सह्याद्रीच्या कुशीत अनेक ट्रेकिंग पॉईण्टस आहेत. त्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सचा, दुर्गवेड्यांचा ‘विक पॉईण्ट’. ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या त्या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे, कातळ शिल्पे, खोल दऱ्या, उरात धडकी भरवणारे उभे कडे, समृद्ध वनसंपदा, प्राचीन वास्तू कलेचे दर्शन घडवणारी देखणी मंदिरे, लेणी समूह…
सह्याद्रीत अनेक कोकणकडे आहेत, परंतु हरिश्चंद्र गडाचा हा थोरला कडा म्हणजे सृष्टीला पडलेले सुंदर स्वप्नच जणू! देशभरात अत्यंत दुर्मिळ दिसणाऱ्या वर्तुळाकार इंद्रधनुष्याचा (इंद्रवज्र) अद्भुतरम्य देखावा काही दुर्गवेड्यांनी तेथे पाहिला आहे. म्हणूनच तो गड हा एक अनमोल ठेवा आहे.
एकेकाळी अतिशय दुर्गम व लोकवस्तीपासून दूर असलेल्या हरिश्चंद्रगडाने महायोगी संत चांगदेवापासून निसर्गवेड्या मिलिंद गुणाजीपर्यंत अनेक दुर्गवेड्यांना, हौशी पर्यटकांना मोहित केले आहे. वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, भूगर्भशास्त्रवेत्ते, भाषा अभ्यासक, धाडसी गिर्यारोहक, विरक्त योगी आणि सामान्य श्रद्धाळू असे कितीतरी जण त्या गडाच्या प्रेमात पडले. तो गड पाचव्या शतकातील त्रेकुटक व कलचुरी राजघराण्याच्या कारकिर्दीपासून प्रसिद्ध आहे. स्कंद, अग्नी व मत्स्य पुराणात त्याचा उल्लेख आहे. इंग्रजी सैन्यातील अधिकारी कर्नल माकिनटोशच्या फौजेने मराठेशाहीच्या अखेरच्या युद्धात मे १८१८ मध्ये गड काबीज केला. त्याने किल्ल्याच्याही अवघड वाटा, पाण्याची टाकी, तटबंदी उध्वस्त केली. मात्र त्याने हरिश्चंद्रेश्वराचे देखणे मंदिर व लेण्यांना धक्का लावला नाही. गेल्या काही वर्षात ऊन, वारा, पाऊस या बाह्य कारणांनी मात्र त्या प्राचीन वास्तूच्या वैभवास सुरुंग लावले आहेत. मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. कळसापर्यंत पंचावन्न ते साठ फूट उंचीच्या मंदिराच्या भिंतीवर पायऱ्यांवर आकर्षक व शैलदार कोरीव काम केलेले आहे. सभामंडपाच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेशमूर्ती असून, मूर्तीच्या वरील बाजूस देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव मंदिराच्या प्रांगणाला बंदिस्त करण्यासाठी प्राकाराची भिंत बांधलेली आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन ऐसपैस गुहा आहेत. त्यातील एका प्रशस्त गुहेच्या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितले जाते. तेथेच चांगदेवांनी ‘तत्त्वसार’ या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली. मंदिर परिसरातील शिलालेख त्याची साक्ष देतात. शेजारील गुहेत विठ्ठल – रुख्मिणीची मूर्ती वारकरी सांप्रदायाच्या संदर्भाने मनात कुतूहल निर्माण करते. गुहेलगत पाण्याची दोन टाकी आहेत. भिंतीशेजारून एक प्रवाह उत्तरेकडे उताराच्या दिशेने वाहत जातो. त्या प्रवाहाला चांगदेवांनी ‘मंगळगंगा’ म्हटले आहे. प्रवाहावर पुलासारखे बांधकाम असून तेथूनच पूर्वेकडून मंदिरात प्रवेशता येते. त्या वास्तुवैभवाला बाह्यकारकांची जणू दृष्ट लागली असून, कालौघात प्राकाराची भिंत व मंदिराच्या पश्चिम बाजूची मोठी पडझड झाली आहे. त्यातील काही दगड मंगळगंगेच्या वेगवान प्रवाहाबरोबर घरंगळत लांबवर गेले आहेत.
