ऊस लागवडीचे देशातील वीस टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. ऊसाची मळी आंबवून त्यातील साखरेचे मद्यार्कात रूपांतर करतात. त्यांपासून अल्कोहोल, डिनेचर्ड स्पिरिट, इथेनॉल यांची निर्मिती होते. इथेनॉल पेट्रोल-डिझेलसारख्या इंधना बरोबर वाहनांसाठी वापरता येते…
ऊस लागवडीचे देशातील वीस टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. साखरेच्या उत्पादनात देशात महाराष्ट्राचा वाटा पस्तीस टक्के आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू ही राज्येही उत्पादनात अग्रेसर आहेत. ऊसापासून साखर हे साखर उद्योगाचे प्रमुख ध्येय. ऊसात साखर फक्त चौदा ते पंधरा टक्के असते. त्याखेरीज बगॅस तीस टक्के, मळी चार टक्के, प्रेसमड दोन टक्के आणि पाणी पन्नास टक्के असते. त्या घटकांचा वापर पुरेपूर केल्यास साखरउद्योग किफायतशीर होऊ शकतो. (सह) वीजनिर्मितीसाठी बगॅस वापरतात. बगॅस (उसाच्या चिपाडावर आधारित सहवीजनिर्मिती) कागदनिर्मिती, पार्टिकल बोर्ड, पशुखाद्य, खते, शोभेच्या वस्तू इत्यादींसाठीही उपयुक्त आहे; पण बगॅस (सह)वीजनिर्मितीसाठी वापरणे जास्त हितकर आहे. त्यासाठी उच्च दर्जाचे बॉयलर आणि टर्बाईन वापरावे लागते. त्यामुळे जास्त वाफ निर्माण होते. असा वापर करून बिगरहंगामी (सह)वीजनिर्मिती करता येते. कारखाने विजेची स्वत:ची गरज भागवून राहिलेली वीज विकू शकतात. महाराष्ट्रात अडुसष्ट कारखान्यांत साधारण साडेअकराशे मेगॅवॉट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प आहेत.
संबंधित लेख – ऊस शेती किमया तीन ‘एफ’ची
मळी ऊसगाळपानंतर प्रतिटन चाळीस-पन्नास किलो (चार-पाच टक्के) बाहेर पडते. तिच्यात पन्नास टक्के साखर असते. ती वेगळी करता येत नसल्याने मळी आंबवून तिच्यातील साखरेचे मद्यार्कात रूपांतर करतात. डिस्टिलेशन युनिट्स (आसावनी) राज्यात 2019 पर्यंत चौऱ्याहत्तर कारखान्यांत होत्या. आसावनीमध्ये मद्यार्क वेगळा करतात. त्यांपासून अल्कोहोल, डिनेचर्ड स्पिरिट, इथेनॉल यांची निर्मिती होते. मद्यार्कापासून देशी दारू, एक्स्ट्रॉन्यूट्रल अल्कोहोल येथपासून उच्च प्रतीचे मद्य आणि डिनेचर्ड स्पिरिटपासून इथेनॉल निर्माण करतात. एका टनातील चाळीस किलो मळीपासून बारा लिटर इथेनॉल मिळू शकते. डिनेचर्ड स्पिरिट हे औद्योगिक वापरासाठी, तर इथेनॉल पेट्रोल-डिझेलसारख्या इंधना बरोबर वाहनांसाठी वापरता येते. वाहने केवळ इथेनॉलवरही धावू शकतात (इथेनॉलवर चालणारी ग्रीन- बस नागपूर मध्ये धावत आहे). इंधन समस्या आणि पर्यावरण सुरक्षितता या संदर्भात हासुद्धा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
सरकार इथेनॉल बनवण्याची यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी अल्प दराने पंच्याऐंशी टक्के कर्ज पुरवणार आहे. त्यामुळे यंत्र खरेदीच्या खर्चाचा प्रश्न सुटेल. ब्राझिलने इथेनॉल उत्पादन सुरू झाल्यावर साखरेचे उत्पादन प्रचंड वाढल्याने पर्याय म्हणून ऊस साखरनिर्मितीसाठी न वापरता थेट इथेनॉलनिर्मितीसाठी वापरण्याचे धोरण अंमलात आणले आहे. भारतातही या पर्यायाचा विचार होण्यास हवा. त्यामुळे साखरेच्या अतिरिक्त साठ्याचा प्रश्न सुटून नुकसान टळू शकेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यातून आधार मिळेल.
– आ.श्री. केतकर 8275869042 aashriketkar@gmail.com
—————————————————————————————————————-