ्यात कधी कधी अचानक ढग किंवा गहिरे धुके दाटून येते आणि चार-पाच फूटांवरील दृश्‍यदेखील दिसेनासे होते. त्‍या परिस्थितीत पाय घसरून दरीत पडण्याची भीती वाटते. त्‍या दिवसांत तेथे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असतो. ती दरी कोरड्या ऋतूत पाहणे इष्‍ट. तेथे राहण्याची कोठलीही सुविधा नाही. जाताना खाण्‍याचे सामान आणि पाणी सोबत घेऊन जावे लागते.

पावसाळ्यात कड्यावरून दिसणारे दृश्‍य नयनरम्‍य असते. तेथे कड्याच्‍या एका बाजूने वाहणारा गीरनी/गीरना धबधबा दृष्‍टीस पडतो. त्‍या कड्यावर उभे राहून मोठ्याने बोलल्‍यास आवाजाचा प्रतिध्वनी निर्माण होतो आणि काही वेळाने स्‍वतःचाच आवाज ऐकू येतो. अशा प्रकारे ‘एको साउंड’ची मजा अनुभवता येते. दरी बघून त्याच मार्गाने परत यावे लागते. संपूर्ण दरी फिरण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात.

सांदण दरीमध्‍ये एअरटेल कंपनीने ‘फोर जी’ची जाहिरात चित्रित केली होती. सांदण दरीत भर पावसाळ्यात जाणे सुचवण्‍याजोगे नाही.

नाशिक ते सांदण दरी हे अंतर ऐंशी ते पंच्‍याऐंशी किलोमीटर आहे. दरी भंडारद-यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. त्‍या रस्त्याने जाताना कळसुबाई, अलंग, मलंग, मदन, कुलंग, रतनगड, हरिश्चंद्रगड अशा उंचच उंच, एकापेक्षा एक सरस डोंगररांगा दिसतात. सांदण दरीचा परिसर कळसुबाई आणि हरीश्चंद्रगड अभयारण्याचा आहे.

– प्रा. एस आर निकम, 9421106531

About Post Author

6 COMMENTS

  1. असा आगळा वेगळा निसर्गातील…
    असा आगळा वेगळा निसर्गातील अनुभव घेणे आवश्यक आहे कारण अनुभवानी जीवन समृद्ध होते.

  2. अप्रतिम ,…
    अप्रतिम ,
    महाराष्ट्राला निसर्गाने खूप भरभरून दिले आहे, आणि त्याची जपणूक आपणच करायची आहे ,
    अप्रतिम लेख

  3. Vegveglr bhuakar pahnyachi…
    Vegveglr bhuakar pahnyachi majja ani aavad lekhatun nirman hote…..such a nice information..

  4. निसर्गाच्या या अविष्काराला…
    निसर्गाच्या या अविष्काराला जवळून बघण्यासाठी या लेखाचा चांगला उपयोग होतो

Comments are closed.

Exit mobile version