मंदिराच्या उत्तरेला घारापुरीच्या लेण्याची आठवण करून देणारी भव्य गुंफा आहे. ते केदारेश्वराचे लेणे. गुहेत चौथऱ्यावर भव्य शिवलिंग आहे. त्याच्या चारही बाजूंला बारा महिने थंडगार पाणी असते. चौथऱ्याच्या चार कोपऱ्यांवर छतापासून कोरलेले खांब असले तरी त्यांपैकी तीन पूर्णपणे तुटले आहे. त्यांचा अर्धवट भाग लोंबकळत आहे. लेण्याच्या दर्शनी बाजूच्या कोरलेल्या खांबांपैकी तीन खांबांवर अस्पष्ट शिलालेख दिसतात.
मंदिराच्या पूर्वेला हेमाडपंथी वापी म्हणजेच सप्ततीर्थ (सर्वतीर्थ) आहे. त्या प्रशस्त तीर्थकुंडात डिसेंबरअखेरपर्यंत पाणी असते. कुंडांच्या दक्षिणेला चौदा देवळ्यांमध्ये चौदा विष्णुमूर्ती विराजमान होत्या. देवालयाची व या बांधीव तीर्थकुंडाची मोठी पडझड झाली. तेथील काही विष्णुमूर्ती गायब झाल्या तर उर्वरित विष्णुमूर्ती मंदिरामागील गुहेत अस्ताव्यस्त पडल्या आहेत. तीर्थकुंडासमोर छोटेखानी मंदिर असून, ते काशितीर्थ नावाने ओळखले जाते. मंदिरासमोर अपूर्ण शिल्प आहे. त्याचा अर्थबोध होत नाही. मंदिराचीदेखील मोठी पडझड झाली आहे.
तारामती शिखराच्या उत्तरेला पायथ्याशी नऊ लेण्यांचा समूह आहे. त्या लेण्यांच्या दर्शनी बाजूच्या चौकटीवर गणेशमूर्ती कोरलेल्या आहेत. अभ्यासकांच्या मते ही लेणी दहाव्या किंवा अकराव्या शतकातील असावीत. समूहातील दुसरे लेणे आकाराने सर्वात मोठे आहे. तिसरी गुंफा अपूर्ण अवस्थेत आहे. त्या गुंफेचे वैशिष्ट्ये म्हणजे तेथे सहा फुट उंचीची भव्य गणेशमूर्ती आहे. मूर्तीचे बारकाईने निरीक्षण केल्यास ती दिगंबर अवस्थेत असल्याचे दिसते. दिगंबरावस्थेतील गणेशमूर्ती अतिशय दुर्मीळ असल्याचे सांगितले जाते. समोरच्या गणेश मंदिरातील मूर्तीदेखील दिगंबरावस्थेत आहे.
गडावर इतिहासाची साक्ष देणारे आठ शिलालेख आहेत. विदेशी संशोधकांनी सर्वप्रथम त्या लेखांकडे लक्ष वेधले. जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जेस, सिंक्लेअर यांनी प्रथम त्यावर टिपणे तयार केली. गो. नी. दांडेकर, रा.चिं. ढेरे, वि.भी.कोलते, म.रा.जोशी, आनंद पाळंदे, राजेश्वर गोस्वामी आदींनी शिलालेखांचे वाचन केले आहे. ‘तत्वसार’च्या शेवटी एका ओवीत शके १२३४ ला हरिश्चंद्र गडावर ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. प्राचीन काळात हा गड धर्मपीठ म्हणून मान्यता पावलेला होता.
गडावरील कातळ शिल्पे…
हरिश्चंद्रगडावरील सर्व भूरूपे म्हणजे निसर्गनिर्मित भव्य शिल्पेच आहेत! सामान्यभ्रंशामुळे तयार झालेला येथील रौद्रभीषण तरीही मोहक असणारा कोकणकडा, गडाच्या माथ्यावरील बालेकिल्ला, तारामती शिखराच्या पश्चिमेकडील उतारावर एकावर एक रचल्यासारख्या शिळा दिसतात. सकृतदर्शनी ती कुणाची तरी रिकामपणाची कामगिरी वाटते. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. उन, वारा, पाऊस यांसारख्या बाह्यकारकामुळे झालेल्या झीजेचा तो परिणाम असून, भौगोलिक भाषेत झाला tor असे म्हणतात.
दख्खनचे पठार ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकापासून निर्माण झाले. लाव्हा रसापासून सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली. साडेतेरा कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातून उफाळून आलेला हा लाव्हा पृष्ठभागावर क्षितीज समांतर पसरून दख्खनच्या पठाराचा जन्म झाला. उन, वारा, पाऊस यामुळे त्याची झिज होत राहिली आणि त्याला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. निसर्गनिर्मित अशी अनेक शिल्पे गडावर पाहण्यास मिळतात.
