भानगडवाडीचे झाले शिवाजीनगर!

0
43
_BhangadvadiZale_Shivajinagar_1.jpg

गावाची ओळख ही तेथील लोकांच्या वागणुकीवरून बनते. उदाहरणार्थ शिस्तप्रिय, वक्तशीर पुणेकर, घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणारे मुंबईकर! रोज भानगडी करणा-या आणि भांडणाऱ्या लोकांचे भानगडवाडी हे गाव. पण बचतगटाच्या माध्यमातून तेथील स्त्रियांनी भानगडवाडीचे फक्त नाव बदलले नाही तर त्यासोबत लोकांची मानसिकताही बदलली. गावाचा सामाजिक आणि आर्थिक विकाससुद्धा साधला! त्यामुळे पूर्वीची भानगडवाडी नावाचे गाव हे आता ‘शिवाजीनगर’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. नकाशावर शिवाजीनगर अशी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात मोलाचा वाटा आहे तो तेथील स्त्रीशक्तीचा.

नाशिक शहरापासून जवळ असलेल्या जानोरी गावाला जाताना उजव्या हाताला शिवाजीनगर नावाची छोटीशी वस्ती लागते. वस्तीत सुमारे शंभर घरे आहेत. त्या वस्तीचे चित्र काही वर्षांपूर्वी वेगळे होते. झोपडपट्टीवजा घर, मजुरीत मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांचा ताण, लोक दारूच्या व्यसनात डुंबलेले, सतत होणारी भांडणे, पर्यायाने बायकोला केली जाणारी मारहाण. या सगळ्या गोष्टींमुळे वस्तीवर रोज भानगडी आणि भांडणे ठरलेली. मुला-मुलींच्या शिक्षणाबद्दल प्रचंड अनास्था. मुलगा बारा-तेरा वर्षाचा झाला, की बापाचे बघून तोही दारू पिण्यास लागे. एकूणच निरक्षरता, व्यसनाधीनता आणि प्रचंड गरिबी.. वस्तीची अशी दयनीय अवस्था होती. ‘महिला आर्थिक विकास महामंडळा’ने वस्तीत बचतगटाचे काम 2005 मध्ये हाती घेतले. सुरुवातीला सहयोगिनी सुरेखा लोखंडे यांनी महिलांशी बोलणे सुरू केले. मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. उलट, त्यांना वस्तीतून हाकलून देण्यात आले. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. त्या महिलांशी सातत्याने बोलत राहिल्या. त्यांनी बैठका घेतल्या. बचतगटाचे महत्त्व सांगितले, शेवटी भानगडवाडीतील अकरा महिला एकत्र आल्या. त्यांनी ‘तिरंगा’ नावाने महिला बचतगट स्थापन केला. त्यांनी प्रत्येकी पन्नास रुपयांची बचत करत बँकेत खाते उघडले. बँकेकडून वीस हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यातून कोंबडीपालनाचा व्यवसाय सुरू केला. कोंबड्या विकत घ्यायच्या, त्यांचे पालनपोषण करायचे. अंडी विकून त्यातून उत्पन्न मिळू लागले. नंतर त्यांनी बँकेचे कर्ज फेडले. त्यांनी त्या व्यवसायामध्ये यश मिळाल्यानंतर ‘शेळीपालन’ सुरू केले. त्यासाठी पुन्हा बँकेकडून दोन लाखांचे कर्ज घेतले. प्रत्येकी दहा बकऱ्या-बोकड विकत घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. त्यांना बोकडांची विक्री करून चांगला पैसा मिळतो. साधारणपणे एक बोकड चार हजार रुपयांना विकला जातो. स्त्रियांचा व्यवसायात चांगला जम बसला आहे. प्रत्येकीकडे वीस शेळ्या आहेत. त्याशिवाय कोकरू आणि बोकडसुद्धा आहेत. बचतगटाने सगळ्या बकऱ्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी पगारी गुराखीसुद्धा ठेवला आहे. तो शेळ्यांना चरायला घेऊन जातो. स्त्रियांचे नियोजन जमीन विकत घेण्यासाठी सुरू आहे. जमीन घेऊन तेथे चारा-पिकाची शास्त्रोक्त पद्धतीने जोपासना करून शेळीपालन करण्याचा त्यांचा मानस आहे.

महिलांच्या हातात बचतगटाच्या माध्यमातून पैसा येऊ लागला. त्यांचा आत्मविश्वास वाढला. मग त्यांनी वस्ती विकासात लक्ष द्यायचे ठरवले. बचतगटाच्या ‘लक्ष्मी मावशी’ सर्व कार्यात सदैव आघाडीवर असतात. सर्व स्त्रिया पूर्वी झोपड्यांमध्ये राहत होत्या. ‘इंदिरा आवास योजने’अंतर्गत त्यांच्या घरांना मंजुरी मिळाली खरी, पण अधिकारी कामांमध्ये दिरंगाई करत. बचतगटाने घरांसाठी लढण्याचे ठरवले. ग्रामसभेत ठराव मांडून तो मंजूर करून घेतला. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरची भेट घेतली. तरी काही घडले नाही, तेव्हा त्यांनी गावसभा समितीला हाताशी धरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. त्यात परिस्थिती नमूद केली आणि शेवटी, वरिष्ठांकडून दबाव आणून घरांसाठीचा मार्ग मोकळा करून घेतला.

