आमचे गाव बोरी अरब. त्याला अरबाची बोरी किंवा ‘बोरी खुर्द’ असेही म्हणतात. ते यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा या तालुक्यात येते. बोरीतील बरेचसे लोक स्थलांतरित असे आहेत. ते झाडीपट्टीमधून म्हणजे गोंदिया वगैरे भागातून कामाच्या शोधार्थ बोरीला आले आणि बोरी येथे असलेल्या उद्योगधंद्यांच्या सोयींमुळे तेथेच स्थायिक झाले. त्यामुळे बोरीमध्ये सर्व जातिधर्मांचे लोक राहतात, मात्र त्यांचे विभाग वेगवेगळे आहेत. त्यांच्या वस्त्या जातीनुसार आहेत- एस सी समाज स्वतंत्र, कुणबी-ब्राह्मण एकत्रित, मारवाडी स्वतंत्र अशा. ते सर्व लोक गुण्यागोविंदाने, न भांडता वर्षानुवर्षे राहत आहेत. लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी वेगवेगळ्या आहेत, परंतु नदीवर कपडे धुणे व पाणी भरणे यांसाठी मात्र स्त्रिया-मुली एकत्रित जातात व गप्पागोष्टी करतात !
शेती हाच गावाचा मुख्य व्यवसाय आहे. शेती मुख्यत: कुणबी व मारवाडी यांची आहे. इतर लोक मोलमजुरीची – निंदन, खुरपण, पेरणी, शेतफवारणी वगैरे – कामे करतात. त्यांपैकी बरीचशी कामे ट्रॅक्टरने होऊ लागली आहेत. शेतात कापूस, ज्वारी, तूर अशी पिके लावली जातात. तीच पिके जास्त घेतली जातात. अलिकडे सोयाबीनचे प्रमाण वाढले आहे. गावात मंगळवारी आठवडी बाजार भरतो. त्या दिवशी लोक बाजारहाट करण्यासाठी आजुबाजूच्या कंझारा, पिंपळगाव, ब्रह्मी, लाडखेड, लहान बोरी या खेडेगावांतून येतात. शाळा त्या दिवशी अर्ध्या दिवसाची असते.
नदीचे नाव गंगानदी. तिला अडान नदी असेही म्हणतात. स्त्रिया व मुली नदीच्या काठावरील रेतीमध्ये खड्डा करतात, त्यामुळे नदीच्या पाण्याचा झरा तेथे तयार होतो. थोड्या वेळाने तो खड्डा पाण्याने भरून जातो. मग त्यात घागर बुडवून पाणी घेतले जाते. ते पिण्याचे पाणी म्हणून घरी आणतात. त्या पाण्यात तुरीची डाळ लवकर शिजते असे म्हणतात. नदीच्या काठावर म्हणजे रेतीमध्ये भरपूर शंख-शिंपले, पाढऱ्या रंगाची गारगोटी म्हणजे चकमक- चमकणारे असे पांढरे दगड सापडतात. त्यापासून रांगोळी बनवण्यात येते. तरुण मुले नदीच्या खोल पाण्यात पोहण्यासाठी उतरतात. पोळ्याच्या दिवशी नदीवर बैलांना अंघोळीसाठी आणले जाते.
नदीमध्ये असलेल्या एका ठिकाणाला ‘लगीनबुडी’ असे म्हणतात. त्याचे कारण असे सांगतात, की एका रात्री दुसऱ्या एका गावाची लग्नाची वरात नदी ओलांडून नवरदेवासह लग्नघरी बैलगाडीतून जात होती. बैलगाड्या अनेक होत्या. प्रकाशासाठी त्यांच्याजवळ कंदील होते. एकामागे एक बैलगाड्या सावकाश चालत होत्या. त्या सर्वांना ते बोरी गावचे नसल्यामुळे पाणी किती खोल आहे याचा अंदाज आला नाही. नदीतील त्या ठिकाणची नैसर्गिक रचना खाली पाणी, वर खडक आणि पुन्हा खडकावर पाणी अशी आहे. व्यक्तीने खाली गेल्यानंतर वर येण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या डोक्याला खडक लागून तो परत खोल पाण्यात जातो. एकेक बैलगाडी व त्यातील लोक हे पाण्यात उतरत गेले आणि एकामागोमाग एक ते सर्व जण पाण्यात गडप झाले ! अशी कहाणी. तेव्हापासून त्या ठिकाणाला ‘लगीनबुडी’ असे म्हणतात; आणि अर्थातच त्या ठिकाणी कोणी फिरकतसुद्धा नाही.