सामान्यभ्रंशामुळे तयार झालेला येथील कोकणकडा वर्षानुवर्षे धाडसी गिर्यारोहकांना साद घालत आहे. भ्रंश रेषेच्या एका बाजूची (पश्चिमेची) भूमी खाली सरकल्याने कड्यासारखा तीव्र उतार तयार झाला आहे. सुमारे दोन हजार फूट खोलीचा तो सरळसोट उतार हे तर कोकणकड्याचे रौद्रभीषण तरीही मोहक वाटणारे रूप. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत अनेक कोकणकडे आहेत. पण अंतर्वक्र नालाकृती कोकणकड्याची सर कोणत्याच कड्याला येणार नाही. कितीतरी वेळ बघत बसले तरी मन तृप्त होत नाही. त्या कड्याचे सौंदर्य, मोहकता न्याहळताना अनामिक भीतीने अंगावर काटा येतो. तरीही भयमिश्रित कुतूहलाने तेथे येणारा प्रत्येकजण त्याचे ते रौद्र रूप पुन्हा पुन्हा पाहत बसतो; डोळ्यांत साठवण्याची धडपड करतो. तेथील पावसाळ्यातील धुक्याचा अनुभव तर केवळ स्वप्नवतच! काळजात धडकी भरवणाऱ्या त्या कड्यालाही काही धाडसी गिर्यारोहकांनी नमवले आहे. अरविंद बर्वे नामक मुंबईकर निसर्गवेड्या तरुणाने तर स्वतःला त्या कड्यावरून खाली झोकून देऊन आपली इहलोकीची जीवनयात्रा संपवली. गडावरच्या पाण्याची व्यवस्था नष्ट करतानाच बालेकिल्ल्यालाही त्या गोष्टीची झळ बसली तशीच ती कोकणकड्यालाही बसली. माकिनटोश नामक ब्रिटीश सेनाधिकाऱ्याने कड्यावर चढाई करताना आधारासाठी असलेल्याय खोबणीची पुरती नासधूस केली.
इंद्रवज्राचा देखावा
कड्यावरून अतिशय दुर्मीळ असे वर्तुळाकार इंद्रधनुष्य दिसल्याची नोंद कॅप्टन साईक्स या इंग्रज अधिकाऱ्याने करून ठेवली आहे. ते अद्भुत दृश्य पश्चिमेस धुके आणि पूर्वेकडून सूर्यप्रकाश असला आणि रिमझिम पाऊस सुरू असला तरच दिसू शकेल. अशा विशिष्ट वेळी साईक्स घोड्यावरून रपेट मारत तेथे आला आणि त्याला त्याच्या सहकाऱ्यांसह त्याची प्रतिमा समोरच्या गोलाकार इंद्रधनूत पाहण्यास मिळाली. तो अचंबित झाला. कडा पाहण्यासाठी मंदिरापासून पश्चिमेस दोन किलोमीटर पायपीट करावी लागते.
बालेकिल्ला
हरिश्चंद्रगडाच्या दक्षिण माथ्यावर तोलारखिंडीतून वर चढून गेल्यावर डाव्या हाताला व्होल्कॅनिक प्लगसारखी (म्हणजे भूगर्भातील लाव्हा बाहेर पडतो ते मुख) रचना दिसते. लाव्हा रस बाहेर पडण्याच्या क्रियेमुळे तो भूभाग बाजूच्या भूभागापेक्षा उंच झालेला आहे. तोच हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला होय. तेथून कळसुबाई, रतनगड, आजोबा, घनचक्कर, भैरव, कुलंग,अलंग, मदन असा उत्तरेकडील तर माळशेज घाट, भैरव, नानाचा अंगठा, जीवधन यांपर्यंतचा दक्षिण पश्चिमेकडील मुलुख दृष्टिक्षेपात येतो. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी खास असा रस्ता नाही; मस्त रान तुडवत रस्ता शोधत जाणे हाच मार्ग!