त्यांनी व्यवसाय आणि घर एकीच्या बळावर मिळवल्यानंतर घरातील पुरुषांना सुधारण्यासाठी कंबर कसली. सगळ्या जणींनी एकत्र येऊन दारूबंदीसाठी लढा देण्याचे ठरवले. त्यांनी जानोरी गावातील बचतगटांना त्यात सहभागी करून घेतले.

बचतगटांचा दबदबा वाढू लागला तसा, ग्रामपंचायतीवर दबाव टाकून याच महिलांनी गावात दारूबंदी आणली. त्यांनी ‘आम्ही मार खाणार नाही आणि नवऱ्याला दारू पिऊ देणार नाही’ असा कडक पवित्रा घेतला. नवऱ्याने एखाद्या महिलेला मारले, की सगळ्याजणी एकत्र येत. महिलांचा मोठा मोर्चा लक्ष्मीमावशीच्या नेतृत्वाखाली निघे. सार्याा महिला हातात लाठ्या-काठ्या घेऊन पीडित महिलेच्या घरी पोचत. ‘तू जर बायकोला मारलेस तर आम्ही तुला मारू’ अशी थेट धमकीच या महिला देत असत. त्या नंतरही नाही ऐकले तर लक्ष्मीमावशीच्या काठीचा प्रसाद त्या नवरोबाला मिळे. महिला थेट ‘हिला तुझी गरज नाही, आम्ही तिला सांभाळू’ अशी निर्णायक भूमिका घेत. त्यामुळे पुरुष मंडळी दबावगटाला घाबरू लागली. त्यांच्या दारू पिण्यावर वचक बसू लागला. त्यांनाही सगळ्या जणींना एकत्र पाहून भीती वाटू लागली. एकदा तर लक्ष्मीमावशीच्या मुलानेच बायकोला मारले. त्याचे लग्न नुकतेच झाले होते. लक्ष्मीमावशीने स्व:ताचा मुलगा असला तरी, त्याला पाठीशी न घालता  आक्रमकच भूमिका त्यावेळी घेतली. तिने मुलाला ‘हिला मारलं तर घरातून तुला हाकलून देईन’ असा दम दिला. नंतर बायकोला मारल्याने कुटुंबाचीच नाही तर वस्तीचीसुद्धा बदनामी होते असे समजावून सांगितले.

बचतगटाचे आरोग्य तपासणी शिबिर सुरू होते. त्यावेळी शिबिर उधळून देण्याचा प्रकारही घडला होता. काही नवरोबा बायको बचतगटाच्या कामात सहभागी होते हे बघून चिडले होते. त्यांनी शिबिर भरलेल्या ठिकाणी जाऊन, दारू पिऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शिव्या देऊ लागले. त्यांनी खुर्ची-टेबल आदी वस्तूंची फेकाफेक आणि मोडतोड सुरू केली. एकूणच धिंगाणा सुरू झाला. त्यावेळी सगळ्या स्त्रियांनी मिळून त्या दारुड्या नवऱ्यांचा  समाचार घेतला. त्यांना गावासमोर चोपून काढले. महिलांचे ते रौद्र रूप पाहून गावातील पुरुष मंडळी घाबरून गेली. त्यांच्या लक्षात आले, ते दारू प्यायले तर त्यांची गतही तशीच होईल. त्यांनी वस्तीतील बचतगटाचे रूपांतर दबावगटात होताना प्रत्यक्ष बघितले. बचतगटाने दबाव तंत्राचा यशस्वी अवलंब करून भानगडवाडीचे अवघे रूप पालटून टाकले. त्यांनी भानगडवाडीचे नामांतर शिवाजीनगर असे 2009 मध्ये केले.

सरकारने तिरंगा बचतगटाला ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ दिला आहे.

बचतगटाने वस्ती सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, कुटुंब नियोजन, सार्वजनिक शौचालय, स्त्री-भ्रूण हत्याविरोध, साक्षरता या क्षेत्रांतही कामे केली आहेत. गटातील सर्व महिलांनी अक्षरओळख करून घेतली आहे. त्या इंग्रजी भाषेतून सह्या करतात. वस्तीत जन्माला येणाऱ्या मुलींचा जन्मदिवस खास साजरा केला जातो. महिला कुटुंब नियोजनासाठी आग्रही आहेत. गटाच्या दोन महिलांची जानोरी गावाचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली आहे.

– मेघा वैद्य

मूळ प्रसिद्धी – लोकसत्ता- ‘चतुरंग ‘ पुरवणी/शनिवार, १० मार्च २०१३ वरून

About Post Author

Previous articleगेट वे ऑफ इंडिया
Next articleपेशवाई थाट!
मेघा जगदीश वैद्य या नाशिकच्या रहिवासी आहेत. त्या 'दैनिक तरुण भारत'च्या मुंबई आवृत्तीमध्ये 'संवाद' या सदरात काम करतात. त्या सोबतच नाशिकच्या एच.पी.टी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागात शिकवतात. त्यांनी 'ई टीव्ही मराठी' वाहिनीत बुलेटीन प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. लोकप्रभा, भवताल या मासिकांसाठी लेखन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9922367563