पावसाळ्यात नदीला पूर येई. एकदा धान्याने भरलेला ट्रक पुलावरून घसरून वाहून गेला होता. तेव्हापासून नदीला पूर आल्यास व पुलावरून पाणी वाहू लागल्यास पुलाच्या दोन्ही बाजूंस गाड्यांची गर्दी होते. पुलावरून पाणी ओसरेपर्यंत वाहने थांबलेली असतात. तो जुना पूल पडला आहे व शासनाने तात्पुरती सोय दुसरीकडे करून दिली आहे. नदीवर धरण बांधून पाणी अडवण्यात आले आहे. तेथूनच शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा होतो. अडान नदीला पूर 2021 या वर्षी आला होता आणि त्यामुळे वाहनांची रहदारी आठ दिवस बंद करावी लागली होती.
बोरी गावात माठ आणि चहा हे प्रसिद्ध आहेत. माठ बस स्टॅण्डवर ठेवलेले असतात आणि चहासुद्धा तेथेच मिळतो ! येणाऱ्याजाणाऱ्या सर्व बसेस तेथे थांबत व प्रवासी लोक तेथे चहा घेत. बोरीतील माठासारखे माठ अन्यत्र कोठे पाहण्यास मिळत नाहीत. त्या माठांना आतून चोपडे व वरून बारीक बारीक रेती लावलेली असते. अशा माठांमध्ये पाणी उन्हाळ्यात थंड, पावसाळा व हिवाळा या दोन ऋतूंत कोमट राहते. आम्ही तीस-पस्तीस वर्षांपासून एकच माठ वापरत आहोत. मात्र नव्या काळात माठ तयार करण्यात येत नाहीत आणि चहा पिण्यासाठी कोणी बसमधून खाली उतरत नाही.
बोरी अरबला जिल्हा परिषदेची कन्या शाळा आहे. पहिली ते चौथीपर्यंत प्रत्येकी एक तुकडी आहे. मी तेथेच शिक्षण घेतले. पूर्वीच्या काळी, उजवा हात डाव्या कानाला किंवा डावा हात उजव्या कानाला डोक्यावरून लागला तरच शाळेत प्रवेश मिळे, ती रीत मुलामुलींचे वय किती ते कळावे/समजावे म्हणावे म्हणून मोजण्याची अशी एक पद्धत होती. बेसिक शाळा पहिली ते चौथीपर्यंत सर्व मुले व पाचवी ते सातवीपर्यंत मुलेमुली एकत्र असत.
गांधीवादी विचारांच्या गावातीलच मारवाडी लोकांनी- राजाबाबू, ओमबाबू यांनी- आठवी ते दहावीपर्यंत शाळा सुरू केली. शाळा सुरुवातीला त्यांच्या गोदामात भरत असे. नंतर शाळेसाठी जागा घेऊन बांधकाम करण्यात आले. कॉलेजसुद्धा केवळ आर्ट आणि कॉमर्ससाठी (सायन्ससाठी नाही) सुरू झालेले आहे.
सडकेच्या दोन्ही बाजूंला कडुलिंबाची मोठमोठी झाडे लांबच्या लांबपर्यंत असत. मध्यभागी काळीभोर अशी सडक ! सुंदर असे ते दृश्य असे. झाडांवर दिवसभर कावळे असत आणि त्यांचा काव-काव असा आवाज सदोदित कानी पडे. नव्या काळात दोन्हींकडील झाडे तोडली आहेत व त्या जागी दुसरी नवी वेगवेगळी झाडे लावली आहेत. कावळे दिसेनासे झाले आहेत.