तारामतीच्या शिखरावरील टॉर (tor)
हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या दक्षिणेकडील शिखर म्हणजे तारामती शिखर. त्या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची चार हजार सातशे बहात्तर फुट इतकी आहे. शिखराच्या दक्षिणेला तीव्र उताराचा कडा आहे. शिखराच्या धारेवरून पश्चिम बाजूला एकमेकांवर मुद्दाम रचून ठेवल्यासारख्या बऱ्याच शीळा (गाडग्या-मडक्याच्या उतरंडी प्रमाणे) दिसतात. प्रथमदर्शनी ती कामगिरी रिकामटेकड्या गुराख्याची असावी असे वाटते. मात्र वस्तुस्थिती तशी नसून ऊन, वारा आणि धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या क्रियेमुळे त्यातील मृदू खडकाची झीज होऊन त्यांचे विदारण झाले आणि कठीण खडक एकमेकांवर रचून ठेवल्याप्रमाणे दिसू लागले. भौगोलिक भाषेत त्याला tor असे म्हणतात. माथ्याचे ते दुर्मीळ असे वैशिष्ट्य. तेथेच विविधरंगी स्फटिके व खनिजे आढळून येतात. मात्र भटकंती करणाऱ्याने धोपटमार्ग सोडल्याखेरीज त्याला तेथील भू-शिल्पे दिसणार नाहीत. पश्चिमेला एकांटी मोठ्या दिमाखात उभे असलेले, तुलनेने कमी उंचीचे शिखर म्हणजे रोहिदासाचे शिखर. मात्र पुराणकाळातील हरिश्चंद्र राजा, तारामती व रोहिदास यांचा या शिखरांशी अर्थाअर्थी काही संबंध नाही.
रेड बोलची कपार
पाचनई गावातून गडाची चढण चढताना अंगावर येणाऱ्या उंच कड्याच्या अजस्र कपारीत खडकांच्या दोन थरांच्या मध्ये लाल-हिरवी राख सापडते. तिला भौगोलिक भाषेत ‘रेड बोल’ म्हणतात. ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकामुळे भूपृष्ठाला तडे गेले, मोठमोठ्या भेगा पडल्या, भ्रंश झाले. त्यानंतर त्या दख्खनच्या पठारावर पर्वत, पठारे, टेकड्या तयार झाल्या. त्या नैसर्गिक घटना तेवढ्यावरच थांबल्या नाहीत. सोसाट्याचा वारा, धो-धो कोसळणारा पाऊस त्यावर तुटून पडला. उन्हाचा आणि थंडीचाही त्यावर परिणाम होऊ लागला. त्यामुळे सतत क्षरण कार्य होत राहिले. मूळचे भू-आकार पुन्हा बदलू लागले. काही पर्वतांची उंची कमी होऊ लागली आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहांनी दऱ्या खोल होत गेल्या. तेथील नव्वद टक्के झीज पावसाने केली असून, त्यातूनच निसर्ग नावाच्या शिल्पकाराने असंख्य शिल्पे निर्माण केली!
गड परिसरातील जैवविविधता
भौगोलिक व नैसर्गिक अनुकूलतेमुळे हरिश्चंद्रगडाच्या परिसरात जैविक विविधताही मोठ्या प्रमाणावर आहे. त्या बाबतीत ‘हरिश्चंद्रा’चे जंगल देशातील समृद्ध ठिकाणांपैकी एक समजले जाते. असंख्य प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक व सरपटणारे प्राणी या सगळ्यांचे तेथे वैपुल्य आहे. गडावर स्वयंचलित वाहने जाण्याची सोय नसल्याने मानवी हस्तक्षेपापासून परिसर पुष्कळ सुरक्षित आहे.
गडाच्या माथ्यावर उत्तराभिमुख उतारावर सदाहरित जंगलाचा हिरवाजर्द पट्टा दिसतो आणि पठारावर असंख्य अल्पजीवी वनस्पती आढळतात. त्या पावसाळ्यात सजीव होतात. तेथे सुमारे पाच हजार मिलीमीटरच्या आसपास पाऊस कोसळतो. पावसाळा सुरू झाला की एरवी भकास वाटणारी तेथील पठारे हिरव्या चैतन्याने बहरतात. राजतेरडे, रानतीळ, रानकांडे, रानलसूण, सोनकी, पालेचिराईत, डायसोफिलिया, सायप्रस, शेराला अशा असंख्य अल्पजीवी वनस्पती सर्वत्र डोकावू लागतात. त्यांना फुलेही अवघ्या पंधरवड्यात येऊ लागतात. पठार जांभळ्या, हिरव्या, पिवळ्या, तांबड्या, गुलाबी अशा विविधरंगी रंगछटांनी नटून जाते. जुलै ते ऑक्टोबर या काळात पठारावर फुलोत्सवच सुरू असतो.
