‘गरिबाची बायको आणि शेतकऱ्याचा बैल आजारी पडू नये’ अशी एक ग्रामीण म्हण आहे. आणि यंदातर दुष्काळाच्या माराने शेतकरीच आजारी पडला आहे. याचे पडसाद उमटलेले दिसताहेत ते बैलपोळ्याच्या सणावर. राज्यातील तीव्र दुष्काळामुळे बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. दरवर्षी खेड्यापाड्यातून मोठ्या उत्साहाने साजरा होणा-या बैलपोळ्यांला यंदा रंगच चढला नसल्याचे चित्र राज्यात दिसून आले.
भयावह दुष्काळामुळे चारा व पाणी टंचाईने ग्रासलेल्या शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी दुष्काळी भागांसाठी काही ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये जनावरे दाखल केली. स्वतः शेतकरीही छावणीतच आश्रयाला होते . त्यामुळे बळीराजाला यंदाचा बैलपोळा चारा छावण्यांमध्येच साजरा करण्याची वेळ आली. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे बैलपोळा केवळ बैलपूजेपुरताच मर्यादीत राहिला. यावर्षी अतिवृष्टीने बैल सतत पाण्यातच आहेत. शेतात पाण्याचे डोह साचले असल्याने शेतातील कामे बंद आहेत. या कारणांमुळे बैलपोळ्याच्या मिरवणुका, बैलांच्या शर्यती आणि बैलपोळ्याशी निगडीत प्रथा पार पाडण्यात शेतक-यांचा फारसा उत्साह दिसून आला नाही.
अतिरिक्त पावसाने हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने यंदाचा बैलपोळा चिंतेच्या सावटाखाली साजरा झाला. या वर्षी सुरुवातीस झालेल्या पावसाने पिकांनी चांगला जोर धरला होता. यामुळे व्यापाऱ्यांनी एक-दीड महिन्यापूर्वीच पोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली सर्व पिके वाया गेली. याचा परिणाम यंदाच्या पोळ्याच्या बाजारावरही झाला. बाजारपेठेतील या साहित्याकडे बहुतांश शेतकरी फिरकलेही नाहीत. बैलांच्या सजावटीसाठी नवे साहित्य खरेदी करण्याऐवजी शेतकऱ्यांनी यंदा गेल्या वर्षीच्या मटाटय़ा, गळमाळा, चौरे, शेंब्या, घाटी, चंगाळ्या, रेशीममाळा, कमरपट्टा, बाशिंग स्वच्छ आणि दुरुस्त करून वापरले. ज्या शेतक-यांना जोडधंदा किंवा नोकरीचा आधार आहे त्यांनी बैलपोळा उत्सांहात साजरा केला. इतर शेतक-यांना मात्र हाती पैसा नसताना आणि डोक्यावर आभाळ फाटलेले असताना बैलपोळा कसा साजरा करायचा ही चिंता भेडसावत राहिली.
परिस्थिती बिकट असली तरी वर्षातून एकदा येणारा हा सण रिकामा जाऊ द्यायचा नाही, या उद्देशाने शेतक-यांनी उसने अवसान आणत पुढील वर्षी सर्व मनाप्रमाणे होईल या आशेवर बैलपोळा साजरा केला. चांगली वृष्टी झालेले भाग वगळले तर राज्यात इतर ठिकाणी बैलपोळ्याचा दरवर्षीप्रमाणे रंग दिसून आला नाही. बळीराजाच्या घरी वर्षातून एकदा होणा-या कोडकौतुकाला यंदा बैल पारखाच राहिला.
– संपादक
thinkm2010@gmail.com