बोरीला कापसाचा कारखाना- जिन फॅक्टरी आहे. आजुबाजूच्या गावांतील शेतकरी त्यांचा कापूस तेथे आणतात. तेथे कापसाच्या गंज्याच्या गंज्या लावतात. वेगवेगळी मशिनरी तेथे आहे. कापसापासून सरकी वेगळी करण्यात येते. कापूस बारदानांत भरून तो सूतगिरणीत नेला जातो. लोकांना शेतीबरोबर तो जोडधंदा मिळाला आहे. आमच्या गावात- बोरी अरबला शकुंतला एक्सप्रेस नावाची रेल्वे होती. ती ब्रिटिशांनी सुरू केली होती. कारण यवतमाळला कापूस जास्त प्रमाणात होत होता. कापसाच्या त्या मालाच्या वाहतुकीसाठी ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी ती रेल्वे सुरू केली होती. बरेचसे लोक यवतमाळला रेल्वेनेच जाणे-येणे करत. ती रेल्वे होती यवतमाळ ते मूर्तिजापूर व मूर्तिजापूर ते यवतमाळ अशी. तिची वेळ होती सकाळी सात-दहाला यवतमाळला जाण्याची आणि परत दुपारी तीन वाजता यवतमाळ ते मूर्तिजापूरला येण्याची.
शकुंतला रेल्वेचा शिट्टीचा आवाज, तिच्या इंजिनाचा आवाज व भक् ऽ भक् ऽ ऽ निघणारा धूर यांमुळे वातावरणात एक प्रकारचे चैतन्य निर्माण होत होते. ती रेल्वे बंद झाली. परंतु अजून ते मंतरलेले दिवस जुन्या लोकांना आठवतात. घरोघरी नळ आले आहेत, रस्ते पक्के झाले आहेत, गावातील शेतकऱ्यांची मुले शहरात नोकरी करू लागली आहेत, कच्च्या घरांचे रूपांतर पक्क्या घरांत झाले आहे.
जिल्हा परिषद कन्या शाळेसमोर भरपूर मोकळी जागा होती. तेथे महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर गवताची गुजरी भरत असे. गुजरी म्हणजे गवताच्या भाऱ्यांची विक्री. मजूर लोक दिवसभर शेतात निंदन करून गवत जमा करत. त्या गवतावर त्या मजुरांची मालकी असे. त्यामुळे मजूर लोक जमा केलेले ते गवत एका मोठ्या कपड्यांत बांधत व डोक्यावर घेऊन घरी आणत. घरी आणल्यानंतर त्याला व्यवस्थित सजवत, म्हणजे ताठपणा येण्यास काठी टाकून त्याच्या आजुबाजूला गवत टाकत व दोरीने व्यवस्थित बांधत. तो झाला गवताचा भारा ! त्या गवताच्या भाऱ्याची गुजरी भरायची- संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा-साडेदहापर्यंत. तो भारा मजूर लोक ज्यांच्याकडे काम करत ते मारवाडी लोकच त्यांच्या गाई-गुरांसाठी विकत घेत. ते मजूर तो भारा पुन्हा डोक्यावर घेऊन मालकाच्या गोठ्यात आणून टाकत. त्या भाऱ्याची किंमत फारशी नसे. ती एक, दोन, अडीच किंवा तीन रुपये अशी, गवताचा प्रकार पाहून ठरत असे.
शाळेसमोर रामायणाचे प्रात्यक्षिक होई. संध्याकाळचे जेवण झाले, की लोक रामायण पाहण्यास येत. पडद्यावरील चित्रपटसुद्धा तेथेच येत असत. ती करमणुकीची साधने होती.
पोळा-नागपंचमी-दसरा हे सण गावात रीतीने साजरे होतात. नागपंचमीला फक्त वरणफळे तेवढी करतात.
नव्या काळात पूर्वीपेक्षा खूप साऱ्या सुधारणा झाल्या आहेत. पक्के रस्ते, पक्की घरे, लोक बैलगाडीऐवजी टू व्हिलर, रिक्शा अशा नव्या यांत्रिक वाहनांनी कामाला जातात. त्या प्रवास भाड्याचे पैसे शेतमालक देतो.
– रत्नकला बनसोड 9503877175 bhimraobansod@gmail.com
————————————————————————————————————————————————–
खुपच छान माहिती… 👍👍👍