हरिश्चंद्रगडाच्या परिसरात जांभूळ, रामेठा, बामणी, दिंडा, सुरुंगी, फापती, करवंद, आंबा, पळस, फणस, शाल्मली, हिरडा, पळसवेल, पांढरी आदी वृक्ष आढळतात. वृक्षांची उंची कमी असते. घनदाट वृक्षांवर चढलेल्या राक्षसी वेली आणि खाली दाट उंच गवत, हे तेथील जंगलाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. इमारतीसाठी किंवा फर्निचरसाठी त्या लाकडांचा उपयोग नाही. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या उपयुक्त नसल्याने जंगलतोडीचे प्रमाण कमी आहे. मात्र जैविकदृष्ट्या त्या वनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कारवी ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती सह्याद्रीच्या माथ्यावर हजार-बाराशे मीटर उंचीवर आढळते. तिचे विपुल अस्तित्व हरिश्चंद्रगडाच्या चहुबाजूंनी आहे. ती दर सात वर्षांनी जांभळ्या रंगाच्या फुलांनी बहरते. वनस्पती फुललेल्या काळात पाहणे, ही अपूर्व आनंद देणारी घटना असते. कारवीने डोंगरउतारावरील मातीचे संधारण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. गिरिभ्रमण करणाऱ्यांनाही कारवीचा मोठा आधार तीव्र चढणीच्या अवघड पायवाटेने चढत असताना असतोच. अन्यथा डोंगरउतारावरील खोल दरीकडे पाहून अनेकांचे डोळे गरगरल्याशिवाय राहिले नसते. कोणत्याही रस्त्याने गडावर जाताना कारवीची भेट होतेच. फुले येऊन गेल्यावर कारवी मरते. नव्या कारवीचा दरवर्षी जन्म होतो.
तारामती शिखराच्या उत्तर उतारावरील विस्तीर्ण पठारावर मोठी झाडी, झुडपे कमी असली तरी असंख्य अल्पजीवी वनस्पतींचे वसतिस्थान तेथे आहे. अभ्यासकांनी त्याबाबत अभ्यास व सर्वेक्षण केले आहे. उन्हाळ्यात वाळलेल्या गवतामुळे आणि दिवसादेखील तालात गाणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजाने भकास वाटणारे ते निर्जन पठार पावसाळ्यात चैतन्याने न्हाऊन निघते. पिवळी सोनकी फुलल्यावर सारे पठार पीतवर्णी शालू पांघरते. कळलावी, चित्रक, देवनाळ, शतावरी, पांढरी यांसारख्या दुर्मीळ औषधी वनस्पतींचा तेथे आढळ आहे.
कळसुबाई अभयारण्यात कोल्हे, रानडुकरे, तरस, भेकर, खोकड, ससे, बिबटे, रानमांजर, साळींदर व भीमाशंकर अभयारण्य ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते शेकरू त्या परिसरात आढळतात. मात्र बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गरुड, ससाणे, खंड्या, बुलबुल, पर्वत कस्तूर, सुतार, मोर, तित्तर, पारव, घार, सुभग या पक्ष्यांचाही तेथील परिसरात वावर असतो. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग, फुरसे, घोणस, मण्यार या जातींचे विषारी साप त्या भागात आढळतात. विषारी- बिनविषारी इतर सापांचेही वास्तव्य असतेच.
संशोधन व सर्वेक्षण
गडावर पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. ३१ डिसेंबरला तर तेथे जत्रेचे स्वरूप येते.
शिलालेखांचा उल्लेख १८८४ च्या नगर जिल्ह्याच्या गॅझेटिअरमध्ये आढळतो. त्यात जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जेस, सिंक्लेअर यांचा समावेश आहे. शिलालेख वाचण्याचे काम वि. भि. कोलते, रा. चिं. ढेरे या देशी संशोधकांनी केले. त्याशिवाय म.रा. जोशी, आनंद पाळंदे, गो,नी,दांडेकर, राजेश्वर गोस्वामी, मिलिंद बोकिल आदींनी त्या गडाला भेट देऊन इतिहास, भाषा व आध्यात्मिक दृष्ट्या अभ्यासात भर घातली. ज्ञानदेवादी भावंडेदेखील तेथे येऊन गेल्याचा उल्लेख यात्रापर्वात एका लेखात आढळतो. तो लेख सुवर्णाक्षरांनीच मढवण्यात यावा अशी ‘गोनीदां’ची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
गड तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांचेही आकर्षणबिंदू ठरल्याचे उपलब्ध कागदपत्रे व नोंदींवरून दिसून येते. साईक्स नावाच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने तर तेथे बांधकामही केले होते. त्याचे अवशेष तेथे दिसतात. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या चरित्रात, ते ठाण्याचे उपजिल्हाधिकारी असताना (सन १९२९) गडावर आल्याचा उल्लेख आहे. त्यांना गडावरच थंडी वाजून आल्याने त्यांना डोली करून खाली नेण्यात आल्याचा मजकूर त्यांच्या चरित्रात आहे.
त्याखेरीज कितीतरी योगी सिद्धसाधक तेथे येऊन गेल्याचे उल्लेख आहेत. शैव, वैष्णव तसेच शाक्त संप्रदायांचे अवशेषही तेथे सापडतात.
तेथील वनस्पतीसृष्टीचे संशोधन ब्रिटिश काळापासून सुरू झाले आहे. १९०८ सालात तत्कालीन मुंबई इलाख्याचे (बॉम्बे प्रेसिडेन्सी) वनस्पती शास्रज्ञ डॉ. कुक यांनी तेथील झाड-झाडोऱ्याचा अभ्यास केला. १९६९ मध्ये पुणे येथील वनस्पती संरक्षणालयातील डॉ.बिलोरी व डॉ. हेमाद्री या दुकलीने तेथील तीनशेतीस जातींच्या वनस्पतींची नोंद केली आहे. त्याच विभागातील डॉ. सिंग व डॉ. प्रधान यांनी १९९० मध्ये गडाला भेट देऊन अभ्यास केला. तर संगमनेर येथील संशोधक प्रा. डॉ. मोहन वामन यांनी तेथील वनस्पतीसृष्टीचा तपशीलवार अभ्यास केला आहे. तेथील वनस्पतीसृष्टीचे ते महत्त्वाचे संशोधन मानले जाते. गुणवैशिष्ट्यांनुसार विश्लेषण करताना डॉ. वामन यांनी सहाशेएकोणतीस वनस्पतींची नोंद केली आहे. त्यात देशभरातूनच नामशेष होण्याच्या मार्गावरील ऐंशी औषधी वनस्पतींचे अस्तित्व त्यांनी शोधून काढले आहे. तर सोळा प्रकारच्या ऑर्किड जातीच्या वनस्पती त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
भीमाशंकर अभयारण्य ज्या शेकरू जातीच्या खारीसाठी देशभर प्रसिद्ध आहे, ती शेकरू तेथील तोलारखिंड परिसरात बऱ्यापैकी संख्येने दिसून येते. इतरही विविध प्राण्यांचे वसतिस्थान येथे आहे. तेथील प्राणिसृष्टीवर हवा तेवढा अभ्यास झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे तेथील भूगर्भशास्त्राच्या अभ्यासालादेखील बराच वाव असल्याचे दिसून येते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या कोथळे, पाचनई, लव्हाळी, कुमशेत, खिरेश्वर येथील आदिवासींचे गडाशी भावनिक नाते जुळलेले आहे. ते लोक महाशिवरात्रीच्या दिवशी गडावर जाऊन मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने हरिश्चंद्रेश्वराला अभिषेक घालतात.
भाऊसाहेब चासकर
Last Updated On – 21st March 2016
खुप छान
खुप छान
खुपच छान विवीधता पुर्ण ईतरां
खूपच छान. विविधतापूर्ण. इतरांपेक्षा वेगळी माहिती.
हरिश्चंद्रगडाची भटकंती
हरिश्चंद्रगडाची भटकंती करण्यापुर्वी खुप छान आणि भरपुर माहिती मिळाली. या पावसाळ्यात गडाची भटकंती करताना कोणती काळजी घ्यावी?
धन्यवाद…!
मी हा गड पाहिला मी आणि माझे
मी हा गड पाहिला. मी आणि माझे मित्र या गडाच्या प्रेमातच पडलो. आम्ही अनेक प्राध्यापक-शिक्षकांनी सलग 10 वर्षे दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत गडाची सफर केली. ती चार दिवसांची असे. इतक्या वेळा जाऊन गडाचा इतिहास कळवला नव्हता. तो ही माहिती वाचून कळाला. वाचताना परत सफर करीत आहोत असे वाटले. धन्यवाद.
khup sunder mahiti dili ahe…
khup sunder mahiti dili ahe… wachtana janu tithech safar kartoy asa ha anubhav ahe. khup chan . thank you. tumhi itaki utkrushta mahiti share kelyabaddle.
Comments are closed.